Categories
संपादकीय

विज्ञानगौरव

फेब्रुवारी – २०१७

28 फेबु्रवारी हा दिवस प्रतिवर्षी विज्ञानदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विज्ञानाचा गौरव करणारे कार्यक्रम शैक्षणिक संस्थांमधून साजरे होतात. आपल्या व्यवहारात सर्वत्र विज्ञानावर आधारित साधनांची रेलचेल झालेली दिसते. आपण साधनांचा सतत वापर करीत असल्यामुळे ही साधने निर्माण कशी झाली, याबाबत आपणाला कुतूहल वाटेनासे झाले आहे. विज्ञानाच्या प्रगतीचा गौरवशाली इतिहास समजून घेतला, तर मन आश्चर्याने भरून जाते.

17 व्या शतकात विज्ञानाची कळ आपल्या हाती आली. गॅलिलिओ आणि न्यूटन यांनी सृष्टीतील घडामोडींबाबत एक नवा विचार मांडला. निसर्ग हा नियमबद्ध आहे आणि हे नियम बुद्धीने शोधता येतात हा विचार मोठा क्रांतिकारक विचार होय. विज्ञानपूर्व काळात नैसर्गिक घटनांचे कारण देव नावाची महाशक्ती आहे, असा समज होता. न्यूटनने देव निसर्गातील घडामोडीत हस्तक्षेप करत नाही, हे स्पष्ट करून विश्वातील पदार्थांच्या गतीबाबत तीन नियम मांडले. हे नियम आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम यांच्या मदतीने आकाशातील ग्रहगोलांच्या गतीचे स्पष्टीकरण दिले. विश्वातील घडामोडींचे नियम वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून बुद्धीने शोधता येतात, हा विचार मोठा क्रांतिकारक होय.

न्यूटननंतर वैज्ञानिक पद्धतीचा अंमल युरोप खंडात झपाट्याने वाढू लागला. भौतिक, रासायनिक, जैविक क्षेत्रात नवे नियम शोधले गेले आणि या नियमांचा वापर करून नवीनवी साधने निर्माण झाली. तंत्रविज्ञान विकसित झाले.

विज्ञानाच्या विकासाचा विचार करताना तीन प्रकारचे परिणाम समोर येतात. जग कसं चालतं, जगाची निर्मिती कशी झाली, याचं उत्तर विज्ञानाच्या नियमाद्वारे आपणाला मिळतं. दुसरा परिणाम म्हणजे विज्ञान-नियमाचा वापर करून यंत्रनिर्मिती होऊ लागली. दळणवळण, करमणूक, आरोग्य अशा विविध क्षेत्रात ही साधने आपल्या मदतीला उपलब्ध झाली. पण या दोन परिणामांपेक्षा आणखी एक महत्त्वाचा परिणाम विज्ञानातून मिळाला. तो म्हणजे आपल्या चुकीच्या समजुतींचे निराकरण.

आपले आजार दैवी अवकृपेमुळे होतात, ही गैरसमजूत विज्ञानाने दूर केली. महारोग म्हणजे मागील जन्मीच्या पापाला शिक्षा, हा भ्रम विज्ञानाने दूर केला. एखाद्या बाईला मूल होत नाही त्याला ती कारण आहे, हे अज्ञान विज्ञानाने दूर केले. मांडूळ सापाला दोन तोंडे नसतात. त्याचे शेपूट जाड असल्याने ते तोंडासारखे दिसते. हा साप गुप्तधन शोधून देतो, हे असत्य विज्ञानामुळेच कळाले. सर्व माणसाच्या रक्ताचा रंग लालच असतो. मग जातीचा अभिमान कशासाठी, हा विज्ञानाचा सवाल आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील विविध अंधविश्वासाला आणि चुकीच्या परंपरांना विज्ञान उघड करते. विज्ञान हे अशा प्रकारे अज्ञानाचा भेद करते म्हणून त्याचा प्रचार सर्वत्र व्हावा. सत्यशोधक विज्ञान यासाठी महत्त्वाचे आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार सर्वत्र व्हावा. वैज्ञानिक दृष्टी आणि पद्धती प्रभावीपणे प्रसारित व्हावी, हा संदेश विज्ञानदिनी घेऊया!