Categories
मंथन

आत्म्याशी बोलणे हा मानसिक आजार

ऑक्टोबर - २०१८

समाजातील सध्याच्या वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकारहे अभियान गेले तीन वर्षे चालवत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी अंनिसने केलेले सगळे प्रयत्न हे अहिंसक आणि संवैधानिक होते. या पार्श्वभूमीवर समाजातील जमावाची वाढती हिंसा आणि टोकाच्या धार्मिक प्रभावामधून झालेली बुरारीसारखी कुटुंबाच्या आत्महत्येची हिंसा आणि तेलंगणामध्ये झालेली प्रणयची हत्या याविषयी मांडणी करणारे दोन टिपणवजा लेख प्रसिद्ध करीत आहे. संपादक

दिल्लीतील बुरारी येथील सामूहिक आत्महत्या प्रकरण

दिल्लीमधील बुरारी भागात भाटीया कुटुंबातील 11 व्यक्तींच्या संशयास्पद मृत्यूने राजधानी हादरली. रात्रीपर्यंत सकृतदर्शनी सगळे व्यवस्थित चाललेल्या कुटुंबातील वृध्द कुटुंबप्रमुखांच्या पासून ते लहान मुलांच्या पर्यंत तीन पिढ्यातील स्त्री आणि पुरुष सकाळी फाशी घेतलेल्या स्थितीत दिसून आले. यामधील एक तरुण मुलीचे तर पुढील महिन्यात लग्न देखील होणार होते. आतापर्यंतच्या पोलिस तपासात पुढे आलेल्या गोष्टी ध्यानात घेता बाहेरून कुणी येऊन हे कृत्य केल्याची शक्यता जवळजवळ निकालात निघाली आहे.मोक्ष मिळवण्याच्या भ्रामक कल्पनेला बळी पडून कुटुंबातील लोकांनी केलेल्या अघोरी साधनेच्या प्रकारातून या आत्महत्या घडल्याचे दिसते आहे.भाटीया कुटुंबातील ललित हा मुलगा हा जास्त प्रमाणात आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी रस घेत असे आणि त्याच्या डायरीमध्ये मोक्ष मिळणे मृत्यूपश्चातचे आयुष्य, अघोरी साधनेसाठी करायची तयारी अशा अनेक गोष्टींचे संदर्भ मिळतात. ज्या स्टूलवर उभे राहून हे गळफास घेतले गेले तो स्टूल शेजारच्या कुटुंबाच्या कडून घरी आणताना या कुटुंबातील व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे. सकृतदर्शनी नॉर्मल दिसणारी माणसे इतक्या टोकाची कृती कशी काय करू शकतात आणि एकाच वेळी कुटुंबातील सर्वच्या सर्व अकरा लोक आत्महत्येसारखे कृत्य कसे करू शकतात, असे कोडे आपल्यातील अनेक जणांना पडले असेल म्हणून यामागचे मानसिक आणि अंधश्रद्धेच्या बाजूने जाणारी कारणे जरा समजून घेऊया.

त्यातील पहिले कारण म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपापल्या दैनंदिन आयुष्यापेक्षा मृत्यूनंतरच्या आयुष्याला खूप जास्त महत्त्व. यामधूनच आत्मा, पुनर्जन्म, प्लान्चेट करून मृत आत्म्यांशी बोलणे या पूर्णत: अवैज्ञानिक गोष्टींच्या वर विश्वास ठेवणारे लोक आपल्याला आजूबाजूला आढळतात. असा विश्वास ठेवणार्‍यांमध्ये देखील विविध प्रकार असतात. काही लोकांच्यात केवळ मृत्यूच्या भीतीतून सावरण्यासाठी भावनिक आधार एवढेच त्या विश्वासाचे त्याचे स्वरूप असते. जरी आत्मा, पुनर्जन्म या कल्पना ते मनात असले, तरी आपल्या दैनंदिन आयुष्यात ते त्या कल्पनांना धरून फारशी कृती करीत नसतात. पण समाजातील काही माणसांच्या मध्ये दैनंदिन जगण्याचे वास्तव आणि कल्पना यामधील फरक समजून येण्याची क्षमता कमी होते, ती माणसे मात्र या कल्पनांच्या आहारी जाऊन दैनंदिन आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी या गोष्टींचा आधार घेऊ लागतात. त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी या मृत आत्म्याच्या प्रभावातून होतात असे मानणे, काही चांगले घडावे म्हणून त्यांची पूजा करणे, त्यासाठी अघोरी विधी करणे, तांत्रिकांचा आधार घेणे अशा गोष्टी देखील हे लोक करताना दिसतात. कुटुंबातील एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू आर्थिक अथवा कौटुंबिक मतभेद यांच्या ताणांच्या मधून असे वर्तन वाढू शकते. भाटीया कुटुंबाच्या बाबतीत देखील असेच झाल्याची शक्यता जास्त वाटते. 2008 साली ललित भाटीयाच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा आध्यात्मिक कल वाढला, असे सांगितले जाते. केवळ तेवढेच नाही तर त्यांच्या साधनेदरम्यान त्यांच्या वडिलांचा आत्मा त्यांच्याशी बोलत असे, अशी देखील माहिती मिळते आहे. वडिलांच्या आत्म्याच्या सांगण्यावरून देखील ललित काही गोष्टी करीत असत, अशी माहिती पुढे येत आहे. मानसशास्त्राच्या भाषेत अशा स्वरूपाचे आवाज ऐकायला येणे अथवा मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भ्रम तयार होणे हे तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजाराचे (सायकोसिस) लक्षण मानले जाते. यामध्ये त्या व्यक्तीचा वास्तवाशी असलेला संबंध कमी होऊन भासांच्या दुनियेतील गोष्टींच्या वर अधिक विश्वास बसू लागतो. त्या व्यक्तीची कृती देखील तशीच होऊ लागते. या स्वरूपाच्या व्यक्तींचे त्यांच्या भावविश्वातील या भास आणि भ्रमांच्या पलिकडची वर्तणूक अगदी नॉर्मल माणसाच्या सारखी असते. त्यांच्या मनाचा केवळ एकच भाग आजारी पडल्यामुळे दुरून बघणार्‍या व्यक्तीला ही लक्षणे ध्यानात येत नाहीत. जर त्यांच्या लक्षणाची भाषा ही आध्यात्मिक स्वरुपाची असेल तर अनेकदा अशा लोकांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन काही अतींद्रिय अनुभव येणारी सिद्ध व्यक्ती असा होऊ लागतो. मानसशास्त्र आणि अध्यात्म यांच्या दोन्ही विषयीच्या टोकाच्या अज्ञानातून ही परिस्थिती उद्भवते. अशा व्यक्ती कुटुंबातील बाकीच्या लोकांच्यावर त्यांचा प्रभाव टाकू शकतात. यामध्ये त्या व्यक्तीच्या भास आणि भ्रमांची व्याप्ती वाढून कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील त्या गोष्टी खर्‍या वाटू लागतात. मनोविकाराच्या भाषेत याला shared psychosis असे म्हणतात. अशा भास-भ्रमाच्या कल्पनांनी कुटुंबंच्या कुटुंबं प्रभावित झालेली काही प्रकरणे मनोविकारतज्ज्ञ बघत असतात. मुंबईत काही वर्षांच्या पूर्वी असेच एक हत्याकांड झाल्याचे बर्‍याच जणांना आठवत असेल. भारताच्या बाहेर देखील अशी प्रकारणे झाली आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा विविध देशांच्या मध्ये अशा घटना घडल्या आहेत. मेलबोर्नमधील पाच जणांचे एक कुटुंब कोणी तरी आपल्याला जीवे मारणार आहे, अशा स्वरूपाचा भ्रम झाल्याने दुसर्‍या प्रांतात पळून गेल्याची नोंद आहे. 2011 साली तर shared psychosis विषयावर अपार्ट (APART) नावाचा सिनेमा देखील आला होता. या मधील नवरा आणि बायकोला त्यांना कोणी तरी ठार मारणार आहे, अशा भ्रमाने ग्रासलेले असते. भाटीया कुटुंबाच्या बाबतीत वरील गोष्टी घडल्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे.पण shared psychosis मधून कुठल्याही कुटुंबातील इतक्या लोकांनी आत्महत्या केल्याची बुरारी येथील पहिलीच घटना असेल. काही वेळा या स्वरूपाचे टोकाचे विचार मानणारे लोकांचे गट (cult) तयार होतात. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या खुनाच्या प्रकरणात ज्या संस्थांचे लोक पकडले गेले आहेत अशा काही संस्था देखील अशाच प्रकारचे गट म्हणून काम करतात. या गटांच्या मध्ये पारलौकिक कल्याणाला दैनंदिन आयुष्याच्या पेक्षा अधिक महत्त्व दिले जाते. पाताळातील अघोरी शक्ती, भूत, राक्षस अशा गोष्टी आपल्या दैनंदिन जीवाच्या वर प्रभाव करतात, असे मानतात आणि त्यांचा परिणाम कमी व्हावा म्हणू कर्मकांडे देखील करतात. कलकत्यात पूर्वी अस्तित्वात असलेले आनंद मार्गी हा cult किंवा जपान मधील ओम शिन्रीक्यो (Aum Shinrikyo) नावाचा पंथ हे या प्रकारात मोडतात. ओम शिन्रीक्यो पंथांच्या लोकांनी तर अशाच विचारांच्या प्रभावाच्या खाली टोकियोमध्ये सिरीन विषारी वायूने हल्ला केला होता. अंतिम सत्य शोधण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत असा त्यांचा दावा होता. जपान सरकारने दहशतवादी संघटन घोषित करून त्यांच्या मुसक्या आवळल्या.

दिल्लीतील बुरारीमध्ये घडलेल्या घटनांच्या सारखे प्रसंग टाळायचे असतील तर आपल्याला काही गोष्टी करायला लागतील.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना वैज्ञानिक आधार नाही, अशा पुनर्जन्म, आत्मा-परमात्मा अशा संकल्पनांची चिकित्सा करायला हवी. मनोरंजन अथवा गोष्टी म्हणून या गोष्टी चर्चिल्या जाणे एकवेळ आपण समजू शकतो; पण त्या गोष्टीवर आपण आपल्या आयुष्यातील निर्णय घेऊ शकणे, हे अत्यंत धोकादायक आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडचणी येत असतात आणि आपण स्वत:च्या बुद्धीचा वापर करून आणि मित्रमंडळींची मदत घेऊन त्या सोडवू शकतो. त्यासाठी अघोरी गोष्टींची गरज नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. भाटीया कुटुंबातील एकाही व्यक्तीला स्वत:च्या तोंडाला आणि डोळ्याला पट्टी लावून मानेला फास लावला तर काय होऊ शकते, याचा विचार आला नाही यावरूनच चिकित्सक मनोवृत्ती या समाजात रुजवण्यासाठी किती प्रयत्न करायची गरज आहे, हे लक्षात येते. आंधळेपणाने लोक जेव्हा गोष्टी मान्य करू लागतात, तेव्हा अशा गोष्टी समाजाच्या सर्व स्तरांच्या मध्ये घडू लागतात.

मानसिक आरोग्याच्याविषयी आपल्या समाजात असलेले अज्ञान दूर करणे, हे देखील अशा गोष्टी टाळण्यासाठी आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांच्या कडे कलंकाच्या नजरेतून बघितल्यामुळे मानसिक अवस्थांसाठी आपल्याकडे मदत घेणे टाळले जाते. योग्य वेळी मानसतज्ज्ञांची मदत घेतली तर ‘बुरारी’ सारख्या घटना टाळता येऊ शकतात. समाजातील अधिकाधिक लोकांना मानसिक आरोग्याविषयी प्रथमोपचाराची माहिती देऊन मानसमित्र म्हणून प्रशिक्षण देण्याचा उपक्रम महाराष्ट्र अंनिस चालवते, असे अनेक मानसमित्रमैत्रिणी समाजात तयार व्हायला हव्यात बा. भ. बोरकर म्हणतात, त्याप्रमाणे

‘’स्वर्ग नको सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा

तृप्ति नको मज मुक्ती नको, पण येथील हर्ष नि शोक हवा”

या भावनेने जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर असे प्रसंग आपण टाळू शकू, असे वाटते.