इचलकरंजी येथील म.अं.नि.स.चे ज्येष्ठ कार्यकर्ते टी. आर. शिंदे यांचे 2 ऑक्टोबर 2017 रोजी निधन झाले. त्यांचा जन्म 11 ऑगस्ट 1931 रोजी शितोळ अंकली (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे झाला होता. ते 1949 पासून इचलकरंजी येथे राहत होते.
महाराष्ट्रातील महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे ते काम करत होते. केशवराव विचारे, डी. एस. नार्वेकर गुरुजी आणि पुण्याचे बारवकर गुरुजी यांनी इचलकरंजीमध्ये बौद्धिक क्लास, सत्यशोधकी विद्यार्थी संघ या नावे अवधूत आखाडा चालू केला. त्याचे हे निवडक विद्यार्थ्यांपैकी एक. टी. आर. शिंदे (आबा). बौद्धिक क्लासच्या जडणघडणीतून ते पुढे काँग्रेसमध्ये इंटकचे (कामगार संघटना काँग्रेस प्रेणित) सेक्रेटरी म्हणून नावारुपास आले. इचलकरंजी नगरपरिषदेत अॅक्ट्रॉय क्लार्क म्हणून नोकरीस लागले. नोकरी लागल्यापासून 5 ते 6 वर्षांतच नोकरीचा राजीनामा देऊन पुढे ते कलानगर भागातून नगरसेवक झाले. इचलकरंजीच्या मराठा मंडळाचे सदस्य ते होतेच; पुढे ते मंडळाच्या सुकाणू कमिटीचे सदस्यही झाले. शहरात सत्यशोधकी बौद्धिक क्लास चालू केले. समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापनेपासून ते कार्यकारिणीत होते; शिवाय शहराचे निमंत्रक म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेपासून इचलकरंजी शहरात समितीची चळवळ मोठी करण्यात आणि कार्यकर्ते जोडण्यात सतत त्यांचा अग्रभाग होता. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे शहरातील सभासद करण्यात, मासिकाचा प्रचार करण्यात आणि वार्षिक अंकास शहरातून जाहिराती गोळा करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सत्यशोधकी विचारानुसार मरणोत्तर नेत्रदान व देहदान करणारे ते सच्चे कार्यकर्ते ठरले. त्यांच्या स्मृतीस सलाम!