Categories
अभिवादन

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणारे : प्रा. पी. एम. भार्गव

वार्षिकांक - २०१७

विज्ञान क्षेत्रातील बहुतेक शास्त्रज्ञ, सामाजिक प्रश्नांबाबत उदासीन असतात. प्रा. पी. एम. भार्गव याला अपवाद होते. रसायनशास्त्र सेल्युलर आणि मॉल्युक्युलर बायोलॉजी या मूलभूत विज्ञान शाखांत त्यांनी मौलिक संशोधन केले.

पी. एम. भार्गव यांचे विशेष म्हणजे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारासाठी केलेले विशेष प्रयत्न. अंधश्रद्धांवर ते प्रहार करीत. बुवाबाजीवर आघात करीत. विद्यापीठात ज्योतिष शिकवण्याला त्यांचा विरोध होता. त्यासाठी ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढले. अशा या सामाजिक जाणिवा प्रखर असणार्‍या वैज्ञानिकाचा परिचय स्फूर्तिदायी आहे.

दि. 22 फेबु्रवारी 1928 रोजी अजमेर, राजस्थान येथे डॉ. पुष्प मित्र भार्गव तथा डॉ. पी. एम. भार्गव यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील डॉ. रामचंद्र व आईचे नाव गायत्री होय. वडील व्यवसायाने डॉक्टर होते. वयाच्या 10 व्या वर्षी त्यांच्या कुटुंबियांनी वाराणसी येथे स्थलांतर केले आणि तेथेच बेसंट थिओसॉफिकल स्कूलमध्ये खर्‍या अर्थाने त्यांचे शिक्षण थेट 9 वी पासून सुरू झाले. तोपर्यंत आजोबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण घरीच सुरू होते. शालेय शिक्षणानंतर माध्यमिक शिक्षण क्वीन्स कॉलेजमध्ये झाले. बी.एस्सी. पदवी 1944 मध्ये भौतिक, रसायन आणि गणित या विषयांमध्ये प्राप्त केली. 1946 मध्ये एम.एस्सी. ही पदवी ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये प्राप्त केली आणि त्यानंतर लखनौ विद्यापीठातून पीएच.डी. पदवी सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी प्राप्त केली. पीएच.डी.नंतर ते हैदराबाद येथे स्थायिक झाले.

1950 ते 1953 दरम्यान त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आणि नंतर उस्मानिया विद्यापीठ येथे संशोधनकार्य केले. 1953 मध्ये ते कर्करोगावर संशोधन करणार्‍या मॅकरडले मेमोरिअल लॅबोरेटरी, युनिव्हर्सिटी ऑफ बिस्कॉनसिन, मेडिसॉन येथे पोस्ट डॉक्टरल फेलोशीप अंतर्गत संशोधनासाठी गेले. चार्ल्स हेडलबर्गर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधनकार्य केले. 1956-57 मध्ये त्यांनी राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन संस्था, लंडनमध्ये वेलकम ट्रस्टचे रिसर्च फेलो म्हणून संशोधन कार्य केले. याच ठिकाणी त्यांचे संशोधनाचे क्षेत्र रसायनशास्त्राकडून जीवशास्त्राकडे बदलले. 1958 मध्ये भारतात परत आल्यानंतर पुन्हा हैदराबाद येथील अगोदरच्याच संस्थेत संशोधनकार्य सुरू केले. संशोधनाच्या निमित्ताने अमेरिका, लंडन, फ्रान्स, जर्मनी इत्यादी 50 देशांत जाऊन जागतिक स्तरावरील वैद्यकीय परिषदांमध्ये शोधनिबंधाचे सादरीकरण केले; तसेच अनेक परिषदांच्या अध्यक्षपदीही त्यांची निवड झाली होती. त्यांचे 125 हून अधिक संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले.

सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिकुलर बायोलॉजी या राष्ट्राला भूषणावह अशा महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना 1 एप्रिल 1977 रोजी डॉ. पी. एम. भार्गव यांच्या नेतृत्वाखाली झाली. सुरुवातीपासून ते 1990 पर्यंत ते या संस्थेच्या संचालकपदी होते आणि तेथूनच ते निवृत्तदेखील झाले.

पी. एम. भार्गव हे सरकारी धोरणांवर नेहमीच आक्षेप घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे उपाध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले. राष्ट्रीय संरक्षण सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी देखील त्यांनी कार्य केले. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाद्वारा निर्देशित जेनेटिक इंजिनिअरिंग कमिटीवर देखील कार्य केले आहे. जेनेटिकली मॉडीफाईड अन्नधान्यास, शेतीच्या वाणास त्यांनी भारतात येण्यापासून विरोध केला. बायोटेक्नॉलॉजी रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया या कायद्याच्या प्रस्तावाला देेखील हा कायदा अवैज्ञानिक, अंतर्विसंगत, लोकांच्या भल्यासाठी नसणारा आणि संविधानाच्या तरतुदींना छेद देणारा आहे, असे सांगून विरोध केला.

पी. एम. भार्गव हे विज्ञानाचा; तसेच विवेकवादाचा देखील प्रसार, प्रचार करणारे आणि त्याचबरोबर अंधश्रद्धेच्या विरोधात कार्यरत होते. 1946 मध्ये स्थापन झालेल्या असोसिएशन ऑफ सायंटिफिक वर्कर्स इन इंडिया या वैज्ञानिकांच्या ट्रेड युनियनशी ते संबंधित मार्गदर्शक होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. जानेवारी 1964 मध्ये त्यांनी सतीश धवन आणि विज्ञानाचे इतिहासकार अब्दुर रहमान यांच्या समवेत ‘सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ सायंटिफिक टेम्पर’ची स्थापना हैदराबाद येथे केली. विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांच्याशी संबंधित अनेक चर्चासत्रांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि समाजात असलेल्या अंधश्रद्धा, रुढी, प्रथा, परंपरा, कर्मकांडे इत्यादींवर हल्ला चढविला. देशातील अनेक तथाकथित आध्यात्मिक संत, गुरू यांच्या विरोधात देखील त्यांनी जाहीरपणे मत प्रदर्शित केले. ‘The Angels Devil and Science’ हे भारतीय वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित पुस्तक त्यांनी लिहिले. 1976 मधील 42 व्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय नागरिकांच्या कर्तव्यात वैज्ञानिकदृष्टीकोनाचा अंतर्भाव करण्यात भार्गवांचा मोठा यशस्वी सहभाग आहे. 1981 मध्ये त्यांनी इतर समविचारी विवेकवादी सहकार्‍यांबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनासंदर्भात एक जाहीरनामा जारी केला. यावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले आणि त्याचा उल्लेख आजही वैज्ञानिक दृष्टिकोनाशी निगडित अनेक गोष्टींमध्ये केला जातो.

2000 साली एन.डी.ए. सरकारच्या कालावधीत ज्योतिषशास्त्राचा समावेश विद्यापीठस्तरीय शिक्षणक्रमात करण्याचे निर्देश दिले गेले होते. त्या वेळी डॉ. भार्गव व इतर सहकार्‍यांनी सरकारच्या या अशैक्षणिक, अवैज्ञानिक धोरणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर देखील सर्वोच्च न्यायालयात देखील जनहित याचिका दाखल करण्यात भार्गवांचा पुढाकार होता. ती मा. न्यायालयाने फेटाळली होती. परंतु जनमानसांत मोठ्या प्रमाणात फलज्योतिषाविरुद्ध प्रबोधन करण्याचे कार्य भार्गवांनी केले होते.

कर्नाटकातील प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनानंतर; तसेच दादरी येथील घटनेनंतर त्यांनी सरकारवर प्रचंड टीका केली. नागरिकांनी काय खावे आणि काय खाऊ नये, यावर सरकार निर्बंध घालू शकत नाही, असे त्यांचे बीजेपी सरकारविरोधी परखड मत होते. 2015 मध्ये सरकारच्या असहिष्णुतेच्या धोरणाविरोधात सुरू झालेल्या ‘पुरस्कार वापसी’ अंतर्गत त्यांनीदेखील पद्मभूषण पुरस्कार सरकारला परत केला होता. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (रेग्युलेशन) बिल 2013 या कायद्याच्या निर्मितीसाठीच्या समितीचे ते अध्यक्ष होते. जवळपास 15 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी कायद्याच्या मंजुरीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला. सरोगसी (रेग्युलेशन) बिल 2016, सरकारने मंजूर केले. सरोगसी तंत्रज्ञानावर निर्बंध आणू नयेत, असे त्यांचे मत होते; परंतु त्याचबरोबर सरोगेट मदरचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत, असेही त्यांचे मत होते. भोपाळ गॅस दुर्घटना पीडित लोकांना न्याय मिळावा यासाठी स्थापित ‘संभावना’ ट्रस्टच्या कार्यात ते जवळपास 20 वर्षे कार्यरत होते.

पी. एम. भार्गव हे भारतीय शास्त्रज्ञ लेखक आणि उत्तम प्रशासक होते. ‘सेंटर फॉर रेग्युलेशन अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी’ या शासकीय अनुदानित संशोधनकार्य करणार्‍या संस्थेची स्थापना त्यांनी हैदराबाद येथे केली. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रभावीपणे प्रसार आणि प्रचार करण्यात ते नेहमी अग्रेसर असत. प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून आचरण करावे, ते त्यांचे कर्तव्यच आहे, अशी भावना त्यांची होती. 100 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. 1986 मध्ये त्यांना फ्रान्स सरकारचा ‘Legion a Honneur’ हा पुरस्कार प्राप्त झाला होता. भारत सरकारने देखील त्यांच्या संशोधनकार्याची दखल घेऊन 1986 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले होते.

डॉ. भार्गवांच्या दूरदृष्टीमुळे आणि मेहनतीमुळे ‘सेंटर फॉर सेक्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी’सारखी आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली संशोधन संस्था उभी राहू शकली. भारत एक विज्ञानाधिष्ठित राष्ट्र म्हणून उभारण्यासाठी ज्या अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले, त्यापैकी भार्गव यांचे स्थान वरच्या श्रेणीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ओळख रेणु जैवशास्त्रज्ञ, विचारवंत, विवेकवादी आणि संस्था निर्माण करणारी व्यक्ती म्हणूनच आहे. विज्ञान, कला, संस्कृती आणि समाजातील त्यांचे स्थान याबद्दल भार्गवांची ठाम मते होती. सामाजिक समस्यांमध्ये; ज्यामध्ये विज्ञानाचा संबंध आहे, अशासारख्या संदर्भात ते विशेष लक्ष घालून दक्ष राहत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक शास्त्रज्ञांना प्रेरणा मिळालेली आहे.

प्रा. डॉ. सुदेश घोडेराव

संपर्क : 9422257654