Categories
आरोग्य

मन चकवा

वार्षिकांक - २०१७

आपल्या ज्ञानेंद्रियांनी मिळविलेली माहिती मेंदूकडे पाठविली जाते. मेंदू त्या माहितीनुसार जगाचं आकलन करतो. हे कार्य बहुतेकवेळा सुसंगतपणे चालते आणि नित्याचे व्यवहार सुकर होतात. पण कधीकधी ज्ञानेंद्रियांनी पाठविलेल्या सिग्नल्समध्ये मेंदू बदल करतो आणि आपण फसू लागतो. आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा आपल्याला फसवू शकतात. आपल्याला भास होतात. सामाजिक उन्माद आपल्याला हिंसक बनवतो. मेंदूच्या आजारामुळे आपण विक्षिप्त बनलो. ज्ञानेंद्रिये फसतात तसेच मेंदूही (मन) फसते. मन चकव्याचे विलक्षण परिणाम समजावून घेऊन त्यावर योग्य उपचार करून आपण वर्तनातील दोष सुधारू शकतो. हे कसे शक्य आहे?

आपण आणि भोवतालच्या विविध वस्तू, प्राणी, वनस्पती यांचं मिळून जग बनलंय. या जगात विविध प्रकारच्या घटना घडत असतात. या वास्तव जगातील वस्तुमात्राचे ज्ञान किंवा आकलन आपल्याला कसं होतं? याचं उत्तर आहे ज्ञानेंद्रियांद्वारे. कॅमेर्‍याप्रमाणे आपले डोळे समोरच्या वस्तूची प्रतिमा टिपतात. रेटिनावर उमटलेल्या प्रतिमेवरून विद्युत सिग्नलस मज्जातंतूंद्वारे मेंदूतील दृष्टिकेंद्राकडे पाठविले जातात. परिणामी आपणाला संबंधित वस्तू दिसायला लागते. आपल्या कानाद्वारे ध्वनीलहरी, त्वचेद्वारे स्पर्श, जिभेद्वारे चव आणि नाकाद्वारे वास यांचे सिग्नल्स मेंदूतील त्या-त्या केंद्रात पोचले की, आपणाला अनुक्रमे आवाजाचे, स्पर्शाचे, चवीचे व वासाचे ज्ञान होते. डोळे, कान, त्वचा, जीभ आणि नाक यांना आपण ज्ञानेंद्रिये म्हणतो. ज्ञानेंद्रिये आपणाला बाह्यजगाचे व त्यातील घटनांचे आकलन करून देण्यास मदत करतात. जणू काय ही ज्ञानेंद्रिये म्हणजे आपल्या शरीराच्या खिडक्याच होत.

ज्ञानेंद्रियांद्वारे आलेल्या माहितीवर मेंदू विविध प्रकारच्या क्रिया करून आपणास जे आकलन होते, ते बहुतेक वेळा व्यवहारात उपयोगी ठरते. या आकलनामुळे जीवनातील विविध व्यापार शक्य झाले आहेत. वस्तू दिसणं, संगीत ऐकू येणं, गोड पदार्थाची चव आवडणं, वार्‍याचा थंडगार स्पर्श अनुभवणं, रात्रीच्या वेळी रातराणीचा सुगंध जाणवणं, असे विविध खरेखुरे अनुभव ज्ञानेंद्रियांद्वारे होणार्‍या खर्‍याखुर्‍या आकलनामुळे आपणास शक्य झाले आहेत. असं घडलं नसतं, तर आपले नेहमीचे जीवन आणि विविध व्यापार अवघड झाले असते. परंतु काही वेळा भलतंच घडू शकतं. कधी-कधी वास्तवात अस्तित्वात नसलेली व्यक्ती किंवा वस्तू एखाद्याला दिसायला लागते. अशी व्यक्ती किंवा वस्तू आजूबाजूच्या इतरांना मात्र दिसत नाही. काहीवेळा काहीजणांना विचित्र आवाज ऐकू येतात, जे इतरांना ऐकू येत नाहीत. ज्ञानेंद्रियांचे आकलन अशा रीतीने कधी-कधी चुकीचे होते. त्यातून चुकीचे समज पसरवतात आणि मग व्यावहारिक जीवन बिघडू लागते, असं कशामुळं घडतं?

कॅमेरा आणि माणूस यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. कॅमेर्‍याच्या पडद्यावर जे चित्र उमटतं, त्याला आपण फोटोग्राफ म्हणतो. फोटोग्राफ म्हणजे वस्तूची हुबेहूब नक्कल किंवा मांडणी असते; पण डोळ्यांच्या भिंगाद्वारे मागील रेटिना पडद्यावर उमटलेली प्रतिमा ही हुबेहूब असली, तरी प्रतिमेचे आपले आकलन इथेच संपत नाही. रेटिनावरील प्रतिमेचे सिग्नल्स मेंदूकडील दृष्टिकेंद्राकडे पाठविले जातात. या केंद्रात या सिग्नल्सचे अर्थ लावण्याचे कार्य मेंदू करतो. हे कार्य बहुतेक वेळा सुरळीत चालते. पण काही वेळा अनेकविध कारणांनी या कार्यात बिघाड होतो आणि आपले आकलन चुकीचे ठरते. पुस्तकातील बाईच्या चित्राला खोडकर मुलगा मिशा लावतो. तसाच काहीसा हा प्रकार घडतो. आपला मेंदू अनेकविध कारणांनी काही वेळा खोडकर बनतो किंवा भलतेच चाळे करू लागतो, तेव्हा आपले जगाबद्दलचे समज चुकीचे होतात. मनाचे व्यापार आणि ज्ञानेंद्रियातील क्रिया यांच्यात सुसंगतपणा असेल, तर आपणास जगाचे योग्य आकलन होते; पण या दोन्हीत विसंगतपणा आला की, आपण डोकं बिघडल्याप्रमाणे वागतो किंवा गैरसमजाच्या प्रदेशात वावरू लागतो. असं घडण्याची जी विविध कारणे आहेत, ती समजून घेणं हा या लेखाचा विषय आहे.

जशी अपेक्षा, तसं दिसणं

(We see what we expect)

आपल्या सर्व अनुभवांतून आपल्या काही अपेक्षा तयार होतात. या अपेक्षांचा प्रभाव आपले दृष्टी आकलन चुकीचं करू शकतो. अपेक्षांना जणू काय डोळे फुटतात, जे आपल्या खर्‍या डोळ्यांना फसवतात.

खालील ओळी वाचा.

(अ) Pune in The

The Rain

(ब) सीमा म्हणाली

हाय!

हाय! राणी!

आपल्यापैकी बहुतेक जण ‘अ’ मधील ओळी Pune In the Rain असंच वाचतील. तसेच ‘ब’ मधील ओळी सीमा म्हणाली, हाय राणी असंच वाचतील; प्रत्यक्षात ‘अ’ मध्ये ‘The’ दोन वेळा; तसेच ‘ब’ मध्ये ‘हाय’ दोन वेळा आला आहे. आपण वाचनात एकच शब्द दोन वेळा अपेक्षित नसतो. तशी आपणास सवय नसते. त्यामुळे मन (मेंदू) दोन शब्दांचा एकच शब्द करून टाकतो. जशी अपेक्षा तसे दिसते; म्हणून वास्तव जेव्हा आपल्या अपेक्षेला जुळत नाही, तेव्हा आपलं जगाचं आकलन चुकतं.

जी गोष्ट घडलीच नाही, ती अपेक्षापूर्तीच्या स्वभावधर्मानुसार घडल्याचे आढळते. या बाबतीत मानसवैज्ञानिकांनी प्रयोग केले आहेत. एका संशोधनात तुमच्या खोलीतील दिवा ठराविक वेळाने उघडझाप करीत नव्हता, तरी तो अनेकांना सूचनेनुसार उघडझाप करताना दिसला. दुसर्‍या एका प्रयोगात काही व्यक्तींना शॉक देण्यात येईल, अशी सूचना दिली गेली. त्यांना विद्युत साधन जोडण्यात येऊन शॉक दिल्याचे नाटक करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात शॉक दिला नव्हता. तरीही तो दिलाय असं सांगणारे महाभाग भेटले. अशा तर्‍हेचे चुकीचे आकलन प्रयोगशाळेबाहेरच्या जगात घडताना दिसते. युरोपमधील एका प्राणिसंग्रहालयातील पांडा अस्वल बाहेर निसटले. याबाबतची बातमी सगळीकडे पसरली. मग अनेकांनी आपण तो पांडा पाहिल्याचे सांगावयास सुरुवात केली. पण प्रत्यक्षात जो पांडा प्राणिसंग्रहालयापासून काही मीटर अंतरापर्यंत गेला होता व ट्रेनखाली सापडला होता. म्हणजे लोकांनी पांडाला पाहिल्याच्या बातम्या अतिरंजित होत्या. तो आपल्याला दिसणार, या अपेक्षेनुसार लोक त्याला पाहिल्याचे सांगत होते. हे अपेक्षेमुळे झालेले भास होते.

चंद्रविकृती या अंधविश्वासाबाबतीत अपेक्षादृष्टीचा प्रभाव दिसून येतो. पौर्णिमाकाळात इस्पितळातील रोग्याच्या आजाराची तीव्रता वाढते, अशी एक गैरसमजूत आहे. परिचारिकांना याबाबत निरीक्षणे नोंदवायला सांगण्यात आली. ज्या परिचारिका चंद्रविकृती खरी मानत होत्या, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पौर्णिमाकाळात रोग्यांचे आजार वाढल्याचे सांगण्यात आले; पण ज्या चंद्रविकृती मानत नव्हत्या, अशा परिचारिकांना रोग्यामध्ये असा बदल आढळला नाही. आपल्या अपेक्षेनुसार मानसिकता कशी बदलते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

नुसतं सुंदर शरीर असून काय कामाचं? मला सुंदर हवं असे वचन कित्येकवेळा भाषणांमधून विचारवंत व्यक्त करतात; पण अपेक्षासमजानुसार बहुतेक तरुण मंडळी सुंदर मुखडा सर्वांगीण सुंदर मानतात; पण सुंदर मुखड्याखाली कुरूप मन असू शकतं जे पुढे संकट ठरू शकतं. एक गुण असेल, तर त्या व्यक्तीत इतरही चांगलेच गुण असतात, ही एक गोड गैरसमजूत अपेक्षादृष्टीचा परिणाम आहे. यालाच वलय परिणाम किंवा (Halo Effect) असं नाव आहे.

वलय परिणाम इतर व्यक्तींच्या बाबतीत आपलं मत बनविताना उपयोगी ठरतो. हा परिणाम सर्व मानवी समाजात सर्वत्र आणि सर्व काळी प्रभाव टाकताना दिसून येतो. सासू-सुनेचे नाते, घराणेशाहीचा प्रभाव, वैवाहिक जोडीदाराची निवड, जातिभेद, धर्मसंघर्ष अशा विविध क्षेत्रात वलयाचा परिणाम प्रभावी ठरतो. पारधी लोक दरोडेखोरच असतात, हा गैरसमज अपेक्षावृत्तीचाच परिणाम होय. लोकशाहीत घराणेशाहीचा प्रभाव टिकून राहतो. कारण एखाद्या घराण्यातील कर्तृत्ववान व्यक्तीचे वारस कर्तृत्ववानच असतात, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. सून नेहमीच माझ्याविरोधात नवर्‍याला भडकावते, हा सासूचा आरोप, तर सासू माझ्याविरोधात मुलाचे कान भरते, हा सुनेचा आरोप. सासू-सुनेच्या नात्यातील संघर्ष व गैरसमजुती या अपेक्षा स्वभावधर्मानुसार प्रभावीत होतात. यातून निर्माण होणारे डाव-प्रतिडाव (Game-playing) हा सनातन संघर्षनाट्याचा व त्यातून उद्भवणार्‍या गैरसमजुतीचा विषय आहे. उत्तम, सर्वगुणसंपन्न, प्रजाहितदक्ष राजाचा मुलगा तसाच निपजेल, अशी भावना सर्वसामान्य लोकांची इतिहासकालापासून आढळते. गुणवानाचे वारस गुणवान या अपेक्षेनुसारच हे घडते. काही वेळा ते खरेही असते; पण सर्वच वेळा सर्वांच्या बाबतीत हे खरे ठरतेच, असं नाही. म्हणूनच राजेशाही गेली आणि लोकशाही आली. पण लोकशाहीत ही घराणेशाही प्रभावी ठरते. याला कारण वलय परिणाम. सत्ताधार्‍यांच्या कुटुंबियांचा राजकारणातील प्रभाव, सहकार क्षेत्रातील घराणेशाही हे सर्व वलय परिणामांचे दुष्परिणाम होत. भारतीय समाजातील मूर्तिपूजकता (Idolatry) ही अपेक्षा वर्तनातून आलेल्या वलय परिणामाचाच प्रभाव होय.

वलय परिणामाचे विचार करायला लावणारे एक उदाहरण इंटरनेटवर उपलब्ध आहे. जर्झी कोसिन्स्की हा पोलीश-अमेरिकन लेखक. त्याने स्टेप्स (Steps) हा ललितग्रंथ लिहिला होता. या ग्रंथाबद्दल त्याला 1969 चे ललित साहित्याचे अमेरिकन नॅशनल बुक अवॉर्ड मिळाले. यामुळे कोसिन्स्की हा प्रख्यात ललित साहित्यिक म्हणून मान्यता पावला. 1975 मध्ये चक रॉस या फ्री-लान्स लेखकाने एक गंमत घडवून आणली. नवोदित लेखकांची पुस्तके (उत्तम असली तरी) प्रकाशक छापत नाहीत, हे गृहीत त्याला सिद्ध करायचं होतं. त्याने कोसिन्स्कीच्या स्टेप्स या पुरस्कारप्राप्त पुस्तकाची टंकलिखित प्रत चार प्रकाशकांकडे पाठविली. मात्र त्या पुस्तकावर कोसिन्स्कीचे नाव न छापता एरीक डेमॉस असं खोटंच नाव छापलं. चारही प्रकाशकांनी ही प्रत प्रकाशनासाठी स्वीकारली नाही. नंतर रॉसने या प्रतीच्या प्रिंटस 1977 मध्ये 10 प्रकाशकांना प्रसिद्धीसाठी पाठविल्या. त्यात त्यांनी कोसिन्सकीचे मूळ पुस्तक प्रसिद्ध केले होते, त्यात रँडम हाऊस या प्रकाशकाचाही समावेश होता. या प्रती त्याने साहित्य प्रसिद्धीस मदत करणार्‍या 13 एजंटांना देखील पाठविल्या होत्या. पुन्हा हे पुस्तक छापण्यास सर्वांनी नकार दिला. त्यात रँडम हाऊसचाही समावेश होता. असा असतो वलय परिणाम. लेखक, खेळाडू, राजकारणी या सर्वांना तो लागू पडतो. तो एकदा प्रसिद्धी पावला की, बस्स्. देवाच्या मूर्तीभोवती जसं तेजाचं वलय असतं, तसं कर्तृत्वाचं वलय या मंडळांना चिकटतं, ते कायम. म्हणूनच सलग खेळात झिरोवर त्रिफळा उडाला, तरी ओपनिंग बॅट्समन घरी बसविला जात नाही.

परंपरेने आलेले रीतिरिवाज, पूर्वजांचे अनुभव, सांगोवांगी चालत आलेल्या मिथक कथा व गोष्टी यांचा प्रभाव म्हणून व्यक्तीच्या मनात अनेक पूर्वग्रह तयार झालेले असतात. या पूर्वग्रहातून विशिष्ट घटना वा दृश्याबद्दलच्या अपेक्षा निर्माण होतात. या अपेक्षा म्हणजेच पूर्वग्रहपीडित मनाचे जणू काय डोळे. या मनाच्या डोळ्यांना, खर्‍या डोळ्यांपेक्षा वेगळे दिसते. मनाचे डोळे आपल्याला फसवितात. काळ्या रंगाबद्दल आपला असलेला पूर्वग्रह काळा गणवेश घातलेल्या सर्व खेळाडूंना पांढरा गणवेश घातलेल्या टीमपेक्षा अधिक दोषी ठरवितात.

आपल्या अपेक्षा, आपले आकलन व इतरांविषयीचे मत यावर परिणाम करतात, हे खरेच; पण आपल्या प्रतिक्रियांवरसुद्धा परिणाम करतात. अपेक्षांच्या प्रतिक्रियात्मक परिणामाचे उदाहरण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील प्लॅसिबो परिणाम. औषध नसलेली गोळी देऊन डॉक्टर पेशंटला या गोळीने तुला आराम पडेल, असे जेव्हा सांगतो, तेव्हा पेशंटच्या बरे वाटायच्या अपेक्षांना उत्तेजन दिले जाते. परिणामी मनाचा आजार बरा करण्याची क्षमता वाढून पेशंट बरा होऊ शकतो. पूर्वी जेव्हा प्रभावी औषधे उपलब्ध नव्हती, तेव्हाचे वैद्यकीय सल्लागार प्लॅसिबोद्वारे इलाज करीत असत.

इच्छादृष्टी जे हवे ते दिसणे

अपेक्षाधारणेचा जसा आपल्या आकलनावर परिणाम होतो, त्यापेक्षा जास्त परिणाम आपल्या आंतरिक इच्छांचा होतो, हे कशामुळे घडते? आपल्या मनातील चालत आलेल्या पूर्वापार श्रद्धा/विश्वास/समजुती यांना धक्का पोचू नये किंवा त्यांच्याशी विसंगत असं काही दिसू नये, अशी आपली आंतरिक इच्छा असते. परिणामी आपल्या इच्छेनुसार हवं तेच पाहण्याचा आपला तीव्र कल असतो. आपण भोवतालच्या जगातील ज्या-ज्या गोष्टीचे आकलन करतो, त्या गोष्टी आपल्या श्रद्धेचे समर्थन करणार्‍या असतील, तर त्या श्रद्धा अधिक घट्ट होण्यास मदत होते.

इच्छाशक्तीच्या प्रभावाच्या अनेक घटना व्यावहारिक जगात आपणास दिसून येतात. विशेषत: धार्मिक क्षेत्रात याबाबतचे अनुभव प्रकर्षाने येतात. धर्मभावना ही मानवी जीवनातील महत्त्वाची प्रेरणा आहे. धर्माच्या बाबतीत अतिसंवेदनशील व्यक्ती इच्छा-प्रभावातून आलेल्या भ्रमाची शिकार बनतात. ‘देऊळ’ सिनेमातील केशवला झाडाच्या बुंध्यात दत्त प्रकटल्याचे दिसते. मुकुंद टांकसाळेंच्या ‘फ्रिज महादेव’ या कथेत फ्रिजमधील बर्फात अमरनाथ गुहेतील महादेवाची पिंड प्रकटल्याची दिसू लागते. ही झाली काल्पनिक उदाहरणे; प्रत्यक्षात विविध देवता विविध स्वरुपात विविध ठिकाणी प्रकट झाल्याच्या घटना भारतात अनेक वेळा घडल्यात. उदा. पपईत गणपती प्रकट झाल्याची घटना. पण अशा घटना प्रत्यक्षात घडलेल्याही दिसून येतात. जगभरातील सर्व समाजात दैवी चमत्काराच्या घटना घडताना अधूनमधून कानावर येतात. कॅनडामध्ये घडलेली घटना मोठी अफलातून आहे. मेरी मातेची मूर्ती आईस्क्रीममध्ये प्रकट होईल, अशी भविष्यवाणी कुणीतरी केली. या मेरीमातेचे दर्शन व्हावे म्हणून कॅनडा ते अमेरिकेतील ह्यूस्टनपर्यंत रस्त्याच्या कडेने फूटपाथवरील आईस्क्रीमचे डाग पाहत श्रद्धाळूंनी प्रवास केला. हीच देवता जून 1997 मध्ये मेक्सिको शहरातील एका प्लॅटफॉर्मवरील द्रवाच्या डागात दिसली. हा द्रव बहुधा मूत्राचा किंवा पाण्याचा असावा. या डागरुपी देवतेच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली होती. 1978 मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये एका गृहिणीला जळक्या गोल पावामध्ये येशू ख्रिस्ताचा चेहरा दिसला.

पाव किंवा आईस्क्रीम आणि मूत्राचे डाग याद्वारे देवता आपल्याला दर्शन देतात, असे मानणे म्हणजे श्रद्धेतून प्रभावीत झालेल्या इच्छाशक्तीच्या भ्रमाची शिकार बनणे होय. वस्तूच्या विशिष्ट आकारातून अर्थ काढण्याची आपली सहजप्रवृत्ती अशा चुकीच्या समजुतीकडे आपणास घेऊन जाते. हे विशिष्ट आकार जेव्हा संदिग्ध असतात, तेव्हा विशेषत्वाने अशा गोष्टी घडतात. व्हायकिंग यानाने 1976 मध्ये घेतलेल्या मंगळाच्या फोटोत काही लोकांना मानवी चेहरा दिसला. त्या-त्या समाजाच्या संस्कृतीचा प्रभाव म्हणून विविध समाजातील लोकांना एकच आकृती विविध रुपात दिसते. अमेरिकन लोकांना चंद्रावर माणूस दिसतो, तर ईस्ट इंडियन लोकांना तो ससा वाटतो. चिनी लोकांना तो माकड वाटतो. अशा आकृती संदिग्ध असल्यामुळे त्यांचा कसाही अर्थ लावता येतो. कारण आपण जे पाहतो, त्याचा उगम आपल्या पूर्वग्रहपीडित समजुतीत असतो.

धार्मिक क्षेत्राबरोबर अन्य विविध क्षेत्रात इच्छाप्रभावाच्या घटना घडताना दिसतात. जे. बी. र्‍हाईन या मानसशास्त्रज्ञाचा परामानसशास्त्रावर प्रचंड विश्वास होता. परामानस घटनांच्या सत्यतेच्या समर्थनार्थ त्याने विविध प्रयोग केले. या प्रयोगांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन इतर मनोवैज्ञानिकांनी केले. चाचणी तीच; परंतु ती यशस्वी झाली, अशी बाजू मांडणारे समर्थक आणि ती अयशस्वी ठरते, अशी टीका करणारे संशयवादी यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. संशयवादी टीकाकारांनी उपरोक्त प्रायोगिक चाचण्यांबद्दल प्रामाणिक मत नोंदवले होते; पण ज्यांचा परामानसशास्त्रावर गाढा विश्वास होता, त्यांचा कल अयशस्वी चाचण्या यशस्वी आहेत, असं सांगण्याचा होता. वृत्तपत्रात किंवा दूरदर्शनवर निवडणूक प्रचारावरील बातम्या येतात. उमेदवार व त्यांचा पक्ष यावर समीक्षात्मक लेखही येतात. असे लेख व बातम्या या खरं तर बहुतांशी वस्तुनिष्ठ व नि:पक्षपाती असतात. (स्वतंत्र बाण्याच्या माध्यमांना कोणाचीही बाजू घेण्याचे कारण नसते.) पण या बातम्या व लेखांबाबत लोकांना विचारणा झाली किंवा त्यांचे मत शोधण्याचा प्रयोग केला, तर आपल्याला प्रिय असणार्‍या उमेदवाराच्या विरोधात बातम्या छापल्या गेल्या, अशी उत्तरे मिळतात. बातम्या त्याच; पण दोन भिन्न पक्षाच्या लोकांची उत्तरे मात्र एकांगी स्वरुपाची. अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीबाबत प्रसारमाध्यमांतील बातम्यांवरच्या प्रतिक्रियांचे संशोधन प्रसिद्ध आहे. 90 टक्के मतदारांनी या बातम्या त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात होत्या, असं मत नोंदविले. अशा मानसिकतेला विरोधी मीडिया परिणाम (Hostile Media Effect) असं नाव आहे. सर्व क्षेत्रात अशा तर्‍हेने इच्छाप्रभावातून आलेल्या गैरसमजुती प्रकर्षाने दिसतात. आपला आवडता क्रिकेटवीर संशयास्पदरित्या बाद झाला, तर अंपायरने त्याला मुद्दाम बाद केले, अशी ओरड लोक करतात. हे इच्छाप्रभावाचेच लक्षण होय. तरी बरं आता तिसर्‍या इलेक्ट्रॉनिक अंपायरची सोय क्रिकेटमध्ये झाली आहे, ज्याला चॅलेंज करता येत नाही.

आपला तो बाळ्या……

आपला तो बाळ्या – दुसर्‍याचं ते कारटं, अशी एक म्हण आहे. ही म्हणसुद्धा इच्छाप्रभावाची निदर्शक आहे. स्वत:बद्दलचे किंवा इतरांबद्दलचे आपले मत (judgement) ठरविताना आपल्या सुप्त इच्छा/आकांक्षा प्रभावी ठरतात. टॉलस्टॉय या प्रख्यात रशियन लेखकाची एक कथा आहे. दोन छोट्या शाळकरी मुलांचं भांडण होतं. ती मुले आपल्या आईकडे दुसर्‍याबद्दलची तक्रार घेऊन जातात. दोन्ही आया रस्त्यावर येऊन जोरजोरात एक-दुसरीच्या मुलाला दूषणे देऊ लागतात. बराच वेळ असं चालल्यावर त्या थकून आपल्या मुलाला घरात घेण्यासाठी हाक मारतात, तर ते दोघेही हसत-खेळत त्याचं भांडण- विसरून गेलेले दिसतात. आपला तो बाळ्या प्रवृत्तीचा उगम हा सुप्त इच्छाप्रेरणेत आहे. मी खरा की, तू खरा, मी चांगला की, तू चांगला. म्हणजे स्वत:बद्दलचे आणि इतरांबद्दलचे मत ठरविताना ही इच्छाप्रेरणा प्रभावी ठरते. एका खात्रीशीर संशोधनाचे फलित याबाबत लक्षात घेता येईल. या संशोधनानुसार आपण स्वस्तुतीत अधिक रममाण होतो. आपल्यापैकी बहुतेक जण स्वत:ला अधिक बुद्धिमान, अधिक चांगल्या मनाचे आणि कमी एकांगी वृत्तीचे आहोत, असे समजतो. या संदर्भात एका शाळेतील 10 लक्ष मुलांचे सर्वेक्षण केले गेले. त्यांच्यातील 70 टक्के मुले इतर सर्वसामान्य मुलांपेक्षा त्यांच्यात अधिक नेतृत्व गुण आहेत, असं समजत होती. सर्वच्या सर्व मुले दुसर्‍याशी जुळवून घेण्याच्या गुणाबाबत आपल्यात अधिक क्षमता आहे, असं समजत होती. महाविद्यालयीन प्राध्यापकाबाबत असे दिसून आले की, त्यांच्यातील 94 टक्के प्राध्यापक सर्वसामान्य प्राध्यापकापेक्षा आपण आपल्या कामात अधिक सक्षम आहोत, असे समजत होते. आपल्या सुप्त आकांक्षा अशा तर्‍हेने आपणास अशा एकांगी समजुतीकडे जातात.

मनी वसे ते…..

We see what we want मनी वसे ते स्वप्नी दिसे. केवळ स्वप्नातच नाही, तर इच्छाप्रेरणा व्यवहारातील अनेक समज-गैरसमजाकडे घेऊन जातात. पीटर ग्लिक आणि मार्क स्नायडर या अमेरिकन मनोवैज्ञानिकांनी वरील सत्य ज्योतिषाबाबत तपासले आहे. ज्योतिषाबाबतचे आपले पूर्वग्रह, पत्रिकांबाबतच्या निष्कर्षातील चुकीच्या समजुतीकडे कसे घेऊन जातात, यावर हे संशोधन केले गेले. ग्लिक आणि स्नायडरने ज्योतिषावर विश्वास असणार्‍या 12 लोकांची आणि असा विश्वास नसणार्‍या संशयवादी 14 लोकांची या प्रयोगासाठी निवड केली. या प्रयोगासाठी एका व्यावसायिक ज्योतिषाकडून एका व्यक्तीच्या कुंडलीवरून त्याची पत्रिका बनवून घेतली. या पत्रिकेत दिलेल्या त्या व्यक्तीच्या स्वभाववैशिष्ट्यांची तपासणी दोन्ही गटातील लोकांना घ्यावयास ग्लिकने सांगितले. संबंधित व्यक्ती ही प्रयोगकर्त्याला सहाय्य करणारी त्यांच्या गोटातील होती. पत्रिकेत या व्यक्तीचे बहिर्लक्षी म्हणजे एुीींर्रींशीीं असे स्वभाववैशिष्ट्य दिले होते. दोन्ही गटातील चिकित्सकांनी या व्यक्तीला प्रश्न विचारून तिच्या स्वभावाची खात्री करावयाची होती. उदा. तुला पार्टीला जाणे आवडते का? अशा तर्‍हेचे प्रश्न विचारता तो जर होय म्हणाला, तर तो बाह्यलक्षी म्हणजे समाजात मिळून मिसळून वागणारा (एकलकोंडा स्वभावाविरुद्ध) आहे, असा निष्कर्ष निघेल. ग्लिकने पत्रिकासंबंधित मित्राला विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला ‘होय’ असे उत्तर देण्यास सूचना केली होती. म्हणजे प्रश्न बाह्यलक्षी स्वभाव सूचित करणारा किंवा एकलकोंडा स्वभाव सूचित करणारा असो, याचे उत्तर प्रत्येकाला ‘होय’ असेच दिले जाणार.

ज्योतिषावर विश्वास असणार्‍या व नसणार्‍या दोन्ही गटाच्या चिकित्सकांनी पत्रिकाधारकाला तो बाह्यलक्षी उत्तर देण्यास राजी व्हावा, असे प्रश्न विचारले. मात्र काही जणांचे काही प्रश्न तो एकलकोंडा आहे, अशी मिळावीत असे अपेक्षित होते. त्यांनाही पत्रिकाधारकाने ‘होय’ अशीच उत्तरे दिली.

दोन्ही गटातील लोकांना त्यांच्या निष्कर्षाबाबत ग्लिकने जेव्हा विचारणा केली, तेव्हा ज्योतिषावर विश्वास असणार्‍या लोकांना आपला हा विश्वास कसा योग्य आहे आणि ज्योतिष किती अचूक आहे, असे उत्तर मिळाले. काही प्रश्नांची उत्तरे नकारात्मक होती, तरीसुद्धा ज्योतिषावरचा त्यांचा विश्वास पक्का होता. गंमत अशी की, ज्योतिषावर ज्यांचा विश्वास नव्हता त्यांनाही अशीच उत्तरे म्हणजे पत्रिकाधारी व्यक्ती समाजप्रिय असल्याचा पुरावा देणारी मिळाली होती. या मंडळींचा ज्योतिषावर अगोदर विश्वास नव्हता, तरी त्यांना हवी तशी उत्तरे मिळाल्याने त्यांचा ज्योतिषावर विश्वास बसल्याचे दिसून आले. मात्र यातील काही जणांना नकारात्मक उत्तरे मिळाली होती. त्यांनी ज्योतिषाबाबत शंका व्यक्त केली.

माणूस समाजप्रिय दिसणे आपणास हे आवडते किंवा हवं असतं. एकलकोंडेपणा आपणास नकोसा वाटतो. म्हणून जे हवे ते दिसू लागते. ज्योतिष आपणास हवं त्याचं समर्थन करीत असेल, तर ज्योतिषही खरं वाटणं हा इच्छाप्रभाव. जरी ज्योतिषावर अगोदर विश्वास नव्हता, तरी प्रभावी ठरला. उलट एकलकोंडे व्यक्तिमत्त्व आपणाला नको वाटतं, हा नकारात्मक भाव देणारे ज्योतिषही शंकास्पद वाटणे साहजिक आहे. मनी वसे ते स्वप्नी दिसे, हे तर खरंच; पण मनी वसे ते जागेपणीही दिसे, हे पण तितकंच खरं नाही का?

मनोभास – Hallucinations

प्रत्यक्षात नसलेले म्हणजे डोळ्याला न दिसणारे, दिसतंय असं म्हणणे किंवा कानाला न ऐकू येणारा आवाज ऐकायला येतोय, असा समज करणे म्हणजे भास किंवा करश्रर्श्रीलळपरींळेप : भास म्हणजे मनाचे डोळे किंवा मनाचे कान. अतिभावनिक होणे, उपवास, ताप, विरह किंवा अतिनशिले पदार्थ इत्यादींमुळे आपणास भास होतात. व. पु. काळे यांच्या कथेत एका बाईला तिचा मरण पावलेला नवरा शेजारी बसून बोलतो, असे भास होतात. हा अतिविरहाचा परिणाम होय. आपण गाढ झोपेत असताना ओळीने काही दिवस झोपेत व्यत्यय आला, तर दिवसाही आपल्याला भास होऊ लागतात. इतर वेळी नॉर्मल वागणारी व्यक्ती तिच्या आयुष्यात अनेकदा भासाची शिकार बनते. एका सर्वेक्षणानुसार 10 ते 25 टक्के नॉर्मल लोक त्यांच्या आयुष्यात एकदा तरी भासाचा अनुभव घेतलेले आढळतात.

नॉर्मल लोकांपेक्षा सिझोफ्रेनियासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये भासाची तीव्रता जास्त आढळते. जॉन नॅश हा प्रख्यात नोबेल प्राईझ विजेता गणिती व अर्थतज्ज्ञ. तो सिझोफ्रेनियाचा बळी होता. त्याला परग्रहवासीयांचे भास होत असत. गणितातील उत्तराप्रमाणे हे भास त्याला खरेच वाटत. इ.स.2002 मध्ये अ‍ॅकॅडमी अवॉर्ड मिळालेला ‘द ब्युटिफुल माईंड’ हा चित्रपट नॅशच्या जीवनावर आधारित आहे.

मेंदूविकारतज्ज्ञ पेनफिल्ड याने केलेल्या संशोधनानुसार, मेंदूचे वेगवेगळे भाग विद्युत यंत्रणेद्वारे उत्तेजित केले, तर चित्र-विचित्र भास निर्माण होतात. मायकेल पर्सिन्जर याने दाखवून दिलंय की, काही लोकांना आपल्याच शरीरातून स्वत: बाहेर पडल्याचे अनुभव येतात. खोलीत कुणीही नसताना कोणीतरी असल्याचा भास होतो. हे भास विद्युत-चुंबक लावलेले हेल्मेट डोक्यावर ठेवल्यास निर्माण होतात, असं त्यानं दाखवून दिलं. आपल्या मेंदूत धार्मिक आणि दैवी अनुभव देणारी सर्किट्स आहेत. त्यांना बाहेरून उत्तेजित केल्यास दैवी प्रकारचे भास होतात.

झोपेत बिघाड झालेल्या मानसिक आजारात संबंधित व्यक्ती निश्चेष्ट, भावना उत्तेजित आणि भास होण्यास अनुकूल बनते. अशा व्यक्तीला भुताचे, सैतानाचे आणि परग्रहावरील मानवाचे भास होतात. नॉर्मल स्थितीत झोप लागताना किंवा झोपेतून जागे होताना किंवा कारचा लांबचा प्रवास करताना आपणाला परग्रहवासियांनी उचलून नेण्याचे भास होतात. अशा अवस्थेत शरीरातून निघून बाहेर तरंगणे, भूत दिसणे, निधन पावलेल्या प्रिय व्यक्तीला पाहणे इत्यादी भास अनुभवाला येतात. ज्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात कल्पना रममाणता (fantacy prone) प्रभावी असते, त्यांना असे भास सहजपणे होतात. सूचनावर्तनाच्या प्रभावाखालील लोकही भासाची शिकार बनतात. त्यांचे भास शंकास्पद असले, तरी रंगवून सांगितलेल्या अशा ऐकीव गोष्टीचा प्रभाव आपल्या विवेकावर मात करतो.

सारांशाने असं म्हणता येईल, बाहेर वास्तवात जे आहे, तेच आपणास दिसतं किंवा ऐकू येतं असं नाही, तर आपला मेंदू त्यात भर घालतो आणि एकेक एक संबंध जोडला जात नाही. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या अनुभवात नवीन भर घालून आपण ज्याची अपेक्षा करतो आणि ज्याची इच्छा करतो, त्यांनी हे अनुभव प्रभावित होऊन नवअनुभव तयार होतात. याशिवाय आपणाला भास होतात. हे भास काही वेळा सामुदायिक स्वरुपाचे असतात, ज्यामध्ये एकापेक्षा अधिक लोकांना एकाच गोष्टीचा भास होतो. हे सामुदायिक भास सामुदायिक उन्मादाला जन्म देतात.

सामाजिक उन्माद (Mass Hysteria)

मज दिसले जे मनी वसले, हे सदोष वर्तन केवळ व्यक्तीगत पातळीपुरते मर्यादित राहत नाही, ते सार्वत्रिक स्वरुपातही दिसून येते. या प्रकाराला सामाजिक उन्माद म्हणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अलिकडेच उत्तर भारतात घडलेल्या एकाएकी स्त्रियांच्या वेण्या/केस कापल्या जाण्याच्या घटना. या घटनांची सुरुवात दिल्ली परिसरात झाली. नंतर त्या हरियाना आणि राजस्थानमधूनही सुरू झाल्या. ज्यांची वेणी कापली जाई, त्या स्त्रिया हे कसं घडलं, याबाबत विचित्र कारणे देऊ लागल्या. कुणी हे सैतानाचं काम, तर कुणी आम्हाला बेशुद्ध करून अनोळखी व्यक्ती अशी कृत्ये करत असल्याचा दावा करू लागल्या. आग्य्रामध्ये एका निष्पाप वृद्ध बाईला ती असे वेण्या कापते म्हणून मारहाणही झाली. पण पोलीस किंवा तपास पथकाला अशा प्रकारच्या घटना प्रत्यक्ष तपासात कोठेही आढळल्या नाहीत. मनोदुर्बल स्त्रिया स्वत:च नकळत अशा घटना घडवून आपणास माहीत नाही, असा पवित्रा घेतात. अंतर्मनातील तीव्र दु:खद भावना व्यक्त करण्याचा हा भानामतीचा प्रकार म्हणजे जे हवेसे वाटते, तेच दिसते या मानसिकतेचा परिणाम होय.

21 सप्टेंबर 1995 रोजी संपूर्ण भारतातील गणेशमूर्ती अचानक दूध पिऊ लागल्या, या सार्वत्रिक उन्मादाने भारताचे संपूर्ण जगात हसू झाले. याची सुरुवात दिल्लीमध्ये झाली. चमच्यातील दूध गणेशमूर्तीने पिणे याचं खरं कारण होतं पृष्ठीय ताणाचा परिणाम. पण देव काहीही करू शकतो, या अतिरेकी श्रद्धेतून तो दूध पित आहे, असं दिसणं हा सार्वत्रिक मनोभासाचा परिणाम होता. म्हणून गणपतीने पिलेले दूध जरी खाली ताटात साठलेले असताना ते लोकांना दिसले नाही. दिसलं ते मनातलं, हवंसं वाटणारं, श्रद्धा बळकट करणारं.

2006 मध्ये मुंबईत घडलेला सार्वत्रिक उन्मादाचा प्रकार, तर अजबच म्हणावा लागेल. समुद्राच्या खाडीचे पाणी एकाएकी गोड झाल्याच्या बातम्या पसरल्या आणि प्रत्यक्षातील खारट पाणी लोकांना गोड लागले. कारण ते गोड झालंय, अशी हवी वाटणारी भावना प्रबळ होत गेली.

सार्वत्रिक उन्मादात केवळ भारताचीच मक्तेदारी नाही. जगात सर्वत्र अशा घटना घडल्यात, भविष्यातही घडतील. अमेरिकेतील इलिनॉईस राज्यातील एका गावातील बाईने एका रात्री अनोळखी इसम तिच्या घरात शिरून गुंगीच्या औषधाने तिला बेशुद्ध केल्याचे सांगितले. याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्या आणि पुढच्या दिवसांत अशाच तक्रारी अनेकांकडून पोलिसाकडे येऊ लागल्या. त्यांच्या सांगण्यानुसार घुसखोर त्यांच्या घरात घुसला. त्याने खोलीत गोड वायू फवारला. परिणामी त्यांना मळमळू लागले आणि त्यांचे पाय बधीर पडले. पोलिसांनी अनेक आठवडे शोध घेतला; पण कसलाही भौतिक वा रासायनिक पुरावा सापडला नाही. अतिरंजित व सामाजिक उन्माद यातून या घटना घडल्या, अशी पोलिसांनी प्रसिद्धी दिल्यावर हे प्रकार बंद झाले.

चुकीच्या अतिशयोक्तीपूर्ण समजुती समाजाच्या, एका भागात झपाट्याने कशा पसरतात? एक कारण म्हणजे आपले सदोष आकलन आपल्या सुप्त इच्छांतून ते सूचनावर्तीत्व येते, त्याच्याशी जोडले जाते. परिणामी अशा गैरसमजुती पसरतात. त्यांना पुरावा नसला, तरी मानवी मनाचे खेळ अजब आहेत, हेच खरे!

मेंदू विकृती आणि आकलन

वास्तव जगाच्या चुकीच्या आकलनाला आपल्या मेंदूतील क्रियाबिघाड कारणीभूत ठरू शकतो. याबाबतच्या संशोधनातून मिळालेले निष्कर्ष थक्क करून सोडणारे आहेत. मानवी मेंदूमध्ये वेगवेगळ्या 30 दृष्टीसंबंधात जवळपास 30 वेगवेगळी केंद्रे आहेत. आपण पाहत असलेल्या दृश्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये या 30 केंद्रांशी जोडलेली आहेत. उदा. वस्तूचा रंग, खोली, गती इत्यादी. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा मध्य टेंपोरल विभाग दुखावला असेल, तर त्या व्यक्तीला गतीविषयक आंधळेपणा येतो. अशी व्यक्ती वस्तू पाहू शकते; पण तिची गती ओळखू शकत नाही. दृष्टिमार्गात बिघाड झालेल्या व्यक्तींना ‘चार्लस् बॉनेट सिंड्रोम’ नावाचा विकार होतो. अशी व्यक्ती अंशत: किंवा पूर्णपणे आंधळी होते. त्यांना विचित्र भास होतात. चार्लस बॉनेट सिंड्रोममुळे काहींना भुतासारख्या आकृत्या, ड्रॅगन्स तेजस्वी देवदूत, सर्थसील छोटे प्राणी आणि पर्‍या दिसल्या आहेत.

प्रख्यात न्यूरो वैज्ञानिक आणि लेखक ऑलिव्हर सॅक्स यांनी दिलेली मज्जाविकृती मोठी मजेशीर आहे. या माणसाला तपासत असताना त्याने आपले बूट काढून टाकले. सॅक्सनी जेव्हा त्याला ते परत घालण्यास सांगितले, तेव्हा तो आपल्या पायाला बूट म्हणून धरू लागला. सॅक्सने त्याचे बूट पलिकडे आहेत, असे सांगताच तो म्हणाला, “अरेच्चा, मला वाटलं पलिकडे माझा पाय आहे.” तो जेव्हा उठून जाऊ लागला, तेव्हा स्वत:ची हॅट बाजूस शोधू लागला. आपल्या बायकोचे डोके पकडून तो ते आपल्या डोक्यावर उचलून घेण्याचा प्रयत्न करू लागला. या अनुभवावर आधारित सॅक्सने आपल्या एका पुस्तकाला ‘आपल्या बायकोला हॅट समजणारा माणूस’ असे नाव दिले. आपल्या मेंदूतील टेंपरेशन लोब्स्मुळे इतरांचे चेहरे आणि वस्तू ओळखू येतात. या अवयवांचा काही भाग बिघडला, तर असे पेशंट्स स्वत:च्या पालकांना ओळखू शकत नाहीत. कॅपग्रास भ्रमाचा विकार झालेली व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना लबाड किंवा भोंदू समजतात.

आयुष्यातील बराच काळ आंधळा असलेल्या व्यक्तीस जेव्हा डोळ्याच्या रोपणाने दृष्टी आली, तेव्हा नवीन वस्तूंना स्पर्श केल्यानंतरच त्या त्याला दिसू लागतात.

आभासी अवयवाचा दोष मज्जाविकृतीतून येऊ शकतो. अपघातात ज्या व्यक्तीने हात किंवा पाय गमावले आहेत, तिला ते तेथे आहेत, असा भ्रम कधी-कधी होतो. आभासी अवयवाची विकृती तीव्र वेदनेची भावना निर्माण करू शकते. एका फिजिशियनच्या एका पायामध्ये तीव्र वेदना वारंवार येत. याला बर्जरची विकृती असं नाव आहे. त्याच्या वेदना इतक्या तीव्र होत्या की, तो पाय कापून काढावा लागला. पण आश्चर्य म्हणजे त्याच्या या कापलेल्या पायाच्या जागी आभासी पायात वेदना चालूच राहिल्या.

वरील संशोधनाचा निष्कर्ष असा की, जगाबद्दलचे आपले आकलन आपल्या मेंदूतील गुंतागुंतीच्या मज्जारचनेवर व त्यातील बिघाडावर अवलंबून आहे. जन्मत:च आपल्या मेंदूत शंभर बिल्लयन नूरॉन्स आहेत. या न्यूरॉन्सला विशिष्ट रचना असते. ते परस्परांशी माहिती पाठविणारे वा माहिती स्वीकारणारे तंतू न्यूरॉन्सकडे जोडलेले असतात. या गुंतागुंतीच्या जाळ्यात एखाद्या ठिकाणी बिघाड झाला, तर बाह्य जगातील आपले आकलन वास्तवापेक्षा निराळे होते.

निष्कर्ष

वर स्पष्ट केल्याप्रमाणे आपली ज्ञानेंद्रिये विशिष्ट परिस्थितीत आपल्याला फसवतात, तेच आपणाला दिसते, ज्याची आपण अपेक्षा करतो किंवा इच्छा धरतो; शिवाय काही वेळा आपणाला भास होतात. गंमत म्हणजे ज्या शारीरिक आणि मानसिक यंत्रणेद्वारे या चुका होतात, त्याच यंत्रणेद्वारे व्यवहारातील उपयोगी पडणार्‍या रास्त गोष्टीही साध्य होतात. सिग्नलजवळ लाल दिवा लागला, तर गाडी थांबते आणि हिरवा दिवा लागला की, ती चालू होते. याचप्रकारे सिग्नल लागतील अशी अपेक्षा होते आणि ती रास्तच असते. हे गृहीत आपण स्वीकारले नाही, तर क्रॉसजवळ प्रत्येक गाडीकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल आणि मेंदूवर माहिती साठवण्याचा मोठा ताण पडेल. उद्या सकाळी सूर्य उगवणार ही अपेक्षा अशीच रास्त असते. अपेक्षा अशा तर्‍हेने आपल्या व्यवहारी जीवनात अतिशय उपयोगी पडतात. तथापि, आपण ज्याची अपेक्षा करतो, तसे घडत नसेल तर प्रश्न निर्माण होतात. आपण खोटे आकलन स्वीकारतो.

आपले आकलन सदोष होण्याचीही शक्यता असल्याने आपली ज्ञानेंद्रिये आपल्याला नेहमीच वास्तवाचे अचूक ज्ञान देतील, असा विश्वास बाळगणे योग्य नाही. म्हणून ऐकीव पुरावे किंवा माहितीवर एखाद्या दाव्याचे मूल्यमापन करणे योग्य नाही. मी भूत पाहिले किंवा मला परग्रहावरील माणूस दिसला, हा उपाशी राहिल्याचा भावनिक ताणाचा, नशिल्या पदार्थाचा, इंद्रीय भ्रमाचा किंवा मेंदूतील दोषाचा परिणाम असू शकतो. गूढ किंवा दैवी कारणापेक्षा ही कारणे अधिक योग्य आणि स्वीकारार्ह वाटतात. जी कारणं अधिक ग्राह्य वाटतात, ती स्वीकारणे केव्हा योग्यच. खेदाची बाब अशी की, उत्क्रांत होत असताना माणसांना ऐकीव रम्य कथांचे आकर्षण आणि अशा कथांना महत्त्व देण्याची ऐतिहासिक सवय ही व्यक्तीच्या भुतावरच्या घटना वर्णनाला स्वीकारार्ह कारण ठरते. एका मानसशास्त्रज्ञाने म्हटलंय की, आपले विश्वास किंवा श्रद्धा या आपल्याला मौल्यवान ठेवीसारखे वाटतात. दागिने, पैसे किंवा ठेवीप्रमाणे आपल्या श्रद्धासुद्धा आपणास अमूल्य वाटतात. परिणामी आपले विश्वास किंवा श्रद्धा यांना आपण घट्ट धरून ठेवणे, श्रद्धेला पुरावा असतो म्हणून नव्हे, तर त्यामुळे मनाला बरं वाटतं म्हणून होय. परिणामी आपल्या दोषावर किंवा चुकीच्या आकलनावर कशी मात करायची हे खरोखर अवघड काम आहे. पण ते अशक्य नाही. यासाठी खालील प्रकारे आपण आपल्या वर्तनात बदल करण्यास सुरुवात करू शकतो.

हे प्रश्न स्वत:ला विचारा!

(1) तुमची समजूत/श्रद्धा ही खरीच ठरावी, हा तुमचा हट्ट/गरज आहे का?

(2) एखादी विशिष्ट घटना घडून यावी, अशी तुम्ही अपेक्षा करता का?

(3) तुमच्या अशा आंतरिक इच्छा/अपेक्षा बाजूला ठेवून वेगळ्या अंगाने किंवा दृष्टीने तुम्ही जगाकडे पाहू शकता का?

या तीनही प्रश्नांना ‘होय’ असं तुमचं उत्तर असेल, तर तुम्ही जगाकडे पाहताना किंवा घटनांचा अर्थ लावताना अतिशय काळजीपूर्वक वर्णन केले पाहिजे.

प्रा. . रा. आर्डे