Categories
कविता

कार्यकर्त्यांच्या कविता

वार्षिकांक - २०१७

माझा पत्ता (अमृता प्रीतम)

आज मी घरक्रमांक पुसला आहे

आणि गल्लीच्या शिरोभागावरील

गल्लीचे नाव हटवलेय

आणि,

प्रत्येक सडकेच्या

दिशादर्शक नावावर रंग फासलाय

कुणालाही कळू नये म्हणून

पण,

जर तुम्हाला मला भेटायचंच असेल

तर,

जगातील सर्व देशांत, सर्व खंडांत

सर्व शहरांतील

सर्व गल्ल्यांतील

सर्व दारांवर थाप द्या…….

असेल हा एक शाप वा वरही असेल!

जेथे

स्वच्छंदी-निर्भय-निर्धारी आत्म्याची सावली पाहाल

……. समजा, तेच माझे घर आहे…..

ईशान संगमनेरकर, मुंबई

मोबा. 9821817656


कळले नाही

देव जन्मला मेंदूत केव्हा, कळले नाही,

माणूस मेला तिथेच तेव्हा, कळले नाही.

देव-देवता वरून येऊन मेंदूत पडल्या,

कसे फाटले आभाळ केव्हा, कळले नाही.

धूर निघे सोन्याचा येथे ते कळले पण,

कोण राबले खाणीत, तेव्हा कळले नाही.

तेलावाचून पणत्या ‘बाबा’ सहज पेटवी,

गरीब मुलीला वृत्त कसे हे कळले नाही?

हवी तेवढी राख घरातील चुलीत असता

संत काढतो हवेतुनी का कळले नाही,

तिमिरातील आंधळ्या श्रद्धेला दिवा दावता

बुद्धीतून का फुटे न लाव्हा, कळले नाही.

-प्रा. अनिल सोनार


सोवळ्यातला वाघ

एकदा एका बाईंचा

देव बाटला!

पुण्य गेलं वाहून

खिसाच फाटला!

बाई उठल्या,

जातीनं पेटल्या,

फौजदाराला भेटल्या,

आणि म्हटल्या-

“शूद्र विधवेनं, देव बाटवलाय,

लिहून घ्या गुन्हा!

हत्तीच्या पायी देऊ

पेशवाई आली पुन्हा!!”

“माहेर माझं

रेशीम बाग!

सोवळ्यात असतो

तिथला वाघ!”

बाई खोले!

त्यांना ठाऊक नव्हते, फुले!!

त्यामुळे झाला लेट,

दोन शतकांचा थेट!

एवढ्यात, संविधान झालं जागं

वाघाच्या लागलं मागं

वाघ पळाला, सोवळं टाकून,

बाई बसल्या, तोंड झाकून

अनिल चव्हाण, कोल्हापूर

मोबा. 9764147483


तू बंदूक म्हण

मी गांधी, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी म्हणतो

तू जातीय विषमता म्हण

मी फुले, शाहू, आंबेडकर म्हणतो

तू अंधश्रद्धेचे, गुलामीचे धर्म सांग

मी बुद्धाचा समानतेचा, विज्ञानाचा धम्म सांगतो

तू मनुस्मृतीची हुकूमशाही सांग

मी संविधानाची लोकशाही सांगतो

तू हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सांग

मी फक्त माणूस आणि माणुसकी सांगतो

महिंद्र मुरलीधर बनसोडे

मोबा. 9029222128


खबरदार पुरोगाम्यांनो

का पुरोगाम्यांनो का…?

का तुमचा घोडा आमच्यापाशी अडतो ?

जळी-स्थळी काष्ठी-पाषाणी

का तुम्हाला आमचाच धर्म नडतो? ॥1॥

आली नागपंचमी की, लागले बोंबलायला

वाचवा साप

वाचवा साप

अरे बाकी दिवशी मारतो दगड,

पण पुजतो ना एके दिवशी,

यात कसलं आलंय पाप.!

साप मेला तरी बेहत्तर,

मांसाहारी असूनही

त्याला दूध पाजून

आमची ‘उज्वल’ परंपरा जपतो,

जळी-स्थळी काष्ठी-पाषाणी

का तुम्हाला आमचाच धर्म नडतो?॥2॥

आला गणपती की कोकलू लागतात

थर्माकोल वापरू नका

मूर्ती शाडूची करा.

पीओपी, थर्माकॉलसारख्या

तुमच्याच विज्ञानाचा

वापर करतो,

निदान कौतुकाची थाप तरी मारा.

धर्मासाठी झाले थोडे

नदी-तलाव प्रदूषित, तर

तुमचा भेजा का ठणकतो ?

जळी-स्थळी काष्ठी-पाषाणी

का तुम्हाला आमचाच धर्म नडतो?॥3॥

दीन दीन दिवाळी, म्हणे साजरी करा

फटाकेमुक्त दिवाळी, सुरू होते तुमची वळवळ

दिवाळीत फटाके नाही तर काय

गोट्या खेळू ?

बंद करा तुमची फालतूची बडबड

धर्म-रीतीसाठी ‘चायनीज’

फटाके संस्कृती जपली

तर का तुमचा जीव जळतो ?

जळी-स्थळी काष्ठी-पाषाणी

का तुम्हाला आमचाच धर्म नडतो?॥4॥

आमचा कोणताही सण आला की,

तुम्ही विघ्नसंतोषी डबक्यातून

बाहेर येतात ?

आणि धर्मचिकित्सेच्या

नावाने प्रत्येक गोष्टीला

नावे ठेवतात.

आमच्या धर्मात काही उणे नाही.

त्यातील विकृतींचाही अभिमान

आम्ही बाळगतो

जळी-स्थळी काष्ठी-पाषाणी

का तुम्हाला आमचाच धर्म नडतो? ॥5॥

नेहमी आमचा धर्म,

आमची कर्मकांडे,

दुसर्‍यांच्या धर्मात तुम्ही डोकावून पाहणार कधी ?

आमच्या धर्मातील धूळ तशीच राहू द्या.

दुसर्‍याचे अंगण झाडणार कधी?

आमच्या धुळीचा

कपाळी ‘टिळा’ लावला तर

का तुम्हाला नेहमी पोटशूळ होतो?

जळी-स्थळी काष्ठी-पाषाणी

का तुम्हाला आमचाच धर्म नडतो? ॥6॥

खबरदार पुरोगाम्यांनो…

आम्हा कट्टर धर्मांधांच्या वाटेला जाल तर…

कानाखाली शिवसूर्यजाळ काढू, जर फक्त आम्हाला टार्गेट कराल तर

लढू शकत नाही तुमच्या विचारांशी,

पण तुम्हाला थांबवावं कसं, असा जेव्हा आम्हाला प्रश्न पडतो

तुम्हाला संपवून

प्रश्न आम्ही सोडवतो

तुम्हाला संपवून

प्रश्न आम्ही सोडवतो ॥धृ॥

अनिल करवीर, तारापूर

9823280327


….डबक्यामध्ये डुबुकडुबुक !!

विठोबाला मागं सारत

बडव्यांचाच देव झाला

मशिदीत राहणारा फकीर साई

सोनेरी मंदिरात येऊन मेला !!……॥1॥

सामान्यांचा जाणता राजा

हिंदूंनी डांबून ठेवला

शांतिदूतांचा निळा पुतळा

लाल होऊन बस जळू लागला ……॥2॥

गांधीजींच्या सत्याग्रहाचा

‘गांधीगिरी’ म्हणून विनोद झाला

सेनेपासून सोनियापर्यंत

जो-तो तलवारी उपसू लागला ……॥3॥

राजकारणाच्या डबक्यामध्ये

सारेच पक्ष डुंबू लागले

याचा वा त्याचा देव्हारा घेऊन

नागडे-उघडे नाचू लागले …………॥4॥

जात-पात संपवणार्‍यांची

वेगळीच जात माजू लागली

दुसर्‍याची वेशीवर टांगून लाज

आपली मात्र झाकू लागली ……….॥5॥

पारतंत्र्यात सुद्धा कमरेला

जे नीतीचं धडूत होतं

ते पण फेडून डोक्याला बांधलं

होत्याचं अन् नव्हतं केलं !!……….॥6॥

दिलीप डोंबिवलीकर, वाई

9867249421


शंबुक!

त्रेता युगांत मारला गेलेला शंबुक

कलि युगात पुन्हा जन्माला येतो।

शंबुकवेडा असतो।

बिचारा पुन्हा-पुन्हा मारला जातो।

आणि

तो पुन्हा-पुन्हा जन्माला येतो॥

त्रेत युगांत तो शंबुक असतो।

द्वापारांत तो एकलव्य असतो।

तर कलियुगात रोहित वेमुल्ला॥

शंबुक वेडाच असतो।

तो नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहतो।

स्वत:वर होणारा अन्याय

तो निमूटपणे सहन करीत नाही॥

पण!

अन्यायाविरुद्ध तो एकटाच आणि

मूकपणे लढत राहतो॥

पण। पण॥ पण॥।

एक शंबुक असाही जन्माला येतो।

तो अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारतो।

तो सर्व शंबुकांना हाक देतो

आणि सांगतो-

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा॥

त्याने सर्व शंबुकांच्या हातात

एक शस्त्र दिलं-

शासकांनाही शासन करण्याचं।

-अ‍ॅड. सुभाष पाटील

हणमंतवडिये, जि.सांगली.


मानवतेची जात

जात-पात-धर्म मानत नाही,

असं आम्ही नेहमी म्हणत असतो.

तरीही प्रत्येक अर्जात मात्र,

जातीचा रकाना देत असतो.

जात, जात आणि जात,

हा शब्द नेहमी चघळत असतो.

जात काढल्याबिगर आमचा,

एकही दिवस जात नसतो.

जाती-धर्माचे बंधन ….

आम्ही अजूनही नाही तोडले.

फुले, आंबेडकर, गांधी यांचे,

ऋण अजूनही नाही फेडले.

जात असावी प्रत्येकाला,

असे मलाही वाटून गेले.

जात असावी विद्वत्तेची,

जात असावी कर्तृत्वाची.

असलीच तर एखाद्याची,

जात असावी मानवतेची.

प्रा. बी. एन. चौधरी,

धरणगाव, जि.जळगाव. भ्र.ध्व. 9423492593


कबीरजी (दोहे)

कर्ता-धर्ता त्यास समजुनी पूजन करती दगडाचे

विसंबुनी त्यावरती ओझे वाहती दु:खाचे

अंधार कोठडी जग हे त्याला काळ्या कर्माची दारे

दगडात दावूनी देव पुजारी लुटून नेई सारे ॥1॥

का दगडाचे पूजन करता? नाही उत्तर याला

मानव अवघे आशेपायी जपती अंधाराला

भन-भन भटकत फिर-फिर फिरले पूजत दगड-धोंड्याला

सद्गुरूची मग भेट होईना जळून जरी जन्म गेला ॥2॥

जीव जगती जगी ते सारे असती शाळीग्राम

साधू-संत देवासम तिथे दगडाचे काय रे काम?

विनंती केली शाळीग्रामा मनीचा भ्रम ना फिटला

मनात असता वादळ-वारा, तो तर सुखाला मुकला ॥3॥

पूजनी ठेवून शाळीग्राम मनात मायेचा हेतू

कांबळी काळी पांघरली, मग जनास दिसशील का रे तू?

फुकट करशी जप, तप, तीर्थ, व्रत अवघा ध्यास

दूरच तरी भाग्याचा तारा अंतरी निराश, उदास ॥4॥

जगी वाढली भूतकाळातून तीर्थ व्रतवेल

कबीर उपसून फेकून देई, संपवी दुष्ट खेळ

मनमयुरा तव हृदय द्वारका कायेस मान काशी

गाभाराच तव तनु, चिर-परिचित ज्योत जीवाशी ॥5॥

जग जरी भटके काशी-मथुरा दगडावर डोके आपटे

हृदयी हरीचा वास असे तर कबीरा दु:ख फिटे॥

अ‍ॅना गोन्स, पुणे


….. आणि भारत सज्ज झाला

14 महिन्याचं लेकरू कडेवर घेऊन ,

आपल्या 5 वर्षांच्या मुलीला हाताने ओढत,

7 वर्षाच्या मुलीच्या कडेवर बसलेल्या

3 वर्षाच्या मुलीला बिस्किटाचा घास भरवत,

ती 6 महिन्यांची पोटुशी माऊली,

अनवाणी पायाने, ’यावेळी मुलगाच होऊ दे!’

असा नवस बोलण्यासाठी मंदिरात आली..!!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला! ॥1॥

गळ्यात ताईत आणि मनगटाला गंडा बांधला,

नाकात दोन-दोन थेंब टाकून, परातीतल्या पाण्यात हात बुडवून, कावीळ उतरवली,

आणि सापाचे विष उतरवण्यासाठी मांत्रिक गाठला!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला! ॥2॥

मुलीच्या लग्नात 10 तोळे सोने आणि लाखभर हुंडा

शेत विकून दिला, शिवाय तिचं बाळंतपण सुद्धा केलं!

बाळाच्या जावळाला बोकड कापून जेवणावळी घातल्या!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला! ॥3॥

बाई कमावते, नवरा दारूत उडवतो, रात्री पायाखाली तुडवतो.

तरीही वंशाचा दिवा हवा म्हणून सासू रुसून बसली!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला! ॥4॥

नापिकीला कंटाळून बाप हवालदिल झालाय! तंगड्या वर करून बसलेल्या मुलाच्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय! हळदीला डीजे नाही आणला तर लग्न नाही करणार म्हणते धाकटी मुलगी!

नांदवायचं नाही म्हणताहेत सासरचे, म्हणून घरी आली मोठी मुलगी..!!

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला! ॥5॥

नव्या गाडीच्या नंबर प्लेटला लिंबू मिरची बांधली,

राहत्या घरातले स्वयंपाकघर पूर्वेचं पाडून पश्चिमेला बांधलं,

नावाच्या स्पेलिंगमध्ये एक्सट्रा लेटरही जोडून घेतलं

आता कुठे पोरगा बिनपगारी मास्तर म्हणून नॉन ग्रांट च्या शाळेत लागला

आणि भारत महासत्ता बनण्यासाठी सज्ज झाला! ॥6॥

डॉ. अभिनय दरवडे

संगोपन बालरुग्णालय, धुळे


गार्द्यांच्या गर्दीत सत्यनारायण मेला

ध्वनी प्रदूषण। वायू प्रदूषण।

तन प्रदूषण। मन प्रदूषण।

प्रदूषित सारे। झाले वातावरण।

अध्यात्मासी पडले। बुवांचे वेष्टन॥1॥

कोणी नाना, दादा। तात्या आणि आप्पा।

वामन, अनिरुद्ध। मारताती गप्पा।

कोल्हाट्याच्या खेळी। चाले कसरत।

अध्यात्माचे खेळी। बुवांना बरकत॥2॥

भाव तोचि देव। साधू-संत म्हणती।

शूचित्वी निरंजनी। देव राहे म्हणती।

पीठाधीश मठाधीश। बुवा सारे म्हणती।

देव आमुचे पायी। लोटांगण घालती॥3॥

मत्स्य, मांस, मदिरा तैसी मदिराक्षी।

मुद्रा मैथुनात यथेच्छ डुंबती।

गुरुगीता तैसी अष्टाव्रक गीता।

मुखी बरळती सार्थ(?) भगवद्गीता।

वेदशास्त्रवचने निरर्गल वदती।

शंकरभाष्य फोड तोंडी लावताती।

वेदार्थ, शास्त्रार्थ फुकाचा करिती।

विकारी बुवा देवा वेठी धरिताती॥4॥

देव यांना वाटे भाजीपाला।

अध्यात्माचा यांनी केला चोळामोळा।

येर्‍यागबाळ्यांच्या हाती अध्यात्म खुळखुळा।

पिसाट बुवांनी केला समाज हा खुळा।

योगयोग म्हणुनी भोग माजविती।

यथेच्छ भोगुनी अहं ब्रह्मास्मि म्हणती।

बुवांच्या गर्दीत देव घुसमटला।

गार्द्यांच्या गर्दीत सत्यनारायण मेला॥5॥


सूर्य की लो

डॉ. दाभोलकर की शहादत को सर्मपित

आप जो औरंगजेब की तरह

भगवीं सत्ता के बाहुबल

पीछे मोडना चाहते हो

इतिहास का रथ॥

सोचते हो हर बार

बंद कर दोगे

गोली की शूक से

सच की बुलंद आवाज॥

हमसे हमारा

दाभोलकर छीन कर

आप इसी भर्म में थे शायद॥

पर हार गए हो आप

धर्म की फुँकार के आगे

तर्क की लो ने

हार नहीं मानी॥

उसी सूर्य की रुश्नाई

लाट बन कर

हमारे साँसों में

समा चुकी है

वो तो देश दुनिया में

चेतना की जाग बन गयी है॥

जिसकी लो अब

अंध:कार के अंधेरे को

मनों से साफ कर देगी

जनमों-कर्मों का डर

उसी सूर्य की लो

मन-मस्तक में बसाकर

हम आगे बढते रहेंगे

उसके काफले के साथ

जब तक अंधेरे का

अंश मात्र बाकी है।

रामस्वर्ण लक्खेवाली, मुक्तसर (पंजाब)

मोबा. 09417362085


दारात रोज माझ्या”

दारात रोज माझ्या येतोस तू कशाला

पाही तुझा वळून ॥धृ॥ संसार फाटलेला ॥धृ॥

शेंदूर फासलेली मी मूर्ती पत्थराची

केलीत नाही दूर दु:खे कधी कुणाची

स्वीकार तू विवेका त्यागुनी भाव भोळा

पाही तुझा वळून ॥1॥ संसार फाटलेला ॥1॥

देतोस तू सदैव देवास दान काही

ऐदी बसून खाती त्यांचाच लाभ होई

घेऊन हाती तीर्थ तू लाविशी कपाळा

पाही तुझा वळून ॥2॥ संसार फाटलेला ॥2॥

पोटार्थी पंडितांची तू ओळखी लबाडी

भजनात गुंतवून तुज ठेवती अनाडी

होई शहाणा होई तू विसर मंदिराला

पाही तुझा वळून ॥3॥ संसार फाटलेला ॥3॥

राम मोरे, डोंबिवली

मोबा. 9167642888


संविधान

बुद्धाची करुणा जैनांची अहिंसा

नाकारिते हिंसा संविधान

मिटवितो वाद नाकारितो युद्ध

हसणारा बुद्ध संविधान

फुल्यांचा आसूड शिवबाचा बाणा

जिजाऊचा तान्हा संविधान

अशोकाचे चक्र बळीचे इमान

सत्याची कमान संविधान

जनाईची ओवी चोखाबाची व्यथा

तुकोबाची गाथा संविधान

कबीराचे दोहे वामनाची गाणी

जोतिबाची वाणी संविधान

सिंहाची आयाळ गरुडाचे पंख

नागिणीचा डंख संविधान

रंजल्या-गांजल्या आधार जो देई

त्यांची माता होई संविधान

गोरगरिबांचा तोच सुखकर्ता

असे विघ्नहर्ता संविधान

समता, स्वातंत्र्य न्याय नि बंधुत्व

विकासाचे तत्त्व संविधान

संविधान मनी संविधान ध्यानी

ऐकू येई कानी संविधान

सर्वांचे कल्याण सर्वांचे मंगल

रोखीते दंगल संविधान

संविधान आस संविधान ध्यास

ग्रंथसखा खास संविधान

बाळाचे हसणे फुलाचे फुलणे

समतेचे गाणे संविधान

चिमणीचा चारा बाळमुखी घास

शोषितांची आस संविधान

मताचे महास्त्र दिधले हातात

मुकेही गातात संविधान

दीन-दुबळ्यांचा घेतसे कैवार

देतसे आधार संविधान

काळजी घेतसे मायबापापरी

नव धरि दुरी संविधान

शत्रू मानवांचे वाढविती व्यथा

त्यांच्या पाठी लाथा संविधान

भावाभावात जे लावितात वाद

त्यांना करी बाद संविधान

जाती-धर्मावर माजविती रण

त्यांच्यासाठी घण संविधान

अराजकी आणि देशद्रोही धंदा

त्यांच्यासाठी फंदा संविधान

भ्रष्टाचारी सारे शेठ, सावकार

तुरुंगाचे दार संविधान

लबाड लफंगे आणि गुंड-पुंड

करितसे दंड संविधान

आमुची ती शान आम्हा अभिमान

आमुचा सन्मान संविधान

शब्दाला जागतो नेकीने वागतो

मस्तकी लागतो संविधान

शांततेने होतो सर्वांचा विकास

मोकळे आकाश संविधान

सावित्री नि जोती उजळल्या राती

दिव्यातल्या वाती संविधान

शोषितांच्या साठी राबवितो सत्ता

शाहूंचा खलिता संविधान

डॉ. प्रकाश मोगले, नांदेड

मोबा. 9420911709