Categories
संतविचार

विवेकवादी साहित्यिका : बहिणाबाई चौधरी

वार्षिकांक - २०१७

शंभर वर्षांपूर्वी जेव्हा अजूनही गावात बैलगाडी हेच प्रवासाचे साधन होते, रॉकेलचा दिवा प्रकाशासाठी वापरला जात होता, घरातल्या जात्यावरच धान्य दळावे लागत होते आणि आजारपणावर देवाचा अंगारा हेच एकमेव औषध होते, अशा काळात एक अंगठेबहाद्दूर महिला नवर्‍याच्या मागे कच्चीबच्ची सांभाळत समाजाचा अनुभव उघड्या डोळ्यांनी मांडते आहे, दैववाद, ज्योतिष आणि मायावादही नाकारते आहे आणि बजावते की, अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नयेसंसार खराखुरा आहे, त्यात अडचणी असल्या, तरी त्यातही समाधानाचे क्षण खूप असतात, ते आनंदाने जगा.

’बहिणाबाईंची गाणी’ ही एकूणच मराठी साहित्य विश्वातील अपूर्व आणि अकल्पित घटना आहे. शेतकरी कुटुंबातील संसारी स्त्रीची सुख-दु:खे जगत असताना बहिणाबाईंनी कविता रचली. खानदेशी बोलीत ही कविता त्यांनी रचली आहे. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुख-दु:खाकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही बहिणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. ती त्यांच्या कवितेत प्रतिबिंबित झाली आहेत. ’बहिणाबाईंची गाणी’ वाचताना किंवा अभ्यासताना सतत प्रभावीपणे जाणवते ती बहिणाबाईंची भाषिक क्षमता. ध्वनी, शब्द आणि वाक्य या घटकांच्या सहाय्याने बहिणाबाईंनी इतकी विविध, विपुल, विचित्र आणि विलक्षण भाषिक रूपे कशी घडविली, याचेच आश्चर्य वाटते. अक्षरओळख नसताना, वाचन, लेखन करण्याची क्षमता नसताना बहिणाबाई काव्यनिर्मिती करू शकल्या. तसेच पोथ्या-पुराणातील ऐकलेल्या कथांच्याप्रमाणे पारंपरिक विचार या कवितेतून व्यक्त होत नाहीत; तर विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी विचार व्यक्त होतात, एखाद्याला मोठे आश्चर्य वाटेल.

’बहिणाबाईंची गाणी’ हा बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा संग्रह 1952 साली प्रसिद्ध झाला. आपल्या अशिक्षित आईच्या कविता सोपानदेव चौधरींनी वेळोवेळी उतरवून घेतल्या आणि बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर आचार्य अत्रेंच्या प्रेरणेने त्या 1952 मध्ये प्रसिद्ध केल्या. कवितांच्या लेखनकाळाचा उल्लेख या पुस्तकात आढळत नाही. बहिणाबाईंचे संपूर्ण नाव बहिणाबाई नथुजी चौधरी (जन्म 1880 – मृत्यू 3 डिसेंबर 1951) खानदेशातील असोदे गावातील महाजनांची कन्या. विवाहानंतर जळगाव येथे वास्तव्य. वयाच्या तेराव्या वर्षी बहिणाबाईंचे लग्न झाले आणि वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना वैधव्य प्राप्त झाले. ज्या काळात केशवसुत, विनायक, तांबे, गोविंदाग्रज, बी इत्यादी कवी कविता लिहित होते, त्याच काळात जात्यावर दळता-दळता किंवा शेतावर काम करता-करता आपल्या बोलीभाषेत बहिणाबाई संसाराची गाणी गात होत्या. बहिणाबाईंची प्रतिभाशक्ती उपजत होती, तशीच भाषिक क्षमताही उपजत होती. बहिणाबाईंनी ओव्या रचल्या, विविध भाषिक रूपे घडविली. या ओव्या त्यांच्या तोंडी असत. सोपानदेव लिहू-वाचू लागण्याइतके सक्षम झाल्यानंतर सोपानदेवांनी या रचना यथावकाश लिहून काढल्या असाव्यात. “माझ्या आईला काव्याचे देणे अंगचे होते. कथा-कीर्तनादी श्रवणाने तिला बहुश्रुतपणा लाभला होता. कथा-पुराणातले जे काही थोडेफार आईच्या कानी येत असे ते ऐकून स्वत:चेच असे काही अद्भुतरम्य ती सांगत असे.” असा उल्लेख सोपानदेवांनी केला आहे. “1926 साली सोपानदेवांनी शिक्षणासाठी जळगाव सोडले आणि ते नाशिक येथे व पुढे 1931 मध्ये ते ग्वाल्हेर येथे गेले. त्या कालावधीत आईच्या ओव्यांची वही कोठेतरी गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.” त्या नोंदीवरून या कवितांचे लेखन 1926 पूर्वीच झाले असावे असे निश्चितपणे म्हणता येते. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर एका जुन्या गंजलेल्या ट्रंकेत गीतांची वही सापडली. त्यामुळेच या कविता रसिकांपर्यंत पोचू शकल्या. “बहिणाईंची गाणी” या संग्रहात 48 स्फूट कविता, काही स्फूट ओव्या आणि सासू, नणंद, जाऊ; तसेच खेड्यातील काही व्यक्ती यांची व्यक्तिचित्रे रेखाटणार्‍या लहान-लहान कविता आहेत.

बहिणाबाईंच्या काव्यनिर्मितीची प्रक्रिया कोणत्याही रूढ साहित्यशास्त्राच्या चौकटीत बसणारी नाही. ती प्रक्रिया बहिणाबाईंच्याच शब्दात पाहणे योग्य ठरेल. ’घरोटं’ या कवितेत त्या म्हणतात –

अरे, घरोटा घरोटा

तुझ्यातून पडे पीठी

तसंतसं माझं गानं

पोटातून येतं व्होटी”

(बहिणाईंची गाणी पृ. 16)

भावकवितेची व्याख्या बहिणाबाई अगदी सहजपणे सांगतात. ’बहिणाईंची गाणी’ ही तिच्या संसाराची गाणी आहेत. ही गाणी तिच्या ’पोटातून ओठावर’ आली आहेत. जितक्या सहजपणे झाडाला पालवी फुटते, तितक्या सहजपणे ही गाणी स्फुरलेली आहेत.

एका बाईने बहिणाबाईंना विचारले, ‘तुला एवढे हे शिकवतो कोण? ही गाणी तुला सुचतात तरी कशी?’ या प्रसंगी दिलेले उत्तर बघण्यासारखे आहे.

माझी माय सरसोती, माले शिकवते बोली

लेकबहिनीच्या मनी किती गुपितं पेरली.

माझ्यासाठी पांडुरंगा, तुझं गीताभागवत

पावसात सामावतं, माटीमधी उगवतं”ं

(बहिणाईंची गाणी पृ. 3)

पेरणे आणि उगवणे या दोन क्रियापदांचा अनुबंध बहिणाबाईंनी सहजपणे व्यक्त केला आहे. सरस्वतीने बहिणाबाईंच्या मनात पेरलेली गुपितं म्हणजे काळ्या मातीविषयी, आभाळाविषयी, देवाविषयी, माणसांविषयी मनात अंकुरलेल्या अनंत भावना. अशा भावना प्राचीन संतकवींनी गीता, महाभारत, भागवत इत्यादी कथोपकथांतून व्यक्त होणार्‍या मानवी कृती, उक्ती, स्वभाव याद्वारे व्यक्त केल्या; तसेच विठ्ठलभक्तीद्वारे, कृष्णभक्तीद्वारे व्यक्त केल्या. पण बहिणाबाईंना पांडुरंगभक्तीसाठी गीता-भागवताकडे जावे लागत नाही. तिचं गीता-भागवत पावसातच सामावलेलं असतं अन् त्या पावसानं माती भिजली की ते मातीत उगवतं आणि सरस्वतीने पेरलेली मनातली गुपितं गाण्याचं रूप घेऊन प्रकट होतात.

बहिणाबाई आपल्या बोलीभाषेत अत्यंत जिव्हाळ्याने संसाराची गाणी गात होत्या. या गाण्यांचे नाते थेट प्राचीन संतकाव्याशी होते, तसेच लोकसाहित्याशीही होते. ’ओवी’ हे रचनाबद्ध संतकाव्य आणि लोकसाहित्यात समान होते. सहज स्फुरलेल्या शब्दात आपल्या उत्कट भावना संतांनी ओवल्या आणि लोकसाहित्यात सासुरवाशिणीने, माहेरवाशिणीने आपल्या संसारातील लौकिक सुख-दु:खांच्या भावना सहजस्फूर्त शब्दांत गुंफल्या. केशवसुतादि कवींनी प्राचीन मराठी कवितेला आधुनिक रूप दिले. मराठी कवितेचा चेहरामोहराच बदलून टाकला. बहिणाबाई आधुनिक काळात जन्मल्या आणि जगल्या. त्यांनी आधुनिकतेचा स्वीकार केला. परंतु प्राचीन संतकवितेशी त्यांचे अतूट नाते आहे.

संतकवींपेक्षा बहिणाबाईंची कविता वेगळी आहे. संतांनी कर्म करता-करता भक्ती करायला सांगितली हे खरे; मात्र हेही खरे की, संतकवींनी संसार नि:सार मानला, असार मानला. बहिणाबाई मात्र संसाराचे ’सार’ सांगतात. त्यांची ’संसार’ ही कविता म्हणजे संसाराचे मर्म सांगणारे एक सुंदर सूक्तच आहे-

अरे संसार संसार,

जसा तवा चुल्ह्यावर

आधी हाताला चटके

तवा मिळते भाकर”

(बहिणाईंची गाणी पृ. 11)

संसाराचा खरा अर्थ बहिणाबाईंनी अत्यंत मोजक्या शब्दांत सांगितला आहे. सत्य काय ते एकच ब्रह्म होय. दृश्य जगत्मिथ्या होय असा विचार शंकराचार्यांनी ’ब्रह्मसत्यं जगन्मिथ्या’ या उक्तीद्वारे मांडला. शंकराचार्य जग हे भासरूप म्हणजे मिथ्या मानतात. या विरक्तीच्या तत्त्वज्ञानाने महाराष्ट्रातील गोरगरिबांचे आजवर खूपच नुकसान झाले आहे, आजही होते आहे. बहिणाबाईंनी मात्र ठामपणे सांगितले आहे

‘’अरे संसार संसार

खोटा कधी म्हणून नही

राऊळाच्या कयसाले

लोटा कधी म्हणू नही’

(बहिणाईंची गाणी पृ.11)

संसाराला खोटा म्हणू नये. देवळाच्या कळसाला कोणी लोटा म्हणते काय? संसार म्हणजे केवळ रडणं-कुढणं नाही, संसार म्हणजे गळ्यातला हार. त्याला कोणी लोढणं म्हणता कामा नये. संसार वरवर दु:खमय, कष्टमय वाटत असला तरी त्यात माधुर्य आहे, जिव्हाळा आहे. अशा संसाराला कवयित्री वरून विरूप; पण आत गोड असणार्‍या खिरा काकडी, भिलावा, शेंगा यांची उपमा देते. खिरा काकडी वर तोंडाला कडू असते; पण बाकी सारी गोडच लागते. संसार म्हणजे दोन्ही जीवांचा विचार होय. भारतीय तत्त्ववेत्त्यांनी संसाराबद्दल बराच काथ्याकूट केलेला आहे. मात्र बहिणाबाई या तत्त्वज्ञानाला ठाम नकार देतात. साध्या, सोप्या भाषेत संसाराचे मर्म सांगतात.

ग्रामव्यवस्था :

बहिणाबाईंनी स्वत:च्या माहेराचे, माहेरच्या वाटेचे घरापासून मळ्यापर्यंत लागणार्‍या वेगवेगळ्या घरांचे, वस्त्यांचे वर्णन ’माहेर’, ’माहेरची वाट’, ’घरापासून मळ्याकडे’ या कवितांमधून केले आहे. हे वर्णन वाचताना महाराष्ट्रातील एक प्रातिनिधिक खेडेच वाचकांच्या डोळ्यासमोर उभे राहते.

’रातदिन गजबज असं खटल्याचं घर’,

महाजन बाप, आई भीमाई, भाऊ घना आणि गना, बहिणी सीता, तुयसा; याबरोबरच माहेरची लौकी नदी, रस्त्यांचेही वर्णन ’माहेर’ या कवितेत येते. माहेरच्या वाटेवर लागणार्‍या पानांच्या तांड्यांचे, रेल्वे फाटकाचे, पिवळ्या चिकन मातीचे, बोरी-बाभळीचे, धान्याने भरलेल्या बैलगाड्यांचे वर्णन ’माहेराची वाट’ या कवितेत आले आहे.

’घरापासून मळ्याकडे’ या कवितेत एकेका तुकड्यात एकेका वस्तीचे दर्शन घडते. प्रथम येतो तो महारवाडा. या महारवाड्याच्या दैन्यावस्थेचे चित्रण बहिणाबाईंनी केले आहे.

देखा महारवाड्यात

कशी मानसाची दैना

पोटामधी उठे आग

चुल्हा पेटता पेटेना’

(बहिणाईंची गाणी पृ. 47)

महारवस्तीनंतर दारूची भट्टी लागते. पुढे बदक, कोंबड्या पाळणारा नारखावाडा व पुढे मारवाड्याची पेढी येते. या निमित्ताने चुनीलाल मारवाडी आणि आप्पा महाराज यांची तुलना त्या करतात. मारवाड्याच्या वाट्याला दाम आला आणि आप्पाजींच्या वाट्याला राम आला, असे बहिणाबाई सांगतात. पुढे येतो छापखाना – कोरा कागद छापून शहाणा होतो; मात्र माणूस कोराच्या कोराच राहतो.

मानसा परीस मानूस

राहतो रे येड जाना

अरे होतो छापीसन

कोरा कागद शहाना”

(बहिणाईंची गाणी पृ. 49)

असे बहिणाबाई म्हणतात. पुढे येते ’भुताची हवेली’ बहिणाबाईंचा भुताखेतावर विश्वास नव्हता. आपणच आपणाला भितो, असे त्या म्हणत.

भुईमधी रे डबोलं

डोई पापाचं टोपलं

अरे मानसाचं भूत

मानसानं रे घडलं।”

(बहिणाईंची गाणी पृ. 49)

असा विचार ’भुताची हवेली’ बाबत बहिणाबाई सहजतेने बोलून जातात. पुढे भाटणीच्या घरानंतर मारवाड्याचा बालाजी आणि शेतकर्‍याचा विठोबा या दोन देवळातील देवांची तुलना बहिणाबाईंनी केली आहे.

सोन्यारूप्यानं मढला

मारवाड्याचा बालाजी

शेतकर्‍याचा इठोबा

पानाफुलामधी राजी’

(बहिणाबाईंची गाणी पृ. 50)

खरं म्हणजे बालाजी, विठोबा दोन्ही देव एकच; पण गरिबी-श्रीमंतीने त्यांच्यातही भेद निर्माण केला, याकडे बहिणाबाईंनी लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील एका संपूर्ण खेड्याचे विविधांगी दर्शन बहिणाबाईंनी घडविले आहे. व्यक्तीचे केवळ वर्णन करून कवयित्री थांबत नाहीत, तर त्याबाबतचे चिंतन व्यक्त होते. त्यामधून एखादा विचार, एखादे सामाजिक सत्य सहजच सांगून जातात.

’गुढी उभारणी’, ’आखजी’, ’पोया’, ’कानबाई’ या सणांचे चित्रण बहिणाबाईंच्या कवितांमधून आले आहे. काय ही लोकांची तर्‍हा! जमिनीच्या मध्ये जो उभा असतो, त्याला आडवा म्हणतात. ज्या दिवशी गुढी उभारतो त्याला पाडवा म्हणतात.

आसं म्हणूनही कधी

जसं उभ्याले आडवा

गुढी उभारतो त्याले

कसं म्हणती पाडवा?’

(बहिणाईंची गाणी पृ. 39)

गुढी उभारली जाते; मग ’गुढीपाडवा’ असे का म्हणावयाचे? असा प्रश्न बहिणाबाई उपस्थित करतात. त्या ऐवजी गुढी उभारणी म्हणा, असे सांगतात. ज्याच्यातून पीठ पडते त्याला जातं का म्हणावे? असा प्रश्न करून बहिणाबाई त्याला ’घरोटा’ म्हणतात. रूढ मार्गावरून वाटचाल करण्याऐवजी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे बहिणाबाईंचे धाडस या ठिकाणी आढळून येते.

’कानबाईचा सण’ हे खानदेशचे खास वैशिष्ट्य मानले जाते. बहिणाबाईंनी कानोड आणि पंढरीच्या पांडुरंगाची तुलना केली आहे.

अरे कानोडकानोड

सदा रूसतेफुगते

अंगावरती ठियाले

सर्वे डागीने मांगते.’

(बहिणाईंची गाणी पृ.74)

गाण्या-दागिन्यात दंग असणार्‍या कानोडपेक्षा एकनाथासाठी चंदन घासणारा, दामाजीबरोबर पहारा करणारा, जनाबाई बरोबर दळण दळणारा, कबीरासोबत शेले विणणारा असा भक्तांच्या कामी येणारा विठोबा हाच खरा देव आहे, असा विचार बहिणाबाई मांडतात.

अरे, एकनाथासाठी

कसा चंदन घासतो

सावत्याच्या बरोबर

खुरपं हातात धरतो.

(बहिणाईंची गाणी पृ. 74)

म्हणूनच खरा देवामधी देव पंढरीचा पांडुरंग हा विचार बहिणाबाईंनी स्पष्टपणे मांडला आहे.

’देव दिसला देव कुठे?’

या कवितेत जगासाठी स्वत: चंदनासारखे झिजणार्‍याला आपल्यातच देव दिसतो, असा विचार मांडला आहे.

सदा जगाच्या कारनी,

चंदनापरी प्रसन्न

अरे सोतामधे त्याले

देव दिसलादिसला.”

(बहिणाबाईंची गाणी पृ. 76)

कृषीजीवन :

बहिणाबाई कृषिकन्या आहेत. शेती आणि शेती कामासंबंधीच्या कवितांतून शेतकर्‍याच्या वर्षभर चालणार्‍या कृषिकामाचे वर्णन आले आहे. शेतीच्या साधनांमध्ये शेतीकामासाठी लागणार्‍या सर्व साधनांची उपयुक्तता सांगितली आहे. ’आला पाऊस’ या कवितेत पाऊस आल्यावर होणारा आनंद चित्रित होतो. पेरणी ही केवळ शेतकर्‍यासाठी नाही, तर सर्व जगासाठी आहे, हे सत्य ’पेरणी’ या कवितेत मांडले आहे.

पेरनी पेरनी

अवघ्या जगाच्या कारनी

ढोराची चारनी

कोटी पोटाची भरनी’

(बहिणाईंची गाणी पृ.33)

पेरणीनंतर उगवून येणार्‍या पिकाच्या कोंबांचे वर्णन ’देव अजब गारोडी’ या कवितेत केले आहे. शेतकर्‍याच्या घरात धान्य येईपर्यंत त्याला कापणी, मळणी, उफणणी इ. कामे करावी लागतात. या कामांचेही वर्णन कवितांतून केले आहे.

शेतीकामात शेतकर्‍याला सदैव साथ देणारा प्राणी म्हणजे बैल. बहिणाबाईंनी ’गाडीजोडी’ या कवितेत बैलजोडीचे वर्णन केले आहे. ’पोया’ या कवितेत शेतकर्‍याच्या बरोबरीने राबणार्‍या बैलांच्या अपार कष्टाबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. वर्षभर काम करणार्‍या बैलाला संपूर्ण विश्रांती मिळावी, हा या सणामागचा हेतू आहे. पण प्रत्यक्षात बैलांच्या धावण्याच्या स्पर्धा लावून त्यांना पळविण्याची वाईट प्रथा पडलेली आहे. याबाबत कवयित्री म्हणते –

नका हेंडालू बैलाले

माझं ऐका रे जरासं

व्हते आपली हाऊस

आन बैलाले तरास’

(बहिणाईंची गाणी पृ. 46)

आज बैलाची पूजा करा. उपकाराचं देणं फेडा. शेतकर्‍याचे जीवन म्हणजे कष्टाचे. शेतकर्‍याची हाडे अखेर शेतातच मोडावयाची आणि त्याची राख तापीमाईतच पडावयाची, याची बहिणाबाईंना जाणीव आहे. जीवनाबद्दल कृतज्ञता बाळगून शेतकरी पंढरीच्या विठ्ठलावर श्रद्धा ठेवतो. ‘विठ्ठल मंदिर’, ‘आली पंढरीची दिंडी’ या कवितांमधून भजन-कीर्तनात रंगून जाणार्‍या वारकर्‍यांचे चित्रण येते. शेतीकाम संपल्यानंतर भजन-कीर्तनात रममाण होणार्‍या शेतकर्‍याचे चित्रण कवयित्री करते –

तथापि, शेतकर्‍याच्या कर्जबाजारीपणामुळे विठ्ठलाची भक्ती करणे सुद्धा त्याला किती कठीण होते, याचा अनुभव त्यांना होताच. म्हणूनच

अरे पांडुरंगा तुझी

कशी भक्ती करू सांग

तुझ्या रूपाआड येतं

सावकाराचं रे सोंग’

(बहिणाईंची गाणी पृ. 89)

अशा शब्दांत शेतकर्‍याच्या मनाचे हृदयद्रावक चित्र रेखाटले आहे. अशा रीतीने महाराष्ट्रातील भोळ्या, भाविक, कष्टाळू आणि समाधानी शेतकर्‍याच्या संसाराचे करूणकाव्य बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्याने बहिणाबाईंच्या कवितेत प्रकट झालेले आहे.

सासुरवाशीण :

तत्कालीन स्त्रीजीवनाचे चित्रही बहिणाबाई रेखाटतात. शेतकर्‍याच्या शेतात, मळ्यात, घरात त्याला साथ देते ती त्याची पत्नी. तिलाही बैलाप्रमाणेच कष्ट उपसावे लागतात. या कष्टाचे वर्णन ‘सासुरवाशीण’ या कवितेत येते. त्या काळातील सासुरवाशिणीचे मन अस्वस्थ करणारे चित्र बहिणाबाईंनी रेखाटले आहे.

उठ सासुरवाशिन बाई

उठ जानं शेतीकामाचा किती घोर

तू गोठ्यामधलं ढोर’

(बहिणाईंची गाणी पृ.43)

शेतकर्‍याचे घर. शेतीचा व्यवसाय. सासुरवाशिणीला कष्ट कसे चुकतील? भल्या पहाटे उठून दळण घालायचे. दळण संपले की डोक्यावर घडा घेऊन पाण्याला जायचे. पाणी भरून होईपर्यंत सूर्य उगवेल. मग स्वयंपाकाला चूल्हा पेटवावयाचा. हे तिचे जगणे बहिणाबाईंनी रेखाटले आहे.

सासरी कष्ट करताना माहेरची आठवण येते. माहेरची गाणी मुक्त स्वरांत गावीशी वाटतात. योगी आणि सासुरवाशीण

या कवितेत ’माझं माहेर-माहेर’ असे गाणे गाणार्‍या सासुरवाशिणीला योगी प्रश्न करतो

मंग माहेरून आली

सासराले कशासाठी?

या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणते –

देरे देरे योग्या ध्यान

ऐक काय मी सांगते

लेकीच्या माहेरासाठी

माय सासरी नांदते”

(बहिणाईंची गाणी पृ.44)

योग्याच्या प्रश्नाला सासुरवाशिणीने दिलेले उत्तर सासर-माहेर या संकल्पनांना वेगळे परिमाण देणारे आहे. योगी आणि सासुरवाशीण यांच्यातील हा नाट्यमय संवाद बहिणाबाई सुरेखपणे रंगवितात.

जीवनविषयक तत्त्वज्ञान :

जीवन जगता-जगताच भोवतालचा निसर्ग, समाज, समाजातील विविध रंगाढंगाची माणसं यांचे सूक्ष्म निरीक्षण बहिणाबाईंनी केले. त्या अनुभवातून, निरीक्षणातूनच त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान तयार झाले आहे. ’कशाले काय म्हणू नही’, ’संसार’, ’माझ्या जीवा’, हिरिताचं देनं-घेनं, ’वाटंच्या वाटसरा’, ’मोट हाकलतो एक’ या कवितांमधून बहिणाबाईंचे जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रकट झाले आहे.

’हिरिताचं देनं घेनं’ या कवितेत कवयित्रीने माणसांना सदाचाराचा एक मार्ग दाखविला आहे. स्वार्थाच्या मागे न धावता उपकारक प्रवृत्ती बाळगावी असे सांगताना त्या म्हणतात-

’नको लागू जीवा, सदा मतलबापाठी

हिरीनाचं देनं घेनं नही पोटासाठी’

माणसाने स्वार्थाच्या मागे धावू नये, यासाठी कवयित्री निसर्गाचा दाखला देते.

उभे शेतामधी पीक

उनवारा खातखात

तरसती कव्हा जाऊ

देवा भुकेल्या पोटात’

(बहिणाईंची गाणी पृ.20)

ऊन, वारा खात शेतातली उभी असणारी पिके भुकेल्या पोटात जाण्यासाठी आतुर असतात. पण अशा पिकांच्या शेताभोवती कपाटी लावाव्या लागतात. लोकांचे हे खोटेनाटे व्यवहार पाहून बोरी-बाभळीच्या अंगावर काटे येतात. कनगा कितीही भरला तरी तो रिकामा होतोच. हृदयाचं देणं-घेणं मात्र पोटासाठी नसते. म्हणून स्वार्थाच्या मागे लागू नको.

’कशाले काय म्हनू नही’ या कवितेत अनेक सुभाषिते विखुरलेली आहेत.

विना कपाशीनं उले

त्याले बोंड म्हनू नही

हरिनामाईंना बोले

त्याले तोंड म्हनू नही’

(बहिणाईंची गाणी पृ. 9)

ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नये आणि ज्यातून हरिनाम निघत नाही त्याला तोंड म्हणू नये. भुकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये अन् दानासाठी जो आखडला जातो त्याला हात म्हणू नये. इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये अन् जन्मदात्याला जो त्रास देतो त्याला लेक म्हणू नये. जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये अन् जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. मानवी सत्कृत्यांची अशी सूत्रबद्ध सूचीच या कवितेत पाहायला मिळते. एक-एक गोष्टीचे सत्कार्य सांगताना बहिणाबाई निसर्गातील घटनेचे अनुरूप असे दाखले देतात.

येहेरीतून ये रिती

तिला मोट म्हणू नही

केली सोताची भरती

त्याले पोट म्हनू नही’

(बहिणाईंची गाणी पृ. 9)

प्रत्येक कडवे एखाद्या सुभाषिताचे रूप घेते. माणसानं कसं वागावं, बोलावं, कसं राहावं, काय बोलू नये, काय करू नये, कुणावर प्रेम करावे, ममता करावी अशा अनेक प्रकारचा उपदेश बहिणाबाई करतात. आदर्श मानवी मूल्यांची यादीच बहिणाबाईंनी दिली आहे.

कोणती वस्तू केव्हा घडली? या विषयावर बहिणाबाईंच्या बर्‍याच ओव्या होत्या. त्यातील दोनच उपलब्ध आहेत. किल्ल्या, कुलपांचा नि बेड्यांचा जन्म कधी झाला ते कवयित्री मांडते.

जव्हा इमान सचोटी,

पापामधी रे बुडाले

तव्हा याच मानसानं

किल्ल्या कुलूप घडले ।

किल्ल्या राह्यल्या ठिकाणी

जव्हा तिजोर्‍या फोडल्या

तव्हा याच मानसानं

बेड्या लोखंडी घडल्या॥’

(बहिणाईंची गाणी पृ.90)

जेव्हा माणसाच्या मनातील चांगुलपणा, सच्चेपणा पापामध्ये बुडून गेला तेव्हा याच माणसानं किल्ल्या, कुलूप घडवले. मानवाच्या स्वार्थी प्रवृत्तीवर बहिणाबाईंनी निर्देश केला आहे. ’मी कोन’? या कवितेत माणसाच्या मनातील अहंकारी वृत्तीवर प्रकाश टाकला आहे.

बहिणाबाईंनी ‘मन’ या कवितेतून मनाचे चित्रण केले आहे. मन मोकाट आहे, चंचल आहे. मनातच विचार आणि विकार यांचा जन्म होतो. मनात जसे आभाळ मावत नाही तसा रागही मावत नाही.

मन जह्यरी जह्यरी

त्याचं न्यारं रे तंतर

अरे इच्चू साप बरा

त्याले उतरा मंतर’

(बहिणाईंची गाणी पृ. 18)

साप, विंचवाच्या वाटेला गेलं तरच ते दंश करतात. पण माणूस? समोर दिसेल त्याला आपल्या तिखट बोलण्याने दंश करतो. मन खसखशीच्या दाण्याएवढे सूक्ष्म आहे; तसेच आभाळाएवढे विशाल आहे. मन म्हणजे देवाला जागेपणी पडलेले स्वप्नच आहे. अगदी मोजक्या शब्दांत अतिशय हृदयंगम भाषेत मनाचे चित्रण केले आहे. बहिणाबाईंच्या लेखनातले तेज, मर्मभेदीपणा अपूर्वच आहे.

मानसा मानसा

तुझी नियत बेकार

तुझ्याहून बरं

गोठ्यातील जनावर’

(बहिणाईंची गाणी पृ. 77)

बहिणाबाईंना सर्वांत जास्त कशाची चीड असेल, तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या कृतघ्नपणाची. गाय, म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात. पण माणूस एकदा पोट भरले की उपकार साफ विसरून जातो. कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हलवतो, तर माणसा तू आपली मान मतलब साधण्यासाठी डोलवतोस. केवळ लोभामुळे तू माणूस असूनही ‘काणूस’ म्हणजे पशू झाला आहेस. एवढे सांगून झाल्यावर बहिणाबाईंनी माणसाला तळमळून विचारले आहे –

मानसा मानसा

कधी व्हशील मानूस’

(बहिणाईंची गाणी पृ. 18)

मानवतेलाच जणू काही त्यांनी हे व्याकुळ हृदयाने आवाहन केले आहे. आज स्वार्थाचा वणवा सर्व जगभर पसरला आहे. माणसे पशू होऊन एकमेकांशी झगडत आहेत. मानवता आज रक्तबंबाळ झाली आहे. म्हणूनच माणसाने माणूस कसे व्हायचे, हीच प्रचंड समस्या मानवजातीपुढे आज उभी आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईंना झाला होता. यावरून त्यांच्या प्रतिभासामर्थ्यांचा प्रत्यय येतो. आजच्या युगात मानवतेच्या या व्याधीचे अचूक निदान या कवयित्रीने केले आहे.

बहिणाबाई उदार अंत:करणाच्या होत्या. दारी आलेल्या कलावंतांना ओंजळीने धान्य न देता ती ओंजळ सुपामध्ये घालून द्यावी, असे त्या म्हणत. ‘धान थोडं असलं, तरी मन सुपाएवढं असलं पाहिजे,’ असे त्यांना वाटे. दारी येणार्‍या वासुदेव, बहुरुपी, किनरीवाले, एकतारीवाले, खंजिरीवाले अशा कलावंतांना भिक्षेकरी म्हटलेले त्यांना आवडत नसे.

नका म्हनू रे भिकारी

जरी तुम्ही नानावटी

करा गुनाची कदर

हात घाला कनवटी”

(बहिणाईंची गाणी पृ. 78)

शिणल्या-भागल्या जीवांचे मनोरंजन करण्याचे महत्त्वाचे काम ते करतात. त्यांच्या गुणांची कदर केली पाहिजे, असे बहिणाबाई म्हणतात.

वेसकरवाड्यातील तुळशीराम चोखोबांचा अभंग गात विठ्ठल मंदिराजवळून जात होता. बाबा भटजी त्याचवेळी पूजा आटोपून मंदिराच्या पायर्‍या उतरत होते. तुळशीरामाकडे पाहून ते खेकसले, बहिणाबाईंनी ते पाहिले होते. एकदा प्रसंग साधून बहिणाबाईंनी बाबा भटजींना प्रश्न विचारला – ‘तुम्ही दररोज पूजा करता, नमन करता, तेव्हा आपलं डोकं इठ्ठलाच्या पायावर ठेवता की, त्येच्या तोंडावर?’ बाबा भटजी म्हणाले, “भगवंताचे पाय किती पुण्यकारक, देवाच्या पायावरच डोकं पाहिजे.” बहिणाबाईंनी लगेच प्रतिप्रश्न केला- “मग अशा पुण्यात्री पायातून महार-मांग जलमले ते नीच कसे?” बाबाजी निरूत्तर झाले. पण “बाई शास्त्रातले तुला काही कळायचे नाही,” असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. पुढे एकदा “का रे, जे खरं-खरं असतं ते शास्त्रात नसतं का?” असे बहिणाबाईंनी सोपानदेवास विचारले. बहिणाबाई धर्मशास्त्राविषयी प्रश्न करतात; आणि तेही त्या काळात की, जेव्हा जातिभेद मानणे समाजमान्य होते, अशा काळात. बहिणाबाईंच्या मानवतावादी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन यामधून घडते. तसेच प्रस्थापित धर्मशास्त्र, रुढी-परंपरांच्या विषयी प्रश्न विचारण्याचे त्यांचे धाडसही महत्त्वाचे आहे.

शब्दचित्रे :

बहिणाबाईंनी आपल्या सहवासातील काही व्यक्तींची आखीव-रेखीव शब्दचित्रे त्यांच्या गुणावगुणांसह रेखाटली आहेत. भीमाई, सासू भिवराई, नणंद कासाई, जेठानी पानाई, वाहारी सीताई, ठमाबाई, गणपत, भानादाजी, मारोती, घुडाबाय, मुनीर (शिपाई), मुक्की पिंगादीन, छोटू भय्या, लालू मिय्या, पर्सुराम बेलदार अशी गावकुसातील माणसे अत्यंत मोजक्या शब्दांत साकार होतात.

जीवनात रोज भेटणार्‍या माणसांकडे बहिणाबाई विलक्षण मजेने, मिश्किलपणाने बघतात आणि त्यांचे वर्णन करतात. एखाद्या कुशल चित्रकाराने कमीत कमी रेषांत चित्र काढावे, तितक्या कुशलतेने बहिणाबाई आपल्या भोवतालच्या व्यक्ती वाचकांच्या डोळ्यासमोर उभ्या करतात. सार्‍या गावाच्या खोकल्याचे दान स्वीकारणारी खोकली माय, बंम्बंम् भोलेनाथ करणारा गोसावी असो, पंढरीच्या वारीला जाणे दरवर्षी पुढे ढकलणारा पर्सुराम बेलदार असो किंवा पायाला चक्कर लागलेली घुडाबाय असो – बहिणाबाईंनी सूक्ष्म निरीक्षणांतून या व्यक्ती अमर केल्या आहेत. अर्थात, ज्या-ज्या व्यक्तींमध्ये त्यांना मानवधर्म आढळला त्या-त्या व्यक्तींना त्यांनी आपल्या काव्यात ओवले आहे.

बहिणाबाईंची ’लपे करमाची रेखा’ आणि ‘आता माझा मले जीव’ या दोन कविता अन्वर्थक आहेत. या दोन्ही कवितांमध्ये त्यांच्या वैधव्यस्थितीचा निर्देश आहे. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाई विधवा झाल्या. त्यावेळी दोन छोट्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर होती. अशावेळी बहिणाबाई स्वत:च स्वत:चे सांत्वन करतात –

देव गेले देवाघरी

आठी ठेयीसनी ठेवा

डोयापुढे दोन लाल

रडू नको माझ्या जीवा

रडू नको माझ्या जीवा

तुला रड्याची रे सव

रडू हासव रे जरा

त्यात संसाराची चव’

(बहिणाईंची गाणी पृ.22)

आता रडण्याची सवय सोडून दिली पाहिजे आणि रडण्यालाही जरा हसवले पाहिजे, ही जाणीव अपूर्वच होय. सांत्वन करण्यासाठी आलेल्या आया-बायांना बहिणाबाई निर्धारपूर्वक सांगतात –

नका नका आयाबाया

नका करू माझी कीव

झालं माझं समाधान

आता माझा मले जीव’

(बहिणाईंची गाणी पृ.23)

आता स्वत:च स्वत:ला सांभाळले पाहिजे. शिवाय दोन छोट्या मुलांनाही सांभाळले पाहिजे, याची जाणीव बहिणाबाईंना झाली. ही दोन मुले तरी सुखी राहोत, एवढेच मागणे त्या मागतात. पंचांगात तरी वेगळे भविष्य ते काय पाहायचे म्हणून त्या ज्योतिषाला बजावतात –

नको नको रे जोतिषा

नको हात माझा पाहू

माझं दैव माले कये

माझ्या दारी नको येऊ’

(बहिणाईंची गाणी पृ.21)

शंभर वर्षांपूर्वीचे सामाजिक जीवन ध्यानात घेता भले-भले जोतिषाच्या मागे धावत असताना एका निरक्षर स्त्रीने ‘तू काय माझे भविष्य सांगणार? माझे भविष्य मीच घडवणार आहे,’ ही जाणीव व्यक्त करणे आणि त्याप्रमाणे आपले कुटुंब सावरणे हे खूपच धाडसाचे होते. उर्वरित आयुष्यात बहिणाबाईंनी स्वत:ला कामाला जुंपून घेतले.

आज एकविसाव्या शतकातही भारतीय समाज भविष्य, ज्योतिषी यांच्या कचाट्यातून मुक्त होऊ शकलेला नाही. विवाह असो, मुलांचे शिक्षण असो किंवा आणखी अतिशय महत्त्वाचा एखादा निर्णय असो, लोक ज्योतिषाचा सल्ला घेतात. भविष्य खोटे ठरले, तरी लोक विश्वास ठेवायचे सोडत नाहीत. फार तर ज्योतिषी बदलतात. भविष्य नुसते विचारून थांबत नाहीत, तर भविष्य बदलण्याचा प्रयत्न करतात. मग शनीची शांती करा, गुरूचा खडा घ्या. नवस, ग्रहशांती आणि इतर अघोरी प्रकार अशा अंधश्रद्धांमुळे समाजाचे किती नुकसान होत असेल, याची कल्पनाही करता येत नाही. अशा वेळी ज्योतिषाला ठामपणे नकार देणार्‍या बहिणाबाई काळाच्या किती पुढे होत्या, याची कल्पना येते.

’जरी फुटल्या बांगड्या, मनगटी करतूत’ असे त्या म्हणतात.

जरी बांगड्या फुटल्या असल्या, तरी मनगटातील कर्तृत्व अबाधित आहे याची त्यांना जाणीव झाली. पतिनिधनानंतर त्यांनी स्वत:ला शेतीच्या कामामध्ये गुंतवून घेतले. त्यांनी आभाळाशी, धरतीशी, निसर्गाशी नाते जोडले. मग आभाळाची, धरतीची, निसर्गाची गाणी गात त्या आपले एकाकीपण विसरून गेल्या. त्यावेळी वैधव्य आले की रडत-कुढत जगणं हेच स्त्रीचं प्राक्तन होतं. बहिणाबाईंनी हे प्राक्तन नाकारले अन् नशीब वाचणार्‍या ज्योतिषाला सांगितले –

बापा नको मारू थापा

असो खर्‍या असो खोट्या

नही नशीब नशीब

तयहाताच्या रेघोट्या”

(बहिणाईंची गाणी पृ. 21)

भारतीय समाजात रुतून बसलेली आणखी एक पूर्णपणे अशास्त्रीय कल्पना म्हणजे नशीब, दैव किंवा प्रारब्ध. पूर्वजन्मीच्या पापामुळे या जन्मी दु:ख भोगावे लागते, या अंधश्रद्धेने दु:ख सहन केले जाते. मात्र बहिणाबाईंनी हे नाकारले. बहिणाबाईंनी स्वत:च स्वत:च्या जगण्याला एक नवा अर्थ दिला.

’माझ्या जीवा’ ही कविता या अर्थाने लक्षणीय आहे. शंकराचार्यांनी ’पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननिजठरे शयनं भज गोविंदं भज गोविंदं।’ असा जन्म-मृत्यूच्या फेर्‍याचा जो वेदान्त सांगितला आहे, तो सर्वसामान्य माणसाला समजणे कठीण आहे. हे तर जन्म-मृत्यूचे रहाटगाडगे झाले. जन्माला येणार्‍या जीवाने करायचे काय? तर ’भज गोविंदं, भज गोविंदं.’ मात्र बहिणाबाई असला वेदांत सांगत नाहीत. त्या म्हणतात –

नही सरलं सरलं

जीवा तुझं येनं जानं

जसा घडला मुक्काम

त्याले म्हनती रे जीनं।’

(बहिणाईंची गाणी पृ. 13)

येण्या-जाण्याच्या दरम्यान या जगात जो मुक्काम घडला त्याला जगणं म्हणतात. या मुक्कामात ’भज गोविंदं’ करणं व्यर्थ आहे. कारण

येरे येरे माझ्या जीवा

काम पडलं अमाप

काम करता करता

देख देवाजीचं रूप’

(बहिणाईंची गाणी पृ.13)

या जगात प्रत्येकाने आपली कामे करावीत आणि काम करता-करता देवाचं रूप पाहायला हवं. जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावयाची –

ऐक ऐक माझ्या जीवा

पीडीएलाच कन्हनं

देरे गांजल्याला हात

त्याचं ऐक रे म्हणनं’

(बहिणाईंची गाणी पृ.13)

दु:खी, कष्टी लोकांचे दु:ख दूर करण्याचा प्रयत्न माणसाने करायला हवा. रडत-कुढत बसणं म्हणजे जीवन जगणे नव्हे. कितीही संकटे आली तरीही त्या संकटांवर मात करून हसत राहावयाचे. जगायचे कसे तर बहिणाबाई म्हणतात –

जग जग माझ्या जीवा

असं जगणं तोलाचं

उच्च गगनासारखं

धरित्रीच्या रे मोलाचं’

(बहिणाईंची गाणी पृ.14)

उंच आभाळाच्या तोलाचं आणि धरतीच्या मोलाचं जगणं जगण्यातच जीवाच्या जन्माचं सार्थक आहे. माणसाने आभाळाचे गुण आत्मसात केले पाहिजेत आणि धरतीचेही गुण आत्मसात केले पाहिजेत.

बहिणाबाईंचा काळ हा शंभर वर्षांपूर्वीचा. त्यांनी कधीही शाळेचे तोंड पाहिले नाही. तेराव्या वर्षी लग्न झाले आणि तिसाव्या वर्षी दोन कच्ची-बच्ची पदरात टाकून पती निधन पावले. मग अस्मानी आणि सुलतानी संकटांशी सामना करत बहिणाबाईंनी आपल्या मुलांचे संगोपन केले. त्यांचे जीवन घडवले. स्वत:चेही जीवन घडवले. त्या कधीही हताश, निराश झाल्या नाहीत. आज एकविसाव्या शतकात बुवा-बाबांचे मठ, डेरे आणि सत्संगाकडे नजर टाकली, तर संसारातल्या संकटांना घाबरून आधार शोधणारी लाखोंची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आजारपण, धंद्यात तोटा, नोकरीत त्रास, प्रौढ कुमारी, विधवा, परित्यक्ता, विधुर, शारीरिक-मानसिक विकलांग, आपल्या भौतिक समस्यांवर आध्यात्मिक उत्तर शोधण्याच्या प्रवासाला निघालेले असतात. यामध्ये सुशिक्षित-अशिक्षित असा काहीही फरक असत नाही.

या पार्श्वभूमीवर आपण ज्यावेळी बहिणाबाईंच्या जीवनाकडे-लेखनाकडे पाहतो, तेव्हा काय दिसते? बहिणाबाई कोणत्याही संकटासमोर झुकल्या नाहीत. उपास-तापास, व्रत-वैकल्ये, बुवा-बाबांचे मठ, मंत्र-तंत्र-ज्योतिष, आत्मा-परमात्मा-मोक्ष असल्या कोणत्या बाबींमध्ये त्या अडकल्या नाहीत. या सर्व गोष्टी बाजूला सारून त्या विवेकवादी जीवन जगल्या. आजचे जीवन खोटे आहे आणि मृत्यूनंतरचे पारमार्थिक जीवन खरे आहे, असला मायावाद त्यांना मान्यच नव्हता. बहिणाबाईंनी शेतीमध्ये स्वत: कष्ट केले. बहिणाबाईंनी आभाळाशी, धरतीशी, निसर्गाशीही नाते जोडले आणि मग धरतीची, आभाळाची, निसर्गाची गाणी त्या गाऊ लागल्या. त्या आनंदाने जगल्या. जमिनीची मशागत करताना, पाखरांवर, जनावरांवर माया करताना, पाऊस-पाण्याने हरखून जाताना त्यांच्या प्रतिभेने जे-जे टिपले, जे-जे अनुभव आले, त्यांचे त्यांनी चिंतन केले. त्यांनी मानवी जीवनाचे, मनाचे, शेतीभातीचे, पशु-पक्ष्यांचे, पाऊस, ऊन, रौद्र निसर्गाचेही सूक्ष्म निरीक्षण केले आणि हे सर्व आपल्या कवितेतून मांडले.

अशी ही बहिणाबाईंची कविता. बहिणाबाईंच्या कवितेला एक खास रंग आहे. मातीचा, पाना-फुलांचा, ग्रामीण जीवनाचा, खानदेशी-वर्‍हाडी भाषेचा घमघमणारा सुवास त्यांच्या कवितेतल्या प्रत्येक ओळीला येतो. ही कविता फक्त त्यांची आहे. कुठल्याही पढिकपणाचा तिला पुसटही स्पर्श नाही आणि कवितेतून व्यक्त होणारे विवेकवादी विचार हेही खास बहिणाबाईंचेच विचार आहेत. त्या काळाच्या मानाने किती तरी प्रगत, पुरोगामी विचार बहिणाबाई प्रत्येक ओळीतून, प्रत्येक साध्या-सोप्या विषयातून मांडतात. बहिणाबाई लौकिकार्थाने न शिकलेल्या, अशिक्षित; पण त्यांनी जीवनाचा ग्रंथ बारकाईने वाचला होता. त्यातून त्यांनी स्वत:साठी एक तत्त्वज्ञानही तयार केले होते. त्याप्रमाणे त्या स्वत: जगत होत्या आणि हेच विवेकवादी तत्त्वज्ञान आपल्या कवितेतून मांडत होत्या. वाचकांना विचारप्रवण करेल, अशी ही कविता आहे.

-डॉ. छाया पोवार

संपर्क : 9850928612

संदर्भ :

1. चौधरी सोपानदेव – बहिणाईंची गाणी, सुमित्रा प्रकाशन, मुंबई 1999/2000, 7 वी आवृत्ती पृष्ठ 78.

2. चौधरी सोपानदेव – तत्रैव पृ.66

3. चौधरी सोपानदेव – तत्रैव पृ. 86-87

4. कर्‍हाडे सदा -तत्रैव.