Categories
विशेष लेख

विविध देशांतील विज्ञान शिक्षण

वार्षिकांक - २०१७

विज्ञान युगातील विज्ञानाच्या शिक्षणाची विविध देशांत काय अवस्था आहे, याचा शोध लेखिकेने या निबंधात परिश्रमपूर्वक घेतलाय. सध्याची विज्ञान शिक्षणपद्धती आनंददायी आहे का, पोटभरू याचे उत्तर या लेखातून मिळेल. विज्ञान शिक्षण घेतलेली मंडळी देखील अंधश्रद्धाळू का याचे उत्तर त्यांच्या शिक्षणात मिळते, असा लेखिकेचा निष्कर्ष आहे. अमेरिकेसारख्या देशात विज्ञान शिक्षणाची अवस्था आनंददायी नाही.

शिक्षणक्षेत्राची जगभरातील चिकित्सा आपल्याकडील शिक्षण पद्धतीत काय बदल अपेक्षित आहेत, हे शोधण्यासाठी उपयोगी ठरेल.

Science is a wonderful thing if one doesn’t have to earn one’s living at it.

-Albert Einstein

म्हणजे, विज्ञान ही एक निखळ आनंद देणारी गोष्ट आहे… जर तुमचे पोट त्यावर अवलंबून नसेल तर…!

अर्थात, हा उच्च कोटीचा बौध्दिक आनंद विज्ञानाच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनाच वाटेल असं नाही. कारण बहुतेकदा सामान्य माणसाच्या मनात विज्ञानाबद्दल फारशी आवड नसते. असलाच तर एक भीतियुक्त आदर असतो. (आणि गणिताबद्दल आदरयुक्त भीती!) आपल्याला शाळेत ज्या प्रकारे विज्ञान शिकवले जाते, त्यामुळे हा असा दुरावा वाटणे साहजिकच आहे. खरं तर विज्ञान शिकवले जाणे हेच मुळात चूक आहे, असे काही शिक्षणतज्ज्ञांना वाटते. त्यांच्या मते, विज्ञान हा शिकवण्याचा विषयच नाही, समजून घेण्याचा विषय आहे.

विज्ञान म्हणजे काय, तर आपल्या भोवतालचा निसर्ग आणि त्यातील घटना समजून घेण्यासाठी शोधून काढलेले नियम. हे सगळे नियम माणसाने बनवलेले नाहीत, तर निरीक्षणातून, प्रयोगातून आणि विचारातून त्याला सापडले आहेत. म्हणून खरं तर ‘विज्ञान शिकणे’ म्हणजे मुलांनीही प्रत्यक्ष प्रयोग आणि निरीक्षणातून या ज्ञानापर्यंत पोचणं अपेक्षित आहे.

पण प्रयोग करायला मिळणे ही देखील भारतातल्या मुलांच्या दृष्टीने चैनच. कारण सातवी पर्यंत तर मुलांना प्रयोगशाळेत जायची परवानगी सुध्दा दिली जात नाही. कित्येक शाळांमध्ये तर प्रयोगशाळाच नसते. क्वचित एखाद्या शिक्षकाने प्रयोगातील उपकरणे वर्गात आणून मुलांना काहीतरी प्रयोग दाखवले तरच; नाहीतर बहुतेक मुलांच्या विज्ञानाच्या वह्या उद्देश,साहित्य, कृती, निरीक्षण, निष्कर्ष या कोरड्या माहितीने भरलेल्या असतात.

म्हणूनच मग विज्ञानामधली सुध्दा एखादी गोष्ट खरी का मानायची? असे विचारले तर ‘पाठ्यपुस्तकात लिहिले आहे म्हणून’ किंवा ‘बाईंनी सांगितले आहे म्हणून’ असेच उत्तर येण्याची शक्यता आहे!

परीक्षानलिकेतील द्रावामधून बुडबुड्यांतून फसफसत बाहेर पडणारा वायू प्रत्यक्ष पाहणं वेगळं आणि पान नंबर 17 वरती लिहिलेले ‘कॅल्शियम हायड्रॉक्साइड आणि हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड यांच्या मिश्रणामधून कार्बन डाय ऑक्साइड वायू बाहेर पडतो’ हे नुसतं वाचणं वेगळं. प्रत्यक्ष अनुभवातून मुलं खूप काही शिकत असतात. सगळ्या इंद्रियांमधून माहिती मेंदूपर्यंत पोचली तर ती जास्त चांगल्या प्रकारे साठवली जाते. तसेच प्रयोगातले साहित्य हाताळताना त्यांची शारीरिक कौशल्येच नव्हेत, तर बौध्दिक कौशल्ये सुध्दा विकसित होत असतात. पण फार क्वचित शाळांमध्ये ही सोय उपलब्ध असते. त्यामुळे विज्ञान हा विषयसुध्दा मुलांसाठी गणितासारखा अमूर्तच राहतो, सप्रयोग सिध्द करण्यासारखा असून सुध्दा.

एखादा विषय कोण शिकवते, यावर सुध्दा त्या विषयाबद्दल आवड किंवा नावड अवलंबून असू शकते. बरेचदा शाळांमधून गणितात किंवा इतर विषयात पदवी मिळवलेल्या शिक्षिकेला विज्ञान शिकवायला नेमले जाते. मग इतिहासातल्या घटनांची जशी नुसती जंत्री वाचून दाखवली जाते, गणितातले उदाहरण जसे नुसते फळ्यावर सोडवून दाखवले जाते, तसाच विज्ञानाचा धडा वाचून दाखवला जातो. मुलांचा कल देखील तत्त्व समजून घेण्यापेक्षा ते पाठ करण्याकडेच जास्त असतो. या घोकंपट्टी करण्याच्या सवयीचा परदेशी उच्च शिक्षणासाठी गेल्यावर किती त्रास होतो, ते भारतातले विद्यार्थी अनुभवतातच.

भारतामध्ये अगदी सुशिक्षित आणि उच्चशिक्षित लोकांमध्ये सुध्दा अंधश्रध्दा असतात असं आपल्याला आढळते. वरच्या हुद्द्यावरचा एखादा वैज्ञानिक मुहूर्त पाहून प्रयोगशाळेचे भूमिपूजन करतो किंवा एखादा डॉक्टर एखाद्या बुवाच्या भजनी लागलेला दिसतो. एखाद्या विषयातल्या आंतरराष्ट्रीय तज्ज्ञाकडे सुध्दा विवेकी, वैज्ञानिक वृत्ती असेलच असे नाही. यासाठी ज्या अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, त्यात विज्ञान शिकवण्याची पध्दतही असावी. मुळात मुलांना एखाद्या गोष्टीची कारणं स्वतः शोधायला लावण्याऐवजी आपण स्वतः ती सांगून टाकतो किंवा पाठ तरी करायला लावतो. तिथूनच बौध्दिक आळस जन्माला येत असावा आणि कोणासमोर तरी डोकं टेकवण्याची वृत्ती देखील!

विज्ञानवृक्षाची फळं (म्हणजे तंत्रज्ञानाचे शोध) आपण आवडीने चाखतो. पण त्याच्या मुळाशी असलेल्या विज्ञानाजवळ मात्र आपल्याला जावेसे वाटत नाही. आपण विज्ञानाची सृष्टी स्वीकारतो; पण दृष्टी घेत नाही.

राज्य परीक्षा मंडळाच्या पाठ्यपुस्तकातून विज्ञानाचे जे धडे असतात, त्यामध्ये प्रत्यक्ष उदाहरणं, त्यांच्यावर आधारित प्रश्न असा प्रकार त्या मानाने कमी दिसतो. त्यामुळे आपल्या अवतीभवतीच्या घडामोडी देखील विज्ञानाचा आधार घेऊन समजून घेता येतील, असे मुलांना वाटत नाही. म्हणूनही असेल कदाचित; पण विज्ञान पुस्तकातून बाहेर पडून विचारपध्दतीमध्ये आलेले दिसत नाही.

मात्र संपूर्ण चित्र इतकं निराशाजनक नाही. महाराष्ट्रातील काही संस्था शालेय विज्ञानाच्या पलिकडे जाऊन मुलांना खरोखरीच विज्ञानाची गोडी लागावी म्हणून काम करतात. मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन, मराठी विज्ञान परिषद ही काही उदाहरणं. त्यांची पुस्तक प्रकाशनं, प्रश्नपत्रिका पाहिल्यास असं लक्षात येते की त्यात भर हा वैज्ञानिक तत्त्वे, नियम पाठ करण्यावर नाही; उलट एखाद्या घटनेवरून कसे अनुमान काढायचे यावर आहे. तसेच आजकाल मोबाईलवरील विविध अ‍ॅप किंवा यू ट्यूब वगैरे चॅनलमार्फत मुलांना प्रयोग दाखवता येतात. https://www.youtube.com/user/Scienceonlin efeature=watch , https://www.youtube.com/user/1veritasium हे त्यातले काही उपयोगी पत्ते. पण त्यांचे काम सर्व देशभर किंवा संपूर्ण राज्यात पोचलेले नाही.

अर्थात, विज्ञानाला एक प्रतिष्ठेचे वलय मात्र प्राप्त झालेले आहे….ते नीटसं समजले नसले तरी! याची प्रचीती घ्यायची असेल तर नववी – दहावीत शिकणार्‍या थोड्या हुशार विद्यार्थ्याला विचारून पाहावे की त्याला दहावी नंतर काय करायचे आहे. म्हणजे आर्ट्स, सायन्स की कॉमर्स ? दहातल्या आठ वेळा उत्तर येईल सायन्स म्हणून; आणि कारण विचाराल तर त्यात एक आर्थिक दृष्टिकोन असतो. म्हणजे सायन्स हेच इंजिनिअरिंग, मेडिसिन या पैसे मिळवून देणार्‍या शाखांचे प्रवेशद्वार. पण त्याशिवाय दुसरेही एक कारण असतं, ते म्हणजे विज्ञानाला असणारं ग्लॅमर. त्यातही विज्ञान शाखेत जाऊन संशोधनाकडे वळणारी मुलं विरळाच!

प्रगत देशांच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे कारण त्यांची वैज्ञानिक वृत्ती आणि दृष्टिकोन. एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी किंवा समस्येवरील उपाय शोधून काढण्यासाठी एक शोधक वृत्ती लागते. ती वृत्ती त्या देशांमधील मुलांमध्ये उपजत असते की त्यांना शिकवली जाते? इतर देशांमध्ये विज्ञान कसे शिकवले जाते? विज्ञान शिकवण्याच्या पध्दतीमुळे ही वृत्ती विकसित होते, की इतर देशांमध्ये अभ्यासक्रमच वेगळा असतो? की त्यांना प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारले जातात? त्यांची गुणमापन पध्दती काही निराळी असते का? याबद्दल थोडे कुतूहल वाटले आणि मग ‘नेट’वर, वैयक्तिक संपर्कातून त्या-त्या देशातील शैक्षणिक वातावरणाचा, त्यांच्या विज्ञान शिकवण्याच्या दृष्टिकोनाबद्दल थोडी माहिती काढली. हा काही संशोधनवजा प्रबंध किंवा अभ्यासपूर्ण लेख नव्हे. पण सहज जाता-जाता ज्या काही गोष्टी लक्षात आल्या त्या share कराव्याशा वाटल्या. अर्थात, आपण जरी प्रगत देश अशी एकच सर्वसमावेशक संज्ञा मानत असलो तरी प्रत्यक्षात त्यांच्या धोरणांमध्ये बरेच फरक आहेत. त्यातल्याच काही प्रातिनिधिक देशांशी आपल्या देशाशी तुलना केली.

2013 साली प्रगत राष्ट्रांमधील मुलांची विज्ञानाची परीक्षा घेतली. आश्चर्य म्हणजे इतर 8 राष्ट्रांच्या तुलनेत अमेरिकेचा नंबर शेवटचा होता! शिक्षणतज्ज्ञांच्या असे लक्षात आले की खडू-फळ्याने शिकवण्याची पध्दत आधुनिक विज्ञान शिकवायला रद्दबातल ठरते आहे. कारण आता सर्व प्रकारची माहिती इंटरनेटवर आयतीच उपलब्ध आहे. पण त्या माहितीचे नीट नियोजन करता आले आणि वापर करता आला तरच आपल्याला ज्ञान मिळू शकते. त्यानंतर अमेरिकेतील शिक्षणतज्ज्ञांनी विज्ञान हा विषय मुलांनी वैज्ञानिकांसारखा शिकला पाहिजे, असे ठरवले. म्हणजे नेमकं काय? तर, वैज्ञानिक जसे कोणतीही माहिती पाठ करत नाहीत, तशीच मुलांवर देखील पाठांतराची सक्ती करायची नाही. एखादी संकल्पना (उदा: चंद्राच्या कला) शिकवायची असेल तर आता-आतापर्यंत मुलांना व्हिडियो किंवा मॉडेल यांच्या माध्यमातून दाखवले जायचे. त्या उलट मुलांना त्याबद्दल चित्रातून माहिती द्यायची आणि मुलांनाच त्यावरून मॉडेल बनवायला सांगायचं. कधी मुलांनाच शाळेत PPT बनवून वर्गासमोर पेश करायला सांगायचे. (घरी करायला सांगितले की आई-वडील लुडबूड करतील अशी भीती असावी बहुधा!) आपण काय बनवले आहे हे मुलांनी सांगायचे, चर्चा करायची. याच्यात चुका होतील खर्‍या; पण मुलं अधिक चांगल्या प्रकारे शिकतील. तसेच परीक्षा घेताना प्रश्नमंजुषा घ्यायच्या (म्हणजे QUIZ). मुलांना एकेकटे उत्तरं द्यायला न सांगता त्यांचे गट पाडून त्या गटांमधून स्पर्धा आयोजित करायच्या. या अशा पध्दतींमुळे क्रमिक पुस्तकापेक्षा विषयात जास्त रस निर्माण होतो. तज्ज्ञांचे म्हणणे असे की, या पध्दतीतून केवळ वैज्ञानिकच विकसित होतील असे नाही, तर सगळ्यांनाच त्या शिकण्याच्या पध्दतीचा फायदा होईल. सामान्य जनतेला सुध्दा एखादी बातमी खरी की खोटी ओळखण्याची कला अवगत हवीच आणि सामान्य नागरिकांच्या मतावर (आणि करावर!) तर संशोधनाची धोरणे आणि आर्थिक मदत अवलंबून असते की!

पण काही विषय असे असतात की जिथे पाठांतराला पर्याय नसतो. विशेषतः जीवशास्त्र, गणितातली सूत्रे ! इंग्लंडने विज्ञान शिक्षणामध्ये बरेच नवनवीन प्रयोग केले. काही शाळांमधून एखादी पध्दत यशस्वी होते आहे, असे लक्षात आले तर ती कायमच वापरली गेली. काही पध्दती वापरण्याबद्दल पालक सुरवातीला साशंक होते; पण नंतर त्यांनी त्या पद्धती स्वीकारल्या. अर्थात सर्वच पध्दती व्यवहार्य असतील की नाही, हा त्या-त्या शाळेचा आणि शिक्षकांचा निर्णय असायचा. पण काही अभिनव संकल्पना मांडलेल्या जाणवल्या, ज्यांचा उल्लेख व्हायला हवा.

त्यातली एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे spaced learning. म्हणजे असे की मुलांना एखादा टॉपिक थोडक्यात शिकवायचा (PPT च्या माध्यमातून). मग त्यांना चक्क थोडा वेळ खेळायला लावायचे आणि मग लगेच त्यांना मघाचेच PPT पुन्हा दाखवायचे. उदा : समजा जीवशास्त्रातील मज्जातंतू, संप्रेरक वगैरे पाठ करायच्याच गोष्टी आहेत. तर 10 मिनिटे मुलांना त्या विषयाबद्दल बर्‍याच slides दाखवायच्या. मग 10 मिनिटे त्यांना बास्केट बॉल खेळायला लावायचा. मग पुन्हा मघाचीच माहिती दाखवायची. मात्र दुसर्‍यांदा दाखवताना काही जागा रिकाम्या ठेवायच्या आणि मुलांनाच त्या भरायला सांगायच्या. तज्ज्ञांच्या मते या पद्धतीमध्ये मुलं खूप चांगल्या प्रकारे लक्ष एकाग्र करू शकतात आणि भारतीय मापदंडांनीच मोजायचे ठरवले तरी ती उपयोगी ठरते. कारण मार्क देखील वाढतात! अर्थात, यात माहिती नुसती ऐकूनच नव्हे, तर दृश्य तक्त्यांच्या स्वरूपात समोर येते, म्हणून चांगली साठवली जाते.

तशीच एक पद्धत म्हणजे आठवड्यातला एक वार (बहुधा शुक्रवार) दिवसभर (म्हणजे 5 तास सलग) एकच विषय शिकायचा. त्या विषयावर पुस्तकं वाचायची, चर्चा करायची आणि 5 तासात तो विषय पूर्ण करायचा. वरवर पाहता मुलांना कंटाळा येईल, असे वाटले तरी बहुतेक मुलांनी 5 तास टीचरच्या मदतीशिवाय एकट्याने शिकायला आवडल्याचे सांगितले.

आणखी एक पध्दत म्हणजे प्रोत्साहनाचे भाषण. कधी-कधी मुलांनी काहीतरी चांगले केल्यानंतर मुद्दाम त्यालाच आपल्या कामगिरीबद्दल बोलते केले जाते आणि कॅमेर्‍यावर रेकॉर्ड करून त्यांच्या पालकांना हे भाषण ऐकवतात. त्यातून मुलांचीच नव्हे तर पालकांची देखील कॉलर टाईट होत असावी!

इंग्लंडसारख्या पुढारलेल्या राष्ट्रातही प्राथमिक शाळेत जाऊन काही न शिकण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. म्हणूनच तिथले तज्ज्ञ मुलांना शिक्षण जास्तीत जास्त रसपूर्ण वाटावं, यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या मते, शाळा म्हणजे शैक्षणिक कारखाने आणि विद्यार्थी म्हणजे एका साच्यातल्या वस्तू नव्हेत. प्रत्येक मुलाची आवड-निवड, शैक्षणिक क्षमता वेगळी असते. सगळ्यांना सारख्याच गतीने आणि पध्दतीने शिकता यायला हवे. त्यांना विषय ठरवण्याचे, मध्ये-मध्ये विश्रांती घेण्याचे स्वातंत्र्य हवे. मुलांवरचा शिस्तीचा दाब जाऊन मुलांना मोकळेपणे शिकता यावे यासाठी एका शाळेने वर्ग थेट मैदानात भरवले, मुलांना हवे तेव्हा उठायची मुभा दिली, तासातासांनी घंटा वाजवायचे बंद केले. (घंटेचा आवाज ऐकून मुलांमध्ये कळपाची मानसिकता येते, असे त्यांचे म्हणणे!) अर्थात, यातल्या सगळ्याच पध्दतींमध्ये काही ना काही त्रुटी असायच्याच; पण या प्रयोगांमधून शिक्षण जास्त प्रयोगशील नक्कीच होत असणार!

ऑस्ट्रेलियामध्ये विज्ञानशिक्षणाची पध्दत देखील खूप स्वातंत्र्य देणारी आहे. तिथे विज्ञानाचे असे क्रमिक पुस्तक नाही. एका वर्षाला कोणकोणते टॉपिक असतात ते मुलांना सांगितले जाते. मग त्या विषयावर असलेली नेटवरची माहिती मुलाने वाचणे अपेक्षित असते. त्यावर आधारित एखादा प्रोजेक्ट मुलं गटाने किंवा एकेकट्याने पूर्ण करतात. उदा. रोपाच्या वाढीवर प्रकाशाचा काय परिणाम होतो, असा जर प्रश्न असेल, तर मुलांचा एक गट बल्बच्या प्रकाशावर, एक गट सूर्यप्रकाशावर, तर एक गट निळ्या प्रकाशावर अभ्यास करतो. निरनिराळ्या प्रकारची रोपं या प्रकाशांमध्ये ठेवली जातात. मुलंच त्या रोपांची वाढ किती होते आहे ते मोजतात आणि मग सगळी निरीक्षणे एकत्र करून त्याच्यावरून निष्कर्ष काढले जातात आणि मग प्रकाशाचा काय परिणाम होतो, ते मुलांना स्वानुभवावरून कळते. मुलांना ते पाठ करायची गरज भासत नाही. कारण ते त्यांना बघून समजलेले असते, नुसते वाचून नव्हे.

ऑस्ट्रेलियामध्ये मुलांच्या अभ्यासाचे मूल्यमापन देखील नुसत्या परीक्षेच्या आधारावर होत नाही. वर्षभर मूल काय प्रोजेक्ट्स करते, त्याची निरीक्षणशक्ती कशी आहे, त्याला आपले म्हणणे नीट मांडता येते का, याच्यावर आधारित असते. (प्रोजेक्ट्सची संकल्पना आपल्याकडेही आलेली आहे, पण मुलांना चांगले मार्क मिळावेत म्हणून बर्‍याचदा आई-वडीलच त्यांना प्रोजेक्ट पूर्ण करून देताना दिसतात. मुंबईतील काही शाळांमध्ये तर पैसे घेऊन इतर मुलांचे प्रोजेक्ट पूर्ण करून देणार्‍या गृहिणी, आया देखील आहेत! या सगळ्यातून मुलाला ‘विज्ञान कळावे’ या हेतूलाच हरताळ फासला जातो, हे पालक सोयीस्करपणे विसरतात.) चाचण्या कधी अचानकपणे, पूर्वसूचना न देता घेतल्या जातात आणि कधी वेळापत्रकाप्रमाणे. पण या एकाच परीक्षेच्या आधारावर पूर्ण मूल्यमापन नसल्याने गुणांना अवास्तव महत्त्व प्राप्त होत नाही. तसेच केव्हाही परीक्षा घेतली जाऊ शकत असल्याने विषय समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नसते. पाठांतर, घोकंपट्टी या गोष्टींचे प्रयोजनच राहत नाही. अर्थात, या प्रकारच्या प्रणालीमध्ये त्या-त्या शाळेतल्या शिक्षकावरच सगळी भिस्त असते, सगळ्या शाळांमध्ये एकसमानता नसते.

जपानी शाळांनी 1952 सालापासून विज्ञानाची मूळ संकल्पना तीच ठेवली आहे (?) अगदी तिसर्‍याच इयत्तेपासून मुलांना सजीवसृष्टी, पृथ्वी आणि अवकाश, पदार्थ आणि ऊर्जा हे विषय असतात आणि एक अत्यंत कल्पक उपक्रम म्हणजे संपूर्ण शाळेला मिळून एक विज्ञानबाग दिलेली असते. प्रत्येक वर्गाला त्या बागेचा एकेक कोपरा त्या वर्षी वाटून दिलेला असतो. त्या वर्गातल्या मुलांनी त्याच्यात स्वतः रोपे लावावीत, वर्षभर प्रयोग करावेत, अशी योजना असते. यातून शहरी मुलांना देखील निसर्गाचे सान्निध्य लाभते, सजीवसृष्टीशी, पर्यावरणाशी आपसूक नाते जुळते. इयत्ता सातवीपासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे विषय असतात. पुढच्या इयत्तांना ज्या प्रयोगशाळा असतात, त्याबद्दल अगदी काटेकोर नियम आहेत. तिथली उपकरणे, शैक्षणिक साहित्य यांची गुणवत्ता प्रमाणबध्द (संपूर्ण देशभर) आणि चांगली असेल, याची विशेष काळजी घेतली जाते.

सिंगापूर हा खरं तर चिमुकला देश. पण निसर्गसौंदर्याच्या बाबतीत आणि आर्थिकदृष्ट्या समृध्द. बहुतांशी पर्यटनावरच त्यांची आर्थिक घडी बसलेली. पर्यावरणाचा तोल ढळला, प्रदूषण वाढले तर संपूर्ण देशाला त्याचे चटके बसतात. त्यामुळेच पर्यावरणाबाबतीत जागृती ही सर्व प्रसिद्धिमाध्यमांतून केली जाते. अगदी शालेय स्तरापासूनच ही सजगता दिसून येते. तिथे सायन्स सेंटरमध्ये योग आला. शाळांमधून back to moon for good हा चंद्रमोहिमेवर आधारित एक चित्रपट पाहायचा छोट्या 9-10 वर्षांच्या मुलांना आवर्जून चित्रपट पाहायला आणले होते. संपूर्ण 180 अंशातला पडदा आणि अवकाशातून घेतलेले चंद्र, पृथ्वी, तारे यांचे लांबून आणि जवळून दर्शन हा अनुभव खूपच रोमांचकारक झाला. त्यातील दृश्यांच्या भव्यतेमुळे आपण या सृष्टीतले यःकश्चित ठिपका आहोत, हे सत्य तर मुलांच्या मनात ठसले असेलच; पण त्याच्यानंतर लगेच एक छोटीशी फिल्म दाखवली, उजेडाने निर्माण होणार्‍या, प्रदूषणाबद्दल. अनावश्यक दिवे आणि रोषणाई यांमुळे आपण कसे आकाशदर्शनाच्या सोहळ्याला मुकलो आहोत, याचे त्यात वर्णन होते. म्हणजे विज्ञान- तंत्रज्ञानातील शोधांचा उपयोग विवेकाने करावा हा संदेश दिला होता. प्राणिसंग्रहालयात सुध्दा प्राण्यांच्या कोणकोणत्या प्रजाती नामशेष होत आहेत, त्यासाठी आपण काय करू शकतो, याबद्दलचे फलक लावले होते. सहलीला आलेल्या मुलांना त्यांच्या शिक्षिका आवर्जून ते फलक वाचून दाखवत होत्या, अधिक माहिती सांगत होत्या. त्यांची ही तळमळ नक्कीच नवीन पिढीला जागृत ठेवेल, अशी खात्री वाटली.

तिथल्या शाळेच्या प्रश्नपत्रिका पाहण्याचा योग आला. एका प्रश्नांची चार संभाव्य उत्तरे आणि त्यातून मुलांनी निवड करणे हा पॅटर्न होता. पण ती उत्तरे देखील कशी, तर तुम्हाला तो विषय कळलेला असेल, तरच योग्य उत्तर निवडता येईल. उदा. चुंबकत्वाच्या धड्यामध्ये, उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकमेकांना आकर्षित करतात (आणि दोन उत्तर ध्रुव एकमेकांना दूर सारतात) हे तत्त्व असतं; तर मग यावर आधारित प्रश्नांमध्ये लोहचुंबकांच्या निरनिराळ्या आकृती दिलेल्या असतात आणि अमुक आणि अमुक जवळ आले तर काय होईल, तमुक झालं तर काय होईल, असे प्रश्न विचारले असतात. या प्रश्नाचं उत्तर पाठ करून लिहिता येणं अशक्य आहे. कारण आकृती दर वेळेला निरनिराळी असते किंवा जीवशास्त्रातील प्रयोग असतील तर पावावर किती पाणी घातल्यास किती बुरशी येते, याचा तक्ता असतो आणि या निरीक्षणांमधून तुम्ही योग्य तत्त्वावर पोचता नं, हे पाहिले जाते. अमुक-अमुक तत्त्व लिहा, असा प्रश्न नसतो. मुलांना पेपरमध्येच उदाहरणं निवडून फ्लोचार्ट पूर्ण करायला सांगितलेलं असतं. त्यामुळे घरून उदाहरणं पाठ करून येण्याचा काही उपयोग होत नाही. विज्ञानाचा वर्ग देखील थेट प्रयोगशाळेतच भरतो, अगदी पाचव्या इयत्तेपासूनच. मग मुलांना त्याबद्दल आपुलकी न वाटली तरच नवल.

अर्थात, प्रगत देशांकडे केवळ जास्त पैसे आहेत म्हणून हे शक्य होते, असे नाही आणि केवळ सगळी मुलं शाळेत जातात म्हणून ती शहाणी होतातच, असे नाही. शिक्षण सक्तीचे आहे किंवा नाही किंवा शिक्षणावर किती पैसे खर्च केले जातात, या एकाच मुद्द्यावरून शिक्षणाचा दर्जा ठरत नाही. उदाहरणादाखल अरब देशांकडे पाहता येईल. वास्ताविक पाहता 1960 मध्ये शाळेत जाण्याचे आणि साक्षरतेचे जे प्रमाण 1 टक्का होतं, ते आता 2000 साली 99 टक्क्यांवर आलेले आहे. एवढंच नव्हे, तर तेथील सरकार राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा शिक्षणाकरिता बाजूला ठेवते आहे. पण तरीही आत्ता नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात असे दिसून आले की विज्ञान आणि गणित या विषयांमध्ये तेथील विद्यार्थी खूप मागासलेले आहेत. त्याची जी अनेक कारणं आहेत, त्यात इस्लामी विषयांवर भर जास्त दिला जातो. जागतिक इतिहासापेक्षा इस्लामचा इतिहास आणि इंग्लिशऐवजी अरेबिक भाषा शिकणे सक्तीचे केले जाते. तिथल्या शाळांमध्ये शिकलेली मुलं सांगतात की विषय समजून घेण्यापेक्षा घोकंपट्टीवर जास्त भर दिला जातो. परीक्षेत मार्क मिळवण्याचे तंत्र शिकवले जाते; पण प्रत्यक्ष कृतीतून (किंवा पुस्तकातून) ज्ञान मिळवण्याला प्रोत्साहन दिले जात नाही. साहजिकच विज्ञान-तंत्रज्ञानात किंवा संशोधनात त्यांचे फारसे योगदान असत नाही. यावर उपाय म्हणून तिथल्या शैक्षणिक संस्था विज्ञान शिक्षकांना इतर देशातून आयात करायला बघतात (आणि सरकार तिथल्या विद्यार्थ्यांना परदेशी शिकायला पाठवते). पण जोपर्यंत शिकवण्याची पध्दत, अभ्यासक्रम इत्यादी गोष्टींमध्ये मूलभूत बदल होत नाहीत, तोवर परिस्थिती बदलणे कठीण आहे.

आपल्या देशातही विज्ञान शिक्षणामध्ये अनेक गोष्टी केल्या जात आहेत. उदा. सातारा जिल्ह्यात शेळकेवाडीची शाळा आहे; त्यात शेतीचे प्रयोग मुलांना शाळेतच करायला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यांना प्रशिक्षण देणार्‍या डॉ. शैला दाभोलकरांच्या मते, शेतीच्या माध्यमातून फक्त जीवशास्त्रच नव्हे, तर भौतिक आणि रसायनशास्त्र आणि गणितसुध्दा शिकवता येऊ शकते. ठाणे जिल्ह्यातल्या पाष्टेपाडा गावामध्ये संदीप गुंड यांनी शाळेत सौरऊर्जेचा वापर करून मुलांना संगणक वापरायला शिकवले आहे. पृथ्वीची सूर्याभोवती प्रदक्षिणा, ग्रहणे यांसारख्या त्रिमितीत घडणार्‍या घटना पुस्तकातील दोन मितींच्या चित्रांमधून मुलांना कळणे कठीण जाते. त्यासाठी मग यू-ट्यूब, व्हिडिओ इत्यादींचा चपखल वापर केला जातो. इतरही अनेक शाळांची आणि शिक्षकांची वर्णने आहेत. ‘शाळाभेट’ या साधना प्रकाशनाच्या नामदेव माळी लिखित पुस्तकांमध्ये आपल्याला सापडतात. आर्थिक चणचण, पालकांचा असहकार, दैनंदिन अडचणी यातल्या कशाचा बाऊ न करता हे शिक्षक कधी गावाच्या मदतीने, तर कधी स्वतःच्या हिमतीवर मुलांसाठी उपक्रम आखत गेले. सरकारी अनुदान किंवा आर्थिक सुबत्ता यांनी उपकरणं येतील; पण ती वापरायची सर्जकता ही काही पैशावर अवलंबून नसते. ज्या शिक्षकांनी या मुलांना भोवतालच्या घडामोडीतून विज्ञानाचे नियम शोधायला शिकवले, तर त्यांना आपसूकच चिकित्सक दृष्टी येईलच. हीच मुलं म्हणजे उद्याचे नागरिक आहेत. ही वैज्ञानिक वृत्ती त्यांच्यामध्ये रूजली की मग वेगळ्या अंधश्रद्धा निर्मूलनाची गरजच भासणार नाही!

(हा लेख लिहिताना खालील मित्रमंडळींचे अनुभव उपयोगी पडले. देविका तांबे आणि देवचाके (सिंगपोर) सूरज सुवर्णा (ऑस्ट्रेलिया) सुरभी डांगी, योगिता भातखंडे (अमेरिका) पूर्णिमा कबाड (ओमान).