आम्ही कर्नाटकाच्या दौर्यावर होतो. तेव्हा ‘दि हिंदू’ मधील बातमी आमच्या वाचनात आली. मंड्या जिल्ह्यातील एका खेडेगावातील घटना. यशोदा या मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे तेथील जातपंचायतीने तिच्या कुटुंबाला बहिष्कृत केल्याची ती बातमी होती. त्यामुळे आम्ही ठरविले की, आपण या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला भेट देऊ . ‘दि हिंदू’चे विशेष प्रतिनिधी एम. टी. शिवकुमार यांनी ही बातमी दिली होती, त्यांच्याशी संपर्क केला. त्यांनी आम्हाला वस्तुस्थिती सांगितली. संपर्कासाठी काही फोन नंबर दिले. त्यानुसार आम्ही ती मुलगी, तिचे पालक, वकील यांच्याशी संपर्क केला आणि भेट होण्याची शक्यता तपासून आम्ही महा.अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रीय समन्वय विभागाच्या राज्य सचिव प्राचार्य डॉ. सविता शेटे आणि जातपंचायतविरोधी मोहीम राज्य सचिव कृष्णा चांदगुडे त्या गावी पोचलो. आम्ही तिघांनी यशोदा व कुटुंबाची भेट घेतली. वडील कामाला गेले असल्यामुळे यशोदा, तिची आई व आजी यांची भेट झाली.
मंड्या जिल्हा, मलवल्ली तालुक्यातील गोल्लरहल्ली हे छोटे गाव. जेमतेम 307 उंबर्याचे आणि जवळपास 1453 लोकसंख्या असणारे खेडेगाव. यशोदाने (वय 27) आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या गावातील जातपंचायतीने तिच्या आई-वडिलांच्या कुटुंबाला बहिष्कृत केले. काय आहे ही गोष्ट?
मजुरी करून पोट भरणारे, तिगला गौड समाजातील सानम्मा आणि पुटमाडू हे जोडपे गोल्लरहल्ली या गावात अनेक वर्षांपासून राहते. त्यांना तीन मुली. यशोदा सर्वांत मोठी. तिचे शिक्षण 8 वी पर्यंत झालेले. आई-वडील मजुरी करतात, घरात लहान दोन बहिणी, यामुळे यशोदेने लवकर काम करून पैसे मिळविण्याचे ठरविले आणि ती काम करू लागली. जवळच्या कनकपुरा या गावातील ‘लगूना क्लोथिंग’ येथे ती 8 वर्षे नोकरी करीत होती. स्वतःचे लग्न न करता तिने लहान बहिणींचे शिक्षण, व विवाह केले व आई-वडिलांना हातभार लावला.
कनकपुरा येथे रोज कामाला जात-येत असताना यशोदाची ओळख कुमार या तरुणाशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले व दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. कुमार हा जवळच्याच 8 किलोमीटर अंतरावर असणार्या थरलकट्टी या गावचा, वक्कलिगा समाजातील; बेंगलोर येथे ड्रायव्हरची नोकरी करणारा मुलगा.दोघांची जात वेगळी; मुलगा उच्च जातीतील आणि मुलगी कनिष्ट जातीतील आहे.. यशोदेच्या आई-वडिलांची या विवाहास पूर्ण संमती होती. कुमारच्या आई-वडिलांची तशी संमती नव्हती; पण तुम्हाला हवे तर लग्न करा, आम्ही कुणी येणार नाही, असा त्यांचा निर्णय होता. यशोदाचे आई-वडील, बहिणींच्या सहकार्याने यशोदा व कुमारचा श्रीरंगपट्टणम येथे 12 मे 2017 रोजी निमीसांबा मंदिरामध्ये विवाह झाला. विवाहानंतर यशोदा कुमारसोबत बेंगलोरला गेली. गोल्लरहल्ली गावात तिगला गौडा समाजाची लोकसंख्या जास्त आहे. आपल्या समाजातील मुलीने दुसर्या जातीतील मुलाबरोबर लग्न केले आहे, हे कळाल्यावर आमच्या गावाची बदनामी केली म्हणून त्या समाजातील ज्येष्ठांनी यास विरोध केला. त्यांच्या जातपंचायतीने यशोदाच्या आई-वडिलांना रु. 7000/- चा दंड लावला, तो त्यांनी दिला; पण तेव्हापासून या कुटुंबाचा सतत अपमान करणे, देवकार्यात सहभागी होऊ न देणे, स्पर्श होऊ न देणे, कुठल्याच कार्यक्रमाला न बोलावणे, पशूहूनही हीन वागणूक देणे, समाजातील कार्यक्रमाला येऊ न देणे, पंगतीत जेवायला न देणे, काम न देणे, कुणी काम दिले तर त्यास रु. 1000/- दंड व काम आहे या म्हणून सांगणार्यास रु. 500/- दंड लावला आहे. गावात त्यांना काम दिले जात नाही. त्यामुळे बाजूच्या गावामध्ये जाऊन यशोदाचे आई-वडील मजुरी करतात.
यशोदा गरोदर राहिली तेव्हापासून त्रास वाढला. ती बाळंतपणासाठी माहेरी आली; पण ते गावात होऊ शकले नाही, त्यामुळे हुलगुर या गावी तिचे बाळंतपण झाले, तिचा मुलगा निहाल 10 महिन्याचा आहे. ती माहेरीच होती. विवाहानंतर यशोदा तिच्या सासरी गेली नाही, तिचे सासू-सासरेही तिला आतापर्यंत भेटले नाहीत; ऐवढेच काय, मुलगा झाल्यावर त्याला पाहण्यासाठीही कुणी आले नाही. कुमारच्या घरावर बहिष्कार नाही; पण यशोदाच्या घरावर पूर्ण बहिष्कार आहे. मुलीला सोडून द्यायचे, ती मेली तरी आई-वडिलांनी जायचे नाही व आई-वडील मेले तरी यशोदाने यायचे नाही. यासाठी रु.25,000/- चा दंड सांगितला आहे; जे यशोदाच्या आई-वडिलांनी नाकारले आहे. तिच्या विवाहित बहिणीलाही त्रास दिला जातो. या कुटुंबाला मदत करणार्या वकिलावरही बहिष्कार टाकला आहे. हुलगुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. जेव्हा ही सर्व घटना गावाबाहेर अनेकांना कळली, तशी ती प्रशासनापर्यंत पोचली आणि मग कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष नागलक्ष्मी बाई यांनी यशोदा व कुटुंबास जानेवारी 2019 मध्ये भेट दिली. जातपंचायतीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यांना समजावून सांगितले, योग्य कार्यवाही करू, असे सांगितले. तद्नंतर मंड्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बलराम गौडा यांनीही भेट देऊन बैठका घेतल्या, सर्वांना सूचना दिल्या. त्यानंतर तीन वेळेस पोलीस येऊन गेले. काही गोंधळ, मारामारी तर होत नाही ना, हे पाहून गेले एवढेच; पण आमच्या परिस्थितीत कुठलाही बदल झाला नाही, असे यशोदा, तिची आई यांनी आम्हाला सांगितले. अत्यंत भयग्रस्त स्थितीमध्ये ते सर्वजण जगत असल्याचे जाणवले. शासकीय अधिकार्यांनी फक्त भेट दिली; मात्र त्या कुटुंबासाठीची गावातील परिस्थिती काही बदलली नाही. आताही त्यांना गावात काम मिळत नाही, किराणा सामान, जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत. यासाठी शेजारच्या गावात जावे लागते, अशी स्थिती आहे. त्यांचा त्रास, मानहानी, अपमान हे सांगत असताना यशोदा व तिच्या आईस अश्रू अनावर होत होते. कन्नडमधून त्यांच्याशी संवाद साधत होतो, त्यामुळे त्या मोकळेपणाने व्यक्त होत होत्या. यशोदा आता बेंगलोरला जाईल, तिला काम मिळवून द्या, असे त्यांचे म्हणणे होते. त्या तिघींशी संवाद करून, आम्ही याबाबत कर्नाटकातील संबंधित वरिष्ठ, अधिकारी, महिला आयोग यांच्याशी बोलू, हा मानसिक आधार देऊन परत निघालो.
परतताना मंड्या या जिल्ह्याच्या ठिकाणी आमची ‘दि हिंदू’चे विशेष प्रतिनिधी एम. टी. शिवकुमार यांच्याशी भेट झाली, चर्चा झाली. त्यांना मअंनिसची भूमिका सांगितली. जातपंचायतीचे हे कृत्य फक्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नसून सामाजिक न्यायाचा आहे; त्यामुळे जातपंचायतीवर कारवाई करावी , मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई द्यावी, यशोदाला रोजगार/ नोकरी द्यावी, कुटुंबाचे मानसिक पुनर्वसन करावे, फक्त छउ नव्हे, तर ऋखठ झाला पाहिजे, गावातील दहशतीचे वातावरण बदलले पाहिजे, बाधित कुटुंबाचे मनोबल वाढविण्यासाठी गावात प्रयत्न करावेत, सध्याच्या कायद्यातील तरतुदी अपुर्या आहेत, त्यासाठी कर्नाटकातही सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा केला पाहिजे, अशी मअंनिसची भूमिका व मागण्या आहेत, हे आम्ही ‘दि हिंदूच्या’ प्रतिनिधीस सांगितले. त्यासाठी आम्ही कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्यायमंत्री, आयुक्त, राष्ट्रीय व राज्य महिला आयोग, राष्ट्रीय व राज्य मानव अधिकारी आयोग, पोलीस प्रशासन सर्वांपर्यंत पोचवू व पाठपुरावा करू, असेही सांगितले. मअंनिसच्या या कामाची ‘दि हिंदू’ने दखल घेतली.
महाराष्ट्र असो, कर्नाटक किंवा इतर कोणतेही राज्य, परंपरेच्या नावाखाली किंवा कोणत्याही कारणाने माणसाची दुसर्या माणसाला आपल्या कह्यात, दबावात ठेवण्याची, वर्चस्व गाजविण्याची प्रवृत्ती ही अविवेकी तर आहेच; पण मानवतेला हीन करणारी आहे. त्याच्या विरोधात महा.अंनिसचे काम हे सगळीकडेच दाखलयोग्य आहे, हे तिथेही जाणवले. कर्नाटकात जातपंचायतीला मूठमाती देण्यासाठी बरेच काम करण्याची आवश्यकता आहे, हे दिसले. निवडणुकीनंतर तिथे पुन्हा जाऊन काम करावे लागेल. जातधर्मविरहित आणि मानवतापूर्ण समाज निर्माणासाठी विवेकाचा आवाज बुलंद करू या.
–प्राचार्य डॉ. सविता शेटे