Categories
अभिवादन

कार्ल मार्क्स जन्मद्विशताब्दी

मे - २०१८

1 जानेवारी 1818 ला पेशवाई बुडाली. याच दशकात भारतीय इतिहासाची स्त्री, शूद्रातिशूद्रांच्या शोषणाच्या दृष्टीने मांडणी करणारे महात्मा फुले भारतात जन्माला आले, तर याच वर्षी जर्मनीत 5 मे 1818 ला अवघ्या मानवजातीच्या श्रमशोषणाच्या इतिहासाची तर्कशुद्ध भौतिक दृष्टीतून मांडणी करणारे आणि मानवजातीला शोषणमुक्तीचे तत्त्वज्ञान देणारे कार्ल मार्क्स जन्माला आले. या घटनेला दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. खरे तर काळाच्या संदर्भात विचार केला, तर दोनशे वर्षे हा फार अल्पकाळ ठरतो. मार्क्स यांचा मृत्यू 1883 ला झाला; म्हणजे त्यांच्या मृत्यूला 135 वर्षे लोटली आहेत. 1848 साली मार्क्स एंगल्स यांनी कम्युनिस्ट जाहीरनामा लिहिला; ज्याला 170 वर्षे झाली आहेत. या 170 वर्षांत कम्युनिस्ट जाहीरनाम्याने जगाचा इतिहास-भूगोल पार उलटा-पालटा केला आहे. याच विचारांच्या आधारावर रशियामध्ये कामगार क्रांती झाली, जी 70 वर्षे टिकली; पण तिने सामाजिक मालकी असणारा, शोषणमुक्त, समतेवर आधारलेला समाज निर्माण करता येतो, याचा विश्वास मानवजातीत निर्माण करून ठेवला आहे.

मार्क्सवाद कालबाह्य झाल्याची ओरड गेली शंभर वर्षे सुरूच आहे; पण ही कालबाह्यता सिद्ध करण्यासाठी शोषक वर्गाच्या बुद्धिवंतांची जी अमाप धडपड सुरू आहे, ती पाहता मार्क्सवादाचा प्रभाव आजही टिकून आहे, हेच सिद्ध होते. एखादा विचार संपुष्टात आला असेल, तर त्याची कोण कशाला चर्चा करेल! असो. या जन्मद्विशताब्दी निमित्ताने मार्क्सवादाच्या या प्रणेत्याचे जीवन आणि तत्त्वज्ञान आपण समजून घेणे उचित ठरेल.

वर म्हटल्याप्रमाणे मार्क्स यांचा जन्म जर्मनीतील मिझेर शहरात एका मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते. बर्लिन विद्यापीठातून त्यांनी कायदा, इतिहास, तत्त्वज्ञानात पदवी मिळविली, तर एकीक्युरस यांच्या तत्त्वज्ञानासंदर्भात शोधनिबंध सादर करून डॉक्टरेट मिळविली. विद्यापीठात प्राध्यापक होण्याची त्यांची इच्छा होती; पण विद्यार्थीदशेतच ते हेगेल यांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली आले. त्यामुळे विद्यार्थी दशेपासूनच ते बंडखोर, क्रांतिकारी विचार करू लागले. ज्या विद्यापीठामध्ये त्यांना प्राध्यापक होण्याची इच्छा होती, ते विद्यापीठ उजव्या विचारांच्या प्रभावाखाली होते. या विद्यापीठातून लुडविक फायरबाख यांना निमंत्रित केले होते, मार्क्स त्यांचे शिष्य बनले. त्यामुळे मार्क्स यांची प्राध्यापक बनण्याची इच्छा मावळली. लुडविक फायरबाख यांनी याच काळात धर्मशास्त्रावर टीकेची झोड उठविली होती. मार्क्स आणि एंगल्स त्यामुळे प्रभावित होऊन स्वत:ला त्यांचे अनुयायी म्हणवून घेऊ लागले. याच काळात काही डाव्या हेगेलवादी असणार्‍या लोकांनी एक वर्तमानपत्र सुरू केले. मार्क्स त्याचे मुख्य संपादक बनले. या वर्तमानपत्रातून ते सरकारवर टीका करणारे लेख लिहू लागले. द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांच्या संदर्भात त्यांनी जहाल भाषेत लेख लिहिला. सरकारला हे मानवणे शक्यच नव्हते. सरकारने वर्तमानपत्र बंद पाडले. या लिखाणातून मार्क्स यांना आपल्याला राजकीय अर्थशास्त्राची फारशी माहिती नाही, हे लक्षात आले आणि त्यांनी गंभीरपणे राजकीय अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू केले.

1843 ला मार्क्स यांनी त्यांची बालपणीची मैत्रीण जेनीबरोबर विवाह केला. जेनी एका धनाढ्य प्रतिगामी कुटुंबातून आली होती. तिचा भाऊ सरकारमध्ये गृहमंत्री होता. जेनीवरील प्रेमातून मार्क्स यांनी खूप कविता लिहिल्या; पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की, हा आपला प्रांत नाही. या कविता पुढे पुस्तकरुपाने छापल्या गेल्या. नवथर प्रेमाची, स्वप्नाची सर्व लक्षणे या कवितांमधून दिसून येतात. याच वर्षी मार्क्स एका मासिकाचे संपादन करण्यासाठी पॅरिसला गेले. या मासिकाचा एकच अंक निघू शकला. कारण सरकारने ते बंद पाडले. याच वेळी त्यांची पॅरिसमध्ये फ्रेड्रीक एंगल्स यांच्याशी ओळख झाली आणि पुढे ते जीवलग मित्र बनले. जेनी आणि मार्क्स यांचे प्रेम, मार्क्स आणि एंगल्स यांची मैत्री मानवी इतिहासातील प्रेमाचे आणि मैत्रीचे आदर्श निर्माण करणारी आहे.

मार्क्स आणि एंगल्स समाजवादी विचारांकडे वळल्यानंतर गुप्तपणे काम करणार्‍या कम्युनिस्ट लीगचे सभासद बनले. या कम्युनिस्ट लीगच्या दुसर्‍या अधिवेशनात घोषणापत्र लिहिण्याची जबाबदारी या दोघांवर येऊन पडली. मार्क्स आणि एंगल्स यांनी लिहिलेले हेच घोषणापत्र ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ म्हणून जगप्रसिद्ध झाले. जगातील सर्व भाषांमध्ये लाखोंच्या संख्येने छापले गेलेले आणि आजही छापत असलेले हे एकमेव पुस्तक असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी तीन पुस्तके कार्यकर्त्यांनी वाचायला हवीत, असे म्हटले आहे, त्यातील एक म्हणजे ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ हे आहे.

या कम्युनिस्ट जाहीरनाम्यात संपूर्णपणे नवा असा भौतिकवादी द़ृष्टिकोन मांडण्यात आला आहे. सामाजिक जीवनाला तर्कशुद्धपणे लागू पडणारा असा हा दृष्टिकोन ‘ऐतिहासिक भौतिकवाद’ म्हणून ओळखला जातो; तर समाजविकासाच्या आणि एकंदरीतच निसर्गाच्या विकासासंदर्भात विकासाची प्रक्रिया विषद करणारा ‘विरोध विकासवाद;’ तसेच जगाचा ज्ञात इतिहास हा वर्गसंघर्षाचा आहे, हे ठोसपणे सांगणारा ‘वर्गसंघर्षाचा सिद्धांत;’ तसेच भांडवलशाहीतील कामगार वर्गाची ऐतिहासिक क्रांतिकारी भूमिका अत्यंत स्पष्टपणे, ओघवत्या प्रभावी शब्दांत मांडण्यात आली आहे. वर म्हटल्याप्रमाणे या जाहीरनाम्यातील दृष्टिकोनाने जगाचा सगळा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही की, ज्यावर मार्क्सवादाच्या या दृष्टिकोनाचा प्रभाव पडलेला नाही.

भांडवली अर्थव्यवस्थेचा सांगोपांग अभ्यास करून तिच्या विकासासाठी आणि कामगार वर्गाच्या शोषणाची प्रक्रिया उलगडून दाखवणारा मार्क्स यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ म्हणजे ‘भांडवल’ (कॅपिटल) याचे तीन खंड आहेत. आजही त्यांचा हा ग्रंथ ‘बेस्टसेलर’ पुस्तकांच्या यादीत असतो. यात श्रममूल्यांचा सिद्धांत मांडून शोषणाची प्रक्रिया विषद केली आहे. थोडक्यात, मार्क्सवादाचे सार सांगणे अवघड आहे, तरी तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील भौतिकवादी दृष्टिकोन म्हणजे माणसाची जाणीव, विचार, भावना या अखेरीस त्याच्या अवतीभवतीच्या भौतिक वास्तवावरच घडत असतात. समाजविकासाचे नियम सांगणारा ऐतिहासिक भौतिकवाद ‘विरोधातून विकास’ या विकासप्रक्रियेची सातत्यपूर्ण गतिशीलता या दृष्टिकोनातूनच आपण सत्यापर्यंत पोचू शकतो. याच दृष्टिकोनातून धर्म, राज्य या संदर्भातील भूमिका पुढे येतात. उदा. धर्म माणसाला त्याच्या खर्‍या दु:खाची, प्रश्नाची जाणीव होऊ देत नाही, याबाबतीत तो जनतेसाठी अफू ठरतो. अफू खाल्लेल्या माणसाला जसे अवतीभवतीचे भान राहत नाही, तशी धर्मामुळे त्याची गत होते. ही गोष्ट आजही आपण चांगल्या प्रकारे अनुभवू शकतो. असे असले तरी अत्यंत वाईट परिस्थितीत तगून राहण्यासाठी माणसाला धर्माची मदत होत असते, ही धर्माची दुहेरी कामगिरी मार्क्स यांनी विषद केली आहे; परंतु आपल्या वास्तव दु:खाला उत्तर शोधायचे असेल, तर माणसाला धर्माच्या अफूतून बाहेर पडणे क्रमप्राप्त आहे. राज्यसंस्थेबद्दल मार्क्सवादाची भूमिका विषद करायची, तर ज्या वर्गाच्या हातात उत्पादनाची साधने असतात, त्याच वर्गाच्या हाती राज्यसत्ता असते. समाजाची सारी विकासाची प्रक्रिया अखेर समाजवादी समाजाकडेच जाणारी असेल; भांडवलशाही अंतिम नाही. समाज सतत प्रगतीच्या दिशेनेच वाटचाल करीत असतो.

या सर्व क्रांतिकारी तत्त्वज्ञानाच्या निर्मितीसाठी मार्क्स यांना आपल्या आयुष्यात भयंकर किंमत मोजावी लागली. प्रचंड गरिबी त्यांच्या वाट्याला आली. एंगल्स यांची आर्थिक मदत नसती, तर मार्क्स यांचे कुटुंबिय कधीच मृत्यू पावले असते. त्यांची मुले औषधाअभावी, अन्न-पाण्याअभावी मृत्यूला सामोरी गेली. त्यांच्या शवपेटीसाठीही मार्क्स यांच्याकडे पैसे नसत. पैशाअभावी छोट्या शवपेट्यांत मुलांचे पाय दुमडून त्यांचे दफन करावे लागे; पण मार्क्स आणि जेनी यांनी अखेरपर्यंत आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. आपल्या क्रांतिकारी विचारांमुळे प्रत्येक देशातून त्यांना हद्दपार करण्यात आले; पण त्यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांना आणि शब्दांना तडजोडीची कसर लागू दिली नाही. मार्क्सवाद हे एक विज्ञान आहे. विज्ञानातील सिद्धांत कालबाह्य होत नाहीत, तर ते अधिक विकसित स्वरुपात पुढे येतात आणि हे सातत्य चालूच राहते. मार्क्सवादाचा नव्या परिस्थितीचे सत्य सांगणारा दृष्टिकोन पुढे येत राहील. शेवटी ‘मार्क्सवाद’ हा इंग्लंडमधील विकसित अर्थशास्त्र, फ्रान्समधील समाजवादी विचार आणि जर्मनीतील विकसित तत्त्वज्ञान यांचा मार्क्स यांनी केलेला विकास आहे. त्यांच्या आधारावरच त्यांनी एक सुसंगत दृष्टिकोन घडवला. लेनिन यांनी साम्राज्यवादाचा सिद्धांत मांडून मार्क्सवादाच्या विकासात भर घातली. अशा प्रकारे मार्क्सवादाचा विकास होत राहील. ती पोथी नाही, तर ते काळाबरोबर राहणारे वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. मानवजातीच्या हातात शोषणमुक्त समाजनिर्मितीसाठीचे हे महान तत्त्वज्ञान देऊन कार्ल मार्क्स यांनी मानवजातीच्या संदर्भातील आपले कर्तव्य पार पाडले आहे. याबद्दल त्यांच्या जन्मद्विशताब्दीनिमित्त आपण त्यांना आदराचा सलाम करूया.

लेखक संपर्क : 9869392157