Categories
वाचक प्रतिसाद

कावडयात्रेवरील लेख आवडला

ऑक्टोबर - २०१८

‘अंनिवा’मधील कावडयात्रा हा डॉ. प्रगती पाटील यांचा लेख वाचला. मी Valley of flowers ला जाताना हरिद्वार मध्ये मुक्काम केला, त्यावेळी कावडयात्रा पाहिली. कावडयात्रा लेखात लिहिले आहे ते जवळून अनुभवले. आज हरिद्वार म्हटलं की फक्त भगवा रंग, कर्णकर्कश आवाज, किड्यामुंगीसारखी माणसांची (पुरुषांची; त्यातही तरुण मुलांची) प्रचंड गर्दी एवढेच आठवते. त्या गर्दीला वेग होता, आक्रमकता होती, हिंसकता होती, उन्माद पण होता. सामान्य माणसाला भीती वाटेल असेच वातावरण होते, धर्मांधता जाणवत होती.

कावडयात्रा म्हणजे बाजारीकरण वाटले.भगवे बर्म्युडा टी शर्ट, कावड सजावटीचे साहित्य विक्रीला होते. बरेच कावडिये कावड म्हणुन गळ्यात दोर अडकवून त्याला दोन प्लास्टिकच्या बाटल्या किंवा प्लास्टिकचे कॅन लावून होते. लोक रात्री उघड्यावरच झोपत होते त्यासाठी पाच-दहा रुपयांत एक प्लास्टिकचे शीट पण विकत मिळत होते. .. हे सगळं मी माझ्या नजरेतून टिपत होते तसं वरून ड्रोन पण टिपत होता त्याच्या नजरेतून..

क्षमा देशपांडे, पुणे