महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मध्यवर्ती शाखेच्या सहकार्याने वर्धा तालुका व जिल्हा शाखेच्या पुढाकाराने विदर्भस्तरीय युवा संवाद शिबीर व यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्याचे संघटना बांधणी प्रशिक्षण शिबीर शनिवार दि. 15 सप्टेंबर आणि रविवार दि. 16 सप्टेंबर 2018 ला सरोज सभागृह, राष्ट्रभाषा रोड, वर्धा येथे संपन्न झाले. शिबिराचा थोडक्यात वृत्तांत…
बदलत्या परिस्थितीमध्ये विवेकवादी चळवळ गतिमान करणे गरजेचे – सुनील स्वामी
समाजातील काही अपप्रवृत्ती युवकांचा वापर विध्वंसक कार्यासाठी करीत आहेत. त्यामुळे सामाजिक व राष्ट्रीय ऐक्याला धोका निर्माण होत आहे. अशा या बदलत्या परिस्थितीमध्ये विवेकवादी चळवळ अधिक गतिमान करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रशिक्षण विभागाचे राज्य कार्यवाह सुनील स्वामी यांनी उद्घाटन सत्रात बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्र अंनिस ही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कल्पकतेतून व कार्यकुशलतेतून पुढे आलेली चळवळ असून युवकांनी या चळवळीला अधिक बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उद्घाटक म्हणून तालुकाध्यक्ष अरुणभाऊ चवडे, अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष बाबारावजी किटे, तर राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, प्रधान सचिव सारिका डेहनकर, डॉ. माधुरी झाडे (वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प), राज्य सरचिटणीस विनायक सावळे, युवा विभाग कार्यवाह कृष्णात स्वाती, सोशल मीडिया सहकार्यवाह सुयश तोष्णीवाल मंचावर उपस्थित होते.
रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांच्या नात्याशी बांधिलकी जपणारी संघटना म्हणजे महा.अंनिस – कृष्णात स्वाती
महाराष्ट्र अंनिस ही राजकीय लोकांच्या, भांडवलदारांच्या किंवा पैसेवाल्यांच्या आधारावर चालणारी संघटना नसून लोकांच्या सहकार्यावर चालणारी लोकचळवळ आहे, त्यामुळेच रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांच्या नात्याशी बांधिलकी जपणारी संघटना आहे. यातूनच तरुण वारस उभा करणे हे युवा विभागाचे कार्य आहे, असे मत युवा विभागाचे राज्य कार्यवाह कृष्णात स्वाती यांनी व्यक्त केले. ‘अंनिस म्हणजे काय रं भावा?’ या गटचर्चेतील अंनिसची वैचारिक भूमिका व ध्येयवाद, अंनिसची उपक्रमशीलता, अंनिसची संघटनात्मक रचना व अंनिसची यशोगाथा या विषयावर चार गटांत गटचर्चा घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
संघटनेतील एकोपा हीच खरी संघटनेची ताकद – विनायक सावळे
आपल्या शाखेमध्ये चांगले वातावरण तयार करायचं असेल, तर शाखा म्हणून काम करणारी आपल्या विचारांची माणसं शोधली पाहिजेत, त्यांच्याशी उत्तम संवाद ठेवून भावकी वाढवा. काही वैचारिक मतभेद असतील, तर मनमोकळेपणाने बोला. गैरसमज टाळा. कारण संघटनेतील एकोपा हीच खरी संघटनेची ताकद आहे, असे मत राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी ‘आमची शाखा, आमची मीटिंग’ या विषयावर संवाद साधताना व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘पद,’ ‘प्रसिद्धी,’ ‘इगो’ याबाबत सुद्धा कार्यकर्त्यांशी आपल्या खास अनुभवातून संवाद साधला; तसेच ‘सभासदापासून-संघटकापर्यंत’ याबाबत सुद्धा सविस्तर मांडणी करताना ‘सप्तपदी’बाबत विवेचन केले.
विदर्भामध्ये महाराष्ट्र अंनिसचे काम वाढविण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले, ते राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांची ‘मी कसा घडलो?’ या सदरामध्ये प्रदीर्घ मुलाखत ठाणे जिल्हा प्रधान सचिव अमोल चौगुले यांनी घेतली, यावेळी काही युवा कार्यकर्त्यांच्या प्रश्नांनाही गजेंद्र सुरकार यांनी उत्तरे दिली.
रविवार : 16सप्टेंबर 2018
चिकित्सा करणारे संदेश लिहा – वाघेश साळुंखे
महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर इत्यादीचा वापर कसा करावा, याबाबत सविस्तर माहिती देताना सोशल मीडिया विभागाचे राज्य कार्यवाह वाघेश साळुंखे यांनी गुडमॉर्निंग, गुड नाईट इत्यादी मेसेजेस न पाठविता चिकित्सा करणारे संदेश, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे संदेश, बुवाबाजी व अंधश्रद्धांचे भांडाफोड करणारे व्हिडीओ, सामाजिक कायद्याविषयी माहिती, प्रबोधनाचे विचार इत्यादी वैचारिक माहिती ‘शेअर’ करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
चार महत्त्वाच्या गोष्टी पाच मिनिटांत
‘चार महत्त्वाच्या गोष्टी पाच मिनिटांत’ या सत्रामध्ये दिलेल्या विषयावर अभिनयावर आधारित कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये शिबिरार्थींनी अभिनय करीत आनंद घेतला व दिलेल्या विषयाच्या सकारात्मक व नकारात्मक पैलूंवर चर्चा करून अंनिसचा कार्यकर्ता म्हणून नेमकेपणाने काय सांगायला हवे, याबाबत सुनील स्वामी यांनी मार्गदर्शन केले.
दिल, दोस्ती, दुनियादारी या विषयांतर्गत विनायक सावळे यांनी उपस्थित युवक-युवतींशी सविस्तर संवाद साधला.
ध्येयनिश्चिती – या विषयांतर्गत सोशल मीडिया विभागाचे सह कार्यवाह मा. सुयश तोष्णीवाल यांनी संवाद साधताना उपस्थित कार्यकर्त्यांच्या ध्येयाबाबत चर्चा केली. डचअठढअ याबाबत माहिती सांगून प्रत्येक शाखेचे पुढील चार महिन्यांचे ध्येय काय असावे, याबाबत शाखानिहाय, गटनिहाय बसवून चर्चा करायला सांगितली व शाखेचे ध्येय लेखी स्वरुपात घेण्यात आले व लिहून दिलेले ध्येय पुढील चार महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाखेने वाटचाल करण्याचे आवाहन करण्यात आले.
समारोप :- दुपारी 4 वाजता राज्य सरचिटणीस संजय शेंडे, गजेंद्र सुरकार, वर्धा जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, तालुकाध्यक्ष अरुणभाऊ चवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष जगजीतसिंग, कार्याध्यक्ष मधुकर धंदरे, वर्धा जिल्हा प्रधान सचिव सारिका डेहनकर, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पप्रमुख डॉ. माधुरी झाडे व तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित युवकांनी आयोजन, नियोजन व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्यानंतर ‘हम होंगे कामयाब’ या गीताने शिबिराची सांगता झाली.
संपर्क : 9423118730