महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर येत्या 15 जुलै रोजी वयाची 90 वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार आहे. त्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने ‘ज्येष्ठ नेते भाई एन. डी. पाटील कृतज्ञता सोहळा’ 15 जुलै रोजी कोल्हापुरात आयोजित करीत आहोत. एन. डी. पाटील सर केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचे पाठीराखे राहिलेले आहेत, असे नाही तर डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या प्रयत्नांची पाठराखण करतानाच त्यांनी गरजेनुसार आपल्या ज्येष्ठतेच्या अनुभवांचे मार्गदर्शन देखील केलेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या मागणीचा दोन दशकांचा पाठपुरावा सरांच्या सल्ला मसलतीनेच आपण करू शकलो आहोत. दाभोलकरांच्या जाण्यानंतर देखील एन. डी. सरांनी व्यक्तिश: मला आणि संघटनेतील इतर सहकार्यांना दिलेला खंबीर आधार आणि मार्गदर्शन आपल्याला संघटितपणे, समर्थपणे, प्रभावीपणे कार्यरत ठेवण्याला अत्यंत उपयोगी ठरला आहे. स्वातंत्र्यचळवळीचे बाळकडू घेऊन कार्यरत झालेले एन. डी. सर एकाच वेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, अर्थकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात चौफेर कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वात शेतकरी कामगार पक्ष, रयत शिक्षण संस्था, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था इस्लामपूर, बेळगावमधील शिक्षण संस्था, अशा अनेक सामाजिक व साहित्यिक संस्था, जागतिकीकरणविरोधी कृती समितीमार्फत चालविलेले सेझविरोधी भूमी अधिग्रहणविरोधी आंदोलन, शेतकरी-कामगार-महिला अल्पसंख्याक समूहांच्या जगण्याच्या भौतिक प्रश्नांसाठीचे शेकडो लढे परिणामकारकपणे चालविले गेले आहेत. अर्थातच, हे सर्व करताना आपल्या जवळपास 75 वर्षांच्या समाजाभिमुख जीवनामध्ये व्यक्तिगत व सार्वजनिक पातळीवर चरित्र आणि चारित्र्यावर एकही शिंतोडा नसलेला हा आजच्या काळातील कदाचित एकमेव नेता असेल! अशा एन. डी. पाटील सरांमुळे आपल्याला मिळालेला कार्यविचारांचा वसा पुढे नेण्यासाठी प्रेरणा घेण्याच्या उद्देशाने कृतज्ञता सोहळ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवे, असे आवाहन करतो.
कार्यगौरव स्मरण
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटीत कार्याचे अध्वर्यूपण ज्यांच्याकडे जाते, अशा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा निर्घृण खून झाला तो दिवस 20 ऑगस्ट हा स्मृतिदिन यापुढे ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून साजरा करायचा असा निर्णय ‘ऑल इंडिया पिपल्स सायन्स नेटवर्क’ (AIPSN) या भारतातील विज्ञान प्रचार, प्रसार क्षेत्रातील सर्वांत मोठ्या समन्वय मंचातर्फे करण्यात आला आहे. आपल्या देशातील सर्व राज्यांतील मिळून 40 पेक्षा जास्त संस्था-संघटना त्यामध्ये सहभागी आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कार्यासाठी आपले अमूल्य योगदान देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कार्यरत असताना शहीद झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानाप्रती देशातील जनतेने व्यक्त केलेला उच्च दर्जाचा ‘कार्यगौरव’ आहे, असे मी मानतो.
आता आपल्यावर जबाबदारी आहे की, येत्या 20 ऑगस्टपासून ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ व्यापक स्तरावर व सुनियोजित पद्धतीने साजरा केला जावा, त्यासाठी आपल्याला चांगली पूर्वतयारी पुढील महिन्यांमध्ये करावी लागेल. मानवी समाजाच्या उत्थानासाठी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यान्वित करण्याचे वेगवेगळे प्रयत्न अधिक गतिमान व प्रभावी कसे करता येतील, याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. त्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
त्रिदशकपूर्ती आरंभ
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती येत्या 9 ऑगस्ट 2018 रोजी 30 वर्षे पूर्ण करीत आहे. म्हणजे समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संघटितपणे कार्यरत राहण्याचा वस्तुपाठ जगापुढे उभारणार्या संघटनेचे त्रिदशकपूर्ती वर्ष येऊ घातलेले आहे. त्या निमित्ताने आपण मागील वर्षापासून महाराष्ट्र अंनिसचा ‘भविष्यवेध 2025’ बाबत चर्चा संघटनांतर्गत सुरू केली आहे, हे आपण जाणताच. आतापर्यंतच्या वाटचालीत पाहिलेली स्वप्ने, ठरविलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासोबत पुढील दशकात अंधश्रद्धा निर्मूलनासह वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आघाडीवर करावयाच्या कामांची ध्येयनिश्चिती आपल्याला करावयाची आहे. त्यासाठी आपण सगळे कटिबद्ध होऊया!
आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वर्धापन दिन 9 ऑगस्टपासून म्हणजे त्रिदशकपूर्ती प्रारंभ दिनापासून शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन 20 ऑगस्टपर्यंत म्हणजे ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ निमित्ताने दिनांक 9 ते 20 ऑगस्ट 2018 ‘मानव समाज उत्थानासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अभियान’ राबविण्याचे ठरवू या!
विवेकाचा आवाज द्विगुणित करूया!
आपला स्नेहांकित,
अविनाश पाटील