Categories
चळवळ

गांधी समजून घेताना…

ऑक्टोबर – २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी 250’ निमित्ताने राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी 250’ निमित्ताने राज्यव्यापी प्रशिक्षण कार्यशाळेचे दि. 2 व 3 सप्टेंबर 2017 रोजी आचार्य दादा धर्माधिकारी सभागृह, सेवाग्राम, ता. जि. वर्धा येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन दि. 2 सप्टेंबर रोजी झाले. उद्घाटन सत्राचे उद्घाटक मा. अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष, मअंनिस), अध्यक्ष मा. प्रा. डॉ. श्रीराम जाधव हे होते. मा. प्रा. शेखर सोनाळकर, मा. डॉ. रवींद्र रुक्मिणी, मा. डॉ. उल्हास जाजू, मा. गजेंद्र सुरकार, मा. माधव बावगे, मा. सुनील स्वामी यांची उपस्थिती होती.

कार्यशाळेचे प्रास्ताविक गजेंद्र सुरकार (राज्य सरचिटणीस, मअंनिस) यांनी केले. गांधीजी आणि मअंनिस यांचा संबंध विषद करताना गांधीजी केवळ धार्मिक नव्हते, तर विवेकवादीही होते, विज्ञानवादी होते. त्यांनी कधीही देवळात पाऊल ठेवले नाही किंवा देऊळही बांधले नाही. आंतरजातीय, आंतरधर्मिय लग्नाचे ते पुरस्कर्ते होते. असा विवेकी गांधी लोकांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली असून ईश्वर हे सत्य नसून सत्य हेच ईश्वर आहे, ही भूमिका स्वीकारणारा गांधीजी संविधान बांधिलकी महोत्सव, संविधान जागर यात्रा काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितेतर समूहाकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे गांधीजींच्या संदर्भात चर्चा घडवून आणण्यासाठी हा प्रयत्न आहे. कारण महाराष्ट्र अंनिस ही चळवळ केवळ अंधश्रद्धा निर्मूलनाचेच काम करीत नाही, तर व्यापक परिवर्तनाच्या लोकचळवळीशी स्वत:ला जोडून घेत या प्रशिक्षण कार्यशाळेतून विवेकवादी, विज्ञानवादी गांधींचा शोध घेण्याचा प्रयत्न होणार आहे आणि विवेकी गांधी जर मिळाला, तर तो स्वीकारण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त करून चिकित्सा न करता कुठलीही गोष्ट नाकारणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले व उपस्थित सर्व मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे सेवाग्राम नगरीत स्वागत करण्यात आले.

इतिहासातील ओझी घेऊन वर्तमानात जगू नका अविनाश पाटील

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी वर्षभर अंनिसने कार्यक्रम राबविले. बाबासाहेबांना दलितेतर समूहाकडे नेण्यासाठी अंनिसच्या युवा विभागाने दोन टप्प्यांमध्ये ‘संविधान जागर यात्रा’ काढली व जवळपास 125 ठिकाणी जाऊन संविधानाचा जागर केला. त्याप्रमाणे महात्मा गांधींना समजून घेण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन असून गांधींबद्दल असलेले पूर्वग्रह संवादाच्या, चर्चेच्या माध्यमातून दूर करून ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष मा. अविनाश पाटील यांनी उद्घाटन सत्रात केले. ते पुढे म्हणाले की, ‘भारतीय कसावर आधारित विवेकवाद समजून घेणे आवश्यक आहे. गांधी आणि आंबेडकर यांच्यातील वैचारिक संघर्ष याबाबतीत काही आक्षेप असतीलही; परंतु त्या-त्या परिस्थितीच्या संदर्भात दोन्ही महामानवांना समजून घेऊन समन्वय साधणे गरजेचे आहे. गांधींच्या कृतिकार्यातून योग्य व कालसुसंगत जे वाटेल ते घ्यावं. त्यासाठी आपणाला गांधींचे सहकारी म्हणून पुढे यावे लागेल; तसेच इतिहासातील ओझी घेऊन वर्तमानात जगू नका, असे आवाहनसुद्धा पाटील यांनी केले. तसेच गांधीजींच्या विचाराचं, कर्तृत्वाचं आजच्या परिस्थितीमध्ये काय महत्त्व आहे, हा संदेश अंनिसच्या माध्यमातून पुढील काळात समाजासमोर मांडणार असल्याचे प्रतिपादन अविनाश पाटील यांनी यावेळी केले. गांधींचा विचार, कार्य केवळ प्रातिनिधिक स्वरुपात राहता कामा नये. यासाठी अंनिस पुढील काळात अशा प्रकारच्या कार्यशाळा घेऊ इच्छिते, असे मत अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.

गांधी सांगण्याची नव्हे, जगण्याची गोष्ट आहे प्रा. डॉ. श्रीराम जाधव

धर्म म्हणजे नीती. धर्माशिवाय माणूस जगू शकत नाही. मानवी जीवनाला संकुचित धर्म गांधींना अभिप्रेत नव्हता, तर मानवाचा उत्कर्ष करणारा धर्म त्यांना अपेक्षित होता. त्यामुळे गांधीजींचा मानवता धर्म समजून घेण्यासाठी गांधी भाषणातून सांगण्याची गोष्ट नव्हे, तर जगण्याची गोष्ट आहे, असे मत सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे मंत्री तथा कार्यशाळेचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीराम जाधव यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, सेवाग्राम ही दिल्लीनंतरची सेकंड कॅपिटल होती. येथूनच देशाच्या स्वातंत्र्याची दिशा ठरविली जात होती. अशा या कर्मभूमीत कार्यशाळेच्या माध्यमातून गांधींना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी यांचे पुणे कराराच्या पार्श्वभूमीवर वैचारिक मतभेद होते; परंतु त्या-त्या परिस्थितीच्या संदर्भात दोन्ही महामानवांना समजून घेणे गरजेचे आहे. गांधींसमोर त्यावेळी राष्ट्र होते, तर बाबासाहेबांसमोर त्यांचा समाज होता. त्यामुळे दोन्ही महामानवांना स्वतंत्रपणे समजून घेण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली. गांधींनी ब्रह्मचर्याचे पालन केले. त्यासाठी कस्तुरबांनीही त्यांना साथ दिली. गांधींनी टिळकांच्या मृत्यूनंतर एक कोटी फंड जमा केला व तो ‘हरिजन सेवक’ फंडाला दिला. गांधी म्हणायचे की, “मी आधी जे म्हणालो, ते सोडून द्या; पण मी शेवटी काय म्हणालो ते घ्या.” त्यामुळे गांधीजींची विवेकी भूमिका नीट समजून घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. रवींद्र रुक्मिणी महात्मा गांधींचे विचार आणि कालांतराने बदलत गेलेले विचार लक्षात घेता महात्मा गांधींचे विवेकी विचार समाजापर्यंत पोचविण्यासाठी महात्मा गांधींना मानणारे लोक कमी पडलेत. त्यामुळे महात्मा गांधींबाबत अनेक गैरसमज आजही कायम आहेत व ते सोशल मीडियावरही पसरविले जातात. त्यामुळे विवेकवादी चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी व गांधीवाद्यांनी गांधींना नीट समजून घेऊन विवेकी गांधी लोकांपर्यंत जाणे अधिक गरजेचे आहे. इतर महापुरुष समजायला कठीण नाहीत; पण गांधी समजायला कठीण आहेत, हे सांगताना ते पुढे म्हणाले की, गांधी मुळात कार्यकर्ता होते. गांधी म्हणायचे “माझे जीवन हाच माझा संदेश आहे.” एखाद्या माणसाला समजून घ्यायचे असेल, तर त्याच्या शत्रूकडे जा, असे डॉ. रवींद्र यांनी सांगतानाच संघटना आणि विचार एकत्र आले, तर उजवा विचार येथे रुजणार नाही, असे विचार डॉ. रवींद्र रुक्मिणी यांनी ‘विवेकी गांधी’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर गांधीविचाराला मानत होते; परंतु विवेकवादी चळवळीत गांधी कुठेच दिसत नाहीत? चातुर्वर्ण्य व्यवस्था मानणारे गांधी शेवटच्या टप्प्यात चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा विरोध करतात. कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी देऊळ नसावे, ही गांधीजींची भूमिका होती. पश्चिम बंगालमधील कालिमाता दर्शनाला गांधी गेले नाहीत. कारण तेथे पशूचा बळी दिला जातो. ती देवी मान्य नाही, ही भूमिका गांधींची होती.

एखाद्याचे शिष्य बनू नका, तर उत्तराधिकारी बना – प्रा. शेखर सोनाळकर

समाजवाद्यांनी आणि गांधीवाद्यांनीही गांधी नीट समजून घेतला नाही, ही खंत व्यक्त करताना सोनाळकर म्हणाले की, गांधी ज्याला जेवढा पचेल तेवढाच घ्यावा; बाकीचा सोडून द्यावा. एखाद्याचे शिष्य बनण्यापेक्षा त्याचे उत्तराधिकारी बना, असे आवाहन करताना गांधी समजून घ्यायचा असेल, तर विनोबांच्याही पलिकडे जावं लागेल. गांधींचा धर्म हा हिंदू नव्हता, तर तो मानवता होता. हिंदूंचा धर्म हा ब्राह्मणशरण आहे; पण गांधींचा धर्म ब्राह्मणशरण नव्हता. गांधीजी आपला धर्म इतरांवर लादू शकत नव्हते. गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यापूर्वी एक वर्ष भारत समजून घेतला. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक आंदोलने केली. यामध्ये चंपारण्याचा लढा, असहकार आंदोलन, मिल मजुरांचा लढा, खिलाफत चळवळ, मिठाचा सत्याग्रह इत्यादीचा उल्लेख विशेष रुपाने करता येईल. यासाठी ‘चले जाव’ आंदोलन केले. देशाला, देशातील जनतेला एकत्र करायचे असेल, तर अहिंसेच्या आणि विवेकाच्या मार्गानेच लढलं पाहिजे, असे गांधींना वाटत होते. भगतसिंगाला फाशी होऊ नये यासाठीसुद्धा गांधीजींनी ब्रिटिशांना पत्र लिहिले होते. गांधीजी हे हिंदू-मुस्लिम एकतेचे पाईक होते, असेही ते म्हणाले. गांधीजींची भूमिका निसर्गवादी होती. इतरांच्या बाबतीत ते कमालीचे उदार होते, असेही ते म्हणाले. 145 मिनिटाच्या आपल्या भाषणात प्रा. सोनाळकर यांनी स्वातंत्र्याचा इतिहास सविस्तर समजावून सांगितला व सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधी यांच्यामध्ये काही बाबतीत मतभेद असले, तरी दोघांचेही ध्येय एकच होते, हे सांगताना भारत-पाकिस्तानची फाळणी आणि गांधीजींची भूमिका याबाबत सुद्धा त्यांनी माहिती विषद केली.

गांधीजी आदर्शवादी, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वास्तववादी होते – प्रा. डॉ. सुधाकर सोनोने

वर्तमान काळात महापुरुष कुठल्यातरी राजकीय पक्षाची खाजगी मालमत्ता असल्याचे भासवते; परंतु त्या महापुरुषांच्या विचारांचा हे राजकीय पक्ष धोरण राबविताना अजिबात विचार करीत नाहीत. गांधी आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांचेही तेच झाले.

गांधीजी खेड्याकडे चला, असं म्हणत असत. कारण शेतीवर आधारित ग्रामोद्योग उभे राहावेत आणि खेडी स्वयंपूर्ण व्हावीत. खेड्यातील दारिद्य्र दूर व्हावे, असे गांधींना वाटत होते, तर ग्रामव्यवस्था ही जातीवर आधारित आहे व यात दलितांचा उद्धार होणार नाही. त्यासाठी अस्पृश्यांनी शहराकडे चला, असा संदेश डॉ. बाबासाहेब देत होते. त्या-त्या परिस्थितीमध्ये दोन्ही महापुरुषांच्या विचारांमधील संघर्ष समजून घेणे गरजेचे आहे; परंतु या दोन महापुरुषांमधील वैचारिक मतभेद समाजासमोर वेगवेगळ्या पद्धतीने मांडला आणि राजकीय फायदा घेतला, असेही ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्याकरिता संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. डॉ. आंबेडकर हे वास्तववादी होते. या वास्तविकतेला कायदेशीर प्रक्रिया देण्यासाठी बाबासाहेब आग्रही होते, तर महात्मा गांधी आदर्शवादी होते. आदर्शवादातून समाजनिर्मिती करण्याचा प्रयत्न गांधींनी केला. दोघांचाही केंद्रबिंदू मानव होता. त्यामुळे या दोन्ही महापुरुषांच्या विचाराचा समन्वय साधणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. दोघांच्या विचारामधून काय घेता येईल, याचा विचार करून विवेकवादी चळवळ गतिमान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

डॉ. उल्हास जाजू महात्मा गांधींची देव-धर्मविषयक संकल्पना मांडताना अंतिम ईश्वर निसर्ग आहे. त्यामुळे त्याला जाणून घेऊन अनुभूती घ्या आणि समाजाला जोडण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन डॉ. उल्हास जाजू यांनी केले. शेतकर्‍यांचे जीवन अधिक महत्त्वपूर्ण असून श्रमजीवनामधूनच समाज उभा करण्यासाठी गांधीजींचे विवेकी विचार लोकांपर्यंत पोचविणे गरजेचे आहे.

डॉ. सोहन पंड्या महात्मा गांधी यांची ग्रामोद्धारासंबंधी संकल्पना विषद करताना शेतीवर आधारित उद्योग नामशेष होत असून ग्रामीण भागातील लोकांचा लोंढा शहराकडे वळत आहे व शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यासाठी गांधीजींची ग्रामस्वराजाची संकल्पना नीट समजून घेऊन शेतीवर आधारित लघुउद्योगाला चालना देणे गरजेचे आहे. यावेळी पंड्या यांनी जैवशेतीबाबत सुद्धा शास्त्रीय दृष्टीने माहिती दिली.

समारोपीय सत्र

मा. सुनील स्वामी महाराष्ट्र अंनिसचा पुढील काळात कृतिकार्यक्रम काय असावा, यावर बोलताना गांधीजींवरील फिल्म लोकांपर्यंत पोचविण्यासाठी तरुणांशी सतत संपर्कात राहून आपल्या क्षमता, मर्यादा, आवड लक्षात घेत लोकांपर्यंत विवेकी गांधी फिल्म किंवा वक्तृत्वाच्या माध्यमातून पोचविण्याची गरज सुनील स्वामी यांनी व्यक्त केली.

प्राचार्य सविता शेट्ये विवेकी गांधी समाजापर्यंत नेण्यासाठी अशा प्रकारच्या आणखी कार्यशाळा आयोजित करण्यात आणि गांधीजींवरील अभ्यासकांनी यासाठी आपला वेळ द्यावा, असे प्रतिपादन केले.

माधव बावगे – गांधी समजून घेण्यासाठी अपेक्षेएवढे कार्यकर्तेया कार्यशाळेला आले नाहीत. त्यांच्यापर्यंत आपण जाणे आवश्यक असून सेवाग्रामपासून “युद्ध नको, बुद्ध, गांधी हवा” असा संदेश सायकल यात्रेच्या माध्यमातून गावागावात; विशेषत: दलित समूहाकडे नेण्याची गरज त्यांनी कृतिकार्यक्रमाच्या संदर्भात बोलताना व्यक्त केली.

सत्यपाल महाराज मी गेल्या 50 वर्षांपासून तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गौतम बुद्ध, पंजाबराव देशमुख इत्यादी समाजसुधारकांचा प्रचार आणि प्रसार सप्तखंजिरीच्या माध्यमातून करतो आहे. गांधी सादर करण्यासाठी आधी मला गांधी समजून घ्यावा लागेल. दोन दिवस जर कार्यशाळेला उपस्थित असतो, तर गांधी समजून घेता आले असते, असे मत प्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी समारोपीय कार्यक्रमात व्यक्त केले. ग्रामसफाई, निर्मलग्राम, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी विषयाच्या माध्यमातून विवेकी गांधी तरुणांकडे नेण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आपल्या खास विनोदी शैलीमध्ये भोंदूबाबा हातचलाखी करून कसे फसवितात, याचा प्रयोग करून दाखवित त्याची उकलही उपस्थितांना सांगितली.

दोन दिवसीय कार्यशाळेचे आभार प्रदर्शन सुनील स्वामी (प्रशिक्षण विभाग कार्यवाह) यांनी केले व “हम होंगे कामयाब…” या क्रांतिगीताने कार्यशाळेची सांगता झाली. या कार्यशाळेत विविध सत्रामध्ये प्रा. अजय सावरकर, प्रकाश कांबळे, सुनील ढाले, सारिका डेहनकर, भरत कोकावार, नरेन्द्र कांबळे, भीमसेन गोटे, ममता बालपांडे, सुनील सावध, रजनी सुरकार, बाबाराव किटे, डॉ. ज्ञानेश्वर वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. या कार्यशाळेला चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, बीड, अकोला, कोल्हापूर, लातूर, वर्धा, नागपूर इत्यादी जिल्ह्यातील जवळपास 80 कार्यकर्ते उपस्थित होते.

वार्तांकन :- प्रकाश कांबळे