Categories
जात पंचायत

आंतरजातीय विवाह केल्याने तीन कुटुंबे बहिष्कृत

ऑक्टोबर – २०१७

तेलगू मडेलवार समाजातील तीन मुलांनी आंतरजातीय विवाह केल्याने जातपंचायत समितीने या तीन कुटुंबियांना वाळीत टाकण्याची घटना खडकी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी समाजातील 9 पंचांवर गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही धार्मिक, तसेच लग्नसमारंभ आदी कार्यक्रमांत त्यांना सामावून घेतले जात नसल्याने या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तीन जणांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकाराने पुरोगामी पुण्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजित रामचंद्र चिंचणे (वय 39, रा विश्रांतवाडी, आळंदी रोड) तसेच महेश अंगीर व संतोष चिंचणे यांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांच्या लग्नाला अनुक्रमे सतरा, बावीस आणि पस्तीस वर्षे झाली आहेत. तरीही तेलगू मडेलवार समाजाच्या (फंड) पंचांनी या तिन्ही कुटुंबियांना समाजातील कोणत्याही कार्यक्रमास निमंत्रण न देणे, लग्नसमारंभ, बारसे, धार्मिक कार्यक्रमांपासून लांब ठेवले होते. या पंचांची निवड ही समाजातूनच केली जाते. ‘विवाहानंतर समाजाचे सदस्यत्व मिळते’, अशी अट समाजाने ठेवली आहे. समाजातीलच मुले किंवा मुलांशी विवाह केल्यावरच समाज सदस्य बनवून घेतात. एखाद्याने आंतरजातीय विवाह केला, तर त्याचे सदस्यपद रद्द केले जाते. तसेच बहिष्कृतसुद्धा केले जाते. या तिन्ही युवकांनी 2013 पासून समाजाला पत्रव्यवहार करून समाजात घ्या, अशी विनंती केली; परंतु समाजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. या जातपंचायत समितीच्या निर्णयाला वैतागून युवकांनी पोलीस ठाणे गाठले. समाजाच्या रुढी, परंपराविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली.

दरम्यान, त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडेही दाद मागितली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हाध्यक्ष नंदिनी जाधव या सुद्धा फिर्यादी युवकांबरोबर खडकी पोलीस ठाण्यात आल्या आणि पंचांवर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. दि. 3 जुलै 2017 रोजी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा अस्तित्वात आल्याने आम्ही समाजाला विनंती केली, तरीही समाजाने ‘तुम्हाला जिथे तक्रार करायची, तिथे करा’, असे सुनावले. समाजातील पंच गणेश निमकर, प्रशांत अंगीर, प्रकाश पिंपळकर, सुधीर पिंपळकर, विलास चिंचणे, उमाकांत वेलीटकर, येलपूर बाबूलाल, किशोर गरसुंद, अनिल तेलंग या नऊ पदाधिकार्‍यांवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. एस. गोरे करीत आहेत.

नंदिनी जाधव, पुणे