तुंग, ता. मिरज येथील पांडुरंग तमाण्णा चौगुले (नंदीवाले) यांच्या कुटुंबास नंदीवाले जातपंचायतीने गेल्या 10 वर्षांपासून वाळीत टाकले होते. चौगुले यांनी 10 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्याच्या मुलाच्या विवाहास पाठिंबा दिला होता. त्यामुळे जातपंचायतीने त्यांना बहिष्कृत केले आहे. त्यांना समाजाच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास, लग्न, मयत यावेळी बोलावले जात नव्हते. त्यांचे जगणे या जातपंचायतीने मुश्कील केले होते. ते 10 वर्षे अपमानित होऊन जगत होते. कोणीही नातेवाईक, समाज त्यांच्याशी संबंध ठेवत नव्हता. अशा त्रासाने त्यांच्यावर गाव सोडण्याची वेळ आली होती.
पांडुरंग चौगुले यांनी सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, संजय बनसोडे, प्रा. सतीश चौगुले, अवधूत कांबळे, अजय भालकर, प्रा. अनंतकुमार पोळ यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांची भेट घेऊन महाराष्ट्र सरकारने नुकत्याच पारित केलेल्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी तुंग गावाला प्रत्यक्ष भेट देऊन सखोल चौकशी केली. त्यानंतर सोमवारी ता.11 सप्टेंबर ला रात्री 11 वाजता सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला तेरा पंचांवर गुन्हा दाखल केला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे….
शंकर यल्लाप्पा चौगुले, रावसाहेब शंकर चौगुले, पांडुरंग लक्ष्मण चौगुले, गजानन राजाराम चौगुले, शिवाजी राजाराम चौगुले, दिलीप श्रीपती चौगुले, सोपान लक्ष्मण चौगुले, ज्ञानदेव लक्ष्मण चौगुले, अशोक ज्ञानदेव चौगुले, विलास शिन्नाप्पा चौगुले, आप्पासो शिन्नाप्पा चौगुले, महेश तुकाराम चौगुले, नितीन तुकाराम चौगुले, सर्व रा. तुंग, नंदीवाले वसाहत.
हा गुन्हा दाखल करण्यास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, उपनिरीक्षक आर. आर. साळुंखे यांचे सहकार्य मिळाले.
सांगली जिल्ह्यात सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे. या कायद्यानुसार एखाद्या कुटुंबास भावकीने कोणत्याही कारणाने वाळीत टाकणे हा दंडनीय अपराध आहे. या कायद्यामुळे जातपंचायतीच्या मनमानीला लगाम बसेल. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हा कायदा होण्यासाठी अंनिसने गेल्या 3 वर्षांपासून पाठपुरावा, संघर्ष केला आहे. सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा पारित झाल्यानंतर काही काळातच अनेक गुन्हे जातपंचांच्या विरोधात दाखल झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील तुंग येथील ही घटना या संदर्भातील आठवी आहे. यावरून जातपंचांचा जाच सामान्य माणसांवर किती भयानक आहे याची कल्पना येते.
भावकीच्या जाचाला कंटाळलेल्या वाळीत टाकलेल्या पीडित व्यक्तींनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन अंनिस करत आहे. तुंग येथील सामाजिक बहिष्काराच्या घटनेचा पाठपुरावा करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या सांगली शाखेच्या प. रा. आर्डे, जयसिंगराव मोहिते, शशिकांत सुतार, डॉ. संजय निटवे, प्रवीण कोकरे, अण्णा गेजगे इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
– राहुल थोरात, सांगली