Categories
परिवर्तन

सत्यनारायण पूजा ते अंनिस कार्यकर्ता…

ऑक्टोबर – २०१७

मी त्यावेळी इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. बहीण भावामध्ये मी सर्वांत मोठा होतो. आम्ही नाभिक समाजाचे असल्याने घरी वडिलांचे सलून होते. माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. ते ‘शिवलीलाअमृत’ रोज वाच असत. एके दिवशी आमच्या सलूनमध्ये एका फिरत्या देवर्षी पिंगळ्याने आमच्या वडिलांना सांगितले की, दर अमावस्येला तुम्ही सत्यनारायणाची पूजा घाला. तुमची भरभराट होईल. आमच्या गावातील गणपुले काका दर अमावस्येला घरी येऊन सत्यनारायणाची पूजा सांगू लागले. पूजेला मी कमरेला सुपारी (पत्नी समजून) लावून बसत होतो. असेच दोन वर्षे चालू होते. माझे पूजापाठ झाले व त्यातील फोलपणा, खोटेपणा लक्षात येऊ लागला. पूजेचा मंत्र मी काका सांगण्यापूर्वीच म्हणू लागलो. पूजेनंतर काकांना कोरडा शिधा म्हणून गूळ, गव्हाचे पीठ, हरभरा डाळ व पाच रुपये दक्षिणा देत होतो. आमची भरभराट झाली नाही: पण काकाचा फायदा झाला. पूजेतला फोलपणा लक्षात आल्याने सत्यनारायण पूजा मी बंद केली.

माझ्या बहिणीला सोळाव्या वर्षी फिट आली. तिच्या नाकाला कांदा लावला. ती शुद्धीवर आली. पण ती घुमू लागली. आमच्या तारळे गावात तेव्हा स्त्री (बाई) देवर्षी होती. तिच्याही अंगात येत होते. माझ्या बहिणीला वडिलांनी व आईने त्या स्त्री देवर्षीकडे नेले. ‘संतोषी माँ’च्या फोटोकडे सारखे पाहून बहिणीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले व ती मोठ्याने घुमू लागली. ‘तिच्या अंगात संतोषी माँ आली आहे. तुमच्या घराचे कल्याण होणार आहे. देवी तुमच्या मुलीच्या अंगात येते आहे. शुक्रवारी तुम्ही आंबट दही, चिंच खाऊ नका. देवीला गूळ व चण्याचा नैवेद्य दाखवून सर्वांना वाटा.’ पुढे त्या स्त्री देवर्षीने देवीला शांतता येण्यासाठी ‘साडी चोळी’ दान करण्यासाठी सांगितले. त्या देवर्षीने आम्हाला फसवले. घराची कसलीच प्रगती, भरभराट झाली नाही. उलट साडी-चोळी वाया गेली. बहिणीच्या अंगात येते याचे शास्त्रीय कारण म्हणजे तिला तारुण्यात येत असलेला मानसिक आजार ‘हिस्टेरिया’ झाला होता आणि आम्ही सर्व देवी अंगात आली, असा अर्थ लावून होतो. पुढे तिचे लग्न झाल्यावर अंगात येणे बंद झाले.

मी वयाच्या चोविसाव्या वर्षी एका विनाअनुदान शाळेवर मुख्याध्यापक म्हणून काम करत होतो. शालेय कार्यक्रमासाठी एका प्राध्यापकांचे ‘अंधश्रद्धा’ विषयावर व्याख्यान ठेवले होते. त्यांनी भुताच्या गोष्टी सांगून मुलांची करमणूक केली. त्याच दिवसापासून आठ दिवसांत माझ्या लहानपणाच्या आयुष्यातील अनुभव, समाजातील अंधश्रद्धा, उपवास, अंगात येणे, भूतबाधा, भानामती, करणी, नवस, ज्योतिष या माझ्या जीवनात घडले, त्या सत्यघटनेवर कुंभारबाव, जि. सातारा येथे व्याख्यान दिले. त्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कामाचा उल्लेख केला. व्याख्यान सर्वांना आवडले. दुसर्‍या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सातारा येथील दवाखान्यात जाऊन भेटलो. तेव्हा ‘तुम्ही चांगले काम करत आहात. काम असेच पुढे चालू ठेवा. तुम्ही मोठे व्हाल’, अशी डॉक्टरांनी सदिच्छा दिली.

सन 1994 मध्ये सातारा येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर झाले. त्या शिबिराला मी उपस्थित होतो. तेथून प्रेरणा घेऊन अंनिसचा कार्यकर्ता झालो. पुढे डॉक्टरांनी मला सातारा जिल्हा अंनिस संघटनेचा सचिव केले. या मानाच्या कामाच्या पदाने प्रेरणा घेऊन अंनिस वार्तापत्राचे शंभर वर्गणीदार करून ‘शतकवीर’ झालो. पुणे येथील ‘साधना सभागृहा’त सुप्रसिद्ध सिनेनट डॉ. श्रीराम लागू, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते ‘शतकवीर’ म्हणून माझा सत्कार करण्यात आला. पुढील वर्षीही पुन्हा ‘शतकवीर’ म्हणून गौरविण्यात आले.

आतापर्यंत वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये 40 लेख लोकमत, सकाळमध्ये सामाजिक विषयावर लिहिले. अनेक शाळांमध्ये भाषणे दिली. बुवाबाबांचे हातचलाखीचे चमत्कार करणे व विस्तवावरून चालून दाखवण्याचे काम केले.

अंनिसच्या राज्य कार्यकारिणीच्या चार बैठकांना उपस्थित राहिल्याने माझे विचार प्रगल्भ व समृद्ध झाले. तसेच राज्यपातळीच्या कार्यकर्त्यांच्या ओळखी झाल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. सत्यनारायणाच्या पूजेपासून अंनिस कार्यकर्त्यापर्यंतचा माझा हा प्रवास असा झाला.

विलास भांदिर्गे, संपर्क : 7057041282