Categories
जात पंचायत

घटना जातपंचायतीच्या : अमानुष अत्याचाराच्या

सप्टेंबर - २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे जातपंचायतीच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी काही उदाहरणे खाली दिली आहेत. त्या वाचून जातपंचायतीची दहशत समजून येते.

एका समाजात जातपंचायतीकडून नववधूची कौमार्याची परीक्षा घेण्यात येते.

लग्नानंतर पंचांनी दिलेल्या पांढर्‍या वस्त्रावर नवर्‍या मुला-मुलीने झोपल्यावर रक्ताचा डाग असेल तरच लग्न ग्राह्य धरण्यात येण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.रक्ताचा लाल डाग नसेल, तर मुलीच्या परिवारास दंड केला जातो. मुलींनी कौमार्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी लग्नाअगोदर तिचा इतर समाजातील सहभाग टाळला जातो. शिक्षणावर बंदी आणली जाते.

एका विवाहित महिलेचे चारित्र्य शुध्द असल्याचे सिद्ध करण्यासाठी तिला हात न भाजता उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढण्यास पंचांनी सांगितल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. महिला आयोग व औरंगाबादच्या जिल्हाधिकार्‍याच्यांसमोर पीडित महिलेने आपबिती सांगितली. अकलूज येथे तर पोलीस ठाण्याच्या आवारात असाच प्रकार घडला.

न्यायालयाने निर्दोष सोडलेल्या अहमदनगर येथील एका गुन्ह्यातील संशयितांना पंचांनी न्यायनिवाड्यासाठी तोंडात तांदूळ चघळण्यास दिले. थुंकल्यानंतर ते अधिक ओलसर निघाल्याने त्यातील एका महिलेस गुन्हेगार ठरविण्याचा प्रकार महा.अंनिसने उघडकीस आणला. मुलांच्या लग्नासाठी पुन्हा जातीत येण्यासाठी पंधरा लाख रुपयांची मागणी पंचांनी केली होती.

जातीचे निर्णय जातीतच होतील. त्याचा अधिकार इतर कुणालाही (पोलीस व न्यायाधीश यांनाही) नाही, असा अनेक पंचांनी नियम बनवला आहे. पुणे जिल्ह्यातील एका जातपंचायतीच्या निर्णयाविरोधात इतर जातीतील लोकांनी हस्तक्षेप करण्यास लावल्याने पंचांनी एका कुटुंबास जबरदस्त जीवघेणी मारहाण केली. त्या परिवारातील महिलेच्या योनीमार्गात मिरचीची पूड कोंबली. मअंनिसच्या प्रयत्नाने गुन्हा दाखल झाला.

सातारा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर पित्याने अत्याचार केले. जातपंचायतीने तिला दोराने बांधून सर्वांसमोर काठीने फटके मारण्याची शिक्षा केली. प्रसारमाध्यमांनी सदरची चित्रफीत दाखविल्याने पंचांची अमानुषता समोर आली.

नंदुरबार येथे एका महिलेच्या चारित्र्यशुद्धीसाठी तिच्या बारा वर्षाच्या मुलाच्या हातावर दोर्‍याने रुईच्या झाडाची पाने बांधून त्यावर लालबुंद केलेली कुर्‍हाड ठेवण्यात येणार होती. सात पावले चालून ती फेकल्यावर दोरा जळाला नाही अथवा हात भाजला नाही तर आईचे चारित्र्य शुद्ध असे समजले जाणार होते; अन्यथा आईला पंचांसमोर नग्न अंघोळ घालण्याची शिक्षा करण्यात येत होती. मअंनिसच्या हस्तक्षेपामुळे ते थांबले गेले.

अहमदनगर जिल्ह्यात दोन वर्षांच्या मुलीचे लग्न पंचांनी जबरदस्तीने चाळीस वर्षांच्या खुन्याशी लावले होते. पुढे ती मुलगी सतरा वर्षांची झाल्यावर तिने लग्नाला नकार दिल्याने घटस्फोट मिळण्यासाठी पंचांनी तिला एक रात्रभर त्या म्हातार्‍यासोबत झोपण्याची अट घातली होती. महा.अंनिसने मोठ्या संघर्षाने तो प्रकार थांबवला.

सांगलीत पीडित महिलेस जातीत घेण्यासाठी पंचांनी शरीरसुखाची मागणी केली होती. पंचाचे व्याजाचे पैसे फेडण्यासाठी बायकोची मागणी करण्याचा असाच प्रकार मराठवाड्यात उघड झाला.

खाजणी (रायगड) येथे गावकीच्या जाचाला कंटाळून मोहिनी तळेकर या महिलेने आत्महत्या केली.वाशीम जिल्ह्यात चार व्यक्तींनी जातपंचायतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्या.

आंतरजातीय विवाह केल्याने पंचांनी बहिष्कृत केल्याच्या शेकडो तक्रारी दाखल झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात आंतरजातीय विवाह केल्याने जिवंत मुलीचा दशक्रियाविधी घालण्याचा प्रकार मअंनिसने थांबवला.

पतीच्या निधनानंतर बायकोला अशुभ समजून अंधार्‍या खोलीत डांबून ठेवण्याच्या कुप्रथेला विरोध करणार्‍या महिलेला पुण्याच्या पंचांनी बहिष्कृत केले. पतीच्या प्रेतासोबत पत्नीला उघड्यावर अंघोळ घालण्याच्या प्रथेलाही या महिलेने विरोध केला होता. पंचांविरोधात पुणे येथे तक्रार दाखल करण्यात आली.

आईच्या पोटात असताना लग्न लागले; परंतु तरुणी आयटी क्षेत्रात व तरुण सातवीपर्यंत शिकला असताना लग्नास नकार देणार्‍या मुलीला पंचांनी दंड करत जातबहिष्कृत करण्याचा प्रयत्न करण्याची घटना मुंबईतील जोगेश्वरी येथे घडली आहे. महा.अंनिसच्या साथीने या तरुणीने जातपंचायत बरखास्त करून तिचे रूपांतर सामाजिक सुधारणा मंडळात केले.

कोकणात तर क्षुल्लक कारणावरून वाळीत टाकण्याचे प्रकार समोर आले. सार्वजनिक कार्यक्रमाचे तांदूळ निवडण्यास आले नसल्याने, प्रसाद एकट्याने खाल्ल्याने, बहिष्कृतांच्या प्रेतासाठी बांबू दिल्याने, एकाच आडनावात लग्न केल्याने, जातीवर आधारित व्यवसाय नाकारल्याने, निवडणुकीत विशिष्ट पक्षाला मतदान केल्याने अशा विविध कारणांमुळे वाळीत टाकले जाते.

तक्रार दाखल केल्याच्या रागातून एकाला अंगावर गाडी घालून जीवे मारल्याची घटना रायगड जिल्ह्यात घडली.तक्रार दाखल केल्याच्या रागातून जळगाव जिल्ह्यात पंचांनी गर्भवती महिलेस अमानुष मारहाण केली.अनेक ठिकाणी तक्रारदारांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. विलास बढे या पत्रकारास जातपंचायतीने मारहाण केली.जातपंचायत बंद करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या तरुणास त्याच्याच पंचांनी चाकूने हल्ला केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली.

सांगली जिल्ह्यात पंचांच्या सांगण्यावरून एका महिलेला बांधून मारण्याची चित्रफीत प्रसारित झाली. प्रसारमाध्यमांनी ती दाखवल्याने मंत्रालयही हादरले.

पुणे काँग्रेसच्या पदाधिकार्‍यासह अनेक परिवारांनी आंतरजातीय विवाह केल्याने श्रीगौड ब्राह्मण जातपंचायतीने बहिष्कृत झाल्याची तक्रार केली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्थेत प्रवेश घेतल्याने बौद्ध जातपंचायतीने अनेकांना रायगड जिल्ह्यात वाळीत टाकले आहे. मुस्लिम समाजातून बहिष्कृत केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

कृष्णा चांदगुडे