महात्मा गांधी यांनी समुद्र ओलांडून परदेशगमन केले, तेव्हा त्यांची मोढ वाणिया जातपंचायत बसली. सर्वांनी एकमुखाने निर्णय घेतला. महात्मा गांधींना जातीतून बहिष्कृत करण्यात आले. त्यांना मदत करणार्यास सव्वा रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला होता. त्यामुळे परदेशात जाताना व परत आल्यानंतरही त्यांना भेटण्यास कुणीही समाजबांधव पुढे आला नाही. त्यावेळी गांधीजींची प्राथमिकता देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे, ही असल्याने त्यांनी या विरोधात आवाज उठवला नाही. काही दिवसांनी गांधीजींना जेव्हा पुन्हा जातीत जाण्याची गरज निर्माण झाली, तेव्हा त्यांनी तशी जातपंचायतीकडे विनंती केली. जातपंचायतीने त्यांना पश्चात्तापाचे एक कृत्य करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी नाशिक येथील गोदावरी नदीत डुबकी मारली. समाजबांधवांना जेवण दिल्यावर त्यांना परत जातीत घेतल्याचे ‘सत्याचे प्रयोग’मध्ये त्यांनी लिहिले आहे.
लोकमान्य टिळक यांच्याबाबत पुण्याच्या पंचहौद, चौक येथील ‘चहा ग्रामण्यां’चा किस्सा प्रसिद्ध आहे. ‘ग्रामण्य’ म्हणजे बहिष्कृत करणे अथवा वाळीत टाकणे. युरोपियन मिशनरी पुण्यात शिक्षणप्रसाराचं काम करत होते. गोपाळराव जोशी नामक गृहस्थाने पंचहौद मिशनच्या शाळेतील मिशनरी शिक्षकांकरवी पुण्यातील काही लब्धप्रतिष्ठित मंडळींना शाळेत एका व्याख्यानाला आमंत्रित केले होते. त्याला रावबहाद्दूर रानडे, लोकमान्य टिळक अशा नामी असामी हजर राहिल्या. व्याख्यानानंतर सर्वांना चहा देण्यात आला. या मंडळींनी मिशनर्यांच्या हातचा चहा प्यायल्याची बातमी जोशींनी ’पुणे वैभव’ नावाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. त्यावरून पुण्याचे कर्मठ वातावरण ढवळून निघाले. मिशनर्यांच्या हातचा चहा पिऊन धर्मभ्रष्ट झाल्यामुळे या मंडळींना बहिष्कृत करावे, अशी सनातन्यांची मागणी होती. चहा पिलेल्या मंडळींची कागाळी थेट शंकराचार्यांपर्यंत नेण्यात आली. क्षुल्लक चहाच्या पेल्यातून खरोखर मोठेच वादळ निर्माण झाले. शंकराचार्यांनी जानेवारी 1892 मध्ये या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ग्रामण्य कमिशन नेमले. मिशनरींच्या हातचा चहा प्यायल्याबद्दल दोषी ठरवत या अपराधाबद्दल प्रत्येकाने वैयक्तिक प्रायश्चित्त घ्यावे, असा निर्णय कमिशनने दिला. सनातन्यांनी उठवलेले काहूर त्यावेळी टिपेला पोचले होते. तेव्हा टी पार्टीला उपस्थित असलेले टिळक सोडून इतर सुधारकांनी प्रायश्चित्त घेण्याचे कबूल केले. रानडे यांनी माफी मागून जातीत पुन्हा प्रवेश मिळवला. टिळक बरेच दिवस जातबहिष्कृत होते. पुढे काही दिवसांनी उत्तरेकडे गेल्यावर काशी येथे विधी केल्याचा दाखला दाखवल्यावर टिळकांना पुन्हा जातीत प्रवेश मिळाला.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई यांचा बाळंतपणात मृत्यू झाला. महर्षी कर्वे विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी विधवा विवाह संस्थेची स्थापना केली होती. गोदुबाई या विधवेशी त्यांनी पुनर्विवाह केला. त्यामुळे त्यांच्या मुरूड गावच्या लोकांनी त्यांच्या परिवारावर बहिष्कार टाकला. संत ज्ञानेश्वर व भावंडांना संन्याशाची मुले म्हणून वाळीत टाकण्यात आले होते. पंडित मदन मोहन मालवीय यांना नुकताच मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. त्यांना जातबहिष्कृत करण्यात आले होते. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांचे मागील वर्षी निधन झाले. आयुष्यभर जात – धर्म, अंधश्रद्धेच्या विरोधात लिखाण करणार्या या लेखकाला ख्रिश्चन स्त्रीसोबत लग्न केल्याने जात बहिष्कृत केले होते. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनाही बहिष्कृत करण्यात आले होते. महात्मा फुले यांच्या सुनेचा अंत्यविधी करण्यासाठी कुणीही जातबांधव पुढे आला नव्हता. बौध्दमताला सनातन धर्माशी जोडून घेतल्यामुळे तत्कालीन नंबुद्री ब्राह्मणांनी आद्य शंकराचार्यांना बहिष्कृत केले होते. त्यांच्या आईचे शव उचलण्यास कुणीही न आल्याने त्यांनी शवाचे तीन तुकडे करून वाहून नेले होते. अशा प्रकारे समाजसुधारकांनाही वाळीत टाकण्याला इतिहास आहे.
-कृष्णा चांदगुडे