महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आटपाट निर्मितीतर्फे लघुपट स्पर्धेचे आयोजन
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नागराज मंजुळे यांच्या आटपाट निर्मिती संस्थेतर्फे “विवेक राष्ट्रीय लघुपट स्पर्धा” घेण्यात येणार आहे. या वर्षी ‘जातिप्रथा आणि त्यांच्या विविध समस्या’ हा विषय लघुपट स्पर्धेच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंनिसने आपला लढा कृतिशील मार्गाने पुढे नेत सन 2016 मध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ हा विषय घेऊन लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यावर्षी जातिप्रथा व प्रथेशी निगडित अनेक समस्यांबाबत सांस्कृतिक क्षेत्रात अधिक गंभीर चिंतन होऊन नवीन आशयासह लघुपट निर्माण व्हावेत व जाती निर्मूलनाची सांस्कृतिक चळवळ जोमाने पुढे जावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
ही लघुपट स्पर्धा खुला, विद्यार्थी व अंनिस कार्यकर्ता अशा तीन गटांकरिता आयोजित करण्यात येणार असून विजेत्या लघुपटांना 25 हजार, 15 हजार व 5 हजार रुपये अशी पारितोषिके व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. माहितीपट व अॅनिमेशनपटकरिता वेगळी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
फिल्मच्या प्रकारानिहाय पारितोषिकांसाठींची निवड ही चित्रपट व सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर परीक्षक समितीकडून केले जाईल. त्यातील निवडक लघुपटांचे सादरीकरण दि. 31 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे केले जाईल. तसेच स्पर्धेचे पारितोषिक वितरण हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनी दि. 1 नोव्हेंबर रोजी नागपूर येथे केले जाईल.
भारतीय समाजाचे ‘जातव्यवस्था’ हे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यामुळे ‘जात’ या प्रश्नाचे अनेकविध पैलू आणि त्याची गुंतागुंत समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे राज्याच्या महसूल विभागनिहाय एकदिवसीय चर्चासत्रांचे आयोजन ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र अंनिसची जातविषयक भूमिका, ‘जात’ प्रश्नाच्या वास्तविकतेचे आकलन, फिल्म या माध्यमाबद्दल आणि जातपंचायतीच्या अत्याचाराचे बाधितांचे अनुभवकथन यांचा समावेश असणार आहे. त्यामध्ये विविध प्रकारच्या फिल्म बनविणार्यांपासून माध्यम व समाजकार्याचे विद्यार्थी, सर्व प्रकारचे माध्यम प्रतिनिधी, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, जाती संघटनांचे पदाधिकारी आणि जातपंचायतीमुळे बाधितांना सहभागाचे आवाहन करण्यात येणार आहे.
निवडलेले लघुपट पुढील वर्षभर महाराष्ट्रातील विविध शहरांत प्रदर्शित करण्यात येणार असून विविध शाळा-महाविद्यालयांतून कलाकार व दिग्दर्शकांना घेऊन त्यावर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. चित्रपटात तंत्रज्ञान अधिक विकसित होत असले, तरी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे चित्रपट निर्माण होत नाहीत. त्यामुळे चित्रपट क्षेत्रात विवेकी विचार रुजवावेत, या व्यापक हेतूने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व आटपाट निर्मितीने या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.