महाराष्ट्र अंनिसच्या कामात पुरुषांबरोबर महिलाही सहभागी असतात. हा सहभाग देताना महिला कार्यकर्त्यांना येणार्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रबोधनाचे निरनिराळे मार्ग दाखवून त्यांचा सहभाग व काम वाढविण्यासाठी राज्य महिला सहभाग विभागातर्फे राज्यव्यापी महिला कार्यकर्ता शिबीर आयोजित करण्यात आले होते. सोलापूर येथील हिराचंद नेमचंद मंगल कार्यालयात दि. 28 व 29 जुलै रोजी हे शिबीर पार पडले. या शिबिराचे उद्घाटन मअंनिसच्या उपाध्यक्षा श्रीमती तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. स्त्रियांभोवती अनेक अंधश्रद्धांचा विळखा कुलूपबंद असतो, हे कुलूप वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या किल्लीने उघडून तिला मुक्त करण्याच्या या अनोख्या पद्धतीने या शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी श्रीमती भवाळकरांनी आपल्या मनोगतात परंपरेने आलेल्या कर्मकांडांचा अर्थ आजच्या काळात कसा लावायचा, हे उदाहरणांनी स्पष्ट केले. आजच्या काळात सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीत अर्थकारणाचे महत्त्व सांगितले व त्याचा विचार कसा करायचा, हे स्पष्ट केले. त्यांच्या अनुभवातून त्यांनी स्त्रियांना क्रियाशील होण्याचे अनेक मार्ग सांगितले.
दिनांक 28 जुलैच्या दुसर्या सत्रात राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी ‘पीपीटी’च्या माध्यमातून ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा विषय मांडला. त्यानंतर बुवाबाजी संघर्ष व जातपंचायत विभाग कार्यवाह अॅड. रंजना गवांदे यांनी ‘अंनिसची वैचारिक भूमिका’ आपल्या व्याख्यानातून स्पष्ट केली. ‘स्त्रिया व अंधश्रद्धा : कारणे, स्वरूप व उपाय’ या विषयावर गटचर्चा घेण्यात आली. याचे नियोजन सुरेखा भापकर यांनी केले. उपस्थित महिलांनी सांगोपांग विचार करून आपली मते मांडली. रात्री ‘तोलक’ ही जातपंचायतीची भयानकता उघड करणारी फिल्म दाखवण्यात आली.
दि. 29 जुलै रोजी सकाळी उपस्थित सर्व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात वजन, उंची, बी.पी., हिमोग्लोबीन तपासण्यात आले. राज्य महिला सहभाग विभाग सचिव उषा शहा यांनी ‘मन, मनाचे आजार, अंगात येणे व भुताने झपाटणे’ याविषयी व्याख्यान दिले. जोडीदाराची विवेकी निवड विभाग कार्यवाह आरती नाईक यांनी पीपीटीच्या आधारे ‘लिंगभाव समानता’ हा विषय मांडला. नंतर समारोपाचा कार्यक्रम राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी शिबिरार्थींनी शिबिराचे आयोजन व लाभाविषयी आपली मनोगते व्यक्त केली. नंतर हिराचंद नेमचंद मंगल कार्यालयाचे मानद सचिव दीपक आहेरकर यांनी कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले म्हणून आणि सौ. मालिनी गणपुले यांनी भोजन व इतर खर्चासाठी आर्थिक सहकार्य केले म्हणून या दोघांचा अविनाश पाटील यांच्या हस्ते सन्मान करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तद्नंतर अविनाश पाटील यांनी 9 ऑगस्ट 2019 ला अंनिसला 30 वर्षे पूर्ण होत असल्याने वर्षभर घेण्यात येणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. माधव बावगे यांनी महिलांचा सहभाग वाढवण्याविषयी मार्गदर्शन केले. ‘हम होंगे कामयाब’ या गीताने शिबिराची सांगता करण्यात आली.
– उषा शहा, सोलापूर