भूतबाधा व इतर तत्सम आजारांवर अघोरी प्रकार करणार्या; तसेच भीती दाखवून अंधश्रध्द व्यक्तींचे शारीरिक व आर्थिक शोषण करणार्या तांत्रिक बाबाचा भांडाफोड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी केला.
औरंगाबाद येथील हरसूल गावात गनी कादर पठाण नावाचा एक साठ वर्षे वयाचा तांत्रिक बाबा लोकांना झालेली भूतबाधा बाहेर काढणे, दुर्धर आजार बरे करणे, गुप्तधन शोधणे असे अघोरी प्रकार करत असे. भूतबाधा काढण्यासाठी तो विज्ञानाचा सहारा घेऊन लिंबाचा रस व सोडियम मेटल यांची रासायनिक अभिक्रिया करून आग लावत असे. ही आग तांत्रिक विद्येमुळे लागली गेली, असं अंधश्रद्ध लोकांना भासवत असे. ही क्रिया करताना बर्याचदा शारीरिक शोषण देखील केले जाई. भूतबाधा व तत्सम अघोरी उपचार करण्यासाठी हजारो रुपयांची मागणी केली जात असे. भीतीपोटी अंधश्रद्ध व्यक्ती, बाबा जसे सांगेल तसे करण्यास तयार होत असे.
या तांत्रिक बाबाची माहिती जेव्हा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या औरंगाबाद शाखेच्या कार्यकर्त्यांना कळाली तेव्हा त्या बाबाचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली अतुल बडवे, प्रशांत कांबळे, सुनील उबाळे व सुनील चौतमोल या टीमने बाबांच्या दर्ग्यावर जाऊन ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. तेव्हा तो लोकांना कसे फसवतो, या बाबी निदर्शनात आल्यात. अंधश्रद्ध लोकांची दिशाभूल करून भीती दाखवून त्यांना फसविणे व तो चमत्कार आहे, असे भासवणे हा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकतो. म्हणूनच त्या तांत्रिक बाबाबाबतची तक्रार हरसूल पोलीस ठाण्याचे सहा पोलीस उपनिरीक्षक यांना देण्यात आली आहे. त्या मांत्रिकाला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बारगळ यांनी सांगितले.
-शहाजी भोसले