Categories
अभिवादन

अ‍ॅड. एन. डी. सूर्यवंशी

फेब्रुवारी २०१९

वंचितांचा वकील आणि जनचळवळींचा भक्कम आधार हरपला

महाराष्ट्रातील ख्यातनाम विधिज्ञ, सर्व पुरोगामी परिवर्तनवादी चळवळींतील कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ, मार्गदर्शक अ‍ॅड. एन. डी. अर्थात निर्मलकुमार सूर्यवंशी यांचे दि. 19 जानेवारी 2019 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने विधायक व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईतील वंचित घटकांचा वैधानिक आधारच गेला. त्यामुळे समाजातील ‘नाही रे’ वर्गाची अपरिमित हानी झाली आहे.

माझी आणि त्यांची पहिली भेट झाली, ती मी विद्यार्थी असताना. तेव्हा नर्मदेचं आंदोलन ऐन भरात येत होतं. मेधाताईंच्या या लोकलढ्याचं तरुणांना प्रचंड आकर्षण होतं. आमच्या शेजारी अनेक वर्षे वास्तव्यास असलेले आणि नंतर धुळ्यात स्थायिक झालेले एक कौटुंबिक मित्र एन. डी. सूर्यवंशी सरांना माझ्या वडिलांच्या भेटीस घेऊन आलो. सरदार सरोवर प्रकल्पातील पहिले आदिवासी गाव मनिबेली (ता. धडगाव, जि. तत्कालीन धुळे) हे डूबमध्ये येणार होते. त्या ठिकाणी एक पुरातन शिवमंदिर होते आणि सर्व धार्मिक स्थळांची स्थिती 1947 पूर्वीची ‘जैसे थे’ ठेवण्याबाबतचा कायदा होता. त्या आधारे पुरातन ग्रंथांत, शिवपुराण वा तत्सम पुराणात या शिवमंदिराच्या उल्लेखाचा संदर्भ तपासून खात्री करण्यासाठी ते आले होते. (माझे बाबा संस्कृतचे जाणकार व अभ्यासक आहेत.) तेवढ्या छोट्या मुद्द्यावर देखील त्यांनी धरणाचे बांधकाम काही काळ थांबविले होते.

एखाद्या युक्तिवादासाठी भक्कम पुरावे आणि आधार शोधण्याची त्यांची तळमळ आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, ही त्यांची वृत्तीच होती.

‘नर्मदा बचाओ’ आंदोलनास जो जागतिक आयाम आणि व्यापक मान्यता मिळाली, त्यात मेधाताईंसारख्या नि:स्पृह आणि कणखर नेतृत्वाने रस्त्यावर (नव्हे, पाण्यात) लढलेली लढाई जशी कारणीभूत आहे, तशी तालुका स्तरावरच्या न्यायालयापासून जिल्हा, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आणि जागतिक बँकेपासून आंतरराष्ट्रीय जल आयोगापर्यंतची कायदेशीर लढाई जवळजवळ एकहाती लढणार्‍या अ‍ॅड. एन. डी. सूर्यवंशींचा देखील तेवढाच मोलाचा वाटा आहे. नर्मदेचे आंदोलन ऐन भरात असताना तीन वर्षे आपली प्रॅक्टीस पूर्णपणे थांबवून सर फक्त आंदोलनाचेच काम करीत होते. सरदार सरोवर प्रकल्पाला जागतिक बँकेने मदत थांबविली आणि प्रकल्पबाधितांच्या सन्मान्य पुनर्वसनाबद्दलचा जो जागतिक मापदंड नर्मदा आंदोलनाने घालून दिला- जमिनीच्या मोबदल्यात पैसे नव्हे जमीनच. (म्हणजे जगण्याचे साधन) हे शक्य झाले, त्यात सरांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. न्यायालयाच्या लढाईसोबत सभा, जनसुनवाई, घाटीतून आलेल्या आदिवासींच्या निवास-भोजनाची व्यवस्था येथपासून ते त्यांना प्रवासखर्चासाठी पदरचे पैसे देण्यापर्यंतचे काम एन. डी. सरांनी केले. यासाठी शोषित वर्गासाठीची प्रचंड कणव, माणुसकी, यासोबतच व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवाधिकाराची प्रचंड चाड असावी लागते, ती सरांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेली होती; मात्र याची दखल पाहिजे त्या पातळीवर आणि त्याप्रमाणात घेतली गेली नाही, याबद्दल काहीशी खंत त्यांच्या मनात सतत राहिली.

एन. डी. सूर्यवंशी हे सतत व्यवस्थेद्वारे येणार्‍या किंवा शासनव्यवस्था पुरस्कृत शोषणाविरुद्धच लढले. त्या अर्थाने ते अत्यंत बंडखोर; किंबहुना विद्रोही होते. सर्व प्रकारच्या शोषकांच्या शोषणाविरुद्ध वंचितांचे कैवारी म्हणून त्यांनी बहुतेक वेळा विनामूल्यच वकिली गेली; तीदेखील प्रचंड जिद्दीने आणि यशस्वीच. त्यांच्या ट्रॅक रेकॉर्डवर ‘फेल्युअर’ अभावानेच आढळेल. मात्र हे करीत असताना यशस्वी होण्यासाठी मनधरणी करणे, मर्जी सांभाळणे, आदब ठेवणे, पुढे-पुढे करणे, हाजी-हाजी करणे यासारख्या कोणत्याही क्लृप्त्यांची मदत त्यांना कधीच घ्यावी लागली नाही; याउलट शोषितांना न्याय मिळण्याप्रती त्यांची तळमळ आणि बांधिलकी इतकी प्रबळ होती की, अनेकदा न्यायव्यवस्थेशी आणि न्यायालयाशी प्रसंगी तथाकथित मर्यादा ओलांडूनही भांडण केले. कायद्याचा गाढा अभ्यास, संविधानातील मूलभूत मूल्यांबाबत प्रचंड आदर व निष्ठा आणि त्याच्या प्रस्थापनेसाठीचा आग्रह यातून त्यांची वाणी आणि लेखणी बुलंद होत असे, ती धारदार आणि तळपती वाणी ऐकण्यासाठी त्यांचा युक्तिवाद ऐकण्यासाठी न्यायालयात गर्दी झाली नाही तरच नवल!

सर्वच समाजातील महिला ही तशी शोषित व वंचितच असते; कदाचित प्रमाण कमी-अधिक असेल, अशी सरांची रास्त धारणा होती. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळपास 40-50 वर्षांच्या प्रॅक्टीसमध्ये एकही केस महिलेविरुद्ध घेतली नाही. हा त्यांच्यातील खर्‍या माणूसपणाचा आणखी एक पैलू सांगता येईल. हे ऐकायला, वाचायला सोपे असले, तरी आयुष्यभर तत्त्व म्हणून आचरण करायला त्याबद्दलची पराकोटीची आत्मियतेची भावना किती प्रबळ असेल, हेच यातून दिसून येते.

भारतातील वनजमिनींवरील आदिवासींच्या हक्काबद्दलचा जो कायदा अलिकडे झाला, त्याचे श्रेय देखील एन. डी. सूर्यवंशी सरांना दिल्यास वावगे ठरू नये. कारण याबद्दलचा भारतातील पहिला दावा सुमारे 40 वर्षांपूर्वी त्यांनी धुळ्यातील कॉम्रेड शरद पाटलांसाठी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत यशस्वीपणे लढला होता. त्यात इंदिरा जयसिंग या त्यांच्या सहकारी होत्या, ज्या भारत सरकारच्या अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल राहिल्या आहेत. 2012 साली आपले राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटलांच्या पुढाकाराने सरांचा धुळ्यात नागरी सत्कार समारंभ व त्यानिमित्ताने काही परिसंवाद दोन दिवस झाले होते. त्यानिमित्त काढलेल्या कार्यगौरविकेत इंदिरा जयसिंग लिहितात, “एखाद्या जन्मभराच्या मित्राला तो जन्मभराचा मित्र आहे, याशिवाय काय म्हणणार? आणि अशी मैत्री घडण्यासाठी समान हितसंबंध, समान सामाजिक बांधिलकी आणि समान नैतिक मूल्ये आवश्यक असतात. ”

‘इलेस्ट्रेटेड विकली’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामुळे व तो निर्मलच्या (एन. डी. सर) वाचनात आल्यापासून आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. विकली बंद पडला; पण आमची मैत्री सुरूच आहे. त्या लेखाचे शीर्षक होते ‘न्याय कोठे आहे?’ आणि त्यात झोपडपट्टीत राहणारे, विस्थापित केले गेलेले आणि इतर निराधार लोकांचे अधिकार व हक्क किंवा अधिकाराचा अभाव याबद्दल विश्लेषण केलेले होते. 25 वर्षे लोटल्यावरसुद्धा आम्ही अजूनही अशा न्यायाच्या शोधात आहोत. आश्चर्याची गोष्ट अशी की, अजूनही आमचा धीर किंवा उत्साह संपलेला नाही. आमचा आनंद अशा शोधातच आहे.”

याच गौरविकेत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिले आहे, “अ‍ॅड. एन. डी. सूर्यवंशी हे जिगरबाज आश्वासक व्यक्तिमत्त्व आहे. आपल्या ध्येयाबद्दलच्या त्यांच्या अंतर्बाह्य उजाळ्यामुळे त्यांना एक झळाळी प्राप्त होते. आपले ज्ञान अद्ययावत असले पाहिजे, हा त्यांचा ध्यास आहेच. त्यांचे वय लक्षात घेता त्यांनी ज्या दर्जाची संगणकप्रवणता मिळवली ती चकित करणारी आहे. अंत:करणापासूनची शोषितांबद्दलची तळमळ, त्यासाठी प्रकृतिस्वास्थ्याचे सारे संकेत झुगारून लढण्याची वृत्ती, त्यासाठी लढावयाच्या कायदेशीर डावपेचातील निष्णातता, तज्ज्ञता यांचे अनोखं रसायन म्हणजे अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी.”

एन. डी. सर अत्यंत संवेदनशील होते. विदर्भ-मराठवाड्यानंतर खानदेशात शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या. त्यातून ते अस्वस्थ होत होते. यावर काहीतरी केले पाहिजे, असे ते नेहमी बोलत. त्यावेळी सन 2004 ते 2008 या काळात अविनाशभाई, एन. डी. सर व धुळ्यातील शेतकरी संघटनेतील लढवय्ये कार्यकर्ते रवी देवांग यांनी पुढाकार घेऊन खानदेशातील 200 गावांतून प्रबोधन यात्रा करून शेतकर्‍यांशी संवाद साधला होता. तसेच प्रत्येक आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भेट दिली होती. सविस्तर व शास्त्रीय सर्वेक्षण केले होते. त्या अभ्यासावरून एक विस्तृत अहवाल सादर केला होता. अभिमानाची बाब म्हणजे स्वामीनाथन यांनी पत्र देऊन त्याबद्दल शाबासकी दिली होती आणि त्यातील ‘शेतकरी सुरक्षाकवच’ सारख्या अनेक बाबी स्वामीनाथन आयोगाच्या अहवालात समाविष्ट करण्यात आल्या होत्या, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात ‘बर्ड फ्लू’ने थैमान घातले होते. त्याच्या अहवालाने सारेच धास्तावून गेले होते. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते; पण परराज्यातील रिसर्च लॅबच्या त्या अहवालालाच निर्मलकुमार सरांनी न्यायालयात आव्हान दिले आणि त्याचा परिणाम म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना हवाई पाहणी दौरा सुरू करावा लागला. धुळे शहरातील ‘अतिक्रमण हटाव’ मोहिमेच्या प्रत्येक प्रसंगी सर्व झोपडपट्टीधारक, फेरीवाले यांचा कैवार घेऊन एन. डी. सर यशस्वीपणे न्यायालयीन लढाई लढले आणि त्यांना न्याय व सन्माननीय पुनर्वसन मिळवून दिले.

जनसुनवाई या संवैधानिक हत्याराचा कोणी नव्हे इतका प्रभावी वापर अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी केला आहे. ‘नर्मदा बचाओ’ आंदोलन, पवन ऊर्जा प्रकल्प, सेझ, लवासा, धरणग्रस्त यांसारख्या प्रत्येक ठिकाणच्या प्रकल्पबाधितांसाठी जनसुनवाईचा आग्रह धरून त्याठिकाणी तासन्तास; काही प्रसंगी तर दिवसभर शासनव्यवस्था आणि धनदांडग्या भांडवलशाहीविरुद्ध सरांनी युक्तिवाद करून दोन हात केले आहेत आणि शासनव्यवस्थेला नमते घेण्यास भाग पाडले आहे.

अविनाश पाटील यांनी त्यांच्याबद्दल लिहिले होते, “त्यांच्यातील तल्लख बुद्धिमत्ता आणि विविधांगी जीवनानुभवाचा व ज्ञानाचा तौलनिक अभ्यास करण्याची क्षमता मला भावून गेली. आधुनिक जगाच्या गतीशी समरस होऊन जुन्या चांगल्या गोष्टीही सोबत घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. माहिती, ज्ञान, दृष्टिकोन आणि व्यवहार यांची सांगड अ‍ॅड. एन. डी. सर फार प्रतिभेने घालू शकतात. आपल्याच ज्ञान-विज्ञानाच्या विश्वात रमणारा हा माणूस ‘लोकनेता’ होऊ शकला नसला, तरी ‘ज्ञानजेता’ नक्कीच झालेला आहे.

संविधानाला अभिप्रेत मूल्यव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी त्याचा कालसुसंगत आणि सन्माननीय मानवी जीवन जगण्यासाठीचा अर्थ लावण्यात एन. डी. सरांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यामुळेच कदाचित कायद्याच्या पुस्तकात आणि न्यायदानाच्या कक्षेत प्रचलित पद्धतीने मिळविता न येणारे असे अनेक निर्णय त्यांनी गरीब, श्रीमंत, दलित, आदिवासी, महिला, विस्थापित व प्रकल्पबाधित आदी जनसमूहांना यशस्वीपणे मिळवून दिलेत. मानवी अधिकाराची आणि व्यक्तिस्वातंत्र्याची भाषा प्रत्यक्षात जगण्यासाठी जेव्हा-जेव्हा अडथळे निर्माण झाले, तेव्हा तेव्हा सरांनी त्यामध्ये हस्तक्षेप करून मानवाधिकार व व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी कोणतीही प्रचलित विचारसरणी वा व्यक्ती, संस्था, संघटनांबद्दल दुजाभाव ठेवला नाही.”

अ‍ॅड. एन. डी. सूर्यवंशी सरांनी धुळ्यात सुरू केलेले ‘विधी अध्ययन व संशोधन केंद्र’ आणि ‘मानवाधिकार कृती गट’ या दोन्ही कामात अविनाश पाटील यांचा सक्रिय सहभाग होता.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी त्यांचे जवळचे नाते राहिले आहे. येथील धुळे शाखा व धुळे जिल्ह्याचे समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. समितीच्या पुढाकाराने आणि आग्रहामुळे महाराष्ट्रात अस्तित्वात आलेला जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा यांचा मसुदा, त्यातील सुधारणा, त्यासाठीचे नियम बनविणे यासाठी सरांनी मोलाची मदत केली आहे.

‘झिंदाबाद-मुर्दाबाद’मध्ये अडकून पडलेल्या सामाजिक संस्था-संघटनांना त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लीगल ओरिएंटेशनची फार गरज आहे, असे त्यांचे स्पष्ट मत होते.

अनेक गुंतागुंतीच्या, क्लिष्ट अशा प्रकरणात त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संविधानातील मूलभूत तत्त्वांत कोणता आधार मिळतो, त्याचा वापर करणे ही त्यांच्या कामाची खासियत होती.

संविधानाचा आशय, ओळख व महत्त्व समर्पकपणे आणि सोप्या प्रभावी शब्दांत सांगणारी आणि संविधानाबद्दलची गोडी विकसित करणारी, सामान्य नागरिकाला संविधानसाक्षर करणारी ‘संविधानाचे अंतरंग’ ही पुस्तिका अ‍ॅड. एन. डी. सूर्यवंशींनी महाराष्ट्र अंनिससाठी लिहिली. तिच्या हजारो प्रती आपण महाराष्ट्रभर वितरित केल्या आहेत. ‘संविधान बांधिलकी महोत्सवा’त तिचा महत्त्वाचा उपयोग झाला आहे, होतो आहे, होत राहील.

स्वभावाने अत्यंत तापट, शीघ्रकोपी असणारे सर अत्यंत प्रेमळ, संवेदनशील आणि दिलदार होते, तेवढेच रसिकदेखील होते. रात्ररात्र जागून अभ्यास करताना ते संगीत, नाट्य, सिनेमा यांचा आस्वाद घेत, चांगली भाषणे, कार्यक्रमांचा आनंद घेत. गेली काही वर्षेते अनेक आजारांनी त्रस्त होते. अतिप्रचंड काम आणि मानसिक गुंतवणुकीमुळे प्रकृतीकडे अक्षम्य दुर्लक्ष करणे घडत होते. काहीसे निराश आणि नकारात्मक झाले होते. भ्रष्ट न्यायव्यवस्थेबद्दल व्यथा आणि चीड होती. मागील दीड वर्षांपूर्वी उपचारासाठी जवळपास सहा महिने पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकला अ‍ॅडमिट होते. मात्र मागील जवळपास वर्ष-सव्वा वर्ष पुनर्तपासणीसाठी देखील गेले नव्हते. त्यामुळे ते नैराश्यग्रस्त असावेत, असे वाटत होते; पण त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या घरी ताईंशी (त्यांच्या पत्नी) बोलताना तो गैरसमज देखील दूर झाला. ताई म्हणाल्या की, पुण्याच्या रूबीमधील कोणी एक महिला डॉक्टरांच्या रागावण्यामुळे त्यांनी सिगारेट पूर्णपणे बंद केली. जवळपास दोन वर्षे त्यांनी सिगारेटला शिवले नाही; पण अलिकडे त्यांनी सिगारेट ओढणे पुन्हा सुरू केले होते. जेव्हा-जेव्हा त्यांना ‘फॉलोअप’ला जाण्याबद्दल आम्ही आग्रह धरत असू, तेव्हा-तेव्हा ते म्हणत की, मी त्या डॉक्टरांना कोणत्या तोंडाने भेटायला जाऊ? एवढी पराकोटीची संवेदनशीलता!

म्हणजे एका महिला डॉक्टरने आपल्या भल्यासाठी दिलेला सल्ला पाळला गेला नाही, याची बोच आणि अपराधीपणाची भावना त्यांना पुण्याला तपासणीसाठी जाण्यास रोखत होती. एन. डी. सूर्यवंशी सर तुम्ही खरोखरच ग्रेट होतात!

अविनाशभाई त्या दिवशी भावनातिवेगाने म्हणाले, ‘माझ्या आयुष्यात तीन एन.डीं.चा प्रभाव आहे. एक एन.डी. म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर, दुसरे म्हणजे प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर आणि तिसरे म्हणजे अ‍ॅड. एन. डी. सूर्यवंशी सर.

सरांना विनम्र अभिवादन!

प्रा. परेश शहा, शिंदखेडा, जि. धुळे.

संपर्क : 9421465864