धर्म व विज्ञानः समन्वयाची शक्याशक्यता
कित्येक इतिहासकार व समाजशास्त्रज्ञ, विज्ञान आणि धर्म यांच्यामध्ये संघर्ष होता/आहे हे मानण्यास तयार नाहीत. काहींच्या मते धर्मामुळेच विज्ञानाचा विकास होत गेला. यासाठी 18व्या शतकापूर्वीचे बहुतेक वैज्ञानिक ख्रिश्चन धर्माचे होते, हा पुरावा दिला जातो. हिंदू धर्म ग्रंथात आधुनिक विज्ञानाचे कित्येक दाखले सापडतात, असे हिंदू धार्मिकांना वाटते. परंतु ग्रीक व रोमन साम्राज्यातील वैज्ञानिक विकासाला खीळ याच ख्रिश्चन धर्माने घातली व पुढील हजार वर्षेयुरोपला अंधारयुगात ढकलले, हे सोईस्करपणे विसरले जाते. हिंदू धर्म ग्रंथातील वैज्ञानिक शब्द व वर्णन हे काही विज्ञाननिष्ठतेचा पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळे ख्रिश्चन वा हिंदू धर्मात विज्ञान व धर्म यांचा समन्वय झाला होता असे ठामपणे म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे इतर धर्माच्या बाबतीतही म्हणता येईल. अनेक वैज्ञानिक धार्मिक होते हे आपण नाकारू शकत नाही. परंतु या वैज्ञानिकांनी धर्माला आपल्या संशोधनापासून दूरच ठेवलेले होते.
मुळात विज्ञान व धर्म यांची विश्वाबद्दलच्या कल्पना, नैसर्गिक घडामोडीबद्दलचे आकलन, जडण घडण व त्यांची आधारतत्वे सर्वस्वी वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्यात सांधेजोड होणे अशक्य आहे. धर्म श्रद्धेवर आधारित आहे व विज्ञानाचा आधार पुरावा व तर्क आहेत. विज्ञानाची एक स्वतंत्र पद्धत आहे व त्याच शिस्तीत ते विकास होत असते. गृहितक, पुरावे, निरीक्षण, प्रयोग, निष्कर्ष. चर्चा, गृहितकात दुरुस्ती, पुन्हा प्रयोग, असे चक्र असल्यामुळे विज्ञानाने केलेली विधानं तावून सुलाखून बाहेर पडलेली असतात. त्यामुळे एखाद्या घटनेचा अर्थ लावताना विज्ञान व धर्म यांचे निष्कर्ष पूर्णपणे वेगळे असतात. धर्म तर सर्व गोष्टी परमेश्वरावर ढकलून मोकळे होत असते. विज्ञान सर्व गोष्टी माहित आहेत असा दावाही करत नाही. परंतु धर्म मात्र आपल्या अस्तित्वासाठी पारलौकिक, अलौकिक अशा गोष्टींना प्राधान्य देत असते. जगातील प्रत्येक घटना व गोष्टीबद्दल धर्माकडे उत्तर असते. त्यामुळे तेथे विज्ञानाला स्थान देणे आताच्या प्रचलित धर्मांना शक्य होत नाही.त्याचप्रमाणे सत्य, नैतिक मूल्ये, निसर्ग नियम , अणु – रेणूंची रचना, कष्ट व दुःख इत्यादीबद्दल विज्ञान आणि धर्म यांची समज व विश्लेषण यात मूलभूत फरक आहेत.
तरीसुद्धा यासंबंधी अनेक वेळा अनेक प्लॅटफॉर्मवर चर्चा होत असते आणि जन-सामान्यांना हे नेमके काय चालले आहे याची कल्पना येत नाही. या समन्वयाविषयी लिखित व इलेक्ट्रॉनिक माध्यमात भरपूर साहित्य असून अभ्यासकांना मोठ्या प्रमाणात वैचारिक खाद्य उपलब्ध आहे. अं. नि. वार्तापत्राच्या वाचकांसाठी यासंबंधीची ओळख करून देणारे हे सदर आहे. वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करेल अशी आम्हाला खात्री आहे. ‘धर्म आणि विज्ञान’ ही वैचारिक थीम घेऊन वर्षभर अंनिवा अंकात या संबंधी लेख प्रसिद्ध केले जातील.
प्रस्तावना :
धर्म व विज्ञान यांचा विचार करताना जगातील प्रमुख आठ धर्मांपैकी (हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ज्यू, पारशी, ख्रिश्चन व इस्लाम) कुठल्या धर्माचा विचार केला जात आहे, हे आधी ठरवावे लागेल. कारण यापैकी प्रत्येक धर्माचा, आपला धर्मच विज्ञानाच्या जवळचा असून काही उणिवा असल्यास त्या विज्ञानातच आहेत व विज्ञानानेच पुढाकार घेऊन त्या सुधारल्या पाहिजेत, असा आग्रह असतो. परंतु वैज्ञानिकांच्या दृष्टीने मात्र यातील सर्व धर्म कमी-जास्त प्रमाणात अवैज्ञानिक असून ते बुद्धीच्या वा तर्काच्या कसोटीवर कधीच उतरत नाहीत, असा त्यांचा दावा आहे. धार्मिकांना जेव्हा अडचणीचे प्रश्न विचारले जातात तेव्हा पळवाट म्हणून ते धर्माची व्याख्याच बदलून टाकतात व चर्चा कुठेतरी भरकटत नेतात. येथे संघटित संस्थात्मक स्वरुपातील ख्रिश्चन धर्माचे उदाहरण चर्चेसाठी घेतलेले असून इतर धर्मांच्या बाबतीतसुद्धा ही चर्चा तितकीच लागू होणारी आहे.
रॉजर बेकन (1220-1292), कोपर्निकस (1473-1543), गॅलिलियो (1564-1642), केप्लर (1571-1630) इत्यादी वैज्ञानिकांनी व तत्त्वज्ञांनी कितीही कंठशोष केला असला तरी पाश्चात्य राष्ट्रातील अंधारयुगाच्या खुणा 18 व्या शतकापर्यंत शिल्लक होत्या. (त्या तुलनेने आपल्या येथे अजूनही अंधारयुगच आहे असे म्हणावे लागेल!) ख्रिश्चन धर्माचे जोखड झुगारून (निखळ!) वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास त्या समाजाला पुढील 200 वर्षे वाट पाहावी लागली. परंतु हे अंधारयुग त्याकाळातील अनेक बुद्धिवंतांना, विचारवंतांना क्लेषदायक ठरले व काही वेळा प्राणघातकही. कारण एका बाजूला परंपरागत धर्माची शिकवण व ऐहिक सुखांचा तिरस्कार करणार्या पाप-पुण्यांच्या टोकाच्या कल्पना व दुसर्या बाजूला बुद्धिमत्ता, तर्कविचार आणि अंगभूत प्रतिभेच्या जोरावर जगाकडे पाहण्याचा अत्याधुनिक दृष्टिकोन तसेच धर्माने दाबून ठेवलेल्या प्रश्नांना उत्तरं शोधण्याची दुर्दम्य उत्सुकता व अहमहमिका या पेचात अनेक वैज्ञानिक सापडले होते. सामाजिक व्यवहारासाठी धर्माची पाठराखण करण्याला पर्याय नव्हता व कुणीही धर्मरोषाचा धोका पत्करण्यास तयार नसे.
परंतु यातील काहींना धर्म व विज्ञान यांच्यात सांधेजोड शक्य आहे, असे वाटत होते व तसे झाल्यास या जगात सगळीकडे आबादीआबाद होईल व जगातील विषमता, दारिद्य्र यांचा अंत होईल यावर त्यांचा भाबडा विश्वास होता. मुळात अशा प्रकारच्या सांधेजोडीची विज्ञानापेक्षा धर्माला जास्त गरज होती; कारण धर्मांनी आखलेले बुरुज एकामागून एक याप्रमाणे विज्ञानाच्या तडाख्यामुळे ढासळत होते.
धर्म आणि विज्ञान यांची सांधेजोड का शक्य नाही, याचा विचार करण्याअगोदर धर्म या संकल्पनेतील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचार करणे सोयीस्कर ठरेल. ही चर्चा केवळ विज्ञानाशी सीमित नसून धर्मनिरपेक्षता, ऐहिक सुख-सोयीसाठी प्रयत्न, नैतिकता, स्वातंत्र्य, समता, मानवतावाद इत्यादीशीसुद्धा निगडित आहे.
समाजधारणेसाठी मानवजातीला कालानुसार अनुशासन, व्यवस्थापन, न्याय, संरक्षण, महसूल अशा अनेक संस्था विकसित कराव्या लागल्या. धर्म या संस्थेचा विकास या सर्व संस्थांच्या आधी झालेला आहे आणि या सर्व संस्थांवर धर्माची सुरुवातीपासून घट्ट पकड होती. आधुनिकतेचे वारे वाहू लागल्यावर राज्यसंस्था आणि धर्म (स्टेट आणि चर्च) यांची फारकत करायला हवी असा विचारप्रवाह पुढे आला. आजही अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशामध्ये यासाठी लोक चळवळ करीत आहेत. भारतात तर अनेक धर्म व जाती-उपजाती आणि त्यांचे वेगवेगळे पंथ असल्यामुळे राज्यसंस्था संपूर्णपणे धर्मनिरपेक्ष असायला हवी. राज्यसंस्थेप्रमाणे सामाजिक जीवनही धर्मनिरपेक्ष असायला हवे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, हे स्पष्ट होण्यासाठी धर्म, धर्माची मूलतत्त्वे किंवा सर्वसाधारण धर्मसंस्थेची लक्षणे आपल्याला स्पष्ट करायला हवीत. सर्व धर्मांमध्ये काही विशिष्ट लक्षणे कमी-अधिक प्रमाणात दिसून येतात ती अशीः
धर्माची मूलतत्त्वे
* अलौकिक अद्भुत गोष्टी किंवा शक्ती यांच्या अस्तित्वाची खात्री. उदाः एका किंवा अनेक देवांवर विश्वास.
* काही वस्तू, प्राणी, माणसे किंवा शक्ती पवित्र असतात तर काही अपवित्र असा भेद.
* धार्मिक विधी आणि कर्मकांड; तसेच पाप आणि पुण्य अशा संकल्पना.
* एका अगर अनेक देवांनी घालून दिलेले नैतिक आचरणाचे नियम. उदाः पति-पत्नी मधील नाते किंवा माता पिता यांच्याशी असलेले नाते याबाबतचे; तसेच इतर आचरणाबाबतचे नियम.
* विशिष्ट धार्मिक भावनांची जाणीव व सतर्कता (कॉन्शसनेस) अलौकिक शक्तीबाबत अगर देवाबाबत आदर व आश्चर्य, विपरीत कर्माचा पश्चात्ताप, कर्मकाण्ड किंवा धार्मिक विधी करीत असताना अनुभवास येणारी पवित्र अस्तित्वाशी जवळीक. या सर्व भावना व अनुभव यांचं मूळ असलेली देव ही संकल्पना.
* पूजा, प्रार्थना व भक्ती यांच्याद्वारे देवाशी संपर्क.
* विश्व आणि त्यातील माणसाचे स्थान याविषयीची मनात चितारलेली विशिष्ट प्रतिमा व त्या प्रतिमेनुसार मानलेले विश्वाचे प्रयोजन आणि मानवाचे विश्वाशी असलेले सुसंवादी नाते.
* विश्वाच्या या मानसिक प्रतिमेशी सुसंगत असा ठरविलेला दृढ जीवनमार्ग.
* अशा उच्च हेतूंनुसार जोपासलेले माणसांचे गट.
धर्मसंस्थेच्या या लक्षणांवरून हे स्पष्ट होते की माणसाचे आचार आणि विचार या सर्वांवर धर्म घट्ट पकड ठेवू पाहतो. धर्मामध्ये कोणताही पुरावा नसताना अलौकिक शक्तींचे व देवाचे अस्तित्व मान्य केलेले असते. धर्माची उत्तम उदाहरणे म्हणजे असे गट की ज्यांच्या संस्कृतीमध्ये वर दिलेल्या लक्षणांपैकी बहुतांश लक्षणे प्रकर्षाने जोपासलेली असतात. शैव आणि वैष्णव पंथ किंवा वारकरी पंथ हे भारतातील असे उच्च धार्मिक पंथ आहेत. रोमन कॅथॉलिक व यहुदी धर्म हीही अशा धर्मांची उत्तम उदाहरणे आहेत. अशा धार्मिक समाजगटांमध्ये व्यक्तीला संघशक्तीचा प्रत्यय जरूर येतो. परंतु व्यक्तिस्वातंत्र्य मुळीच नसते. धर्माचा व्यक्तीच्या वर्तनावरील पगडा, विशेषतः विचारस्वातंत्र्याची गळचेपी आधुनिक प्रगत मानवाला जाचकच वाटणार. त्यातून विज्ञानाच्या प्रगतीवर जेव्हा धर्म अंकुश ठेवू पाहतो तेव्हा धर्म आणि विज्ञान यांच्यात संघर्ष होणे अटळ ठरते. या संघर्षाविषयी इथे मुख्यतः विचार करायचा आहे.
धर्मसंकल्पनेचा उदय
समाजजीवशास्त्रज्ञ असं मानतात की धर्माने भीती नाहीशी करणे आणि जगातील अनेक चमत्कारपूर्ण घटनांचं स्पष्टीकरण देणे या माणसाच्या प्राथमिक गरजा भागविल्या. मानवी मेंदूच्या भाषाक्षमतेचा विकास झाल्यावर मानवाला संकल्पना विकसित करणे शक्य झाले आणि मानवेतर प्राण्यांना शक्य नसलेले अनुभवही घेता येऊ लागले. हे अनुभव खालील स्वरुपाचे असतात. जसे की, धोका आणि मरण यांची जाणीव, वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ यांची जाणीव, पारितोषिक आणि शिक्षा, नैसर्गिक घटनांचे आश्चर्य, समस्यांचे निराकरण करण्यातील आनंद तसेच कलास्वाद, आश्चर्य आणि दरारा इत्यादी.
शाब्दिक आणि संकल्पनांची देवाणघेवाण करण्याची क्षमता यांच्यामुळे मानवाला घवघवीत यश मिळाले. प्राथमिक अवस्थेतील मानव ही क्षमता विकसित झाल्याने जन्म-मृत्यू, निसर्गातील विस्मयकारक बदल, आकाशातील चंद्र, तारे इत्यादींबाबत विचार करू शकला आणि त्याला या गोष्टींबद्दल आदरमिश्रित दरारा वाटू लागला. त्यातूनच या सर्व घटनांच्या स्पष्टीकरणाची गरज निर्माण झाली. त्याच्या नव्याने प्राप्त झालेल्या आकलनशक्तीमुळे त्याला आजारपणातून उठून पुन्हा आरोग्य लाभल्याच्या जाणिवेतून आनंद वाटू लागला, तसाच अडचणींना तोंड देऊन मार्ग काढल्याचा, पीक कापून धान्य मिळाल्याचा, समस्यांची उत्तरे मिळविल्याचा, चुका दुरुस्त केल्याचा आणि आसपासच्या जगातील सौंदर्याचा आस्वाद घेण्याचा आनंदही तो मिळवू लागला. प्राथमिक अवस्थेतील माणसे आणि आताचीही बहुतेक सर्व माणसे ही आजूबाजूच्या सर्व गूढ नकारात्मक आणि सकारात्मक अनुभवांचा धर्माच्या सहाय्याने अर्थ लावतात.
जगात जे काही अनिष्ट असेल ते काही धर्मांनुसार डेव्हिल, सैतान यासारख्या दुष्ट दैवताचे काम असते. हिंदू धर्मात चित्रगुप्त आपल्या पाप-पुण्याची नोंद ठेवतो. परंतु काही धर्मांप्रमाणे वाईट घटना माणसाच्या विकृत इच्छांमुळे घडतात. भविष्यातील अशाश्वती आणि धोके टळावेत म्हणून माणसे प्रार्थना करतात आणि सारं काही सुरळीत व्हावं म्हणून देवाला विनंती करतात. प्रिय व्यक्तीच्या मरणाचे दुःख आणि स्वतःच्या मरणाची भीती कमी होण्यासाठी माणसे पुन्हा दुसरीकडे कुठेतरी पुनर्जन्म होईल, अशी शाश्वती शोधत असतात. जीवनातील अन्याय, विषमता, निराश करणारा पक्षपात यांच्याविरुद्ध स्वर्गप्राप्तीनंतर दयाळू पित्याकडून – ईश्वराकडून न्याय्य आणि भरपूर बक्षीस मिळण्याचे आश्वासन यापेक्षा चांगले दुसरे कोणते सांत्वन असेल? याउलट जेव्हा सर्व काही सुरळीत होत असेल, आजूबाजूचं जग सुंदर असेल, अवतीभोवती आपल्याला आवडणारी प्रेमळ माणसे असतील आणि आपल्या कष्टाची गोड फळे मिळत असतील, तेव्हा या सर्व चांगल्या गोष्टींचा उगम ज्यातून होतो त्याचे मनःपूर्वक आभार मानणं याइतकं स्वाभाविक आणखी काय असू शकेल?
जीवनाचे आकलन करून त्याचे नियंत्रण करण्याची क्षमता मिळविणे ही विकसित होत असलेल्या माणसाची नवी गरजही धर्माने पुरविली. कला आणि विज्ञान यांच्याप्रमाणे धर्माचेही साध्य या भौतिक जगाच्या अनाकलनीय वास्तवातून सुव्यवस्था हुडकून काढणे हेच असते. परंतु विज्ञानपूर्व युगात तत्त्वज्ञानाखेरीज सुव्यवस्थेचा दुसरा कोणताही स्रोत नव्हता. शिवाय तत्त्वज्ञान फारच थोड्या लोकांना समजू शकते आणि शिवाय तत्त्वज्ञान धर्मासारखं भावनिक समाधान देऊ शकत नाही.
धर्माची गरज
यातून धर्म माणसाची एकत्र राहण्याची गरज भागविण्यास मदत करतो. ही गरज जैविक आहे. आपल्याला मानसिक व शारीरिकदृष्ट्याही जोमाने वाढण्यासाठी सामाजिक जीवनाची गरज असते. एकट्या राहणार्या व्यक्तीमध्ये प्रियजनांबरोबर राहणार्या व्यक्तींपेक्षा रोगप्रतिकारक्षमता कमी असते, असे अलिकडे काही पुरावे मिळाले आहेत. पण सामाजिक जीवनासाठी नेतृत्वाची श्रेणीबद्ध व्यवस्था असावी लागते; नाही तर अन्न, कामपूर्ती आणि इतर सुविधा यावरून अविरत भांडणे होत राहतील. टीव्हीवरील चिंपँझी आणि बबून यांच्या टोळीजीवनाच्या अनुबोधपटातून हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. माणसाने निर्माण केलेल्या समाजनियंत्रणाच्या वेगवेगळ्या संस्था उपजत जैविक प्रेरणेतून निर्माण झाल्या आहेत आणि या संस्था मानवाला त्याच्या मानवपूर्व अवस्थेतील पूर्वजांकडून मिळालेला वारसा आहे.
समाजाच्या भक्कम बांधणीसाठी लागणारे बळ पुरविणे हे धर्माचे आणखी एक महत्त्वाचे कार्य होते. धर्माची व्याख्याच आपण ‘धारयति इति धर्मः’ अशी करतो. एकएकटा माणूस जीवनसंघर्षामध्ये टिकाव धरू शकत नाही; परंतु समूह आपल्या सदस्यांना प्रबळ बनवितो. विल्सन यांच्या म्हणण्यानुसार समूहवृत्ती धर्माचा मुख्य सहकारी असून त्यामुळे धर्माला प्रचंड बळ मिळतं. पुरोहित आपल्याला एका सचिंत लयीमध्ये विनवीत असतात, “धार्मिक क्रियाकर्मांवर श्रद्धा ठेवा, अक्षय्य शक्तीचा अंश व्हा, तुम्ही आमच्यातलेच आहात.” या जगात सर्वत्र आढळून येणार्या धार्मिक क्रिया- धार्मिक आराधना, त्याग आणि समर्पण म्हणजे प्रबळ सत्तेला आणि सत्तेच्या श्रेणीला शरण जाणे आहे.
नैसर्गिक प्रकोपापासून दिलासा
भूकंप, ज्वालामुखी, महापूर, वादळ, दुष्काळ, रोगाच्या साथी इत्यादी विनाशकारी आणि अनाकलनीय अशा विराट शक्ती आपल्या टोळीच्या नेत्यांच्या कह्यामध्ये नसतात, याची जाणीव आदिमानव जातींमध्ये झालेली होती. हे घडवून आणणार्या शक्ती किंवा गोष्टी त्यांच्या नेत्यांसारख्याच; पण त्यांच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त बलवान; पण दृष्टीआड असणार्या आहेत, असे त्यांना वाटणे साहजिकच होते. या शक्तींबद्दल त्यांच्या मनात भीती, दरारा आणि आदरही असे. अगदी पूर्वीपासून आजपावेतो जवळजवळ सर्वच धर्मांमध्ये देव किंवा देवतांना निर्मितीचे स्वामी आणि टोळीच्या नेत्यांसकट सर्व मानवांवर सत्ता गाजवणारे नियंते समजत. तसेच प्रत्येकाने त्यांचा आदर केला पाहिजे व त्यांची आज्ञा पाळली पाहिजे, असा आग्रह असे. सामाजिक शासन आणि नेतृत्व यांचे जे काही प्रकार माणसाने घडविले, त्यांच्याशिवाय माणसाने आणखी एका नेतृत्वाच्या प्रकाराकडे धाव घेतली; मांत्रिक, तांत्रिक, वैदू, पुरोहित हे तर होतेच; याशिवाय माणसे व देव किंवा भुतं यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी आणखी काही व्यक्तींच्या नेतृत्वाची आणि मदतीची त्यांना गरज भासली. यांच्या मदतीने माणसाने देव-देवतांना शरण जाऊन त्यांची कृपा मिळविण्यासाठी मोठ्या श्रद्धेने कर्मकांडे सुरू केली. या धार्मिक श्रद्धा आणि प्रथांमुळे एक फायदा मात्र झाला. काही विपरीत घडल्यास त्याचा दोष समाजधुरिणांना देणे बंद झाले. अशा तर्हेने धर्मामुळे सामाजिक शासनव्यवस्थेला पुष्टी मिळाली.
या सर्व कारणांमुळे इतिहासपूर्व काळात म्हणजे माणसाच्या मेंदूची वाढ होत असतानाच्या काळामध्ये अलौकिकाचे अस्तित्व स्वीकारल्याने बराच फायदा झाला. एकीकडे धर्मसंस्था समाजाचे अंतर्भूत अंग बनत असताना दुसरीकडे देवावर श्रद्धा बाळगण्याच्या दिशेनेच माणसाचं मन विकसित झालं.
(क्रमशः)
लेखक संपर्क : 9503334895