Categories
कार्याध्यक्षांची डायरी

नव्या वर्षातील आमचे संकल्प आणि मागण्या

जानेवारी २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे नवीन वर्षाच्या – 2017 साठीच्या – सर्वांना हार्दिक सदिच्छा जाहीर करत असताना संघटना म्हणून करावयाच्या कामांचे संकल्प आणि मागण्या करीत आहोत. हे संकल्प आणि मागण्या पूर्ण करणेसाठी आम्ही वर्षभर पाठपुरावा करू व संघर्ष करू.

संकल्प 1 : – अंधश्रद्धा निर्मूलनासह वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात कृतिशील करून समाज विवेकी निर्माण करण्याचा संकल्प घेऊनच महाराष्ट्र अंनिस गेली 17 वर्षे कार्यरत आहे. त्यासाठी संघटनेतर्फे राबविण्यात येणारे जे विविध उपक्रम आहेत, अधिक कालसुसंगत, शोषणमुक्त, पर्यावरणपूरक व विषमतारहित रुढी-प्रथा-परंपरा-कर्मकांडे-सण-उत्सव आदींना घेऊन करण्याचा प्रयत्न राहणार आहे. समाजातील प्रामुख्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक व शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर्स, वकील आदी समूह व क्षेत्रातील लोकांना जोडून घेण्याचा प्रयत्न राहील; तसेच राज्याबाहेर येणार्‍या मागणीनुसार जाऊन तिथे प्रबोधन, प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

संकल्प 2 :- महाराष्ट्र राज्यातील गाव-जिल्हानिहाय होत असलेल्या दारूबंदीच्या मागणीला समर्थन आणि शासनाने सर्वंकष व्यसनविरोधी धोरण स्वीकारावे यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी व्यसनांच्या दुष्परिणामांची गंभीर जाणीव सर्वसामान्यांत निर्माण करणे, प्रचार साहित्य तयार करून ते वितरीत करण्याची, प्रबोधन व प्रशिक्षण आयोजित करण्याची आखणी केली जाणार आहे.

संकल्प 3 :- जातीधर्मनिरपेक्ष राष्ट्र उभारणीसाठी संवैधानिक तरतुदींच्या मदतीने प्रबोधन, मिश्र विवाह प्रोत्साहन-सहकार्य आणि जात पंचायतीला मूठमाती अभियान गतिमान करण्यात येत आहे.

संकल्प 4 :- निरामय मानसिक आरोग्य समाजात प्रवर्धित व संवर्धित करण्यासाठी मानसिक आरोग्य प्रकल्पांतर्गत मन, मनाचे आजार, भुताने झपाटणे, अंगात येणे, व्यसन, आत्महत्या, धार्मिक उन्माद, नैराश्य, ताणतणावांचे नियोजन यावर काम करणारे प्रशिक्षण ‘मानसमित्र’ तयार करण्याचा प्रयत्न आहे.

संकल्प 5 :- संविधान बांधिलकी महोत्सवाचे आयोजन संविधान स्वीकृती दिन 26 नोव्हेंबर ते प्रजासत्ताक दिन – 26 जानेवारीदरम्यान करण्यात येत आहे. त्या अंतर्गत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र अंनिसतर्फे युवा अभिवादन प्रबोधन यात्रा 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली. महामानवांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना, ठिकाणे असणार्‍या मार्गांवरून जाऊन त्या यात्रेदरम्यान 125 पेक्षा जास्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संविधान संवाद सभा, चालता-बोलता संविधान, संविधान सांस्कृतिक अभिव्यक्ती व ग्रामीण आणि नागरी भागातून राष्ट्रध्वजाचे अनावरण आणि संविधान संकल्प सहचिंतन आदी कार्यक्रमांचे आयोजन 26 जानेवारीपर्यंत करण्यात येत आहे.

* आमच्या मागण्या :-

1) दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी खुनाच्या तपासात संशयित आरोपींविषयी ठोस पुरावे मिळण्यासाठी आणि फरार आरोपी सारंग अकोळकर व विजय पवार यांना त्वरित अटक करण्यासाठी तपास यंत्रणांनी काम करावे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाने आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी पुढाकार घ्यावा.

2) खुनाचे, बॉम्बस्फोट केल्याचे, हिंसक कारवायांमधून सहभाग व उत्तेजन देण्याचे, नशा आणणार्‍या पदार्थांचा वापर करून साधकांना गुंगवणारे आणि देशाच्या लोकशाही-संवैधानिक व्यवस्थेला उलथवून टाकणारे लिखाण सतत आपल्या नियतकालिक प्रकाशनांमधून करणार्‍या सनातन भारतीय संस्था, हिंदू जनजागरण समितीसारख्या संस्थांची सखोल चौकशी करून ठोस कारवाईची अपेक्षा आहे. तसेच राज्य व केंद्र सरकारने याबाबत भूमिका सांगावी.

3) अशा प्रकारची हिंसक, विद्वेषी, राष्ट्रहितविरोधी कारवाई करण्याची पार्श्वभूमी असणार्‍या संस्था-संघटनांचे प्रवक्ते, प्रतिनिधींना माध्यमांमधून धार्मिक, नैतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक, राजकीय अशा विविध क्षेत्रांतील प्रासंगिक घटनाक्रमांवर भाष्य करण्यासाठी, आपली बाजू मांडण्यासाठी बोलविले जाते. सर्व माध्यमांचे स्वातंत्र्य व अधिकार मान्य करीत असताना अशी अपेक्षा आहे की, कायदा-सुव्यवस्था पाळणार्‍या व संवैधानिक प्रणालींचा अवलंब करणार्‍या आमच्यासारख्या संघटना-संस्थांच्या प्रवक्ते, प्रतिनिधींच्या बरोबरीने केवळ विरोधात बोलणार म्हणून अशा हिंसक, विद्वेषी, राष्ट्रविरोधी विचार-व्यवहार असणार्‍या संस्था-संघटनांना संधी उपलब्ध करून दिल्यामुळे माध्यमे त्यांना देत असलेल्या मान्यता, प्रतिष्ठाविषयक पुनर्विचार करावा.

4) जादूटोणाविरोधी कायदा अंमलबजावणीसाठी आवश्यक नियम मंजूर करून कार्यान्वित करावेत.

5) सामाजिक बहिष्कार कायदा गेली आठ महिने केंद्राकडे प्रलंबित आहे. तो तातडीने मंजुरी घेऊन लागू करावा, अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे.

अविनाश पाटील

राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

मो. 9422790610