मला आठवतं, लहान म्हणजे पहिली-दुसरीत असताना शाळेतल्या बाई ‘आळी मिळी गुपचिळी’ म्हणाल्या की, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून गप्प बसायचं. गप्प म्हणजे गप्पच! काही बोलायचंच नाही, इकडं-तिकडं सुद्धा बघायचं नाही. वाढत्या वयाबरोबर ‘आळी मिळी गुपचिळी’ वाढत जाऊन त्याचे रूपांतर ‘पाळी मिळी गुपचिळी’ मध्ये कधी झालं, हे समजलंही नाही. पाळीविषयी काही बोलायचं नाही, काही विचारायचं नाही. ब्रहम् सांगतात तेवढं ऐकायचं आणि सांगतात तसं वागायचं, एवढंच! आजही ही परिस्थिती फारशी बदललेली नाही. विज्ञानयुगातही याबद्दलचं बोलणं कुजबुजायलाच लावतं. एवढा हा विषय अछूत-अस्पर्श आहे; नव्हे, व्यवस्थेनं तो तसाच ठेवला आहे. त्यात धर्मसंस्थांचा पगडा मोठा आहे, हे नाकारता येत नाही.
ही मानसिकता बदलण्यासाठी, आळी मिळी तोडण्यासाठी, मौनभंग करण्यासाठी उपयोगी पडणारं एक पुस्तक नुकतंच वाचण्यात आलं. डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी लिहिलेलं ‘पाळी मिळी गुपचिळी’ हे ते पुस्तक! अर्थात, ‘स्त्री आरोग्याचा शोध आणि बोध’ घेणारं पुस्तक! हे पुस्तक स्त्रियांच्या आरोग्याला सर्वांगांनी स्पर्श करणारं आहे, तरी ते कुठंही कंटाळवाणं वाटलं नाही. वैज्ञानिक अंगानं केलेली आरोग्यपूर्ण मांडणी असूनही ती कुठंही रटाळ झाली नाही, हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य! आणि यशही! याचं श्रेय डॉ. शंतनु अभ्यंकर यांच्या भाषेचं. साधी, सोपी, चटपटीत आणि खुसखुशीत भाषासौष्ठवामुळं वाचनीय; तरीही समजायला सोपी अशी याची शब्दरचना आहे.
पौगंडावस्थेतील मुलींपासून सर्वच वयोगटातील स्त्रियांना स्वत:कडे वेगळ्या दृष्टीनं पाहण्याचं भान हे पुस्तक देतं. स्त्री आहे म्हणजे नेमकं काय आहे? माझं महत्त्व काय आहे? माझ्यातलं सामर्थ्य मलाच कसं माहिती नव्हतं? या प्रश्नांचा वेध घेत स्त्रीला तिची माणूसपणाची जाणीव हे पुस्तक करून देतं. त्यामुळं, स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आणि स्वत:मधला न्यूनगंड काढून टाकण्यासाठीची सकारात्मकता निर्माण होण्याला हे पुस्तक चालना देतं. म्हणून हे पुस्तक महत्त्वाचं आहे.
स्त्रीचा जन्म म्हणजे पाप! नशिबाचे भोग! पाळी म्हणजे तर तिरस्कृत, लाज आणणारी गोष्ट! अशी मानसिकता काही अपवाद सोडता सर्व स्त्रियांच्या मनामध्ये ठाण मांडून बसली आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. या वास्तवाला शह देण्याचं काम हे पुस्तक करतं. एवढंच नाही, तर स्त्रीजीवनाशी, तिच्या जगण्याशी संबंधित असणार्या अनेक गोष्टी, ज्या प्रश्नांकित होऊन राहिल्या आहेत, त्यावर हे पुस्तक एक उत्तर आहे. जे सर्वांनी… पुरुषांनीसुद्धा वाचलंच पाहिजे.
हा विषय एकूण 33 प्रकरणांमध्ये विभागला असून प्रत्येक प्रकरणाला एक शीर्षक आहे आणि त्या शीर्षकाखाली एक उपशीर्षक आहे. ते उपशीर्षक जास्त बोलकं आहे. काही उदाहरणं तुमच्यासमोर ठेवते पाहा….
पहिलंच प्रकरण आहे ‘पाळी मिळी गुपचिळी’ उपशीर्षक आहे ‘पाळीविषयक अंधश्रद्धांबाबतचा समाचार’ हा समाचार पाळीसंबंधी भाष्य करत पाळीसंबंधीच्या अंधश्रद्धा दूर करून पाळीची नैसर्गिकता आपल्या समोर ठेवतो. त्या काळात होणार्या त्रासाबद्दलही एक प्रकरण आहे.
‘पपी-लव्ह’ असं एक महत्त्वाचं प्रकरण आहे. याचं उपशीर्षक आहे, ‘उमलत्या वयात खोल-खोल प्रेमात’ शारीरिक आकर्षणापासून निर्माण झालेलं पौगंडावस्थेतील प्रेम, त्याची लक्षणं, मेंदूत होणारा…. केमिकल लोचा वगैरे गोष्टींचं मार्गदर्शन या प्रकरणात भेटेल.
‘अग्गोबाई! अरेच्चा!’ स्त्रियांच्या कामजीवनावरचं खुसखुशीत भाष्य या प्रकरणामध्ये केलेलं आहे. ‘प्रेगनन्सीमध्ये सेक्स योग्य की अयोग्य?’ ‘गर्भसंस्कारांचा बाजारूपणा,’ ‘वेदनारहित प्रसूती शक्य आहे काय?’ ‘सिझरचं प्रमाण का वाढलं?’ ‘गर्भपात का होतात?’ पासून ‘पुरुष नसबंदी,’ ‘पुरुषांतील वंध्यत्व,’ ‘वाढलेल्या वयात लघवीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे खास व्यायाम,’ ‘मोनोपॉज अर्थात पाळी जाण्यासंबंधीची प्रक्रिया’ वगैरे अनेक विषयासंबंधींची चर्चा या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. शंतनु अभ्यंकरांनी वाचकांशी केलेली आहे.
त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे, स्वत:च्या शरीरासंबंधीच्या, मासिक पाळीसंबंधीच्या मानसिक बंधनातून, गैरसमजांच्या पगड्यातून… त्यातून निर्माण होणार्या न्यूनगंड आणि भयगंडातून पूर्णपणे बाहेर पडल्याशिवाय एक व्यक्ती म्हणून पुरुषांच्या बरोबरीने… आत्मविश्वासाने उभे राहणे अशक्य आहे, याचे भान हे पुस्तक देते, एवढे खरे!
पुस्तकाचे नाव : पाळी मिळी गुपचिळी (स्त्रीआरोग्याचा शोध आणि बोध)
लेखक : डॉ. शंतनु अभ्यंकर
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे
संपर्क : 9168682200
पृष्ठ संख्या : 151 किंमत : 200 रुपये.