Categories
नाट्य-चित्र परिक्षण

मंटो : मानवतावादी लेखकाची प्रेरणादायी कहाणी

ऑक्टोबर - २०१८

सआदत हसन मंटो, एक थोर मानवतावादी लेखक, कथाकार, प्रचलित व्यवहारांच्या बंधनांना झुगारून जगणारा मनस्वी कलावंत, निखळ माणूस असण्याचे प्रतीक, दिवसेन्दिवस आजूबाजूला अमानुष होत जाणार्‍या भवतालात अशा पराकोटीच्या संवेदनशील माणसाला जगणे केवळ अशक्य आणि असह्य असते. ‘बुडता हे जन पाहवेना डोळा’ अशी मनाची अवस्था तुकारामांनी नोंदवून ठेवलेली आहे. मंटो याच अवस्थेत जगणारा कायम अस्वस्थ कलावंत. माणूसपणाला कुरतडून टाकणार्‍या या जगाला मंटोने आपल्या कथांतून काहीही आणि कशाचीही भीडभाड न ठेवता व्यक्त केलेले आहे. कलावंताने आपल्या काळाची नस पकडली पाहिजे, असे म्हटले जाते. सर्वांनाच ते शक्य होतेच, असे नाही. अशी नस पकडणारा कलावंत आणि त्याचे साहित्य हे सदैव मानवजातीला प्रेरणादायी ठरते. मानवी समाज अधिकाधिक मानवी होत जावा, आज आहे त्यापेक्षा सुखी होत जावा, प्रत्येकाला स्वातंत्र्याचा लाभ ही एक सामान्य गोष्ट व्हावी. कोणत्याही कारणासाठी एका माणसाने दुसर्‍या माणसाचे गुलाम होऊ नये किंवा परिस्थितीमुळे त्याला व्हायला लागू नये, अशी मनामध्ये अभिलाषा बाळगणारा, तशी स्वप्ने आपल्या साहित्यातून पेेरणारा लेखक कधीच मरत नाही, अजरामर राहतो; जसं वारंवार हत्या होऊनही सत्य कधीच मरत नाही, ते इंद्रायणीच्या डोहात ‘बुडवलं’ तरी ‘वर’ येतेच आणि चारशे वर्षांनंतरही वारकरी पंथाची पताका फडकवत ठेवतेच.

मंटो त्याच्या काळाची नस बरोबर पकडतो. समाजाच्या चेहर्‍यावर धर्माच्या नावाखाली पडलेले कुरुपतेचे, विकृतीचे, अमानवीपणाचे डाग तो आपल्या कथांतून दाखवतो म्हणूनच मानवी मूल्यांची कदर असणार्‍या प्रत्येकाच्या हृदयात मंटो जिवंत राहतो. ते त्याच्यावर प्रेम करत राहतात. त्या प्रेमातूनच थोर अभिनेत्री नंदिता दास हिने मंटोवर अतिशय प्रभावी असा सुंदर चित्रपट बनवला आहे. त्याचे दिग्दर्शन केले आहे. मंटो ज्या काळात जगला, त्या काळात ती आपल्याला सहज घेऊन जाते. त्यामुळे हा चित्रपट मंटोचा केवळ चरित्रपट राहत नाही, तर तो भारत-पाकिस्तान असे दोन देश अस्तित्वात आल्यानंतर त्या देशांच्या जडण-घडणीच्या काळाचा दस्तावेज ठरतो. त्या काळाचा सत्यांश हा चित्रपट सादर करतो.

मंटो घडला मुंबईत. या मुंबईवर त्याचे जीवापाड प्रेम होते. मुंबई सोडून कुठे राहणे त्याच्यासाठी मरणासारखीच गोष्ट. या मुंबईच्या मातीतच त्याचे आई-वडील आणि त्याचा एक मुलगा दफन झालेले. या मातीतच तो वाढला, या मातीनेच त्याला घडवले. मुंबईला, मानवीपणाला लाज आणणार्‍या घटनांना त्याने आपल्या लेखणीचे लक्ष्य बनवले. त्या परिस्थितीवर कठोर घाव घातले. वेश्यांच्या जीवनातील अमानुषतेला त्याने वेशीवर टांगले. अशा अमानुषतेतही वेश्यांनी जपलेल्या मानवीपणाचे दर्शन त्याने कथांतून घडवले आणि हे जसंच्या तसं मानवतावादी दृष्टिकोनातून पुढे आणताना मंटोने शब्दांना त्याच्या नैसर्गिक अर्थासह उभे केले. कोत्या बुद्धीचे; ज्यांना लेखनामागील मानवतावादी प्रेरणांचे काही देणे-घेणे नसते असे तथाकथित संस्कृतिरक्षक ते केवळ शाब्दिक अर्थानेच शब्दाकडे पाहतात. त्यामुळे ते शब्दांनाच अश्लील ठरवतात आणि हेच शब्द ते व्यवहारात रोज वापरत असतात; पण ते शब्द त्यांना कथेतून मात्र चालत नाहीत. भाऊ पाध्ये यांनाही या अश्लीलतेच्या आरोपांशी सामना करावा लागला होता. ज्याला संस्कृतिरक्षक म्हटले जाते, ते प्रत्यक्षात संस्कृतिभक्षकच असतात. त्यांना संस्कृती हवी असते; आपली काळी कृत्ये दडविण्यासाठी, मुखवटा म्हणून आणि हे संस्कृतिरक्षक सर्वच काळात अस्तित्वात असतात. आज तर ते माजलेल्या सांडासारखे सर्वत्र डुरकत फिरत आहेत.

मंटोच्या कथा घडतात फाळणीच्या काळात. धर्मांधतेने माणसे कमालीची अमानुष झालेली. अशा अमानुषतेचे जितेजागते नमुने मंटोने शब्दात पकडले आहेत, अमर केले आहेत; पण इतक्या अमानुषतेतही माणूसपण पूर्ण मरत नाही. धर्मांधतेच्या नशेतही माणसाला आपला माणूस पूर्ण मारता येत नाही आणि हाच प्रत्येक गोष्टीत आणि मनामध्ये चाललेला एकमेकांविरुद्धचा संघर्षच माणसाला माणूस म्हणून जिवंत ठेवतो. हे चिरंतन मानवी सत्य मंटोने त्याच्या ‘ठंडा गोश्त’ या कथेत व्यक्त केलेले आहे. पण या मानवी सत्याकडे लक्ष न देता केवळ त्यातील काही शब्दांमुळे ही कथा अश्लील ठरवली जाते, समाजावर त्याचा वाईट परिणाम होईल, असे मानले जाते, खटला भरला जातो. मंटोला शिक्षाही होते. खरं तर या कथेत चितारलेल्या अमानुषतेच्या पेक्षा मंटोला दिलेली ही शिक्षाच अमानुष आहे. आज जे धर्माच्या, संस्कृतीच्या, परंपरांच्या नावावर लोकांच्या माथ्यावर थोपवले जात आहे, ते अमानुषच आहे. आज आपल्या देशात ही संस्कृतिरक्षकांची जमात तर कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे फोफावली आहे. त्यांच्या धार्मिक भावना इतक्या नाजूक झाल्या आहेत की, साध्या रंगाने, मुलींनी जीन्स घातली तरी त्या दुखावल्या जातात. तरुण मुलं-मुली प्रेमाच्या आणाभाका घेत कुठे बागांमध्ये बसली तरी दुखावल्या जातात. कुणी त्यांना आवडत नसलेला आहार घेतला तरी दुखावल्या जातात.

फाळणी होते आणि देशभर खासकरून सीमावर्ती भागात आणि मुंबई, दिल्ली, कोलकातासारख्या शहरात अराजकसदृश स्थिती निर्माण झाली. दंगली एखाद्या वावटळीसारख्या पसरल्या, कत्लेआम सुरू झाला. ज्या मुसलमानांना पाकिस्तानात जायचे नव्हते, ज्यांच्या पिढ्यान्पिढ्या भारतात गेल्या त्यांना पाकिस्तानाबद्दल काहीच अप्रुप नव्हते आणि पाकिस्तानातील हिंदू आणि शीख जनतेला भारताबद्दल काहीच अप्रुप नव्हते. स्वातंत्र्य मिळूनही या जनतेच्या वाट्याला वनवास आला. घरदार, जमीनजुमला सर्व काही सोडून केवळ जीव वाचवण्यासाठी तिकडचे हिंदू-शीख आणि इकडचे मुसलमान मनाविरुद्ध स्थलांतर करीत राहिले. त्यांची उसवलेली आयुष्ये आजही सांधली गेलेली नाहीत. कुटुंबेच्या कुटुंबे नष्ट झाली, नाहीशी झाली. नातेसंबंधांची ताटातूट आणि वाट्याला आलेली ही वाताहत. परत प्रत्येकाच्या घरातील कोणी ना कोणी गमावल्याची भावना प्रत्येकाच्या मनात दडून बसली होती. याच दडून आणि दबून बसलेल्या भावनांना तिकडचे मुस्लिम धर्मांध आणि इकडचे हिंदू धर्मांध कायम शिळ्या कढीला पुन्हा-पुन्हा ऊत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजप-आरएसएसचे राजकारण याच धर्मांधतेवर आधारलेले आहे. त्याला चांगलीच विषफळे लागली आहेत आणि भारतात पुन्हा फाळणीसदृश परिस्थिती आकार घेऊ लागली आहे. आज ते त्यांच्या विरोधी असणार्‍या लोकांना पाकिस्तानात चालते व्हायची बिनदिक्कत धमकी देत आहेत.

मंटोला पाकिस्तानात जायचे नव्हते; अगदी बायकोच्या जवळच्या नात्यातील लग्न लाहोर येथे असते. त्याला जाण्यास त्याने नकार दिलेला असतो. त्याला त्याच्या आवडत्या मुंबईत राहायचे होते. परिस्थिती खूपच बिघडली होती, तरी त्याला मुंबई सोडायची नव्हती. माणसे त्या काळात खिश्यात दोन टोप्या घेऊन फिरत. हिंदू वस्तीत हिंदू टोपी, तर मुस्लिम वस्तीत मुस्लिम टोपी. या काळात मंटो आणि अशोककुमार गाडीतून चालले होते. अशोककुमार त्यावेळेस स्टार म्हणून चमकत होते. गाडी मुस्लिम वस्तीतून जात होती. मंटोला अशोककुमार बद्दल काळजी वाटू लागली. कारण रस्त्यावर दंगलखोरांचा जमाव होता. मंटो अशोककुमारला मुस्लिम टोपी घालण्याचा आग्रह करू लागला; पण अशोककुमारने मानले नाही. जमाव गाडीभोवती जमा झाला. त्या तरुणांनी अशोककुमारला ओळखले. ‘अशोककुमार, अशोककुमार’ म्हणून जमाव आनंदाने ओरडू लागला. जमावाने, ‘गाडी अमुक गल्लीतून घ्या काहीच त्रास होणार नाही,’ असे सांगत गाडीला वाट करून दिली… ही खरे तर धर्मभावनेवर मात करणारी कलेची-कलावंताची ताकद. नंदिता दास यांनी हा प्रसंग गौरवीकरणाच्या बेगडी पद्धतीने चित्रित केलेला नाही; अगदी सहज त्याचे चित्रण केलेले आहे. सुजाण प्रेक्षकांनी त्याचा अर्थ लावावा, अशी अपेक्षा ठेवून ते चित्रित केले आहे.

मुंबईत दंगलीची स्थिती फारच बिघडत गेली. मंटोचा श्याम चढ्ढा नावाचा त्यावेळी स्टार असलेला अभिनेता जवळचा मित्र होता. मंटोच्या घरातच तो राहात होता. तो लाहोरचा होता. त्याच्या कुटुंबातील एक तरुण मुलगा लाहोरमधील दंगलीत मारला गेल्याचे भारतात आलेल्या त्याच्या कुटुंबाकडून श्याम आणि मंटोला समजते. या घटनेने श्याम आणि मंटो हादरून जातात. श्यामवर या घटनेचा इतका परिणाम होतो की, तो बदला घेण्याची भाषा बोलू लागतो. त्याचे हे बदललेले रूप पाहून मंटो चकित होतो आणि त्याच वेळेस तो मुंबई सोडण्याचा आणि पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतो. श्याम त्याची माफी मागतो; पण मंटो निर्णय बदलत नाही. श्याम त्याला सोडायला बोटीवर जातो, तेव्हा मंटो म्हणतो, ‘आईच्या कबरीवर अखेरचे जाऊन यायला हवे होते.’ तेव्हा श्याम म्हणतो, ‘अरे, ही परिस्थिती काय कायमच अशी राहणार आहे? परिस्थिती निवळेल.’ पण मंटोला खात्री नसते व आपण परत येऊ, असे त्याला वाटत नसते. नंतर श्याम जेव्हा लाहोरला जातो, तेव्हा अतिशय कफल्लक अवस्थेत दारूच्या पूर्ण आहारी गेलेला मंटोला भेटतो. श्याम स्टार असतो, मागेपुढे लोक झुलत असतात. श्याम मंटोला काही पैसे देऊ करतो; पण पैशाची आत्यंतिक गरज असतानाही मंटो ते घेत नाही. टोकाचा स्वाभिमानी बाणा हे मंटोच्या स्वभावाचे वैशिष्ट्य येथे दिसून येते.

मंटो पाकिस्तानात जातो; पण त्याची अवस्था त्याच्याच कथेतील टोबा टेकसिंगसारखी होते. वेड लागलेला टोबा टेकसिंग- फाळणी होण्यापूर्वी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती होतो. फाळणी झाल्यावर हिंदू आणि मुस्लिम वेड्यांचीही अदलाबदल होते. टोबा टेकसिंगचे गाव पाकिस्तानात जाते; पण त्याला पाकिस्तान-हिंदुस्थान काहीच कळत नाही. शेवटी तो दोन्ही देशांच्या सीमेवर उभा राहतो आणि तेथेच आपले प्राण सोडतो. मंटो भारताचा लेखक आहे आणि पाकिस्तानचाही. तो मुस्लिम कुटुंबात जन्मला; पण त्याचे साहित्य देशाच्या सीमा पार करून केवळ नागड्याने जन्मलेल्या माणसासारखे आहे. त्याला मानवतावादाखेरीज दुसरे नाव देता येणार नाही आणि मानवतावादी असणारा लेखक अवघ्या मानवजातीचा ठेवा असतो. हा ठेवा नष्ट करणारे कितीही हुकूमशहा आले तरी तो नष्ट होत नाही. हुकूमशहा मात्र मातीमोल होतात. नंतरच्या काळात लुत भरलेले कुत्रेही त्यांच्यावर तंगडी वर करीत नाही.

नंदिता दास यांनी आपली अभिनय क्षेत्रातील कारकीर्द चांगली गाजविली आहे. मंटो चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शीय कौशल्यही त्यांनी दाखवून दिले आहे. सत्य सांगणार्‍या वास्तववादी चित्रपटात आणखी एका सुंदर चित्रपटाची मंटोच्या रूपाने भर पडली आहे. मंटो फार दूरच्या इतिहासातील व्यक्तिरेखा नाही. मंटोला जाणणारे, ओळखणारे आजही जिवंत आहेत, त्याच्या मुली आहेत की, ज्यांची त्याने मृत्यूपूर्वी त्याच्या कलंदर आयुष्यामुळे भोगाव्या लागलेल्या दु:खाबद्दल क्षमा मागितली आहे. अशावेळी चित्रपटात इतिहासाचे भान जपणे गरजेचे असते. जे आज यात नाहीत, त्यांच्याबद्दल आपल्या कलास्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही खपवता येत नाही. नंदिता दास यांनी त्याची खबरदारी घेतली आहे. ज्यांनी आजवर मंटोचे काहीही वाचले नसेल त्यांनी किमान हा चित्रपट पाहावा. तसेच मंटोच्या खोल दो, ठंडा गोश्त, टोबा टेकसिंग या कथा आवर्जून वाचाव्यात. फाळणीच्या काळातील अमानुषतेचे, दु:खाचे भयप्रद दर्शन या कथांतून आपणास घडेल.

खरे तर मंटोला या जगात फार दिवस राहायचे होते, जसे त्याला मुंबई सोडून जायचे नव्हते, ज्या मुंबईत त्याच्या आई-वडिलांचे दफन झाले होते, त्याच मुंबईत त्याला दफन व्हावयाचे होते. पण या गोष्टी त्याला जमल्या नाहीत. त्याची ही स्वप्ने त्याला पुरी करता आली नाहीत. मंटोचे हे अधुरे राहिलेले स्वप्न-मुंबईचे; तसेच ते मानवजातीचेही अधुरे राहिलेले स्वप्नच. सआदत हसन मंटो एक थोर मानवतावादी लेखक-वयाच्या केवळ 42 व्या वर्षी निधन पावला.