Categories
व्यक्तिविशेष

विवेकाचा झरा : डॉ. बापूजी साळुंखे

जून - २०१९

समाजशिक्षण दोन पातळ्यांवर अखंडपणे चालू असते. एक म्हणजे ‘औपचारिक शिक्षण’ आणि दुसरं म्हणजे ‘अनौपचारिक शिक्षण.’ अनौपचारिक शिक्षणाच्या चळवळीत महाराष्ट्र अंनिसचे कार्य गेली 30 वर्षेअखंडपणे चालू आहे. मीडिया आणि इतर घटकही अनौपचारिक शिक्षणात कार्यशील असतात. महाराष्ट्र अंनिसची लोकप्रबोधनाची चळवळ गतिमान करण्यासाठी एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली रयत शिक्षण संस्थेने मौलिक मदत केली आहे. विशेषत: विज्ञानवाहिनीचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यात या संस्थेने हरप्रकारे मदत केली आहे; पण याचबरोबर आदरणीय डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या ‘विवेकानंद शिक्षण संस्थे’नेही विज्ञानप्रसाराचे ऐतिहासिक कार्य महाराष्ट्रात उभे केले आहे. महाराष्ट्र अंनिसमध्ये सुजाता म्हेत्रे आणि विवेकानंद शिक्षण संस्थेतील प्राध्यापक व शिक्षक यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. या कार्यात बापूजींचे चिरंजीव डॉ. शरद साळुंखे व विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे या द्वयींनी अंनिसला विविध प्रकारे मदत करण्याची भूमिका घेतली आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख अशासाठी की, ज्या विवेकानंद शिक्षण संस्थेचे हे औपचारिक शिक्षणाचे कार्य ज्यांनी उभे केेले आणि वाढविले, त्याचे जनक डॉ. बापूजी साळुंखे यांची जन्मशताब्दी या वर्षी साजरी होत आहे. 9 जून हा बापूजींचा जन्मदिन आहे. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करणे, हे आमचे कर्तव्य आहे.

एकोणीसशे पंचावन्नमध्ये बापूजींनी आपल्या काही सहकार्‍यांसोबत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. धर्माचा उद्देश, नैतिक मूल्यांचा प्रसार आणि सर्वसामान्यांच्या दु:खाचा विचार व त्यासाठी मूल्यविवेक हा विवेकानंद यांच्या विचारांचा पाया होता. विवेकप्रसार हे अंनिसचेही उद्दिष्ट आहे. विवेकानंदांचे नाव आपल्या शिक्षण संस्थेला देऊन बापूजींनी ‘ज्ञान-विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणप्रसार’ याचा उत्तम मेळ साधला आहे.

बापूजींनी आपल्या सहकार्‍यांसमवेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात अंदाजे 140 माध्यमिक शाळा, दहा महाविद्यालये; तसेच अनेक डी.एड्. व बी.एड्. महाविद्यालये, वसतिगृहे इत्यादी संस्कृतिकेंद्रं स्थापन केली. त्यांच्या मृत्यूनंतर या संख्येत भर पडून रयत शिक्षण संस्थेशी तुल्यबळ अशी शिक्षणप्रसाराची चळवळ विवेकानंद शिक्षण संस्थेने उभी केली आहे.

मध्यम उंचीची बांधेसूद व्यक्ती, गांधी टोपी, सफेद पायजमा, पांढरा सदरा आणि साधे पादत्राण यांनी विभूषित असं बापूजींचे आकर्षक व्यक्तिमत्त्व होतं. अशा व्यक्तिमत्त्वाकडे अनेक सेवाव्रती आकर्षित झाले नाहीत, तरच नवल. बापूजी केवळ शिक्षण प्रसारक, सेवाव्रती नव्हते, तर त्यांच्याकडे अनेक सद्गुण होते. ते गवंडी होते, इंजिनिअर होते, कल्पक शिल्पकारही होते. या त्यांच्या गुणामुळेच ते समर्थ शिक्षण संस्थाचालक ठरले.

बापूजींचा मूळ पिंड जरी अध्यात्मवादी होता, तरी ते विवेकवादापासून दूर नेणारे अध्यात्मवादी नव्हते. नैतिक प्रेरणा ही देखील त्यांच्या अध्यात्माच्या विचारांशी सुसंगत होती. विज्ञान किंवा विवेक याच्या कसोटीवर उतरणारे अध्यात्म त्यांनी स्वीकारले होते. एकूणच, सामान्य माणसाच्या उत्थानाचा विचार त्यांच्या कार्यामध्ये होता. ‘विवेकशील अध्यात्मवादी’ असे त्यांचे सार्थ वर्णन करता येईल. नैतिक धैर्य आणि विज्ञानमूल्यांचा स्वीकार यामुळेच अनेक संकटे येऊनही त्यांनी महाराष्ट्रात खेड्यापाड्यात शिक्षण केंद्रे उभी करून ग्रामीण समाजाच्या विकासाचा पाया रचला आणि तो वृद्धिंगत केला.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना डॉ. आप्पासाहेब पवार या इतिहास प्राध्यापकाचे ते लाडके विद्यार्थी बनले. पवारांनी त्यांना सोंडूर येथे इतिहास संशोधनासाठी पाठविले. तेथील जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. सोंडूरहून परतल्यानंतर बापूजींनी 1943 साली स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. नागनाथ नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भूमिगत चळवळीत भाग घेतला. या कार्याबद्दल स्वातंत्र्यसैनिक म्हणून भारत सरकारने त्यांचा यथोचित गौरव केला आहे.

सुरुवातीच्या शैक्षणिक कार्यात त्यांनी रयत शिक्षण संस्थेत योगदान दिले. कर्मवीर भाऊराव पाटील गौरवनिधी गोळा करण्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले व या गौरवनिधीत मोलाची भर घातली. 1948 मध्ये गांधींचा खून झाल्यावर महाराष्ट्रात जातीय दंगा पेटला. या दंगलीमध्ये त्यावेळचे मुंबई इलाख्याचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना दोषी ठरविले. बापूजींनी या संघर्षात कर्मवीरांची बाजू घेऊन त्यांना समर्थन दिले. संस्थेविरुद्धचे राज्यकर्त्यांचे कलुषित मत बदलण्यात बापूजींचे इतरांबरोबर मोलाचे योगदान होते. त्यानंतर रूकडी येथे रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयाची स्थापना करून ते ‘रयत’सेवक बनले. 1945 ते 1955 या काळात बापूजींनी रयत शिक्षण संस्थेत निष्ठेने सेवा केली. कर्मवीरांबरोबरच्या काही मतभेदांमुळे 1955 मध्ये ते रयत शिक्षण संस्थेतून बाहेर पडले; आणि स्वतंत्र शिक्षण संस्थेची सुरुवात केली. विवेकानंद शिक्षण संस्थेचा सुरुवातीचा हा इतिहास होता. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात एकामागून एक माध्यमिक विद्यालये सुरू करून बापूजींनी विवेकानंद शिक्षण संस्थेला रयत शिक्षण संस्थेप्रमाणे विस्तारित करण्यात अभूतपूर्व यश संपादन केले. इचलकरंजी या महाराष्ट्राच्या मँचेस्टर समजल्या जाणार्‍या शहरात गोविंदराव हायस्कूलची स्थापना केली. सातार्‍याचे भवानी विद्यामंदिर, पाटणचे ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल, कोल्हापुरातील माध्यमिक शाळा दिमाखदारपणे कार्यरत झाल्या आहेत.

बापूजी मूळचे पाटण (जि. सातारा) येथील. शैक्षणिक कामासाठी ते कोल्हापुरात स्थायिक झाले. आश्चर्याची बाब म्हणजे बापूजींनी पहिले महाविद्यालय मराठवाड्यात उस्मानाबाद येथे सुरू केले. नंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांनी महाविद्यालये सुरू केली. आज या महाविद्यालयांत कोल्हापूरचे विवेकानंद महाविद्यालय गुणवत्ता व सोयीच्या दृष्टीने परिपूर्ण झाले आहे. शिवाजी विद्यापीठातील एक नामवंत महाविद्यालय म्हणून ते ख्यातनाम झाले आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर येथील परिसरात हे महाविद्यालय वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारासाठी अविरत कार्यरत आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने बापूजींना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही पदवी प्रदान करताना प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी वाचलेल्या गौरवपत्रात बापूजींच्या कार्याचे उचित मूल्यमापन झाले आहे. “ज्ञानवर्धन, ज्ञानसंवर्धन व ज्ञानदान याच आपल्या जीवित ध्येयाशी प्राणप्रतिष्ठेने एकनिष्ठ राहून चैतन्याची अखंड उपासना करणारे थोर समाजशिक्षक म्हणजे बापूजी-गोविंदराव तानोजीराव साळुंखे. युगायुगाच्या अंधाराला प्रकाशाचे शक्तिमान वरदान देण्यात संपूर्ण आयुष्य झोकून देणार्‍या बापूजींनी नैतिक मूल्यांवर श्रद्धा ठेवूनच वाटचाल केली. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणाचा प्रसार सर्वत्र करण्यासाठी ते नित्य कार्यप्रवण राहिले. ज्ञानापासून शतकानुशतके वंचित, दुर्लक्षित राहिलेल्या दीन, दलित, आदिवासी यांसारख्या सामाजिक स्तरांच्या उन्नतीसाठी स्वत:ला वाहून ठेवले. त्यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या नावाने शिक्षण संस्था सुरू केली व वाढविली. त्यांचे जीवन व शैक्षणिक कार्य म्हणजे महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील एक सोनेरी पान आहे. कुसुमाग्रजांच्या काव्यात थोडा बदल करून –

ज्ञानाचा उघडून पिसारा देवदूत कोणी

अज्ञानावर खोदीत बसला विज्ञानाची लेणी

अशा बापूजींचा गौरव गायला कुणालाही आवडेल.

चर्चिल यांच्या एका उद्धरणानुसार मोठा माणूस तो असतो, जो आपल्या सहकार्‍यांनाही मोठे होण्याची प्रेरणा देतो. आज बापूजींचे वारस व संस्थेतील अजीव सेवक आणि सहकारी संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळीत आहेत. अशा या संस्थेच्या संस्थापकाच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना विज्ञानवादी परिवाराचा सलाम! पण?

बापूजींनी विवेकानंद शिक्षण संस्थेचा पाया रचला आणि त्यांच्या सहकार्‍यांनी व वारसांनी संस्थेची वाढ केली, याचे कौतुक व्हावेच; पण या पुढे अशा वाढीबरोबरच गुणवत्तेलाही प्राधान्य द्यायला हवे. अंनिसचं असं निरीक्षण आहे की, केवळ विज्ञान शिक्षणाची वाढ झाली म्हणून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन येत नाही. खेडूतांपेक्षाही आजच्या शहरी-सुशिक्षित वर्गात वास्तूशास्त्र, फेंगशुई, अ‍ॅक्युपंक्चर आणि तत्सम छद्मविज्ञानांचे प्रमाण विलक्षण गतीने वाढत आहे. ढग आल्यामुळे रडार यंत्रणा काम करत नाही, असे विधान एका थोर नेत्याने केले आहे. ते साफ चूक आहे. विद्युत चुंबकीय लहरींबाबत त्यांच्या या अज्ञानाला हसावे की, रडावे, हे समजत नाही. याचा अर्थ विज्ञानाचा चिकित्सक दृष्टिकोन अजूनही समाजात रुजलेला नाही. तो रुजविण्याचे कार्य विवेकानंद शिक्षण संस्थेने आता हाती घ्यावे आणि आपला समाज विवेकी बनविण्याचे आव्हान स्वीकारावे. विवेकानंद यांच्या नावाने सुरू असलेल्या या संस्थेत विवेकाचा आवाज बुलंद व्हावा, ही अपेक्षा! पुन्हा बापूजींना भावपूर्ण आदरांजली.