खेड (जि. रत्नागिरी) जवळील चिनकटेवाडी येथील सचिन, संदीप आणि संजय गोवळकर बंधूंनी बांधलेल्या नवीन वास्तूचा गृहप्रवेश भारताच्या संविधानाची प्रास्ताविका वाचून केला. भारतीय संस्कृतीचे धार्मिक विधी, पूजापाठ यांना त्यांनी फाटा देऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. चिनकटेवाडीतील सर्व ग्रामस्थ व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
हे तीनही बंधू अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गेली अनेक वर्षेजिल्ह्यात काम करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान ही देशाला दिलेली मोठी देणगी आहे. त्याची जागृती समाजात करावी, हा उद्देश ठेवून त्यांनी असा आगळा-वेगळा गृहप्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांनी घराला ‘संविधान’ हे नाव दिले आहे. संविधानामुळे सर्व जाती-धर्माचे लोक आपले हक्क व अधिकार उपभोगत आहेत. मात्र या हक्क आणि अधिकाराबरोबरच काही कर्तव्ये नागरिकांना पार पाडावयाची आहेत. कर्तव्ये नागरिकांनी समजून घेतली पाहिजेत.
त्यासाठी त्यांना राज्य घटनेची माहिती झाली पाहिजे. संविधानाची जागृती, त्याचा प्रसार, प्रचार आणि अंगीकार या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन गोवळकर बंधूंनी केले होते. सातत्याने संविधानाबद्दल समाजात जागृती व्हावी, यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. या कार्यक्रमासाठी अंनिसच्या राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे, राज्य चिटणीस नितीनकुमार राऊत यांच्यासह अंनिसचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते राहुल पोकळे यांनी भारतीय संविधानाबद्दल आणि अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत मार्गदर्शन केले. गोवळकर कुटुंबीयांनी आंब्याचे रोप आणि लेखक गोविंद पानसरे यांचे एक पुस्तक उपस्थितांना भेट दिले.