‘जाता जात नाही ती जात’ ही जातीची नकारात्मक; पण खेदाने वास्तवदर्शी व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करणार्या जातिअंताच्या लढ्यातील कार्यकर्त्यांसाठी एका प्रभावी माध्यमाची जोड देणे, हे यंदाच्या व आगामी विवेक महोत्सवाचे प्रमुख प्रयोजन होते आणि असेल. कारण जात ही संकल्पना देखील एक अंधश्रद्धाच आहे; पण या अंधश्रद्धेचा पगडा समाजमानसावर गहिरा आहे. महाराष्ट्र अंनिस व आटपाट यांनी आयोजित ‘विवेक’ लघुपट स्पर्धेला गेल्या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदा ‘जात’ हा विषय घेऊन पुन्हा स्पर्धा घेण्यात आली. यंदा 53 लघुपट स्पर्धेत उतरले. तुलनेने ही संख्या कमी वाटली, तरी या विषयाचे एकंदर ज्वलंत; पण त्याचवेळी अस्पृश्य स्वरूप लक्षात घेता इतक्या जणांनी या विषयास भिडण्याचा प्रयत्न केला, ही सकारात्मकच बाब आहे.
’जाता जात नाही ती जात’ ही जातीची नकारात्मक; पण खेदाने वास्तवदर्शी व्याख्या बदलण्याचा प्रयत्न करणार्या जातिअंताच्या लढ्यातील कार्यकर्त्यांसाठी एका प्रभावी माध्यमाची जोड देणे, हे यंदाच्या व आगामी विवेक महोत्सवाचे प्रमुख प्रयोजन होते आणि असेल. कारण जात ही संकल्पना देखील एक अंधश्रद्धाच आहे; पण या अंधश्रद्धेचा पगडा समाजमानसावर गहिरा आहे. महाराष्ट्र अंनिस व आटपाट आयोजित ’विवेक’ लघुपट स्पर्धेला गेल्या वर्षी अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदा ’जात’ हा विषय घेऊन पुन्हा स्पर्धा घेण्यात आली. यंदा 53 लघुपट स्पर्धेत उतरले. तुलनेने ही संख्या कमी वाटली, तरी या विषयाचे एकंदर ज्वलंत; पण त्याचवेळी अस्पृश्य स्वरूप लक्षात घेता इतक्या जणांनी या विषयास भिडण्याचा प्रयत्न केला, ही सकारात्मकच बाब आहे- ही चळवळीशी जोडून घेतलेल्या सोनाली कुलकर्णी या विचारी व संवेदनशील अभिनेत्रीची प्रतिक्रिया आश्वासकच. जातवास्तवाबद्दल कोणीच बोलण्यास तयार नसताना या विषयास वाहिलेला महाराष्ट्र अंनिसचा हा रचनात्मक उपक्रम आहे, असे कौतुकोद्गार काढत या विषयावर आलेल्या सर्व फिल्म्स पाहून त्याचे आशय विश्लेषण करून एक पुस्तकही प्रकाशित करावे, अशी रचनात्मक सूचनाही विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी केली आहे. अर्थातच, पुढच्या वर्षीही हाच विषय असणार आहे, याचे सूतोवाच अध्यक्ष अविनाश पाटील यांनी अगोदरच केलेले आहे. ज्युरी या भूमिकेतून मला जाणवलेल्या काही पुरस्कारविजेत्या आणि दखलपात्र लघुपटांविषयी-
कालानुक्रमे सत्ताबदलानुसार निर्माण झालेली आणि आता पुन्हा तडे बसू लागलेली जातीय उतरंड आणि तिचा समाजजीवनावरील परिणाम वाळू कलेच्या (सॅण्ड आर्ट) माध्यमातून मांडण्याचा कलात्मक असणारा सखोल आशयपट ’उतरंड’ (दि. आनंद शिंदे / मुंबई ) हा विलक्षण प्रयोग सर्वोत्कृष्ट लघुपट (खुला गट) ठरला; शिवाय यातील वाळू कलाकार मच्छिन्द्र शिंदे यास विशेष ज्युरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (अर्थात, यात शेवटी येणार्या बाळबोध उपदेशात्मक टेक्स्टची गरज नव्हती. संदेशपट जरी असला तरी संदेश हा दृक्-श्राव्य माध्यमातून सबटेक्स्ट द्वारे झिरपायला हवा. अर्थात, ही अनेक लघुपटांमधून नेहमीच प्रत्ययास येणारी अडचण आहे.)
कथेतील मध्यवर्ती शाळकरी मुलगा असणार्या दलित व्यक्तिरेखेचे संगोपन ज्या परिस्थितीत घडते, ती तपशीलवार दाखवत होणारी सुरवात (जातीय समाजव्यवस्थेचे अनेक पैलू दाखवत घर ते शिक्षणातील उतरंड देखील) शाळेतील लहान मुलांमध्ये सहजभावाने घडणार्या रोटीव्यवहारातून सकारात्मक बदलाची दिशा दाखविणारा विद्यार्थी दशेतील एक स्पृहणीय प्रयत्न. ’जाणीव’ (दि. मल्हार जोशी, सह दि. श्रीराम मोहिते, कथा- अमोल कांबळे/ कोल्हापूर) हा सर्वोत्कृष्ट लघुपट (विद्यार्थी गट) ठरला. शाळेत डब्यांचे एकत्र येणे या तरल टप्प्यावरही फिल्म संपवता आली असती; मात्र येथून पुढे ती थोडीशी ताणत, जरी त्यातील आशयविस्तार ध्यानी घेतला तरी, उगीचच गुडी-गुडी केलेली आहे. आणि त्या टप्प्यावर मग आणखी काही प्रश्नही निर्माण होतात.
माहितीपटांच्या वेगळ्या फॉर्ममधून जरी ’कलर्स ऑफ इंडिया’ (दि. योगेश पाटील/ जळगाव ) मध्ये जातिव्यवस्थेवर प्रत्यक्षपणे भाष्य नसले तरी अन्वयाने सूचन मात्र आहे. हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला. (एकूणच माहितीपट संख्येने व दर्जानेही खूपच कमी होते. अनेकांचा कॅटेगरी लिहितानाही गोंधळ जाणवला. त्यांनी फिक्शन व माहितीपट यातील फरक अभ्यासायला हवा. हे खूपच बेसिक आहे.) ’लिगसी ऑफ पेन’(दि. भूषण खोडके/ औरंगाबाद ) या लघुपटातही प्रत्यक्षपणे नसले तरी अप्रत्यक्षपणे भाष्य झाले आहे. इव्हेंटी स्वच्छता मोहिमेशी, प्रत्यक्षात काम करणार्या सफाई कामगाराची विदारक स्थिती र्क्षीुींरिेीश करत व्यवस्थेचा फोलपणा दाहकतेने भिडवला आहे.
दिसणे आणि भूमिका काय घेतो, यावरून एखाद्या व्यक्तीची जात काढण्याच्या, ठरवण्याच्या सुलभ आकलन पद्धतीला विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित ’फेस टू फेस’ (दि. योगेश मेहेंगे/ अमरावती) मधून नाट्यमयरित्या फटकारलंय. सुरुवातीस हे निव्वळ चर्चानाट्य आहे की काय? असा वैताग वाटणार, तितक्यात या चर्चेचा प्लॉट-डिव्हाइस म्हणून वापर असा अनपेक्षित धक्का बसतो. महापुरुषांचे पुतळे ते प्रॉडक्ट व्हाया जातनिहाय पोकळ अस्मिता; तसेच जातनिहाय सॉफिस्टिकेटेड विकृती या पार्श्वभूमीवर मूर्तिकाराची विद्रोही; पण संयत मार्मिक कृती असणारा ’पुतळा’ (दि. गणेश धोत्रे/ सातारा) हा लघुपट विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित झाला.
’एनलायटन’ (दि. ओमेय साठे/ सातारा) मध्ये दलित जातींमधीलही अंतर्गत उतरंड आणि दुफळी; तसेच राजकारण या सार्याचे दर्शन घडवले आहे. ’क्षमस्व’ (दि.अमित पवार/ मुंबई ) मध्ये एक सवर्ण उच्चशिक्षाविभूषित तरुण विवाहजुळणी संस्थेत जातो. तेव्हा कोणतीही जात चालेल, असे सांगतो; पण परत मागे येऊन मात्र अमुकतमुक जाती क्षमस्व असे सांगतो. ’द क्वेश्चन’(दि. आकाश बोकमुरकर/ कोल्हापूर ) मध्ये जातीच्या दाखल्याची आठव करून देत भारताची प्रतिज्ञा शाळेत सुरू होते. ’इसी बात का डर है’ (दि. शिरीष पवार/ मुंबई) मध्ये एक बाप (राजकुमार तांगडेचा अभिनय नोंदणीय, अर्थातच) आपल्या मुलास शाळेत प्रवेश घेण्यासाठी घेऊन जातो, तेव्हा जात विचारल्यावर सुरुवातीस गांगरतो आणि शेवटी ‘भारतीय’ अशी जात सांगतो. कार्यकर्ता गटातून ’ब्रेकिंग न्यूज’ (दीपरत्न निलंगेकर/ लातूर ) ला प्रोत्साहनपर विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला.
अॅनिमेशन गटात एकही फिल्म आली नव्हती. महागड्या फीसकट उघडलेल्या इतक्या अॅनिमेशनच्या क्लासेसमधून नेमके काय बाहेर पडत आहे, याचा एक वेगळाच लेखाजोखा होण्याची गरज आहे. खरे तर अशा स्पर्धांतील अवकाशाचा विद्यार्थ्यांना असाइनमेंट देऊन प्रॅक्टिकलच्या दृष्टीनेही फायदा करून घ्यायला हरकत नव्हती. असो.
पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश या तडफदार अधिकार्याची परिवर्तनवादी विचारांशी असलेली आपुलकी त्यांनी साधलेल्या ओजस्वी संवादातून व्यक्त झाली. त्यांनी जातव्यवस्थेविरोधातील कवितांचाही त्यांच्या व्याख्यानात प्रभावी वापर केला. पत्रकार मुकुंद कुळे यांचे जातवास्तवासंबंधीचे स्वानुभवाचे बोल सांस्कृतिक वर्चस्ववादाचे पोल खोलणारे ठरले. पत्रकार हेमंत देसाई यांनी आजवरच्या सिनेमातील जातवास्तवाचा आढावा घेतला. याशिवाय महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक केंद्राच्या सचिव मीनाक्षी पाटील आणि पु. ल. अकादमीचे संचालक संजीव पाळंदे यांचीही प्रोत्साहनपर मनोगते झाली.
सर्वसाधारणपणे अशा स्पर्धांसाठी विषय नेमून देऊ नयेत. मात्र हा नियम ‘अंनिस’सारख्या परिवर्तनवादी चळवळी जेव्हा स्पर्धा-महोत्सव आयोजित करतात, तेव्हा गैरलागू करता येतो. अर्थात, स्पर्धकांपैकी ज्यांना गरज असेल त्यांना जात या विषयाचे ओरिएन्टेशन करून देण्यासाठी एखादी कार्यशाळा घेता आल्यास उत्तमच, असे आयोजकांइतकेच मलाही वाटते. ज्युरीप्रक्रियेदरम्यान तर ही बाब विशेषत्वाने जाणवली. अर्थात, विषय नेमून न दिलेल्या अन्य महोत्सवातही प्रत्ययी येणार माझा ज्युरी म्हणून अनुभवसार-
एखाद्या विषयावर लघुपट बनवताना आपल्याकडे संशोधनाची गरज असते, हेच विसरले जाते. विषय व आशय यात फरक आहे, हे समजून न घेता अतिशय ढोबळ पद्धतीने आणि लश्रळलहश (क्लीचे / वापरून वापरवून गुळगुळीत झालेली युक्ती) पद्धतीने कथानक निवडले जाते. यात आशयभान आढळतच नाही. त्यामुळे अनेकदा चांगल्या संकल्पनेचेही मातेरेच होते. विषयाशयानुसार ज्या फॉर्ममधून कथन करायचे आहे, त्यासाठी नेमक्या तंत्रभाषेचा वापर न करता काहीतरी फिल्मी मांडणी केली जाते. अभिनय, संवाद खूपच फुटकळ राहतो. ध्वनिसंगीताचा वापर नेमकेपणाने न होता अतिशय सरळधोपट पद्धतीने होतो.
स्पर्धेतील निवडक लघुपट पु. ल. अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे दाखवण्यात आले, तेव्हा उपस्थित असणारे लढवय्ये माहितीपटकर्ता आनंद पटवर्धन यांनी हे दहाही लघुपट पाहून अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना ज्युरी म्हणूनही सहभाग घेतल्याच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या ‘विवेक’मधील लघुपटांची निवड त्या दर्जाचीच आहे, अशी प्रशस्तिपर प्रतिक्रिया व्यक्त केली, ही ‘विवेक’च्या दर्जावर शिक्कामोर्तब करणारी बाब आहे. हे दहा लघुपट यंदा पुन्हा देशभर दाखवले जातील. त्यानिमित्ताने ‘जातव्यवस्था’ या विषयावर घुसळण घडत राहील. लघुपटांमधून जातिअंताच्या दिशेने विवेकाचा जागर घडत राहील…
– डॉ. अनमोल कोठाडिया
मोबा. – 9145604445
cineanmol@yahoo.co.in