Categories
कार्याध्यक्षांची डायरी

विस्तारणारी क्षितिजे कवेत घेताना…

वार्षिकांक - २०१७

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र विशेषांकाच्या निमित्ताने आपणाशी संवाद साधताना आनंद होत आहे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला आता जवळपास 52 महिने म्हणजे सव्वाचार वर्षांचा कालावधी लोटला आहे. आभाळच कोसळल्याचं दु:ख, वेदना, संताप, पोरकेपणाची भावना, निराशा, हतबलता; तरीही कामाचा जोश केवळ बौद्धिकच नव्हे, तर भावनिक गुंतवणूक, कामात सातत्य, प्रचंड ऊर्जा अशा संमिश्र भावना आणि दृष्टिकोनाचा हा काळ. खूप भयंकर परीक्षा घेतली या काळाने; पण संघटनेने अशा मोठ्या हिमतीने हा काळ लढवला. हो… अक्षरश: लढवलाच. मागे वळून पाहतोय तर… संघटनेने स्वत:च केलेल्या कामाने अवाक् व्हावं एवढं काम झालं. या काळातही संघटना निर्धारपूर्वक आणि खंबीरपणे उभी आहे, सर्वार्थाने वाढते आहे; विस्तारते आहे ही देखील आता सर्वमान्य झालेली गोष्ट आहे. राज्य नाही आणि देशही नाही, तर जगभर या गोष्टीची नोंद घेतली गेली. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी कुशलतेने उभारलेल्या या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या संयमी; आणि तरीही कृतिशील बाण्याला याचं श्रेय जातं. कार्यकर्त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशा संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून माझ्या मनात याबाबत अत्यंत समाधानाची आणि अभिमानाची भावना आहे.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर जादूटोणाविरोधी कायदा अध्यादेशाने लागू झाला. नंतर संघटनेच्या प्रयत्नातून पुढच्या हिवाळी अधिवेशनात कायदा म्हणून अस्तित्वात आला. हा कायदा नंतर संघटनेने राज्यभर नेला. यासाठी काढलेल्या ‘संवाद यात्रे’ने 85 दिवसांत 33 जिल्ह्यांतून 10 हजार 450 किलोमीटरचा प्रवास करत, राज्याच्या कानाकोपर्‍यात कायदा कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय पोचवला. आज या कायद्यांतर्गत साडेचारशेच्यावर खटले दाखल झालेत. त्यातील 10 खटल्यांचे निकाल लागून शिक्षाही झाल्यात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कायदेविषयक गटासोबत व ‘बार्टी’सोबत बसून संघटनेने या कायद्याचे नियम तयार करण्याच्या कामातही पुढाकार घेतला आहे. त्याच पद्धतीने दुसरा कायदा संघटनेने लढवून मिळवला तो म्हणजे सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा. जातपंचायतीला मूठमाती अभियान वेग धरू लागलं. नाशिकला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या उपस्थितीत त्याची पहिली परिषद झाली. त्यानंतर संघटनेने हा विषय लढवला. पुणे, मुंबई, अहमदनगर, नाशिक, जळगाव आणि कोकणातून मोठ्या प्रमाणावर जातपंचायतीच्या केसेस संघटनेकडे येऊ लागल्या. त्यांच्या वेदना जातपंचायतीला मूठमाती परिषदांमधून पुढे आल्या. या विषयाचा पाठपुरावा करीत संघटनेने दुसरा कायदा पदरात पाडून घेतला. आज संघटनेच्या प्रयत्नातून त्याचे एकूण पंधरा गुन्हे दाखल झाले आहेत आणि तेवढ्याच संख्येतील घटना आज संघटनेकडे तक्रार म्हणून आलेल्या आहेत. हा कायदा देखील महाराष्ट्रभर पोचविण्याचं नियोजन संघटनेत सुरू आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही कायदे केवळ आणि केवळ संघटनेच्या रेट्यातून, चिवटपणे केलेल्या पाठपुराव्यातून अस्तित्वात आले आहेत. दोन्ही कायद्यांची उपयुक्तता काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली आहे. यातील आवर्जून नोंदविण्याची बाब म्हणजे या कायद्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत डॉ. दाभोलकरांना 18 वर्षेसंघर्ष करावा लागला. त्या कायद्याच्या निमित्ताने अत्यंत विखारी, विपर्यस्त आणि प्रसंगी विकृत टीका सनातनी प्रवृत्तींनी केली. त्यातील विरोध किती हास्यास्पद आणि बुद्धिपुरस्सर होता, हेही आता दाखल गुन्ह्यांवरून सिद्ध झाले आहे. हे दोन्ही कायदे करणारे महाराष्ट्र भारतातील पहिले आणि पथदर्शी राज्य ठरले आहे. नजीकच्या कर्नाटक राज्यात देखील जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात येत आहे. त्यासाठी देखील महाराष्ट्र अंनिसने तेथील सहकार्‍यांच्या मदतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. आणखी किमान अर्धा डझन राज्यांमध्ये या स्वरुपाचा कायदा व्हावा म्हणून महाराष्ट्र अंनिसचे त्या-त्या राज्यातील समविचारी मित्र नियमित संपर्क, संवादातून प्रयत्न करीत आहेत.

संघटनेच्या नियमित उपक्रमांसोबतच रिंगणनाट्य, जोडीदाराची विवेकी निवड, जादूटोणाविरोधी कायदा प्रबोधन, जातपंचायतीला मूठमाती अभियान आणि मानसमित्र या उपक्रमांनी संघटनेला एकाचवेळी प्रबोधन आणि लढाऊपणाचं बळ दिलं. यातून वेगवेगळ्या जनसमूहांशी संघटना जोडली गेली. जवळपास पन्नास लाख रुपये किमतीचे स्वत:च्या मालकीचे ‘डिजिटल तारांगण’ मुलांना अवकाशाची सफर घडवित आहे. त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवित आहे. यासाठीचा निधी संघटनेने उदार मदतीतूनच मिळविला. कामाप्रती एवढी प्रचंड विश्वासार्हता आणि सहानुभूती संघटनेने मिळविली आहे, याचा मला विनम्र अभिमान वाटतो. संघटनेचा एक प्रमुख उपक्रम असलेले अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मुखपत्राने देखील साहित्यिक क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. दरमहा नियमित प्रसिद्ध होणार्‍या वार्तापत्रातील निवडक लेखनाने प्रत्येकी पाच पुस्तकांचे तीन खंड प्रकाशित केले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर स्वतंत्र साहित्यसंमेलन केले. या विविध उपक्रमांच्या माध्यमातून संघटनेच्या कार्यकक्षा दिवसेंदिवस विस्तारत आहेत.

या सर्व कामांची दखल समाज घेतच असतो. ठिकठिकाणी स्थानिक-जिल्हापातळीवर कार्यकर्त्यांना, समितीला अनेक पुरस्कार वर्षभर मिळाले; मात्र देशपातळीवर दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘प्रफुल्ल बिडवाई स्मृती पुरस्कार’ आणि आय. एच. यू. ई. या जागतिक पातळीवरील विवेकवादी संघटनांच्या कोरमतर्फे लंडन येथे डॉ. नरेंद्र दाभोलकरांना समितीच्या कामाबद्दल या वर्षी देण्यात आलेला मरणोत्तर विशेष पुरस्कार यांचा उल्लेख करावाच लागेल.

विविध राज्यांतून कार्यक्रमांसाठी, शिबिरांसाठी निमंत्रणे सुरू आहेत. या निमंत्रणांतून संघटनेचे पदाधिकारी मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, आसाम, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा अशा विविध राज्यांमध्ये जाऊन आले. अत्यंत धोका पत्करत वाचकांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्र अंनिससारखे विविधांगी आणि शासनाच्या अनुदानाशिवाय केवळ लोकाधारावर काम करणारे दुसरे संघटन देशात नाही. अंधश्रद्धा या विषयावरची आपली तज्ज्ञता तर निर्विवाद आहे. हा सर्व अनुभव उत्साह वाढविणारा आणि वाढत्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.

संघटनेची सध्या वार्षिक सभासद नोंदणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेला आम्ही या वर्षी प्रथमच ऑनलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आणि काय आश्चर्य, केवळ दोन दिवसांत दोन हजार लोकांनी संघटनेत सभासद होण्यासाठी अर्ज भरलेत. हे अर्ज भरलेल्या व्यक्तींत 72 टक्के सभासदांचं सरासरी वय हे केवळ 32 आहे. याचा अर्थ तरुणाई फार मोठ्या संख्येने संघटनेचं काम करू इच्छिते, ही आजच्या स्थितीला सामाजिक चळवळीतील अपवादात्मक आणि संघटनेसाठी अत्यंत आश्वासक अशी बाब आहे. सर्व स्तरावर आज संघटनेच्या कार्यकर्त्यांना मागणी आणि सन्मान मिळतोय. सर्व माध्यमे कामाची आवर्जून दखल घेत आहेत. पुण्यातील खुनाच्या जागेवरील म्हणजे शिंदे पुलावरील आंदोलन आजही अखंडितपणे सुरू आहे, त्याचीही नोंद घेणे माध्यमांनी आवर्जून सुरू ठेवलेय, संघटनेला हितचिंतकांकडून मिळणारी आर्थिक मदत त्याच विश्वासाने सुरू आहे; किंबहुना नवनवीन ठिकाणांहून, नव्या लोकांकडून मदत मिळतेय. ‘आम्ही काम करू इच्छितो’, ‘आम्ही मदत करू इच्छितो’, असे फोन सातत्याने येत आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा अशाच एका वार्षिकांकातील लेख खूप गाजला होता, लेखाचं शीर्षक होतं, ‘हे सारे कुठून येते?’ त्यात संघटनेत गटबाजी नाही, जातीपातीचं राजकारण नाही, हेवेदावे नाहीत, आर्थिक ताण नाही, भांडणं नाहीत, कार्यकर्तेव्यसनी नाहीत, हे कसं जुळवून आलं, याबद्दल आनंद व्यक्त केला होता. आजही संघटनेनं आपलं हे वैशिष्ट्य अबाधित ठेवलं आहे. एक समाधान आणि आनंद वाटावा, अशी संघटनेची स्थिती आहे.

कोणत्याही नेत्याला हेवा वाटावा, अशी ही स्थिती आहे; पण नेतृत्वाला संपूर्ण समाधानी असून कसं चालेल? या अनुकूलतेला संघटना वाढविस्तारात परावर्तित करणं, असलेली मागणी पूर्ण करणं हे एक नवं आव्हान संघटनेला आता पेलायचं आहे. आता संघटनेपुढे वैचारिक वाढविस्ताराचं आव्हान नाही. डॉक्टर हयात असतानाच त्याबाबतचे संघटनेचे पुरसे वैचारिक भरणपोषण झालेले आहे. त्यामुळे विचारांची संघटनात्मक समज आणि व्यवस्थापकीय कौशल्ये असलेली कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचं आहे. कार्यकक्षावाढीची संधी दुहेरी आहे. भौगोलिक दृष्ट्या विस्तारासाठी परराज्यातून कामाची विपुल मागणी आहे. अनेक राज्यांत तर संघटनेच्या सुरुवातीच्या काळातील चमत्कार सादरीकरण, बुवा-बाबांचा पर्दाफाश आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार हे देखील खूप आहे. दुसर्‍या बाजूला, अंधश्रद्धेच्या प्रांतात अलिकडच्या काळात उदयास आलेली आध्यात्मिक बुवाबाजी, भ्रामक विज्ञान, मानसिक आरोग्याचे प्रश्न यांच्याशी लढण्याची तयारी आहे. यासोबतच व्यापक परिवर्तनाशी जोडून घेत विवेकी नागरिकत्वाची जडणघडण, संविधान मूल्यांची रुजवण करीत लोकशाही बळकट करणे यासाठी प्रबोधन आणि नवनवीन कृतिकार्यक्रम हाती घेण्याची संधी आहे. त्यासाठी आधुनिक जगाची भाषा असलेल्या समाजमाध्यमांचा योग्य व पर्याप्त वापर करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तंत्रज्ञानस्नेही होणं, संवाद कौशल्य, मराठीतर भाषांवर प्रभुत्व मिळवणं किंवा अन्य भाषांमधून वाचन, लेखन, संभाषण करता येणारे कार्यकर्तेजोडणं, समाजातील विभिन्न घटकांपर्यंत पोचवण्यासाठीचे सॉफ्ट स्किल्स डेव्हलप करणं, ज्या समाजघटकांची अंधश्रद्धांच्या शोषणातून मुक्तता करावयाचे आव्हान आहे, त्या ग्रामीण कष्टकरी, बहुजन, दलित, आदिवासी समाजापर्यंत पोचणं आणि त्यासाठी मदत करू शकतील, अशा शहरी मध्यमवर्गीय, इंटेलेक्चुअल्स घटकांचा जास्तीत जास्त सहभाग व पाठिंबा मिळवणं हे काम उभं करावयाचं आहे. त्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. यासाठी सहकार्‍यांमध्ये याबद्दलची समसमान समज विकसित करावी लागेल. दृष्टिकोन निर्माण करावा लागेल, यासाठी आपण सघन प्रयत्न जाणीवपूर्वक करीत आहोत.

नेतृत्व म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करताना माझ्या काही भूमिका आणि दृष्टिकोन आहेत. या चार वर्षांच्या काळात मी व्यक्तिगत पातळीवरही खूप काही अनुभवले. मनाला उभारी देणारे आणि वेदना देणारे अनुभवही माझ्या वाट्याला आले. तसे ते सर्वांच्या वाट्याला येतात; पण माझी परिस्थिती जरा अवघडच होती. मी प्रथमच या विषयावर व्यक्त होत आहे. साधारणपणे असे व्यक्त होणे माझा स्वभाव नाही; पण मला वाटतं ही वेळ आणि जागा यासाठी योग्यच आहे. डॉक्टरांच्या उपस्थितीतच जवळपास साडेतीन वर्षेआधी राज्याच्या कार्याध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आली. डॉक्टरांच्या आणि माझ्या कार्यपद्धतीत आणि दृष्टिकोनात काही वेगळेपणं होतं; पण मी कधीही त्याबाबत आग्रही राहिलो नाही. अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर एवढं डॉक्टरांचं व्यक्तिमत्त्व मोठं होतं. अशा परिस्थितीत तुम्हाला अवकाश मिळणं अर्थातच, कठीण होतं. मला मान-सन्मान, स्वीकारार्हता भरपूर मिळाली; पण संधी आणि अवकाश या बाबतीत मी समाधानी नव्हतो आणि जेव्हा संधी आणि अवकाश मिळाला म्हणजे डॉक्टरांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या अवघड व आव्हानात्मक परिस्थितीत; अशा परिस्थितीत हा अवकाश मी वापरू शकलो नाही. तशी स्थितीच नव्हती. मी कमीपणा घेत; प्रसंगी स्वत: मागे, संकोची राहत, तडजोडी स्वीकारत कोणत्याही परिस्थितीत काम न थांबता पुढे जात राहावे एवढा एकच ध्यास ठेवला.

तुमची इच्छा असो वा नसो; नेतृत्वाची तुलना हा प्रकार अटळ असतो. याला मी कसा अपवाद असणार? स्वाभाविकपणे माझी आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांची तुलना होताना मला कधी ऐकायला, तर कधी अनुभवायला मिळतं. यावर मी काय सांगावे? याचं उत्तर तर डॉक्टर दाभोलकरांनीच देऊन ठेवलं होतं. ते म्हणायचे, ‘कोणत्याही चळवळीत किंवा आंदोलनात पहिल्या स्थापनेतल्या नेतृत्वाला समाजाकडून जे मिळतं म्हणजे संधी, मान्यता, लौकिक, प्रतिष्ठा वगैरे ते नंतरच्या नेतृत्वाला कधीच मिळत नाही.’ यासाठी ते बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण द्यायचे आणि म्हणायचे, ‘जे बाळासाहेबांना मिळालं ते राज किंवा उद्धव यांना मिळणं शक्य नाही.’ ही एक बाजू झाली आणि दुसरी नेतृत्वाची क्षमता, दृष्टिकोन आणि कार्यपद्धतीतील वेगळेपणाबाबतची आहे.

संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून माझ्या पूर्ण क्षमतेने मी या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. याबद्दल संघटनेत आणि संघटनेबाहेरही मला खूप आदर मिळाला. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांबरोबर तुलना होण्याइतका मी मोठा खचितच नाही; पण माझ्या संघटनेने मला सतत एका नेत्याचा सन्मान आणि सर्वमान्यता दिली आहे. याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे. राहिला दुसरा मुद्दा. कामाच्या बाबतीत मी संघटनेचा दोलक राज्यपातळीवर सतत हलता ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि व्यक्तिगत करिष्म्यावर आता संघटना उभी राहू शकत नाही किंवा तसा प्रयत्न करणं धोक्याचं आहे, याची मला जाणीव आहे. म्हणून माझा भर हा सामूहिक नेतृत्व उभे करण्यावर राहिला आहे. अधिक विकेंद्रित कार्यपद्धतीचा मी सतत पाठपुरावा करीत आलोय. वेगवेगळ्या आघाड्यांवर आवड आणि क्षमतेप्रमाणे कार्यकर्त्यांना संधी देणे, त्यांना जागा तयार करून देणे, त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव देणे आणि त्यांना अनुयायीत्वाच्या भावनेतून बाहेर काढून सहकारीत्वाच्या भूमिकेत आणणे, यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो. यात कधी खूपच यशस्वी झालो, तर कधी माझ्या अपेक्षेप्रमाणे काम झालंही नाही; पण निराश न होता हे सतत करीत राहावं लागेल, हे मात्र नक्की. हा…. मोकळेपणानं संवाद साधण्याच्या बाबतीत माझ्या व्यक्तिमत्त्वाची मर्यादा मला मान्य आहे. स्वत:च्या भावना शब्दांत बोलून व्यक्त करणे माझ्या स्वभावात नाही. साधारणपणे कामाबाबतच संवाद घडतो, तसा थोडा रूक्ष वाटावा, असा माझा स्वभाव आहे; पण आता या वयात स्वत:त कृत्रिम बदल घडविणे शक्य नाही.

नेतृत्वाचे वेगळेपण काय असते? किंवा काय असावे? सध्या नेतृत्व म्हणजे काय समजले जाते, तर धाडसी वृत्ती आणि कोणत्याही कठीण प्रसंगी स्वत:हून पुढाकार घेण्याची तयारी; पण मला वाटते, संघटनेत नेतृत्वापेक्षा पालकत्वाच्या भूमिकेतून काम करायचे असते. व्यक्तिगत अभिनिवेषाच्या कार्यक्रमातून बाहेर पडत संघटनेच्या विचारकृतीला आवश्यक, पोषक, संवर्धक कामाला प्राधान्यक्रम द्यायचा असतो. स्वत:च काम करण्यापेक्षा काम करणारी यंत्रणा उभी करायची असते. त्या यंत्रणेसाठी आपला वेळ, श्रम द्यायचे असतात. स्वत:च एकटे प्रवक्तेपण करण्यापेक्षा प्रवक्ते तयार करण्याचं काम नेत्याकडून अपेक्षित आहे. ही आहे पालकत्वाची जबाबदारी, नेतृत्वाचा खरा कस यातच लागतो, असा माझा अनुभव आहे.

आज राज्यात वाढीच्या संधी आहेतच; पण परराज्यातून संवाद, वाढ आणि विस्ताराच्या संधी सातत्याने संघटनेच्या द्वाराशी धडका मारीत आहेत. ही संधी सोडून देणं करंटेपणाचं ठरणार आहे. ही वेळ जर आपण गमावली, तर नंतर अशी वेळ आपल्याला मिळणार नाही. म्हणून परराज्यात सतत जात राहणं, संवाद साधत राहणं, तेथील माहोल, सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घेत वाढ विस्ताराच्या संधी घेणं मला फार आवश्यक वाटतं. त्यानिमित्ताने संघटनेत नव्या युवकांना सोबत घेत त्यांना नवा अनुभव देणंही मला महत्त्वाचं वाटतं. कारण हे पुढचं आव्हान त्यांनाच पेलावं लागणार आहे. त्यासाठी थोडा अधिकचा खर्च होत असेल, तर हरकत नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर अशा खर्चाला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणायचे. ही आपली संघटनेसाठीची भविष्यकालीन गुंतवणूक आहे, अशी त्यांची भूमिका होती. तीच माझीही भूमिका आहे. संघटनेची आजची मान्यता जर आपण पुढील वाढविस्तारासाठी वापरू शकलो नाही, तर भविष्यकाळात आपल्याला अशी संधी मिळणार नाही; मग पुढचा प्रश्न तयार होतो तो हा की, आपण परराज्यात संघटना नेणार का? तर आज या उत्तराचीही घाई नको; पण आपल्यासारख्या काम करू इच्छिणार्‍या मित्रांना आपण जोडून घेऊ इच्छितो. त्यांना मदत आणि मार्गदर्शन करू इच्छितो; पण यासाठी संघटनेला स्वत:त देखील खूप गुंतवणूक करावी लागेल, याची मला जाणीव आहे.

आणखी एक मुद्दा, आपल्या परिघावरील विषयांवर काम करणार्‍या साथींच्या सोबत आपण काही कृती करावी का? याबाबतचा आहे. गेले वर्षभर आपण दारूबंदीच्या लढाईत उतरलो आणि त्यांच्या संघटनात्मक बांधणीतही आपला वेळ, श्रम, शक्ती वापरली. खरं तर आपल्या कामाच्या चतु:सूत्रीत चौथे सूत्र हे समविचारी संस्था-संघटनांशी स्वत:ला जोडून घेणे हेच आहे. या जोडून घेण्याने एका नव्या कार्यक्षेत्रात आपल्याला प्रवेश मिळतो. यातून आपणच संघटना म्हणून समृद्ध होत जातो. आपल्या कार्यकर्त्यांनाही काही कालावधीनंतर कामातील तोचतोचपणा संकुचित वाटू लागतो. अशा वेळी व्यापक व्यवस्था परिवर्तन हे सूत्र कायम ठेवत त्याला आवडीचे वेगळे काम मिळण्याचे नवे दालन खुले होते. दारूबंदी हा विषय उदाहरणादाखल घेतला, तर याबद्दल प्रचंड सोसावं लागतं. त्यातून आलेला असंतोष आणि घुसमट असलेला एक मोठा वर्ग विशेषत: महिला वर्ग आपल्या कामाशी जोडला जाण्याची शक्यता वाढते, अशी माझी याबाबतची भावना आहे.

अनेक समविचारी मित्रांमध्ये वावरताना देशभर निराशेचं वातावरण असल्याचं बोललं जातं. विशेषत: राजकीय परिस्थिती अधिकच बिकट असल्याचे म्हटले जाते. याबाबत माझी भूमिका ही संवादी राहण्याची आहे. संवादी राहून संघटनेच्या भूमिकांना पाठिंबा मिळवत आपण विषय पुढे नेणं हे अधिक उपयुक्त आहे, असा माझा अनुभव आहे. कोणतीही व्यक्ती, व्यक्तीसमूह हा पूर्णत: चांगला किंवा पूर्णत: वाईट नसतो, तर तो चांगल्याचं आणि वाईटाचं मिश्रण राहतो. त्यातील चांगुलपणाला जर तुम्हाला आवाहन करता आलं, तर ते जरूर करायला हवं. हे उभयतांच्या फायद्याचंच असतं. आपण सुधारणांच्या बाजूचे आहोत, ही प्रतिमा त्या समूहांना आवश्यक असते आणि संवादातून विरोधाची तीव्रता कमी होत आपलं काम पुढे जाणं शक्य होतं. ते मी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करतोय. यात मी संवादी राहणं म्हणतोय; लीन होणं नाही.

ज्यांना दीर्घकाळ आणि सातत्यपूर्ण काम करत राहणं गरजेचं असतं, त्यांना भविष्यवेधी विचार करून उपलब्ध साधनांशी गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी काटेकोर योजना आखाव्या लागतात. डॉक्टर नेहमी म्हणायचे की, आपली लढाई ही दशकांची नाही, तर शतकांची आहे. आपण केलेल्या कामाचं यश कदाचित आपल्या पिढीला पाहायलादेखील मिळणार नाही. हे लक्षात घेता सध्या आम्ही संघटनेत ‘मिशन 2025’ ची चर्चा सुरू केलीय. आपण आपल्या संघटनेला 2025 साली कोणत्या रुपात पाहू इच्छितो, त्याचं चित्र रंगवा. त्यावर चर्चा करू आणि त्या ध्येयाच्या दिशेने आपला सर्वांचा प्रवास निश्चित करू, असे त्यामागील विचारसूत्र आहे. जेव्हा संघटनेतील सर्वांचं ध्येय एक होतं, तेव्हा संघटना सर्व अडथळ्यांवर मात करीत एकदिलानं जोमाने पुढे जाते. जादूटोणाविरोधी कायदा किंवा खुनाचा तपास याबाबत संघटनेने हा अनुभव घेतलाय; पण ही चर्चा देखील आमची परीक्षा घेत आहे. आम्ही अनेकदा स्वप्न बघायलाही कचरतो, कंजुषी करतो. याबाबत मी संघटनेच्या विविध विभागांशी चर्चा करीत आहे. राज्य कार्यकारिणीतही याची चर्चा सुरू आहे. हे एक नवे आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे.

आम्ही पुढील दशकाची चतु:सूत्रीही निश्चित केली आहे. भविष्यात मानसिक आजारावर प्रबोधन आणि कृती, आध्यात्मिक बुवाबाजी विरोधाची लढाई, भारतीय संविधानाला अपेक्षित नागरिकत्वाचं भरणपोषण, फसवे विज्ञान आणि उपचार पद्धतीबाबतचे प्रबोधन या विषयांना सर्व पातळीवर पुढे न्यावे लागणार आहे. विचार, कृती, प्रबोधन, संघर्ष, संवाद अशी सर्व माध्यमे वापरून समाजापुढे जावे लागणार आहे. संघटनांतर्गत त्याची तयारी सुरू आहे.

अजून काही पूर्ण न झालेले आमचे संकल्प आहेत. आम्ही जे करायचं ठरवलं; पण अद्याप घडवू शकलो नाहीत. भविष्यात ते आमचे प्राधान्यक्रमाचे विषय राहतील. त्याबाबतही आता सांगायला हवे. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर आणि संघटनेवर एक चांगला माहितीपट बनविण्याचा आम्ही संकल्प केला आहे. त्याबाबत काहींनी आम्हाला विचारणाही केली; पण या दोन्ही गोष्टींच्या दर्जाबाबत अजिबातच तडजोड करायची नाही म्हणून आम्ही कोणाला परवानगी दिलेली नाही; पण आता ते लवकर करायला हवे असे काम आहे. त्याप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा एक चरित्रग्रंथ तयार करण्याचंही आम्ही ठरवलंय. तीही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रचंड शब्द देखील कमी पडावा एवढं या अठ्ठावीस वर्षांतलं संघटनेचं काम आहे. हा दस्ताऐवज नीट संकलित करून संपादित करून जगासमोर मांडावा, असा एक महाप्रकल्प आम्ही ठरवलाय. सातारा येथील शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रशिक्षण केंद्र सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज बनवायचं आहे. डॉक्टरांनी विपुल लेखन केलेलं आहे. ते सर्व हिंदी आणि इंग्रजीत भाषांतरीत करून देशभर पोचवायचं आहे. संघटनेतील युवा हा खूपच आश्वासकपणे काम करीत आहे. त्यांच्या पुढाकाराने संघटनेला सोशल मीडियामध्ये कृतिशील ठेवणं, स्वत:चं यू-ट्यूब चॅनेल चालवणं यातही आम्हाला बरीच गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. असं खूप काही करायचंय. यासाठी पैसाच नाही, तर कौशल्य असलेल्या मनुष्यबळाचीही गरज भासणार आहे. ते उभं करणं हे देखील एक आव्हान आहे. हे आव्हान पेलण्यासाठी संघटनेला नव्या उर्जेची गरज भासणार आहे. जसे व्यक्तीला चरित्र आणि चारित्र्य असतं, तसंच ते संघटनेचंही असतं. संघटनेचं चारित्र्य त्या संघटनेचा इतिहास, वर्तमान आणि स्वभाव असतो. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जशी आमच्या हातात संघटना दिली, कार्यकर्त्यांनी त्या चारित्र्यात भरच घातली आहे. अधिक उजळून ठेवली आहे, यात शंका नाही. यानिमित्ताने मी सर्व वाचकांना विनम्र आवाहन करू इच्छितो की, या संकल्पनांबाबत तुम्हाला जो काही वाटा उचलायचा असेल, तर आम्ही आपले खूप आभारी राहू. कोणत्याही स्वरुपाची मदत किंवा सहभागाचे स्वागतच आहे. या ऐतिहासिक वाटचालीत साथ सहयोग देणार्‍यांप्रती मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे स्वागतच आहे.

-अविनाश पाटील

(राज्य कार्याध्यक्ष) मोबा. 9422790610