–हरिशंकर परसाई
एका राज्यात गोंधळ उडाला की, भ्रष्टाचार खूप पसरलाय.
एक दिवस राजाने दरबारी मंडळींना विचारले़, ‘जनता ओरडायला लागली आहे की, सर्वत्र भ्रष्टाचार पसरला आहे. आम्हाला तर आजपर्यंत कोठेही पाहावयास मिळाला नाही. तुम्हाला कुणाला दिसला असेल तर सांगा. दरबारामध्ये हजर असणारे सर्वच जन म्हणतात़ महाराजांना जर दिसला नसेल तर आम्हाला कसा दिसेल?’
महाराज म्हणाले़, “नाही असं काही नाही. कधी कधी जे आम्हाला दिसत नाही, ते तुम्हाला दिसत असेल. ज्याप्रमाणे मला वाईट स्वप्नं कधीही दिसत नाहीत; परंतु तुम्हाला दिसत असतील.” यावर दरबारी म्हणतात़, “महाराज दिसतात. परंतु महाराज ती स्वप्ने आहेत.” महाराज म्हणाले़, “तरीपण तुम्ही लोक संपूर्ण राज्यात शोधून पाहा की, कुठं भ्रष्टाचार तर नाही ना आणि कुठे मिळालाच तर उदाहरणादाखल आम्हाला पाहण्यासाठी थोडा घेऊन या. आम्हाला पण पाहता येईल की, भ्रष्टाचार कसा आहे ते.” एक सरदार म्हणाला़, “महाराज, तो आम्हाला नाही दिसणार. असं ऐकलंय की, तो खूप सूक्ष्म आहे. आमच्या डोळ्यांना तुमची महानता पाहण्याची एवढी सवय लागली आहे की, आम्हाला सूक्ष्म वस्तू दिसतच नाहीत. (What a चमचागिरी!) आम्हाला भ्रष्टाचार दिसलाच तर त्यात तुमचंच रूप पाहावयास मिळेल. कारण आमच्या डोळ्यांत तर तुमचीच मूर्ती बसलेली आहे. पण आपल्या राज्यात एक जात आहे, ज्यांना विशेषज्ञ म्हणून ओळखले जाते. या जातीजवळ असं काजळ आहे की, जे डोळ्यांत घाल्यावर सूक्ष्मातिसूक्ष्म वतूही पाहू शकतात. माझी विनंती आहे की, या विशेषज्ञांनाच भ्रष्टाचार शोधून काढण्याचं काम दिलं जावं. राजाने विशेषज्ञ जातीची पाच लोकं बोलावली आणि सांगितल़ं, “असं ऐकतोय की, आमच्या राज्यात भ्रष्टाचार पसरला आहे. परंतु त्याचं ठिकाण कोठे आहे सापडत नाही. तुम्ही त्याचं ठिकाण शोधून काढा आणि सापडलाच तर त्याला पकडून आमच्याकडे घेऊन या. जर भरपूर असेल, तर उदाहरण म्हणून थोडासा घेऊन या.”
विशेषज्ञांनी त्याच दिवसापासून तपासाला सुरुवात केली.
दोन महिन्यांनंतर ते पुन्हा दरबारात हजर झाले.
राजाने विचारले़, “विशेषज्ञांनो तुमचा तपास पूर्ण झाला?”
“होय महाराज!”
“खरंच़, तुम्हाला भ्रष्टाचार मिळाला?”
“होय. खूप मिळाला.”
राजाने हात पुढे केला. “आणा इकडे. मला दाखवा. कसा असतोय ते तरी पाहू दे.”
विशेषज्ञ म्हणाले़, “महाराज तो हाताने धरला जाऊ शकत नाही. तो वस्तुरूपात (Physical/Material) नाही. सूक्ष्म आहे, अदृश्य आहे. परंतु तो सर्वत्र विद्यमान आहे. त्याला आपण पाहू शकत नाही; पण अपल्याला त्याचा अनुभव घेता येतो.”
राजा विचार करू लागला. म्हणाला, “विशेषज्ञांनो, तुम्ही म्हणता की तो सूक्ष्म आहे. अदृश्य आहे आणि सर्वत्र आहे. हे गुण तर ईश्वराचे आहेत. मग काय भ्रष्टाचार ईश्वर आहे?”
विशेषज्ञ म्हणतात, “होय महाराज, सध्या भ्रष्टाचार देवच झालाय.”
एका सरदाराने विचारले, “पण तो आहे कुठे? कसा समजून घेतला जाऊ शकतो?”
विशेषज्ञांनी उत्तर दिले, “तो सगळीकडे आहे. तो या राजदरबारात आहे. तो महाराजांच्या सिंहासनात देखील आहे.”
“सिंहासनात आहे?” असं म्हणून महाराज उडी मारून दूर उभे राहिले.
विशेषज्ञ म्हणाले, “होय महाराज, सिंहासनातही आहे. मागच्या महिन्यात या सिंहासनाला रंग देण्यासाठी जो खर्च सांगितला गेला, तो खोटा आहे. प्रत्यक्षात दुप्पट खर्च सांगण्यात आला आहे. अर्धे पैसे मधल्या लोकांनी आपसात वाटून घेतले. तुमच्या संपूर्ण राज्यात भ्रष्टाचार आहे आणि तो लाचखोरीच्या स्वरुपात आहे.”
विशेषज्ञांचं बोलणं ऐकून महाराज चिंतेत पडले आणि दरबारातील सरदार सावध झाले.
महाराज म्हणाले, “ही तर खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. भ्रष्टाचाराचा संपूर्ण नाश करण्याची आमची इच्छा आहे. विशेषज्ञांनो, तुम्ही सांगू शकाल का की, भ्रष्टाचार कसा नष्ट केला जाऊ शकतो?”
विशेषज्ञ म्हणाले, “होय महाराज. आम्ही त्यासाठी ही एक योजना तयार केली आहे. भ्रष्टाचार नष्ट करायचा असेल, तर महाराजांना संपूर्ण व्यवस्थेत बदल करावे लागतील. एक म्हणजे भ्रष्टाचाराच्या संधी बंद कराव्या लागतील. ज्याप्रमाणे काँट्रॅक्ट आहे तर काँट्रॅक्टर आलाच, काँट्रॅक्टर आला म्हणजे अधिकारी लोकांना लाच देणे आलेच. काँट्रॅक्ट देणे बंद केले की, लाचखोरी आपोआप बंद होईल. अशा अनेक गोष्टी आहेत. माणूस कोणत्या कारणासाठी लाच घेतो, याचाही विचार केला पाहिजे.”
महाराज म्हणाले, “ठीक आहे, तुम्ही तुमची संपूर्ण योजना ठेवून जावा. मी आणि माझे दरबारी त्याच्यावर विचारविनिमय करून निर्णय घेऊ.”
विशेषज्ञ निघून गेले.
महाराजांनी आणि दरबारातील सरदारांनी भ्रष्टाचार मिटविण्यासाठी तयार केलेली योजना वाचली. तिच्यावर विचारविनिमय केला.
विचार करून-करून दिवसामागून दिवस जाऊ लागले आणि महाराजांची तब्येत बिघडायला लागली.
एक दिवस एक सरदार म्हणाला, “महाराज, काळजीमुळे तुमचं आरोग्य बिघडत चाललं आहे, त्या विशेषज्ञांनी तुमच्या मागं चांगलंच झंझट लावलंय.”
राजा म्हणाला, “होय, मला रात्री झोप येत नाही.”
दुसरा सरदार म्हणाला, “असली योजना जाळून टाकली पाहिजे, जिच्यामुळे महाराजांची झोपच अडचणीत आली आहे.”
महाराज म्हणाले, “पण करायचं तरी काय? तुम्ही सर्वांनीही भ्रष्टाचार मिटविण्यासाठी तयार केलेल्या योजनेचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, ती योजना अमलात आणावी की नाही?”
दरबारी म्हणाले, “महाराज, ती योजना आहे तरी काय? नुसतं एक संकट आहे. त्या योजनेप्रमाणे खूप सारे फेरबदल करावे लागतील. किती त्रास होईल, संपूर्ण व्यवस्था कोलमडून जाईल. जे आजपर्यंत चालत आलंय ते बदललं, तर नवनवीन अडचणी निर्माण होतील. आपल्याकडे अशी एखादी युक्ती हवी की, जिच्यामुळे कोणत्याही प्रकारचा फेरबदल न करता भ्रष्टाचार नष्ट केला जाऊ शकेल.”
महाराज म्हणाले, “मलासुध्दा तसंच वाटतंय; पण हे कसं होणार? आमच्या परदादांना जादू येत होती. आम्हाला ती पण येत नाही. तुम्हीच काहीतरी उपाय शोधून काढा.”
एक दिवस सरदारांनी महाराजांच्या समोर एका साधूला उभे केले आणि म्हणाले, “एका गुहेमध्ये तप करताना या थोर तपस्वी साधकाला आम्ही पकडून आणले आहे. यांनी सदाचाराचा ताईत बनवला आहे. तो मंत्रांनी सिद्ध केलेला आहे. तो ताईत बांधला की, मनुष्य एकदम सदाचारीच बनून जातोय.”
साधूने त्याच्या झोळीतील एक ताईत काढून महाराजांना दिला. राजाने ताईत पाहिला आणि म्हणाले, “या ताईताबद्दल मला सविस्तर माहिती सांगा. याच्यामुळे मनुष्य सदाचारी बनतो कसा?”
साधू समजावून सांगत म्हणाला, “महाराज, भ्रष्टाचार आणि सदाचार मनुष्याच्या आत्म्यात वास करत असतो, बाहेर नाही. विधाता जेव्हा मनुष्याची निर्मिती करतो, तेव्हा कुणाच्या आत्म्यात ईमानदारीचे यंत्र बसवतो, तर कुणाच्या आत्म्यात बेईमानीचे. या यंत्रातून ईमानदारी किंवा बेईमानीचे स्वर निघत असतात. त्यालाच आपण आत्म्याचा आवाज म्हणतो. आत्म्याच्या निर्देशानुसारच मनुष्य काम करत असतो. प्रश्न हा आहे की, ज्या मनुष्याच्या आत्म्यातून बेईमानीचा आवाज येतो, त्या आवाजाला दाबून ईमानदारीचा आवाज कसा काढला जाऊ शकतो?”
“मी कित्येक वर्षांपासून याच गोष्टीवर चिंतन करत होतो. आता मी हा सदाचाराचा ताईत बनवला आहे. ज्या माणसाच्या दंडावर हा बांधलेला असेल, तो मनुष्य सदाचारी बनेल. मी कुत्र्यावरही याचा प्रयोग करून पाहिला आहे. हा ताईत गळ्यात बांधल्यानंतर कुत्राही भाकरीची चोरी करत नाही. कारण या ताईतामधून सुद्धा सदाचाराचे स्वर निघत आहेत. जेव्हा कुणाच्या आत्म्यातून बेईमानीचे स्वर निघू लागतात, तेव्हा या ताईताची शक्ती आत्म्याचा गळा दाबून ठेवते आणि माणसाला ताईतामधून ईमानदारीचे स्वर ऐकू येऊ लागतात. तेव्हा मनुष्य आत्म्याचा आवाज समजून सदाचाराकडे प्रेरित होऊ लागतो. हाच या ताईताचा गुण आहे महाराज.”
राजदरबारात चुळबुळ सुरू झाली. दरबारी उठ-उठून ताईत पाहू लागले.
राजा खूष होऊन म्हणाला, “मला नव्हतं माहीत की, माझ्या राज्यात असे चमत्कारी संतही आहेत. महत्मन्, आम्ही आपले खूप आभारी आहोत. तुम्ही आमच्यावरील संकट दूर केले आहे. आम्ही सर्वत्र पसरलेल्या भ्रष्टाचारामुळे खूप चिंतित होतो. परंतु आम्हाला लाखो नव्हे, तर करोडो ताईत हवे आहेत. आम्ही राज्याकरवी ताईत बनविण्याचा कारखानाच सुरू करू. तुम्ही त्याचे जनरल मॅनेजर म्हणून काम पाहा आणि तुमच्या निदर्शनाखाली उत्तम ताईत बनवून घ्या.”
एक मंत्री म्हणाला, “महाराज, राज्य कशाला असल्या झंझटात अडकेल? माझी विनंती आहे की, साधूबाबालाच ताईत बनविण्याचे टेंडर देऊन टाकावे. ते त्यांच्या साथीदारांकरवी ताईत बनवून राज्याला पुरवतील.”
महाराजांना हा विचार आवडला. साधूला ताईत बनविण्याचे टेंडर दिले गेले आणि लगेचच कारखाना उभारण्यासाठी त्यांना पाच करोड अग्रीम रक्कम देण्यात आली.
राज्याच्या वर्तमानपत्रातून बातम्या छापून आल्या, “सदाचाराच्या ताईताचा शोध! ताईत बनविण्याचा कारखाना सुरू करण्यात आला.”
लाखो ताईत तयार झाले. प्रत्येक सरकारी कर्मचार्याच्या दंडावर एक-एक ताईत बांधला गेला.
भ्रष्टाचाराच्या समस्येचा असा सरळ उपाय सापडल्याने राजा आणि राजदरबारी सर्वच आनंदात होते.
एक दिवस राजाचं कुतूहल जागृत झालं, त्याला वाटलं ‘बघूया तरी की, हा ताईत कसं काय काम करतोय ते?’
तो वेष बदलून एका कार्यालयात गेला. त्या दिवशी दोन तारीख होती. एक दिवस अगोदरच पगार मिळाला होता.
ते कर्मचार्याजवळ गेले आणि काही काम सांगून त्याला पाच रुपयाची नोट देऊ लागले.
कर्मचारी त्यांच्यावर ओरडला. “पळ येथून, लाच घेणे पाप आहे.”
राजाला खूप आनंद झाला. ताईतामुळे कर्मचारी ईमानदार झाला होता.
काही दिवसांनंतर राजा पुन्हा पोषाख बदलून त्याच कर्मचार्याकडे गेला. त्या दिवशी एकतीस तारीख होती. महिन्याचा शेवटचा दिवस.
राजाने यावेळीही पाच रुपयाची नोट दाखविली आणि कर्मचार्याने घेऊन खिशात ठेवली.
राजाने त्याचा हात पकडला आणि सांगितले की, “मी तुझा राजा आहे. तू आज सदाचाराचा ताईत बांधून आला नाहीस का?”
“बांधून आलोय महाराज, हा पाहा.”
त्याने आपल्या अंगरख्याची बाही (Shirt cuff) वर ओढून ताईत दाखवला.
राजा गोंधळून गेला. “मग असं कसं झालं?”
त्यांनी ताईत कानाला लावून ऐकले. ताईतातून आवाज येत होता, “अरे! आज एकतीस आहे. आज तरी घे.”
लेखक : हरिशंकर परसाई
अनुवादक : प्रा.डॉ. मिलिंद नामदेव साळवे, शिराळा.
फोन नं.8888954347