चाल 1

फुले, शाहू, आंबेडकर हा ऽऽ महात्मे थोर,
केला उद्धार, बहुजन दलित शोषितांचा।
वारसा त्यांच्या विचारांचा।
शिलेदार दाभोलकर त्यांचा रं जी ही जी जी ॥1॥
स्वातंत्र्यसूर्य उगवला हाऽऽ मुक्त जाहला।
देश आपुला, गुलामीच्या बेड्या जरी तुटल्या।
अंधश्रद्धेच्या परी उरल्या।
विकासाचा मार्ग म्हणून अडला रं जी ही जी जी ॥2॥
श्रद्धेची चिकित्सा करा हाऽ बुद्धी वापरा विवेक धरा,
दुष्ट रुढी परंपरा विसरा।
घेऊ विज्ञानाचा आसरा।
दिला जग बदलण्याचा नारा रं जी ही जी जी ॥3॥
चाल 2
सामाजिक स्थिती दारूण भाबडे भोळे बहुजन,
जखडले कर्मकांडानं/अंधरुढी परंपरानं, मंत्रतंत्र
चमत्कारानं जातीपाती धर्मभेदानं/लक्षयोनी
दैववादानं, उपवास आणि नवसानं, हरवले बुद्ध प्रामाण्य।
जनतेचे झाले शोषण अंधश्रद्धेनं जी ही जी जी ॥4॥
समाजाचे दु:ख हेरून डॉक्टर दाभोलकर यानं,
डॉक्टरकी दिली सोडून। जनसेवा याच ध्येयानं,
गावोगावी मेळे भरवून, शाळा कॉलेजात जाऊन।
जत्रेत उत्सवातून, संवाद व्याख्यानातून,
सुरू केले जन प्रबोधन।
समतेची, बंधुत्वाची दिली शिकवण जी ही जी जी ॥5॥
चाल 1
बुवाबाजी कर्मकांडान हाऽऽ वाढे अज्ञान, बुद्धी शोषण
जाणीलं दाभोलकर यांनी
संघटन साथी जमवुनी।
काढला महाराष्ट्र पिंजुनी रं जी ही जी जी ॥6॥
शनी शिंगणापूरचा लढा हाऽऽ बंधन तोडा,
चौथरा चढा, हाक दिली दाभोलकर यांनी।
नारीनर समानची दोन्ही। हजारो जमल्या माता
भगिनी रं जी ही जी जी ॥7॥
चाल 3
भोंदूबुवांशी सत्यासाठी दाभोलकर लढले
जातीयवादी धर्मांधांशी ठायी ठायी भिडले
कोरस – जी रं जी रं हे जी जी
फसविणार्या ज्योतिषांना दाभोलकर नडले
हातचलाखी करणार्यांचे पितळ उघड पडले
पोतराज आणि देवदासींना जटामुक्त केले
निर्भय होऊन कसे जगावे तयांस शिकविले
सत्यशोधकी आंतरजातीय विवाह घडविले
सत्यशोधकी आंतरजातीय विवाह घडविले
हुंडाविरोधी व्यसनमुक्तीचं कार्य त्यांनी केले
जातपंचायत नष्ट कराया लढे उभे केले
विवेक आणि विज्ञानाशी नाते जडविले
साधी राहणी, विचार सरणी थोर महात्म्याची
तशी लेखणी वाणी होती ज्ञानसागराची
अंधश्रद्धेच्या कायद्यासाठी बलिदान केले
कार्य पाहुनी समाजद्रोही सनातनी बिघडले ॥8॥
चाल 4 (मैत्रिणी स्वरूप चित्रीणी)
हातामध्ये शस्त्र घेऊन, आले दुर्जन, घात त्यांनी केला
या सुधारकाचा देह भूमीवर पडला
वाटते दु:ख आणि खंत हरपला संत विचारवंत
या पुढे आम्हाला नसेल तुमची साथ
सभोवती नित्य भासतो हसतमुख चेहरा
जिंकिले मृत्यूला कोण तुम्हासम दुसरा
बलिदान तुम्ही जे दिले नसे ते व्यर्थ
आटणार कधी ना प्रेरणेचा स्त्रोत
उठा उठा साथींनो झटा कार्याशी जुटा शोक हा आवरा
हा महापुरुषाला शिंदेशाहीराचा मुजरा ॥9॥