महाराष्ट्र अंनिसच्या भोर येथील विस्तारित राज्य कार्यकारिणीत मी (प्रा. प. रा. आर्डे) पाठविलेला मुख्य संपादक पदाचा राजीनामा संघटनेने मंजूर केला. याबद्दल मी संघटनेचा मन:पूर्वक आभारी आहे. 1995 ते 2002 पर्यंत मी वार्तापत्राच्या ‘संपादक’ मंडळातील एक सदस्य म्हणून सहभाग दिला. या काळात डॉ. प्रदीप पाटील हे वार्तापत्राचे मुख्य संपादक होते. त्यांनी 2002 मध्ये मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिल्यावर संघटनेने या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली. 2002 ते आजतागायत मी वार्तापत्राचा प्रमुख संपादक या नात्याने निष्ठेने कार्य केले.

प्रिय साथी! जवळपास 25 वर्षेअविरतपणे वार्तापत्राला मी योगदान देत आलो आहे. या काळात दररोज अंदाजे चार तास मी वार्तापत्राच्या कार्यालयात उपस्थित राहत असे व संपादन व इतर कामात योगदान देत असे. या काळात किरकोळ प्रवासखर्चाखेरीज मी कोणत्याही प्रकारचे मानधन अथवा पगार वार्तापत्राकडून स्वीकारलेला नाही. याचे कारण महाराष्ट्र अंनिस करीत असलेल्या कार्यावर माझी असलेली अविचल निष्ठा. संघटनेचे अनेक कार्यकर्ते आणि कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनीसुद्धा संघटनेकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक मोबदला स्वीकारला नाही. या त्यागमय आदर्शाचा मी प्रामाणिकपणे वारसा जपत आलो, हे मी नम्रपणे आपणास सांगू इच्छितो.
या सेवाव्रती कार्यापासून मी आज मुक्त होतो आहे, याचे कारण म्हणजे माझे उतारवय. मी सध्या वयाच्या 80 व्या वर्षाच्या जवळपास पोचलो आहे. उतारवयात शारीरिक व्याधींमुळे माझी कार्यक्षमता कमी झालेली आहे; तसेच बौद्धिक श्रमही करण्यास मर्यादा आल्या आहेत. संपादक पदाला न्याय देणे मला अवघड झाले आहे. कार्यकारिणीच्या विविध ठिकाणी होणार्या मीटिंगना मी हजर राहू शकत नाही; तसेच संपादकीय कामासाठी रिपोर्टिंग घेणे व दूरवरच्या लोकांच्या मुलाखती घेणे, अशा कामांसाठी प्रवास करणे आता झेपत नाही. या कारणास्तव संपादकीय काम अपुरे राहून वार्तापत्राच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, या अगतिकतेतूनच मी संपादक पदापासून मुक्त होत आहे. माझे पश्चात संपादक मंडळातील ज्येष्ठ संपादक राजीव देशपांडे आणि त्यांचे सहकारी वार्तापत्राचे संपादकीय काम तडफेने पार पाडतील, याबद्दल मला तीळमात्र शंका नाही. त्यांच्या भविष्यकालीन कारकिर्दीस मी सुयश चिंतितो.
माझ्या संपादकीय काळात वार्तापत्र टीममधील अनेकांनी मला बहुमोल सहकार्य केले. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. डॉ. प्रदीप पाटील, कॉ. टी. बी. खिलारे, प्रभाकर नानावटी, राजीव देशपांडे, आशुतोष मुळ्ये, उमेश सूर्यवंशी, अनिल चव्हाण, मुक्ता दाभोलकर, संजय सावरकर या सर्वांच्या वेळोवेळी झालेल्या सहकार्यामुळेच वार्तापत्र विनाखंड, गुणवत्तापूर्ण रीतीने प्रकाशित करण्यात मी यशस्वी झालो. कौटुंबिक जबाबदार्या माझी पत्नी उषा हिने समर्थपणे सांभाळल्याने मी संपादक कामासाठी वेळ देऊ शकलो. कन्या रुपाली हिने माझे वेळोवेळी कौतुक करून मला प्रेरीत केले. या सर्वांचा मी कृतज्ञ आहे.
माझ्या संपादकीय काळात ज्यांची मला शब्दात सांगता येणार नाही, अशी मदत मिळाली ते म्हणजे वार्तापत्राचे प्रकाशक राहुल थोरात व कार्यालयीन सहकारी सुहास यरोडकर आणि सुहास पवार. बँकेचे व्यवहार असो की, टायपिंगचे काम असो; तसेच आण्णासाहेब कोरे यांच्या प्रेसमधील छपाईचे काम असो, या तिघांनी कधीही आळस दाखविला नाही. वार्तापत्राचे आर्थिक व्यवहार राहुल थोरात आणि सुहास यरोडकर यांनी अतिशय चोख ठेवले आणि ते इचलकरंजीचे ऑडीटर संजय कोले यांच्या मदतीने महाराष्ट्र अंनिसच्या ट्रस्टकडे वेळेत पाठविले. ट्रस्टने केलेल्या सहकार्यामुळेच वार्तापत्राच्या कार्यालयासाठी सहा खोल्यांची प्रशस्त जागा वार्तापत्राला प्राप्त झाली. अशा या कार्यालयात लायब्ररी, संपादकीय कामकाज, कॉम्प्युटर विभाग, संपादक मंडळाच्या मीटिंग्ज यासाठी प्रशस्त जागा मिळाली. हे माझ्या कारकिर्दीत घडले, याचा मला अभिमान वाटतो. माझ्या संपादनाच्या कामामध्ये नेहमी माझ्यासोबत राहिलेले अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, महाराष्ट्र अंनिस ट्रस्ट आणि विशेषत: शैलाताई दाभोलकर यांचा मी कृतज्ञ आहे. तसेच अंनिवाच्या वाचकांनी माझ्या लिखाणास मनःपूर्वक दाद दिली. त्याबद्दल मी सर्व वाचकांचा अंतःकरणपूर्वक आभारी आहे.
निरोप घेताना आणखी दोन महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. आपणा सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे वार्तापत्र हे अंनिसचे मुखपत्र बनण्यास मदत तर झालीच; पण विशेष म्हणजे वार्तापत्र हे अंनिसचा आर्थिक स्रोत बनले. कार्यकर्त्यांच्या देणग्या व जाहिराती मिळविण्याच्या यशामुळे वार्तापत्राद्वारे अंनिसच्या ट्रस्टला शक्तिमान आर्थिक स्रोत मिळाला. कार्यकर्त्यांच्या जिद्दीतून आणि घामातून मिळालेला फंड चोखपणे आपल्या कार्यालयाने अंनिस ट्रस्टकडे जमा केला. याच आर्थिक स्रोतामुळे अंनिस संघटनेला वर्षभरातील आपले प्रबोधनाचे कार्यक्रम पार पाडणे सुकर बनले.
अंनिस ही संविधान मानणारी विवेकवादी संघटना आहे; पण अशा संघटनेला मूलतत्त्ववादी सांप्रदायिक संघटना नेहमीच विरोध करत आल्या आहेत. या संघर्षात अंनिसची भूमिका लोकांपुढे निर्भीडपणे मांडावी लागते. माझ्या संपादकीय काळात मी आणि माझ्या सहकार्यांनी या संदर्भात अनेक लेख लिहिले; परिणामी सांप्रदायिक मंडळींच्या रोषामुळे वार्तापत्राला बदनामीच्या अनेक खटल्यांना तोंड द्यावे लागले. त्यापैकी अनेक खटल्यांमध्ये सांगलीचे प्रसिद्ध अॅडव्होकेट दत्ताजीराव माने, मुंबई हायकोर्टातील अॅड. अतुल अल्मेडा आणि गोव्याचे अॅड. प्रितेश नायक यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य दिले. डॉ. दाभोलकर व दत्ताजीराव माने यांनी ‘निर्भय बनो’ असा धीर दिल्यानेच या सर्व खटल्यांना मी व राहुल थोरात आणि इतर सहकारी यांनी यशस्वी तोंड दिले. वार्तापत्राचा हा निर्भयपणाचा वारसा आपण सगळ्यांनी जपावा, अशी मी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो.
अंनिवाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने वार्तापत्रातील निवडक लेखांचा संग्रह तीन खंडात प्रसिद्ध करण्याचे एक मोठे काम माझ्या कारकिर्दीत पार पडले, याचेही मला मोठे समाधान आहे. मे 2016 ला अंनिवाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सांगलीला भरविण्यात आलेले 2 रे अंधश्रद्धा निर्मूलन साहित्य संमेलन केवळ दिमाखदार नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या जवळ-जवळ 2000 कार्यकर्त्यांना वैचारिक मेजवानी देणारे ठरलेल्याचाही मला आनंद आहे.
वार्तापत्र हे अंनिस चळवळीचे मुखपत्र आहे. वैचारिक लेख आणि चळवळीचे रिपोर्टिंग यांना वार्तापत्रात महत्त्वाचे स्थान आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत चळवळीने केलेल्या कार्याचे प्रतिबिंब वार्तापत्रात पडले आहे. वार्तापत्राचा विकास आणि चळवळीचा विकास हातात हात घालून झाला आहे. तो असाच पुढे चालू राहावा. ही प्रामाणिक सदिच्छा.
मागे वळून बघताना महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीत अंनिसने वार्तापत्राद्वारे दिलेल्या योगदानात मी खारीचा वाटा उचलला, याबद्दल मला अभिमान वाटतो. हे सर्व तुम्हा कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले, हे मी नम्रपणे सांगू इच्छितो. संपादक पदावरून निवृत्त होताना मी पूर्णपणे विवेकवादी बनलो आणि निर्भय झालो. माझ्याप्रमाणेच आपल्या व्यक्तिमत्त्वातही बदल घडविण्याचे सामर्थ्य असलेल्या वार्तापत्राला आपण सर्वांनी बळ द्यावे, अशी इच्छा व्यक्त करून मी आपला निरोप घेतो. अंनिसचे अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील सर, कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि कार्यकारी समिती यांनी संपादक मंडळात मी सल्लागार म्हणून राहावे अशी इच्छा व्यक्त केली, ती मी स्वीकारली आहे. वार्तापत्राच्या पुढील वाटचालीसाठी सल्लागार संपादक म्हणून मी कार्यरत राहीन, याची मी ग्वाही देतो.
गेल्या तीस वर्षांच्या काळात 1985 ते 2013 पर्यंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा सहवास मला लाभला. निरोप घेताना त्यांची मला तीव्रतेने आठवण होते. त्यांच्या बरोबरचा वैचारिक संवाद आठवीत भविष्यकाळात मी निर्भयपणे विवेकाची वाटचाल करीन. पुन:श्च सर्वांचे मन:पूर्वक आभार!