Categories
अभिवादन

‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर

जुलै - २०१९

गोपाळ गणेश आगरकरांचे 125वे स्मृतिवर्ष सुरू आहे. त्या निमित्ताने हा लेख प्रसिद्ध करीत आहोत.

सुधारककार गोपाळ गणेश आगरकर

(14 जुलै 1856 ते 17 जून 1895)

‘सुधारक’अग्रणी गोपाळ गणेश आगरकर यांचा यंदा 125 वा स्मृतिदिन आहे. मला आठवतंय की, मी शाळेमध्ये असताना वि. स. खांडेकरांचा एक लेख आम्हाला अभ्यासक्रमाला होता. त्याचं क्रांतिकारी शीर्षक होतं, “देव न मानणारा देवमाणूस” त्यावेळी हे शीर्षक खूपच क्रांतिकारी वाटलं होतं. आज जेव्हा तो लेख पुन्हा वाचला, तेव्हा तो लेख त्यावेळेपेक्षाही जास्त क्रांतिकारक वाटायला लागला आहे.

आगरकरांचा जन्म 14 जुलै 1856 साली सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला. अवघं 39 वर्षांचं आयुष्य. जन्म झाला एका दरिद्री कुटुंबात. वडील लवकर वारले. घरात विधवा आई. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. प्राथमिक शिक्षण जवळच्या कराड गावी झाले. माध्यमिक शिक्षण अकोल्यामध्ये एका नातेवाईकांकडे झाले. पुढे बी.ए., एम.ए. पुण्यामध्ये झाले. काही दिवस त्यांनी ‘कराड समाचार’ वर्तमानपत्रामध्ये स्फुटलेखन केलं. त्यातून झालेलं अर्थार्जन शिक्षणासाठी वापरलं. एका अर्थाने त्यांची पत्रकारिता विद्यार्थीदशेतच सुरू झाली. पुढे पुण्याला त्यांना समविचारी मंडळी भेटली. समविचारी मंडळींच्यामध्ये लोकमान्य टिळक हे महत्त्वाचे. टिळक आणि आगरकर यांच्या जन्मामध्ये एका वर्षाचे अंतर. शिक्षणासाठी ते डेक्कन कॉलेजमध्ये एकत्र होते. शिकत असतानाच त्यांच्यामध्ये वादविवाद, चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायच्या. कारण त्या काळामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलनं करण्याची तरुणांमध्ये अशी एक ऊर्मी निर्माण झालेली होती आणि या उर्मीमधले हे दोन तरुण होते. या दोन तरुणांनी त्या डेक्कन कॉलेजमध्ये शिक्षण घेता घेता आपल्या राष्ट्राचं भवितव्य काय असेल आणि कसं असायला पाहिजे, याबद्दल खूप विचारविनिमय केला. हा विचारविनिमय करत असताना त्यांच्यामध्ये मतभेदही मोठ्या प्रमाणावर होत होते. पुढे आगरकरांनी ज्यावेळेला स्वत: स्वतंत्र लिहायला सुरुवात केली, तेव्हा लोक म्हणायला लागले, ‘तुम्ही दोघं एवढे मित्र असताना असे मतभेदासाठी भांडणं काय करता?’ तेव्हा आगरकरांनी त्यांच्या ‘सुधारक’मध्ये लेख लिहिला होता, “बांधव हो, विचारकलहाला का भिता?’ विचारकलह हा झालाच पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या समाजामध्ये जे दोष आहेत, ते बाहेर जाणार नाहीत; गुण आहेत त्यांचा विकास होणार नाही.” ज्याच्यामुळे आपण ज्याला साधक-बाधक चर्चा म्हणतो ती समाजातल्या बुद्धिवादी मंडळीनी… विचारी मंडळींनी वेगवेगळ्या पातळ्यांवर करत राहिली पाहिजे. ही त्यांची भूमिका होती.

टिळक आणि आगरकर या दोघांच्या मतांमध्ये फरक होता. तो ढोबळमानाने सांगायचा तर सर्वांना दोन शब्द माहीत आहेत की, टिळक हे जहाल मतवादी होते, तर आगरकर हे मवाळ होते. आज जर आपण विचार केला, तर नेमकी उलटी परिस्थिती आहे, असं मला वाटतं. कारण टिळकांचा जो जहालवाद होता, तो दृश्य होता. आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा? असा तो वाद होता. टिळकांची आणि टिळकपक्षियांची भूमिका अशी होती की, आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. एकदा राजकीय स्वातंत्र्य मिळालं की, ज्या काही उणिवा असतील, त्या आमच्या आम्ही दूर करू. इंग्रजांनी त्यामध्ये पडायचं काही कारण नाही. त्याच्याउलट आगरकरांची भूमिका होती की, आपला समाज परंपरावादी आहे, गतानुगतिक आहे आणि नव्या युगाला सामोरं जायचं असेल, पाश्चिमात्यांच्या बरोबरीनं जायचं असेल, तर आधी आपल्या समाजाचं विचारपरिवर्तन व्हायला पाहिजे. कारण इंग्रज आल्यानंतर काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या, ज्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही आहोत.

पहिली गोष्ट अशी की, या दोघांचा जन्म ज्या 1856 आणि 1857 मध्ये झाला, त्या काळामध्ये बरोबर एक-दोन वर्षांनी 1857 चं झाशीचं युद्ध… झाशीची लढाई झाली होती. म्हणजे, ‘झाशीची लढाई’ म्हटलं म्हणजे आपल्याला ती खूप जुनी गोष्ट वाटते; पण टिळक-आगरकरांचा काळ म्हटले की, तो आधुनिक वाटतो. इतिहासाचं परिशीलन करत असताना, ही काळाची तुलना महत्त्वाची असते, असं मला वाटतं.

दुसरी गोष्ट अशी की, त्यांचा जन्म झाला त्यावेळेस इंग्रज इथं येऊन स्थिर झालेले होते आणि त्यांनी विद्यापीठीय शिक्षणालाही प्रारंभ केला होता. म्हणजे आपण ज्याला विद्यापीठीय शिक्षणाची स्थापना म्हणतो, ती 1856/57/58 या तीन वर्षांत पुणे, मुंबई, मद्रास येथे केली आणि आधुनिक शिक्षणाचा पाया घातला तो त्यावेळेस.

अशा काळामध्ये ही तरुण मंडळी आपल्या देशाबद्दल विचार करत होती. म्हणून टिळकांची भूमिका होती की, आधी आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवावं आणि आगरकरांची भूमिका होती… नाही. या पाश्चिमात्य लोकांसमोर टिकायचं असेल, तर आधी आपल्याला सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत. माणसांची मनं बदलली पाहिजेत.

राजकीय स्वातंत्र्यासाठी कुठली भूमिका घ्यायची झाली, तर त्यासाठी एक विरोधक असावा लागतो… लोकांना संघटित करण्यासाठी आणि कुठलीही संघटना बांधायची झाली, तर विरोध कुणाला करायचा? राजकीय स्वातंत्र्यामध्ये ज्याला आपण हल्ली शत्रू मानतो, तो शत्रू बाहेरचा असावा लागतो. आता शत्रू बाहेरचा म्हणजे इंग्रज. कारण तो बाहेरचा. याउलट आगरकरांची भूमिका होती की, सुधारणा करायची म्हणजे आधी ती स्वत:च्या समाजात करायची. म्हणजे आपल्याला कुणाविरुद्ध उभं राहायचं आहे? तर आपल्याच लोकांविरुद्ध उभं राहायचं आहे आणि स्वजनांना विरोध करणं, स्वजनांसाठी लढणं ही फार अवघड गोष्ट असते; बाहेरच्यांशी लढणं ही सोपी गोष्ट असते.

सगळ्याच समाजसुधारकांना नेहमीच या गोष्टींना तोंड द्यावे लागलेले आहे. राजकीय चळवळी या नेहमी संख्यात्मकदृष्ट्या ज्यांना आवाजी संघटना म्हणतात, तशा त्या आवाजी संघटना आणि सामाजिक संघटना या वैचारिक परिवर्तनासाठी असतात. त्यामुळे त्या समाजाच्या अंत:स्तरामध्ये बदल घडवून आणण्याचं काम करत असतात. दुसरी गोष्ट अशी की, राजकीय संघटनांना सामाजिकदृष्ट्या फार बदल करून चालत नाही. कारण त्यांना लोकानुनय करावा लागतो. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या मतांना अनुमोदन द्यावं लागतं आणि म्हणून एका अर्थाने सामाजिकदृष्ट्या राजकीय संघटना या स्थितिशील असतात, हे आजही आपल्याला दिसेल. त्याच्या उलट सामाजिक परिवर्तन करू पाहणार्‍यांना नेहमी गतिशील राहावं लागतं आणि अंत:स्तरातून गतिशील राहावं लागणं, ही फार अवघड गोष्ट असते. म्हणून वर वर पाहता टिळकांचा पक्ष त्यावेळेला जहाल वाटला, आवाजी वाटला. संख्यात्मकदृष्ट्या मोठा वाटला, तरी क्रांती जी घडवायची आहे, ती आतून घडवायची असल्यामुळे आगरकर हे जास्त जहाल होते, असं म्हणायला हरकत नाही.

दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की, राजकीय संघटना बांधत असताना पूर्वजांचा गौरव करणं, ही फार सोपी गोष्ट असते. कारण लोकांना ते फार आवडत असतं. त्यांना आपली आहे ती परिस्थिती बदलणं त्रासदायक होतं. त्याच्याउलट सामाजिक सुधारणा करणार्‍यांना आपली विद्यमान परिस्थिती बदलणं हे जास्त आवश्यक वाटतं आणि त्यामुळं राजकीय संघटनांचं जे व्यासपीठ असतं, ते विचारांपेक्षा भावनांवर आधारित असतं. ज्यांना आपण भावनिक राजकारण म्हणतो ते! आणि त्याच्या उलट विचारांमध्ये आतून परिवर्तन करायचं असेल, तर पूर्वजांच्या विचारपरंपरेची चिकित्सा करणं गरजेचं असतं आणि या चिकित्सेला सर्वसामान्य माणसांचा विरोध असतो. त्यासाठी विवेकशील विचारधारेचे लोक वाढवावे लागतात. अपरिपक्वता कमी करावी लागते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा विरोध आणि विरोधाचा उद्रेक होण्याची शक्यता असते आणि तो दरवेळेला झालेला दिसतो. म्हणजे अगदी महावीर, जैन, चार्वाक आणि महात्मा बुद्धांपासून सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला हे दिसतं की, आंतरिक परिवर्तन ज्यावेळी माणसं करायला जातात, त्यावेळेला बहुसंख्य समाज हा अस्वस्थ झालेला दिसतो. त्यामुळे टिळक आणि आगरकर यांच्या या परस्परविरोधी विचारधारा असल्या, तरी आपलं उद्दिष्ट एकच आहे. ते म्हणजे राजकीय स्वातंत्र्य आणि लोककल्याण. हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी दीर्घकाळ एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला.

या काळामधून पहिली गोष्ट काय केली असेल त्यांनी, तर आपलं आपण वृत्तपत्र काढलं. आपलं वृत्तपत्र काढलं, तर लोकांपर्यंत पोचणं सोपं जाईल, असं त्यांना वाटलं म्हणून ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही दोन वृत्तपत्रं. 1880/81 मध्ये एकाच वेळेला सुरू केली. त्यातलं ‘मराठा’ हे वृत्तपत्र इंग्रजीमधून झालं. त्याचे संपादक लोकमान्य टिळक होते आणि ‘केसरी’ हे मराठीमधून सुरू झालं, त्याचे संपादक आगरकर होते. पहिले संपादक आगरकर. ते एक वर्ष राहिले. त्यानंतर कोल्हापूरचे जे संस्थान शाहू महाराजांचे होते, तिथे बर्वेनावाचे गृहस्थ दिवाण होते. त्यांच्या काही भ्रष्टाचारांच्या विरोधात आगरकरांनी जहाल लेखन केलं. बर्व्यांनी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा भरला. म्हणजे ‘केसरी’, ‘मराठा’वर आणि त्यांचे संपादकद्वय म्हणून टिळक आणि आगरकर यांना चार महिन्यांची शिक्षा झाली. त्यांना मुंबईच्या डोंगरीच्या तुरुंगामध्ये ठेवलं होतं आणि त्या काळात त्यांनी लिहिलेलं पुस्तक आजच्या काळामध्येसुद्धा सगळ्यांनी वाचलं पाहिजे, असं आहे. ते पुस्तक म्हणजे ‘डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस.’

हे पुस्तक लिहिल्यानंतर टिळक आणि आगरकरांची भूमिका आणखी स्पष्ट होत गेली. त्यानंतर त्यांनी आपसांत थोडी तडजोड केली. तडजोड अशी की, टिळकांना जरी आगरकरांचे विचार पटत नसले, तरी आगरकरांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे लिहावे आणि टिळकांनी त्यांच्या पद्धतीने लिहावे. काही दिवस हा विरोध चालू होता; पण पुढे 1887 मध्ये हा विरोध खूप विकोपाला गेला आणि आगरकरांनी ‘केसरी’ सोडलं. दरम्यानच्या काळात 1881 मध्ये त्यांनी एक संस्था स्थापन केली, शिक्षणासाठी.

शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही, याची त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर आणि टिळक हे त्यांचे संस्थापक होते. त्या संस्थेतर्फे आजचं जे फर्ग्युसन कॉलेज आहे, ते फर्ग्युसन कॉलेज सुरू झालं. 1892 मध्ये आगरकर त्या कॉलेजचे प्राचार्य झाले. या सगळ्या घटना घडत असताना ‘केसरी,’ ‘मराठा’ मधून मात्र आगरकर पूर्ण बाहेर पडले. पुढे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजही सोडलं आणि स्वत:चा संपूर्ण असा वेगळा बाज सुरू केला. 1888 मध्ये ‘सुधारक’ नावाचं वर्तमानपत्र आगरकरांनी सुरू केलं विजयादशमीच्या दिवशी. हे सुधारक साप्ताहिक होतं. ते इंग्रजी आणि मराठी या दोनही भाषांतून चालत होतं. इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी गोपाळकृष्ण गोखले यांनी घेतली होती, जे महात्मा गांधींचे गुरू म्हणून पुढे प्रसिद्धीला आलेले होते. गोपाळकृष्ण गोखल्यांची ख्याती एवढ्यासाठी होती की, त्यांचं इंग्रजी हे अतिशय उत्तम होतं. इंग्रजही त्यांच्या इंग्रजीला नावाजत असत. त्यामुळं इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी गोपाळकृष्ण गोखल्यांची होती, तर मराठी आवृत्तीची जबाबदारी आगरकर यांच्याकडे होती. या सबंध वृत्तपत्रांमधून दोघांची मतं मात्र एकसारखी होती. थोडक्यात सांगायचं झालं, तर ‘सुधारक’मधून त्यांनी कुठल्या कुठल्या भूमिका मांडल्या, कुठल्या मूल्यांना धरून लेखन केलं, हे महत्त्वाचं. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद आणि भौतिकता, अशी ती मूल्ये होती.

आज आपण जी अतिशय महत्त्वाची मूल्यं मानतो, जीवनामध्ये ती त्यांनी सुरुवातीपासून विचारात घेतली. कारण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जगाच्या पाठीवर या तीन मूल्यांची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर झाली आणि पाश्चिमात्य राष्ट्रांच्यामधून या भूमिका फार वेगाने पुढं येत गेल्या आणि त्यामुळे ती राष्ट्रं आधी पुढं गेली. याच्याच अंतर्गत व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद आणि भौतिकता असल्यामुळे आपोआपच बुद्धिवादाला जे पटेल तेच आपण आचरणात आणायचं, त्याचा प्रचार करायचा. ही भूमिका त्यांनी वृत्तपत्रांमधून ठेवली आणि म्हणून समाजामध्ये त्याकाळात ज्या अपप्रवृत्ती होत्या. वाईट रुढी होत्या, ज्या समजुती होत्या. त्यांना विरोध केला. जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य, धर्मप्रामाण्य, स्त्रियांचं केशवपन, विधवा विवाहाला विरोध, बायकांच्या माथी मारलेलं सोवळं-ओवळं, अंधश्रद्धा, पाखंडीपणा असे अनेक विषय जे आजही सर्वसामान्य लोकांच्या पचनी पडत नाहीत किंवा विचार करणार्‍यांच्याही पचनी पडत नाहीत, अशा अनेक विषयांवर सुधारकामध्ये लिहिलं गेलं. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये बायका फारशा घराबाहेर पडत नव्हत्या, त्या एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या काळामध्ये! त्यांनी स्त्रियांच्या पोषाखावरही लिहिलं. आगरकरांच्यावर नेहमी एक आक्षेप येतो की, आगरकरांनी पुण्यातल्या ब्राह्मण समुदायाबद्दलच जास्त लिहिलं. तर ती गोष्ट स्वाभाविक होती. कारण त्यांचा संचार जो होता, तो त्या समाजात होता आणि सगळ्यात जास्त अपप्रवृत्तीही त्या समाजातच होत्या आणि आपल्याच समाजामधला मनुष्य ज्यावेळेला विरोध करतो, ज्यावेळेस भूमिका घेेतो त्यावेळेस तो समाज आपोआपच जुन्या गोष्टी टाकून द्यायला तयार होतो. म्हणजे जसं एक वेगळं उदाहरण द्यायचं झालं, तर डॉ. आंबेडकर पुढे आले आणि त्यांनी दलितांच्यामध्ये चेतना निर्माण केली की, या गोष्टी तुम्ही सोडून द्या. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आपल्यातलाच एक शहाणा सुरता शिकलेला माणूस सांगतोय म्हटल्यावर दलितांना ती गोेष्ट जास्त पटली. इतरांनी सांगून ती पटत नाही. आपल्यातलाच मनुष्य हे सगळं फेकून देतो आणि तो पुढे जातो. इतकंच नव्हे, तर त्याला जास्त सन्मान मिळतो, हे ज्यावेळेस लोक पाहतात त्यावेळेस त्यांच्यावर चांगला परिणाम होतो.

पुढं असं म्हटलं जातं की, ब्राह्मण मंडळींनी बर्‍याच जुन्या गोष्टी सोडून दिल्या. त्याचं कारण असं आहे की, हे सगळे समाजसुधारक त्यावेळेला त्यांच्या समाजातले झाले. कारण ते शिकलेले होते आणि त्यामुळे त्या काळात जरी त्यांना विरोध झाला, तरी ती स्त्रियांनी मात्र फार मोठ्या प्रमाणावर एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आगरकरांची भूमिका उचलून धरली. स्त्रियांच्या शिक्षणाला फार मोठी प्रेरणा मिळाली. धोंडो केशव कर्वेपुढे आले. त्यांनी स्त्रियांसाठी विद्यापीठाची स्थापना केली. मिशनर्‍यांनी मुलींच्यासाठी शाळा काढलेल्या होत्या. महात्मा जोतिबा फुल्यांनी पुण्यामध्ये शिक्षण सुरू केलेलं होतं. एकाच काळामध्ये या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या.

स्त्रियांच्याबद्दल आगरकरांनी फार जहालपणे लिहिलंय आणि विशेषत: ब्राह्मण स्त्रियांच्याबद्दल. त्यामुळे ब्राह्मण मंडळींच्याकडून त्यांना फार मोठा विरोध झालेला होता. इतका विरोध झाला की, आगरकरांची जिवंत प्रेतयात्रा त्याकाळामध्ये पुण्यातल्या ब्राह्मण लोकांनी काढली होती की, हा आमच्या धर्मावर, आमच्या जातीवर आक्रमण करणारा मनुष्य आहे म्हणून; परंतु आगरकरांनी त्यांची पर्वा केली नाही. त्यांनी स्त्रियांच्या पोषाखावर लिहिलं. स्त्रियांच्या केशवपनावर लिहिलं की, विधवांचं केशवपन करणं हे कसं चुकीचं आहे. कारण ब्राह्मण मंडळींत काय किंवा कुठलीही परंपरावादी मंडळी काय… धर्मातल्या कुठल्यातरी जुन्या गोष्टी काढतात. जुने युक्तिवाद काढतात. तसा एक युक्तिवाद काढला जायचा की, विधवेने जर केशवपन केलं नाही, तर तिचा मेलेला नवरा जो आहे, त्याला स्वर्गामध्ये तिच्या केसाचा फास बसतो आणि हे लोक ते मानत होते. आगरकरांनी त्याच्यावर युक्तिवाद केला. आगरकरांना माहिती होतं की, हा सगळा भोंगळपणा आहे म्हणून; पण आता उत्तर त्यांना त्यांच्याच भाषेत दिलं पाहिजे. म्हणून ते म्हणाले, “जर मेलेल्या नवर्‍याच्या गळ्याला जिवंत बायकोच्या केसाचा फास बसत असेल, तर एखाद्याची बायको आधी मेली, तर त्या पुरुषाच्या शेंडीचा फास त्या बाईच्या गळ्याला बसत नाही का?”

अशा प्रकारचे युक्तिवाद त्यांना करावे लागले; मग त्यांनी फार महत्त्वाचे लेख लिहिले, जे आजही महत्त्वाचे आहेत की, तुम्ही हे सगळेच्या सगळे आचरणात आणू शकता का, असे कुठल्याही सुधारणावाद्यांना विचारतात, समाजाच्या प्रवाहात जायचं, तर सगळाच्या सगळा वैचारिक भाग आपण आचरणात आणू शकूच, असं नाही; परंतु तो बोलत राहिला पाहिजे आणि म्हणून ते म्हणाले की, ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार आणि म्हणून जे योग्य वाटतं ते मी बोलतच राहणार.’

आता हे बळ आगरकरांच्याकडे आलं कुठून? कॉलेजमध्ये असताना त्यावेळचे युरोपमधले जे विचारवंत होते, त्या विचारवंतांचा खूप मोठा प्रभाव आगरकरांच्यावर आणि एकूणच सुधारणावादी मंडळींच्यावर होता. म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल, त्यांचं ‘ऑन लिबर्टी’ नावाचं पुस्तक फार महत्त्वाचं आहे; तसेच ‘सब्जेक्शन ऑफ वुमन’ नावाचं पुस्तक महत्त्वाचं होतं. व्हॉल्टेअर, गिबन, मोर्लेअसे लेखक त्यांनी वाचलेले होते की, फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जे पुढे आलेले होते. ‘सब्जेक्शन ऑफ वुमन’चा परिणाम तर त्या काळच्या सगळ्या या तरुण सुधारकांच्यावर फार मोठ्या प्रमाणात होता. आगरकरांच्याच काळामध्ये त्यांनी जी शाळा स्थापन केली, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीनं न्यू इंग्लिश स्कूल पुण्याला, त्यांचे विद्यार्थी होते, महत्त्वाचे कादंबरीकार हरी नारायण आपटे. हरी नारायण आपट्यांनी ‘मी’ नावाची एक आणि ‘पण लक्षात कोण घेतो?’ नावाची दुसरी कादंबरी लिहिली. त्याच्यामध्ये त्यांनी स्त्रिया आणि विधवांची विपन्नावस्था वगैरे वर्णन केलेलं आहे. तर कादंबरीतला जो नायक आहे, भाऊसाहेब नावाचा… त्यांनी विद्यार्थीदशेमध्ये ‘सब्जेक्शन ऑफ वुमन’ पुस्तकावर हात ठेवून शपथ घेतली होती की, ‘मी स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी आमरण झटेन’ तर असा परिणाम आगरकरांच्या लेखनाचा ललित साहित्यावरसुद्धा होत होता आणि सर्वसामान्य तरुणांच्यावरसुद्धा. त्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की, समाजामध्ये आंतरिक विकास करायचा असेल, मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन करायचं असेल, तर विचारांमध्ये कलह झालेच पाहिजेत. मतभेदाला घाबरता उपयोगी नाही आणि प्रत्येकाला आपले मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार आहे. किती टोकाची भूमिका आगरकर त्या काळात घेऊ शकले! तर प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे म्हटल्यानंतर परंपरावादी मंडळी काय म्हणतात, की ‘आमच्या भावना जपण्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे की नाही?’ तर ते ‘आहे.’ उदारमतवादी आगरकर म्हणतात, ‘मी तुझं मतपरिवर्तन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन; पण याउप्परही जर तुला एखादं आचरण करायचं असेल, तर तू ते करू शकतोस;’ मात्र त्याचा इतरांना उपद्रव होता कामा नये आणि ती मुभा आगरकरांच्या घरामध्ये त्यांच्या पत्नीला होती.

सगळ्या सुधारकांच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की, त्यांना पहिला जो विरोध होतो, तो त्यांच्या घरातून. आपल्या घरातल्या व्यक्तींच्यावरसुद्धा जबरदस्ती करायची नाही, त्याचं मतपरिवर्तन करायचं. ही मुभा त्यांनी आपल्या पत्नीला दिली होती. कारण ती एका विशिष्ट परंपरेमधून आली होती. पुढे त्यांनी मग मोठा लेख लिहिला. तो प्रसिद्ध आहे, ‘महाराष्ट्रीयास अनावृत्त पत्र.’ आजच्या काळामध्ये तो वाचायला पाहिजे. महाराष्ट्रीय मंडळींच्यामध्ये काय काय दोष आहेत, ते त्यांनी बाजूला केले पाहिजेत, याचे विवेचन यात आहे.

आणखी एक खोचकपणाने लिहिलेला लेख आहे. तो विशेषत: ब्राह्मणांच्या सोवळ्या-ओवळ्याबद्दल आहे. तो लहानपणी आम्हाला पाठ्यक्रमात होता आणि तो मला अजूनही आठवतो. ‘ऐसे कैसे रे सोवळे?’ तर हे असं सोवळं कसं? आणि मग बायकांच्यामधल्या सोवळ्या-ओवळ्याच्या ज्या भ्रामक किंवा हास्यास्पद कल्पना आहेत, त्या त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर मांडल्या होत्या. आगरकरांच्या काळामध्ये आणखी एक आक्षेप त्यांच्यावर येतो की, महात्मा जोतिबा फुले पुण्यामध्ये कार्य करत होते. त्याची दखल आगरकरांनी घेतली नाही. प्रश्न असा आहे की, आगरकरांचे आयुष्य किती कमी आहे! फक्त 39 वर्षांचं आयुष्य. महात्मा जोतिबा फुले ज्यावेळेला त्यांचा काम करत होते, त्यावेळेस हे अगदी विद्यार्थीदशेमध्ये होते आणि तरीसुद्धा महात्मा जोतिबा फुल्यांच्या वतीनं त्यांनी विधवा केशवपनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचं संघटन करण्याची भूमिका घेतली होती. त्यासाठी ‘दीनबंधू’ नावाच्या वृत्तपत्रामध्ये जो लेख लिहिलेला होता, त्याचं स्वागत ‘सुधारकां’नी अग्रक्रमानं केलं होतं. ‘दीनबंधूं’नी किती चांगली भूमिका घेतली की, विधवांचं केशवपन होऊ नये म्हणून न्हाव्यांचा संप घडवून आणला. ही अतिशय लोकविलक्षण कल्पना होती आणि त्याच्यासाठी महात्मा फुले तर थोर आहेतच; पण ‘दीनबंधू’कारही थोर आहेत आणि आगरकरही.

आपल्या भोवताली काय चाललंय? याची त्यांनी दरवेळेला दखल घेतलेली दिसते.

पुढे टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये वाद हे वैयक्तिक पातळीवर टोकाला गेले आणि प्रत्येक संघटनांमध्ये जसं होतं तसंच झालं की, प्रत्यक्ष त्या व्यक्तींच्यापेक्षा त्यांचे अनुयायी म्हणवणारे जे आहेत, ते अत्यंत क्षुद्र पातळीवरचे असतात आणि त्यांच्यामध्ये संघर्ष होतात. तसे टिळकवादी आणि आगरकरवादी अशांच्यामध्ये फार मोठे संघर्ष झाले आणि सुधारक आणि सनातनी यांच्यातले विरोध खूप विकोपाला गेले. त्यातल्या एकेक घटना जर सांगितल्या, तर आपल्याला आश्चर्य वाटेल अशा त्या घटना घडलेल्या होत्या. त्यातली एकच घटना मी सांगते. मी हे अशासाठी नोंदवत आहे की, मला ज्यांनी सबंध काळ शिकवला किंवा ज्या काळाचा परिचय करून दिला त्यांनी या प्रत्येक घटनेचा अर्थ आमच्या मनावर खोलपणे बिंबवला. त्याच्यातली एक घटना म्हणजे पुण्याला ‘पंचहौद मिशन प्रकरण.’ ‘पंचहौद मिशन प्रकरण’ म्हणजे काय? तर इंग्रजांच्या हातून पाणी पिणं, त्यांचं ब्रेड-बिस्कीट खाणं, हे मोठं पाप समजलं जाई. तर त्या पंचहौद मिशनमध्ये जे धर्मगुरू होते, त्यांनी पुण्यात नामांकित, प्रसिद्ध व्यक्तींची एक बैठक बोलवली. ज्याला आपण चहा-पाण्याची बैठक म्हणूयात अशाप्रकारची! आणि त्याच्यामध्ये टिळक, आगरकर या सगळ्या मंडळींना त्या फादरनी बोलावलं होतं; मग दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध झाली, ‘टिळकांच्या विरोधामध्ये की, हे स्वत: एवढे सनातनी म्हणवतात, धर्माचे पाठीराखे म्हणवतात आणि ते तिथे चहा-बिस्कुटं खायला कसे गेले? कारण त्या पाद्य्राच्या हातचं बिस्कुट खाणं हे सुद्धा पाप मानलं जायचं. ब्रेड खाणंसुद्धा पाप मानलं जायचं. चहा पिणंही पाप मानलं जायचं.’

शिकलेली मुलं चहा पितात, त्यावर बायका गाणं म्हणायला लागल्या, तर आमची आईही म्हणायची, या चहाने किती घात केलेला आहे की, हे इंग्रजी पेय मुलं प्यायला लागली आहेत. म्हणजे मुलं बिघडण्याची कारणं किती लहान-लहान स्तरावर मोजली गेली होती. आज आपण म्हणतो, मुलं मोबाईलमुळं बिघडली. त्यावेळी म्हणाले, चहामुळं मुलं बिघडली, तर हे दर काळामध्ये काही ना काही चालतच असतं.

दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रामध्ये त्या सभेला कोण कोण हजर होतं, त्यांची यादी प्रसिद्ध झाली. टिळक इतके थोर राजकारणी होते की, मग पुण्यातल्या ब्राह्मण मंडळींनी… सनातनी ब्राह्मण मंडळींनी एक सभा घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, जे-जे तिथं हजर असतील, त्यांनी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. कारण ब्राह्मणांकडून पापाला प्रायश्चित्त घेणं हा एक चांगला उपाय आपल्याकडे आहे. तर टिळक एवढे थोर राजकारणी की, त्यांनी प्रसिद्ध करून टाकलं की.. मी काही वर्षांपूर्वी काशीला गेलो होतो. त्यावेळेस सर्वांग प्रायश्चित्त घेतले आहे. त्यामुळं आता शास्त्रानुसार दुसर्‍या प्रायश्चित्ताची गरज नाही.

अशा खळबळजनक घटना पुण्यामध्ये घडत होत्या. विधवांच्या केशवपनाच्या विरोधामध्ये मोठी सभा सनातन्यांनी घेतली. ‘सुधारकां’च्यावर अत्यंत अनर्गल भाषेमध्ये त्यांनी आक्षेप घेतला. ‘विधवा केशवपन’ नावाचे पुस्तक पुढे स. ग. मालशेंनी प्रसिद्ध केलेले आहे. त्यामध्ये या सबंध घटना.. भाषणं वगैरे दिलेलं आहे. तेव्हा ‘सुधारकां’ना एकेक पाऊल पुढे टाकण्यासाठी किती मोठ्या संघर्षाला स्वजनांशी तोंड द्यावं लागलं, हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्याच माणसांना सुधारण्यासाठी आपल्या माणसांचा कोप ओढवून घेणं, ही साधी गोष्ट नसते की, आजही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मंडळींना पुन्हा पुन्हा कोप ओढवून घ्यावा लागतो; परंतु या सगळ्यांतून समविचारी मंडळी वाढत चाललेली होती. विरोध बोथट होत चाललेला होेता. स्त्रियांनी पुढाकार घ्यायला सुरुवात केलेली होती. स्त्रिया स्वत:हून शिकायला पुढे यायला लागल्या होत्या. विधवा स्त्रिया शाळांमधून शिक्षिका व्हायला लागलेल्या होत्या.

आगरकरांची आणखी एक स्त्रियांच्या बाबतीत भूमिका होती की, स्त्रियांना जे शिक्षण द्यायचं ते शिक्षण त्यांच्या उपजीविकेसाठी उपयोगी पडेल, असं दिलं पाहिजे आणि म्हणून स्त्रिया सुरुवातीला शिक्षिका आणि दायी झाल्या. दायी म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या, ज्यांना आपण ‘नर्स’ म्हणतो अशा प्रकारच्या!

पुणं हे तसं सनातनी आणि मागासलेलं; त्यामुळे पुण्यामध्ये हे विरोध फार जहाल होते. त्यामानानं मुंबई पुरोगामी होती आणि आगरकर जर मुंबईला असते, तर त्याचा जास्त उपयोग झाला असता, असं मला वाटतं; परंतु अशा पद्धतींनी या संघर्षातून ज्याला सुधारक म्हणता येईल ते ‘सुधारक’ संबोधनही त्या काळामध्ये शिवी बनली होती किंवा एखादी स्त्री किंवा पुरुष यांनी कपडे जरी बदलले, तरी तो ‘सुधारी’ आहे, असं म्हणायचे. ‘सुधारी आहे’ म्हणजे एखाद्या शिवीसारखा तो शब्द वापरला जायचा.

अलिकडच्या काळामध्ये आमच्या तरुण वयात ‘स्त्री मुक्तीवाल्या बाया’ ही जशी शिवी झालेली होती किंवा हा अंनिसचा कार्यकर्ता ही शिवी झाल्यासारखी झालीय किंवा पुरोगामीची ‘फुरोगामी’ अशी टिंगल करतात. ही प्रवृत्ती दर काळात असते आणि ही कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, असं मला वाटतं आणि याच्यासाठी आगरकर हा आपला फार मोठा प्रेरणास्रोत आहे. कारण आगरकरांनाही खूप सहन करावं लागलं. दारिद्य्र अफाट होतं. कॉलेजमध्ये असतानाही रोज रात्री सदरा धुऊन सकाळी वापरावा लागे. कारण त्यांना एकच शर्ट होता. रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करावा लागे; प्रसंगी वार लावून जेवण करून उपजीविका करावी लागे. त्यांना आयुष्यभर कुठलंही स्वास्थ्य मिळालं नाही. त्याचा परिणाम असा झाला की, ते तरुण वयात सारखे आजारी पडत असत. त्यांना अस्थमाचा खूप मोठा त्रास होता. ही गोष्ट टिळकांना माहीत होती. टिळकांनी पुन्हा पुन्हा.. विशेषत: त्यांच्या आजारपणात त्यांची विचारपूस केली. त्यांना भेटायला गेले, म्हणजे विरोध असूनसुद्धा माणुसकीच्या पातळीवर मैत्री कशी टिकवू शकतो, त्याचं उदाहरण आपल्याला त्या काळातल्या या लोकांमध्ये पाहायला मिळतं किंवा वैचारिक मतभेद टोकाचे असूनसुद्धा माणुसकीच्या पातळीवर ती मंडळी फार सौजन्यशील होती. टिळकांनी शेवटी त्यांना वैद्यकीय मदत पुरवण्याचाही प्रयत्न केला; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही आणि अवघ्या 39 व्या वर्षी आगरकरांना हे जग सोडावं लागलं.

त्यांच्या आईला त्यांनी कॉलेजमध्ये असताना पत्र लिहिलेलं होतं, त्या ओळी मला फार महत्त्वाच्या वाटतात आणि आजही कुठल्याही सामाजिक क्षेत्रात स्वत:ला झोकून देणार्‍या माणसांच्या बाबतीमध्ये असंच घडत असतं, असं मला वाटतं. कोकणातनं आलेली ती दरिद्री बाई.. आई.. तिला डेक्कन कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी पत्र लिहिलं होतं, ‘आई, आपल्या मुलाच्या मोठाल्या परीक्षा होत आहेत आणि त्याला मोठाल्या पगाराची नोकरी लागेल आणि आपले पांग फिटतील, असा विचार तू करत असशील; पण मी तुला आजच सांगून ठेवतो की, उदरनिर्वाहापुरतं अर्थार्जन करून माझा उरलेला वेळ आणि शक्ती मी समाजकार्यार्थ खर्च करणार आहे. माझ्यापासून जास्त अपेक्षा बाळगू नकोस’ आणि त्या विधवा आईने त्यांना साथ दिली. त्यांच्या बायकोने त्यांना साथ दिली आणि तरीसुद्धा 17 जून 1895 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी हा अत्यंत क्रांतिकारी असलेला, विचारांनी जहाल असलेला सुधारणावादी आपल्यातून गेला; परंतु विचारांच्या पातळीवर तो आजही आहे! आणखी एक वाईट गोष्ट मला शेवटी नमूद करायची आहे की, आज जातीयवाद उलट्या पद्धतींनी वाढतो आहे. टेंभू हे जे आगरकरांचं गाव, तिथे आगरकरांचा पुतळा उभा केला होता आणि या दोन-तीन वर्षातली गोष्ट आहे की, टेंभू गावातल्या काही समाजकंटकांनी आगरकरांचा पुतळा फोडला आणि तो फोडल्याचं कारण जातीव्यवस्थेमुळे जो काही एक विकृतपणा उफाळून आलेला आहे की, अमुक जातीचा मनुष्य म्हणजे तो मागासलेलाच असला पाहिजे. तो सनातनी असला पाहिजे. आगरकर तसे नव्हते, हे पुतळा फोडणार्‍यांना माहीत नव्हतं. त्यांच्या पुढार्‍यांनाही माहीत नव्हतं आणि ही जी काही दुर्दैवाची गोष्ट आहे, ती समाजसुधारणेच्या क्षेत्रामध्ये काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. जातीच्यापेक्षा समतोल विचार महत्त्वाचे असतात. अमुक जातीचा मनुष्य म्हणून तो अमक्याच प्रकारानं वागेल, अशी खात्री देता येत नाही. म्हणून आगरकरांचा पुतळा फोडण्याची जी घटना आजच्या युगामध्ये घडते आहे, त्याचाही आपण निषेधच केला पाहिजे आणि जास्त व्यापक भूमिकेवर जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, ही खर्‍या अर्थाने आगरकरांना आदरांजली होईल.

शब्दांकन : नीलम माणगावे