Categories
भानामती

शेतातल्या पिकांना लागली पनवती, गोठ्यातल्या जीवांवर उठली भानामती!

मे - २०१८

ज्ञान हा माणसाचा विशेष आहे. तर्कबुद्धीचा विकास त्याच आधारे होतो. त्या विकासातून विवेक आणि विवेकातून प्रगती आकार घेत असते, हे जरी पूर्णत: खरे असले, तरी ज्ञान मिळविलेले असो की नसो; आपला समाज अजून कुठेकुठे मागासलेलाच आहे. याची प्रचिती 28 मार्च 2018 रोजी महाराष्ट्र अंनिस सांगली शाखेच्या टीमला आली. ‘अंनिस तारांगण’ चालविणारे एक खंदे कार्यकर्ते भास्कर सदाकळे यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील एका शेतकर्‍याच्या शेतात गेली 15-20 दिवस चालू असलेल्या गूढ, भयचकित घटनांचे सत्र; म्हणजेच भानामतीबद्दल सांगली अंनिस शाखेस कळविले. प्रा. प. रा. आड र्ेसरांनी अर्थातच हे आव्हान स्वीकारले. आर्डे सर, डॉ. संजय निटवे, त्रिशला शहा व आशा धनाले ही अंनिसची टीम घटनास्थळी पोचली. निरीक्षणादरम्यान मिळालेली माहिती अशी, ही भानामती फक्त वस्तूंच्या हेराफेरीची नव्हती, तर त्यामध्ये गोठ्यातील मुक्या जनावरांचे जीवही घेतले गेले होते. शिवा लोखंडे या शेतकर्‍याचा परिवार या एकामागून एक घडणार्‍या घटनांमुळे संपूर्ण धास्तावून गेला होता. हा शिवा आपल्या शेतातल्या छोट्या घरात आपली आई, पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे यांच्यासह राहत आहे. घरासमोरच शेत, त्यात मका, डाळिंब, वांगी, मिरची यांची लागवड केलेली. सर्वांनी वाखाणलेल्या डाळिंबाच्या पिकावर रोग पडण्यापासून या भानामतीला सुरुवात झाली आणि आता गेली 15-20 दिवसांपासून वांगी व मिरच्यांची रोपे आपोआप उपटून पडू लागली होती. फळांसह निरोगी रोपे अचानक धराशायी होत होती. याच काळात अविश्वसनीय अशी आणखी एक घटना घडली. कोणताही आजार नसताना त्यांच्या दोन जर्सी गायी व 2 शेळ्या या अचानक चार दिवसांच्या अंतराने तोंडाला फेस येऊन दगावल्या. तेव्हा पुरत्या भयग्रस्त झालेल्या शिवा लोखंडेच्या कुटुंबाने नृसिंहवाडी येथे जाऊन ब्राह्मणाकरवी त्रिपिंडी पूजा घातली. त्यासाठी 10 हजार रुपये खर्च केले; परंतु भानामती चालूच राहिली. उपटून पडलेली रोपे पाहता रोपे व रोपांची मुळे यामध्ये काहीच दोष दिसला नाही.

शिवा लोखंडेचा परिवार बर्‍यापैकी अंधश्रद्ध वाटला. कुटुंब जगविण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकजण मेहनत करत होता; परंतु मेहनत व यश यामध्ये काहीशी दरीच होती. शिवा लोखंडेच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र नुकतेच हरवलेले. त्यानंतर त्याचे अँजिओप्लास्टीचे ऑपरेशन झाले होते. शिवाचा थोरला मुलगा जनावरे व शेत यांच्या मेहनतीत गुंतलेला. धाकटा मुलगा व त्याची पत्नी बर्‍यापैकी शिक्षित. त्यालाही त्याने चालविलेल्या छोट्या शिक्षणसंस्थेत अपयश आले होते. अशा या कुटुंबाचा रामरगाडा ओढताना घरातील महिला वर्ग कोणतीही धुसफूस न करता आपल्या परीने सर्वतोपरी मदत करीत होता. अशी कौटुंबिक माहिती मिळाल्यानंतर आर्डे सरांनी कुटुंबातील प्रत्येकाची वेगवेगळी मुलाखत घेतली. त्यानंतरचा निष्कर्ष सर्व कुटुंबाला सांगितला की, ‘सध्या ज्या गूढ आणि नुकसानदेह घटना घडत आहेत, त्यामागे कोणतीही अमानवी शक्ती किंवा काळी जादू असे काही नसून त्यामागे कुटुंबातीलच कोणाचा तरी मानवी हात आहे. तो छडा लवकरच लागेल.’ त्यानंतर हातांच्या बोटांचे ठसे ठसेतज्ज्ञांकडून पारखून घेण्यासाठी उपटून पडलेली दोन-तीन रोपे जप्त केली गेली. दोन-तीन दिवसांत या घटना घडवून आणणार्‍या व्यक्तीला उजेडात आणण्याचे सांगून निरोप घेतला. त्यांच्या सतत संपर्कात राहिलेल्या आर्डे सरांना नंतर समजले की, दुसर्‍याच दिवसांपासून भानामतीचे सर्व प्रकार पूर्णपणे थांबले आहेत व गोठ्यातील शिल्लक जनावरेही सुरक्षित आहेत. तरीही त्यांनी डॉ. निटवेंसह घटनास्थळी पुन्हा एकदा भेट दिली, तेव्हा सर्व परिस्थिती नियंत्रणाखाली होती. अर्थातच दिलेला इशारा निर्वाणीचा समजून घटना घडविणार्‍या व्यक्तीने पुढील पावले न उचलता स्वत:चे नुकसान थांबविण्यातच इष्टता मानलेली होती. तेव्हा पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, ही खात्री घेऊन या गूढ नुकसानीचे सत्र समूळ नामशेष करून एका वेगळ्या भानामतीला इतिश्री मिळाली. थोडक्यात, यातून असा निष्कर्ष निघतो की, वैफल्यग्रस्त मनोदौर्बल्याला बळी पडलेली एखादी व्यक्तीच भानामतीच्या विकृत मार्गाने सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत असते आणि सामान्यत: साध्या मनोवैज्ञानिक मार्गदर्शक सल्ल्याने तिच्या विकृत मनाला शांत करता येते.

– आशा धनाले

संपर्क : 9860453599