Categories
बालविभाग

द़ृष्टीभ्रम

वार्षिकांक - २०१८

मुलांनो! मराठीत एक म्हण आहे, ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’. पण ही म्हण अपुरी आहे. बहुतेक वेळा आपण जे पाहतो ते खरेच असते. आपण झाड पाहतो, चंद्र पाहतो, सूर्य पाहतो, एकमेकांना पाहतो. आपला डोळा आपल्याला सृष्टीचे वास्तव ज्ञान देतो; पण काही वेळा विशिष्ट परिस्थितीत आपले डोळेदेखील फसतात, हे खरे आहे. आपले डोळे जेव्हा फसतात, तेव्हा आपल्याला भ्रम होतात. त्याला आपण दृष्टिभ्रम म्हणतो. दृष्टीभ्रम हे अतिशय विचित्र आणि गूढ प्रकारची फसगत आहे. या भ्रमांबाबत मानसशास्त्रज्ञांना थोड्या-फार प्रमाणात ज्ञान झाले असले, तरी बर्‍याच भ्रमांबाबत मानसशास्त्रज्ञही बुचकळ्यात पडतात.

द़ृष्टीभ्रम हे चार प्रकारचे मानता येतील. यातील काही भ्रम हे आपल्या दृष्टीच्या मर्यादेमुळे घडतात. पण बहुतेक भ्रम डोळ्यांनी मेंदूला फसविल्यामुळे घडतात. काही दृष्टीभ्रमात एकाच लांबीचे दोन पदार्थ वेगवेगळ्या लांबीचे वाटतात. तर काहींचे आकार किंवा आकारमान समान असूनही दे भिन्न वाटतात. काहीवेळा आपल्याला गतीभ्रम होतो, तर काहीवेळा रंगभ्रम होतो. या विविध प्रकारच्या भ्रमांची उदाहरणे पुढील पानांत दिली आहेत. ती आपण नीट पाहावीत. मग बघा आपले डोळे कसे फसतात ते?

काहीवेळा दृष्टिभ्रमाला मनातील पूर्वग्रहांची मदत होते. श्रद्धाळू लोकांना चंद्रावरचे डाग हा साईबाबाचा चेहरा वाटतो. हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्या मनात ज्या आकृतीचा प्रभाव असेल किंवा जी आकृती अपेक्षित असेल, ती आपल्याला दिसू लागते. हा आकृतीभ्रम आपल्याला कधीकधी मोठा त्रासदायक बनतो. उदा. भूताचा भ्रम. अंधारातील आकृती प्रत्यक्षात भूत नसली, तरी ती आपल्याला भूत भासते; याचे कारण म्हणजे दृष्टीभ्रम. भूत हे वास्तवात नसते, तर ते आपल्या मनात असते. त्याची निर्मिती भीतीतून झालेली असते; पण एखादी आकृती भूतच आहे असे समजून आपण घाबरतो व भीतीमुळे बेशुद्धही पडतो. हे मनाचे खेळ थांबवायचे असतील, तर आपले डोळे कसे फसतात, हे नीट समजून घ्यायला हवे.