Categories
भांडाफोड

कोल्हापुरात शास्त्री महाराजास अटक व कोठडी

जुलै - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेच्या बैठकीत विविध उपक्रम, बुवा-बाबा यांच्या बाबत तक्रारी, झालेले कार्यक्रम याबाबत चर्चा होते. एकदा उपस्थित कार्यकर्त्याने एक जाहिरात दाखवली, सदरची जाहिरात त्यास वृत्तपत्रातून मिळाली होती. जाहिरातीत म्हटले होते – “हनुमानाचे भक्त श्री. शास्त्री महाराज कोल्हापुरात प्रथम आलेले आहेत, हे महाराज चेहरा पाहून भविष्य सांगतात, कोणत्याही समस्येवर त्यामध्ये पती-पत्नीमधील तणाव, संतानसुख, शिक्षण, प्रेमविवाह, वास्तुदोष, कालसर्पदोष या निराकरणासाठी भेट द्या, हॉटेल कोहिनूर, बस स्टँड” व फोन नंबर दिला होता.

याबाबत मीटिंगमध्ये चर्चा केली व शास्त्री महाराजाकडे जाण्याचे ठरले, त्यासाठी संध्याकाळची वेळही घेतली.

महाराज कोल्हापुरातील मोठ्या हॉटेलमध्ये उतरले होते, सायंकाळी गीता हासूरकर, रमेश वडणगेकर यांनी हॉटेल गाठले. महाराजांच्या खोली क्र. 316 बाहेर दरवाज्यावर जाहिरात लावली होती. खोलीत प्रवेश केला, खोलीतील एका बेडवर महाराजांनी हनुमान, लक्ष्मी, साईबाबा, अंबाबाई यांचे फोटो लावले होते, त्याची पूजाही मांडली होती. महाराजांनी बसण्यास सांगितले, महाराज बेडवर बसले, आम्ही खाली. महाराजांची दाढी वाढलेली, पांढरे केस, पायजमा, धोतर असा वेष होता. महाराजांच्या बोलण्यात आवेश, रसाळपणा होता. महाराजांना, समोरील देव-देवतांना आम्ही नमस्कार केला.

गीताताई – मला मूल होत नाही, त्यामुळे घरी भांडणतंटा होत आहे.

महाराज – तुमच्यावर बाहेरची बाधा आहे, त्यामुळे तुम्हास मूल होत नाही.

गीताताई – घरातील भांडणामुळे मी माहेरी आले आहे, पती दुसरे लग्न करतो, असे म्हणतो.

महाराज – तुमच्या सर्व तक्रारी दूर होतील. त्यासाठी पथ्ये पाळावयाची एक म्हणजे रामफळ खायचे नाही, उडीद डाळ खायची नाही, कोणत्याही गोळ्या घ्यायच्या नाहीत, मी देतो ती वस्तू घरात कोठेही ठेवायची. तुम्हास नक्कीच संतन प्राप्त होईल. यासाठी तुम्हास 31 हजार रुपये खर्च आहे.

गीताताई – आम्ही आज पैसे आणले नाहीत, जुळणी करतो मग येतो.

महाराज – मग आजची फी रुपये 200 ठेवा.

महाराजांना यथासांग नमस्कार करून गीताताई व रमेश वडणगेकर खोलीतून बाहेर पडले. बाहेर महाराजांचा सेवक बसला होता.

भेटीसंदर्भात अंनिस कोल्हापूर शाखेच्या प्रधान सचिव स्वाती कोरे, सुजाता म्हेत्रे यांच्याशी चर्चा केली. महाराज लोकांना फसवत आहे, आपण या महाराजास पकडले पाहिजे, असे ठरले. दुसर्‍या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे व शहर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांची भेट घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे शाहूपुरी पोलीस स्टेशनचे शहाजी निकम यांची भेट घेतली. नाईलाजाने ते आमचे म्हणणे ऐकू लागले. सदरचा महाराज दुसर्‍या गावी जाणार असल्यामुळे लगेचच त्याच्यावर आपण छापा टाकू, असे म्हणाले. त्यानुसार त्यांनी एक टीम तयार करून एक साध्या वेशातील पोलीस आम्हासोबत दिला.

गीताताईंनी महाराजांची फोन वरून वेळ घेतली, तसेच ‘मला आजच वस्तू द्यावी, यासाठी माझे बंधू सोबत आले आहेत,’ असे सांगितले. महाराजांनी रजिस्टरमध्ये नाव लिहिण्यास सांगितले. गीताताईंनी पैसे थोडे कमी करावे व वीस हजारांत वस्तू द्यावी, याबाबत महाराजांना राजी केले. मग आता रुपये 5 हजार द्यावे. बाकी रक्कम काढून आणण्यासाठी सोबत असलेला भाऊ बाहेर गेला. थोड्या वेळाने भाऊ बनलेला पोलीस पैसे घेऊन आला, रक्कम देवाच्या पुढे ठेवण्यास सांगितले. महाराजांनी संतान प्राप्तीसाठीचा गंडा गीताताईकडे दिला, त्यानंतर साध्या वेशातील पोलीस व अंनिसचे कृष्णात कोरे, पोलीस निरीक्षक शहाजी निकम आत आले. महाराजाकडील साहित्य, रक्कम ताब्यात घेतली.

या महाराजाचे नाव किसन गंगाराम जोशी, वय 71 रा. मुदखेडा, पो. गारखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव असून त्याच्यासोबत दिगंबर उत्तम जोशी (वय 32) व अल्पवयीन नातवाचा समावेश होता. या महाराजावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट प्रथा प्रतिबंध व समूळ उच्चाटन अधिनियम 2(1), भारतीय दंड संहिता कलम 420 या द्वारे गुन्हा दाखल झाला.

कायदा : एक हत्यार

सुरुवातीस अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितले, या महाराजाला ‘जादूटोणा विरोधी कायद्या’खाली अटक होऊ शकते; तसेच या कायद्याचा वापर करून पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी एक केस केली होती, त्यामुळे या शास्त्री महाराजांना ट्रॅप करण्यासाठी यांनी सहकार्य केले. कायद्याची पुस्तिका आम्हास राज्याच्या लिगल सेल अ‍ॅड. तृप्ती पाटील यांनी उपलब्ध करून दिली. जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण आयोजित करण्याचे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक काकडे साहेब यांनी दिले.

भोंदूबाबाचा चार दिवसांत चाळीसजणांना गंडा

भोंदूबाबा (शास्त्री महाराज) याने चार दिवसांत चाळीसहून अधिक लोकांची फसवणूक करून मोठ्या रकमा उकळल्याचे चौकशीत समोर आले. या महाराजाच्या डायरीत कोल्हापूर, सांगली भागातील लोकांची नावे होती. हा महाराज 20 ते 25 हजार उकळत होता. दिलेला गंडा आठ दिवसांत कुणालाही दिसला नाही पाहिजे, असे सांगत होता. आठ दिवसांनंतर बाबा त्या ठिकाणाहून निघून जात असे. दुसर्‍या शहरात जाऊन, नवीन मोबाईल नंबर घेऊन लोकांची फसवणूक करीत असे. शास्त्री महाराजास न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

बाबा, बुवाकडे गर्दी का?

बुवा, बाबा, महाराज यांच्याकडे गर्दी वाढत आहे. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. आरोग्य, शिक्षण व्यवस्था अधिक महाग झाली, सर्वसामान्य व्यक्ती त्रासली आहे. सर्वसामान्यांच्या समस्यांवर बुवा, बाबा सोपे उपाय सांगतात. बुवा-बाबांचा उपायांचा तात्पुरता दिलासा मिळतो; पण प्रश्न काही सुटत नाहीत. प्रश्न या व्यवस्थेतून निर्माण झाले आहेत. त्यासाठी धोरण हवे, त्यासाठी आग्रह धरावयास हवा. बुवा, बाबा, मात्र त्याबाबत बोलत नाहीत.

शास्त्री महाराज हा एक कुडमुड्या महाराज. लोकांचे भविष्य सांगून फसवणारा, आपल्याकडे देवाच्या, धर्माच्या, अध्यात्माच्या नावावर ठगविणारे आपण आसपास पाहतो, अशा मंडळींचे उद्योग बंद करावेत, यासाठी जनजागृती व कायद्याचे बळ वाढविणे आवश्यक आहे.

या महाराजांना पकडण्यासाठी अंनिसचे राज्य युवा कार्यवाह कृष्णात स्वाती, राज्य कार्यवाह सुजाता म्हेत्रे, जिल्हा प्रधान सचिव सीमा पाटील, शहर प्रधान सचिव स्वाती कृष्णात, सुषमा सूर्यवंशी, रमेश वडणगेकर यांनी प्रयत्न केले; तसेच सहा. पोलीस निरीक्षक शहाजी निकम, पोलीस युवराज पाटील, पोलीस प्रशांत घोलप, तानाजी चौगुले, राजू वरक, दिगंबर पाटील सहकारी सहभाग घेतला. यापूर्वी कोल्हापुरात ‘जादूटोणा विरोधी कायद्या’द्वारे मुलगाच होणार असा दावा करणार्‍या कुंभार बंधूंना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कोल्हापूरचे सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, कॉ. अनिल चव्हाण, कॉ. स्नेहल कांबळे यांनी पकडून दिले, आज ही दुसरी केस कोल्हापूर अंनिसने केली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन…!