10 जून रोजी प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक आणि कलावंत गिरीश कार्नाड यांचे दीर्घ आजारानंतर राहत्या घरी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. विवेकवादाच्या चळवळीच्या अंगाने लक्षात घेतले, तर हा माणूस आपला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सत्तेविरुद्धही बंडखोर विचार मांडताना कार्नाड कचरले नाहीत. त्यांना अंनिसतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहत असताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आमच्या वाचकांना परिचय करून देणे आमचे कर्तव्य ठरते.
गिरीश कार्नाड यांचा जन्म 19 मे 1938 रोजी महाराष्ट्रातील माथेरान येथे झाला. त्यांचे वडील डॉ. रघुनाथ कार्नाड आणि आई कृष्णा पुरोगामी विचारांचे होते. डॉ. रघुनाथ कार्नाड यांनी विधवा कृष्णेशी विवाह केला होता. वडिलांची कर्नाटकात शिरसी येथे बदली झाल्यानंतर हे कुटुंब जवळच धारवाडला स्थायिक झाले. कर्नाटक कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर एम.ए. साठी गिरीश कार्नाड मुंबईमध्ये आले. एम.ए. झाल्यानंतर ते ऑक्सफर्डला गेले. विशेष म्हणजे गणित विषयाचा हा पदवीधर साहित्य आणि काव्य यामध्ये रमला. कुमारवयात असताना गिरीश कार्नाड यांना साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ यांची रेखाचित्रे रेखाटण्याचा आणि त्यावर त्यांची सही घेण्याचा छंद होता. आयरिश नाटककार शॉन ओकेजी यांचे असे रेखाचित्र कार्नाडांनी त्यांना पाठवून दिले. ‘दुसर्याची अशी रेखाचित्रे रेखाटण्याऐवजी असे काहीतरी करा की, ज्यामुळे लोक तुमची सही घेतील,’ असा संदेश ओकेजी यांनी कार्नाडांना दिला. कदाचित याचा परिणाम म्हणूनही स्वत:ची मुद्रा उमटवणारे साहित्य त्यांनी लिहिले आणि कलावंत म्हणूनही ते कीर्तिवंत झाले.
नाटक, चित्रपट, अभिनय आणि साहित्य या सर्वच क्षेत्रांत लीलया वावरताना त्यांनी उदारमतवादाची पाठराखण केली. सामाजिक चळवळीत भाग घेतला आणि वैज्ञानिक दृष्टी जोपासत नाविन्याचा वेध घेतला. कर्नाटकातील यक्षगान आणि कथाकथनाच्या परंपरेनं त्यांच्यातील नाटककाराला जागे केले. त्यांची बहुतांश नाटके भारतीय लोककथा, पौराणिक वा ऐतिहासिक लोककथा यावर आधारित आहेत; परंतु या कथांकडे आजच्या संघर्षातून पाहण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. म्हणूनच त्यांनी या करिता नवा आयाम दिला. त्यांनी ‘ययाती’, ‘तुघलक’, ‘हृदयवदन’, ‘नागमंडळ’, ‘टिपू सुलतान,’ ‘तलेदंड’ ही प्रभावी नाटके लिहिली. या सर्वांमध्ये आधुनिक संदर्भातून केलेले भाष्य यामुळे ती वैशिष्ट्यपूर्ण ठरली. आशय आणि प्रयोगाच्या वेगळेपणातून कार्नाडांनी रंगभूमी समृद्ध केली.
कार्नाडांनी चित्रपटसृष्टीही गाजवली. प्रख्यात साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांचे संस्कारी कादंबरी पडद्यावर साकारण्यास पुढाकार घेतला. त्यातील नायकाची भूमिकाही त्यांनी साकारली. नंतर एस. एन. भैरप्पा यांच्या ‘वंशवृक्ष’ या कादंबरीवर चित्रपट केला आणि त्यातही भूमिका साकारली. कार्नाड हे उत्तम दिग्दर्शकही होते. विशेष म्हणजे ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटातून त्यांनी भूमिका साकारली.
आजच्या सामाजिक वास्तवाविषयी अस्वस्थपणा हीच लेखकाच्या जिवंतपणाची खूण असते. कार्नाडांनी पुराणातील कथा आणि त्यातील मिथके यांचा वापर आपल्या नाट्यलेखनासाठी केला; परंतु या कथांना आजच्या संदर्भात त्यांनी नवा आयाम दिला. ययाति या नाटकामध्ये आपल्या आकांक्षाचं ओझं पुढच्या पिढीवर लादून तिला जर्जर करणार्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून कार्नाडांचा ययाति चिरंतन झाला. आजच्या भोगवादी जमान्यात असे ययाति आपल्याला पदोपदी दिसतात. त्यांच्या नाटकात राजकीय भाष्यही विपुल आहे. उदाहरण म्हणून त्यांचं ‘तुघलक’ हे नाटक आजच्या राज्यकर्त्यांनासुद्धा आपला आरसा वाटेल. आपल्या नाटकात कार्नाड जातीय आणि सनातनी धार्मिक राजकारण यावरही भाष्य करतात. पारंपरिकता आणि आधुनिकता या दोन्हींचं एक अजब आणि सुंदर मिश्रण त्यांच्या नाटकात सापडतं.
कार्नाड यांची नाटकं बघताना हे ध्यानात येतं की, ते हिंदू परंपरेविषयी सजग होते; पण या परंपरेचा आधुनिक अन्वयार्थ ते लावत होते. ते परंपरेला प्रश्न विचारत होते. त्यामुळेच आजच्या प्रश्न विचारणार्यांची मुस्कटदाबी करणार्या परंपरावाद्यांना त्यांचा विरोध होता. त्यामुळेच कन्नडमधील ए. के. रामानुजन आणि यू. आर. अनंतमूर्ती यांच्याप्रमाणेच ते शिव्या आणि टीकेचे धनी झाले.
स्वातंत्र्य, समता आणि विवेक या मूल्यांचा पुरस्कार करण्यासाठी गिरीश कार्नाड रस्त्यावर आले, बोलत राहिले. कर्नाटकालाही प्रगत विचारांचा वारसा आहे. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी उभारलेल्या शरणांच्या चळवळीने जी समानतेची बीजे रोवली त्यांच्या रक्षणासाठी तिथे आजही लेखक, कलावंत अस्वस्थ होऊन रस्त्यावर येतात. गिरीश कार्नाड हे अशा कलावंतांपैकी एक होते. महाराष्ट्रात साठ-सत्तरच्या दशकात कलासाहित्याच्या क्षेत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी विजय तेंडुलकर अग्रगण्य होते. तेंडुलकरांप्रमाणेच कर्नाटकात गिरीश कार्नाड, बंगालमध्ये बादल सरकार आणि हिंदी पडद्यावरील मोहन राकेश हे सर्व कलाकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्तेहोते.
नाटक आणि चित्रपटाबरोबरच ‘मालगुडी डेज’ वर आधारित दूरचित्रवाणी मालिकेत स्वामीच्या वडिलांची व्यक्तिरेखा त्यांनी रंगवली होती. ‘टर्निंग पॉईंट’ या विज्ञान कार्यक्रमाचे सादरीकरणही त्यांनी दूरदर्शनवर केले. विचार स्वातंत्र्याची नेहमीच उघड भूमिका घेत सत्तेविरुद्धही बंडखोर विचार मांडताना कार्नाड कचरले नाहीत. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांच्या वृत्तपत्राच्या पुनर्प्रकाशनात ते हिरिरीने सहभागी झाले. श्वसनाचा त्रास होत असताना देखील नाकात प्राणवायूच्या नळ्या असतानाही आणि गळ्यात ‘मी टू जर्बन नक्षल’ अशी पाटी घालून ते या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्या वैचारिक भूमिकेच्या विरोधात असलेल्या गटाने लंकेश यांच्या प्रमाणेच त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली होती.
नगर येथे जानेवारी 1997 मध्ये झालेल्या सत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून गिरीश कार्नाड यांनी केलेले भाषण तेव्हा खूप गाजले. तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीची प्रथमच सत्ता आली होती. आदल्याच वर्षी ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान सोहळ्यात पु. ल. देशपांडे यांनी ठोकशाहीवर टीका केली होती. त्याला बाळासाहेब ठाकरे यांनी ‘झक मारली आणि पुलंना पुरस्कार दिला’, अशी प्रतिक्रिया दिली होती. ‘सामना’मध्ये ‘मोडका पुल’ अशा शब्दांत पुलंवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते यशवंतराव गडाख स्वागताध्यक्ष असलेल्या नगरच्या साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून कार्नाड काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. कार्नाड यांनी या संमेलनात अंधपणाचे आदेश पाळणार्या सैनिकांची गोष्ट सांगून थेट उल्लेख न करताही ठाकरेंवर टीका केली. संमेलन उधळण्यासाठी जमलेल्या शिवसैनिकांना कार्नाड यांच्या भाषणातला उपहास कळण्याआधीच त्यांचे भाषण संपले होते.
सांस्कृतिक बहुविधता, धर्मनिरपेक्षता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा पुरस्कर्ता असा हा प्रतिभावंत साहित्यिक आपण गमावला आहे. धार्मिक मूलतत्त्ववादाचा गिरीश कार्नाड विरोध करीत. 1992 मधील बाबरी मशिदीचे पतन या घटनेचा त्यांनी जाहीर निषेध केला होता. तसेच हुबळी येथील ईदगाह मैदानाबद्दलच्या वादाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेकदा कडव्या हिंदुत्वाच्या बाबतीत आर.एस.एस. आणि बीजेपी आणि इतर हिंदुत्ववादी संघटना यांना त्यांनी विरोध केला होता. प्रख्यात लेखक नायपॉल यांनी मुस्लिमांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर कार्नाडांनी त्यांच्यावर टीका केली होती. अशा तर्हेने विविधतेने नटलेल्या आणि विविध सांस्कृतिक मूल्यांनी बनलेल्या भारतीय समाजात बहुविधतेचे रक्षण व्हावे, यासाठी गिरीश कार्नाड आग्रही होते. त्यांचे विचार अंनिसच्या विचाराशी मिळतेजुळते होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दहन विद्युतदाहिनीत झाले. यावेळी श्रद्धांजली व इतर कर्मकांड केले गेले नाही. अंत्यसंस्काराला फक्त त्यांचे कुटुंबीय हजर होते. अशा या आपल्या मित्राला अंनिस कुटुंबाची भावपूर्ण आदरांजली.
साहित्य, अनुवाद, पुरस्कार आणि मानसन्मान
होमी भाभा फेलोशिप : 1970-72
पद्मश्री : 1974
कर्नाटक नाटक अकादमी अध्यक्ष : 1976-78
शिकागो विद्यापीठात प्राध्यापक आणि फुलबाईड प्लेराईट इन रेसिडन्स : 1987-88
संगीत नाटक अकादमी अध्यक्ष : 1988-93
पद्मभूषण : 1992
संगीत नाटक अकादमी : विशेष फेलो 1994
मध्य प्रदेश सरकारकडून कालिदास सन्मान : 1999
भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार : 1999
युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया यांच्याकडून ऑनररी डॉक्टर ऑफ ह्युमन : 2011
वाळवा, जि. सांगली येथील ‘दलित, आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या पुढाकाराने.
कन्नड नाटके :-
ययाति, तुघलक, हयवदन, अंजु मल्लिगे, नागमंडल, तलेदंड, टिपू सुलतान कंड कनसु इत्यादी.
इंग्रजी नाटके :-
तुघलक, हयवदन, नाग मंडल, तलेदंड, वेडिंग अल्बम, द फायर अँड द रेन, द ड्रीम्स ऑफ टिपू सुल्तान, ययाति
अनुवाद :-
बादल सरकार यांचे एवं इंद्रजित इंग्रजीत
महेश एलकुंचवार यांची मराठी नाटके कन्नडमध्ये
तुघलकचा हंगेरियन स्पॅनिश, जर्मन अनुवाद
नागमंडलचा पॉलिश भाषेत अनुवाद