बंडोपंत दातरंगे
महाराष्ट्र अंनिसचे नाशिकचे ज्येष्ठ कार्यकर्ते महेंद्र दातरंगे यांचे वडील बंडोपंत दातरंगे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, एक मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. निधनासमयी त्यांचे वय 92 वर्षेहोते. त्यावेळच्या नाशिक नगरपालिकेत उच्च पदावर कार्यरत राहून त्यांनी त्यांच्या सेवेत कामाचा वेगळा ठसा उमटविला होता. कवितालेखन, वाचन व श्रवण करणे हा त्यांचा आवडीचा छंद होता. विद्युत दाहिनीत देहविसर्जन करण्याचा निर्णय दातरंगे कुटुंबीयांना घेतला. त्याचवेळी, इतर कोणतेही धार्मिक कर्मकांड, विधी केले जाणार नाहीत, असे तेथेच जाहीर करण्यात आले; मात्र अनाथालयातील जवळपास 100 गरजूंना कुटुंबातर्फे मिष्टान्न-भोजन दातरंगे कुटुंबीयांनी दिले; तसेच वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजनही नाशिकच्या संदर्भ सेवा हॉस्पिटलच्या रक्तपेढीत केले होते. त्या ठिकाणी दातरंगे कुटुंबीयातील काही सदस्य, अंनिसचे कार्यकर्तेव इतर आप्त-मित्र यांनी एकूण 20 जणांनी रक्तदान केले. दरम्यान महा.अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह नाशिकच्या सर्व कार्यकर्त्यांनी कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले. कर्मकांडाला फाटा देऊन, समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल कुटुंबाचे अभिनंदन केले.
सुधीर धुमाळ
नाशिक जिल्हा अंनिसचे माजी जिल्हा प्रधान सचिव आर्कि. सुधीर धुमाळ यांचे 18 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांचे वय 53 वर्षेहोते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. एवढा दु:खाचा डोंगर कोसळला तरी त्यांच्या पत्नीने सुधीर यांचे नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे नेत्रदान करण्यात आले. सुधीर धुमाळ यांच्या वडिलांचे मरणोत्तर नेत्रदान धुमाळ यांनी करविले होते. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह नाशिकच्या सर्व अंनिस व समविचारी कार्यकर्त्यांनी कुुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले. शोकसभेचेही आयोजन करण्यात आले. अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात आली.
आसराबाई भुयागळे
कन्नड (जि. औरंगाबाद) येथील अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्तेव्ही. सी. भुयागळे यांच्या मातोश्री आसराबाई चिमाजी भुयागळे (वय 93 वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची मुले आणि नातवंडांनी पारंपरिक अस्थी विसर्जनाच्या विधीस फाटा देत तेराव्याचा कार्यक्रम हा वृक्षारोपण; तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजासमोर एक वेगळा पायंडा रचला आहे. आसराबाई यांची मुले व्ही. सी. भुयागळे, एल. सी. भुयागळे हे सेवानिवृत्त आहेत. दोन्ही मुले आणि नातवंडे संतोष व सतीश भुयागळे यांनी अस्थी विसर्जनामुळे प्रदूषण होऊ नये, यासाठी अस्थी विसर्जन न करता वृक्षारोपण केले. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला; तसेच समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी आसराबाई यांचा मोठा मुलगा व्ही. सी. भुयागळे यांनी यावेळी देहदास, अवयव दान करण्याचा निर्णय घेतला असून, तसा फॉर्म भरून दिला. भुयागळे कुटुंबीयांनी जुन्या रुढी-परंपरेला छेद देत प्रदूषण रोखण्यासाठी नवीन पायंडा रचला. आईची आठवण राहावी; तसेच आईने मुलांचे शिक्षण पूर्ण केले. सतत त्याची प्रेरणा मिळावी, यासाठी वृक्षारोपण केले.